Sunday, January 23, 2022

 अवैधरित्या मद्य साठवणूक विरोधातील धडक कारवाईत

20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूबंदी गुन्ह्याखाली मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून 20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कातिलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 1800833333 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 02462-287616 वर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. 

धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठवून नंतर त्या वाहनाची तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलीसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलीसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात 2 ठिकाणी जप्त केला आहे. या गुन्ह्यात 3 आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवसाची कोठडी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक ए. एम. पठाण हे करीत आहेत. 

ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर विभागाच्या पथकाने निरीक्षक ए. एम. पठाण, दुय्यम निरीक्षक रामलिंग सुर्यवंशी, स. दु. नि. शिवाजी कोरनुळे, जवान उज्जल सदावर्ते, जवान नि वाहन चालक फाजिल खतिब यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. ही कारवाई दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, हरि पाकलवाड, ए. जी. शिंदे, मो. रफी, बालाजी पवार, विकास नामवाड, परमेश्वर नांदुसेकर, आर. बी. फाळके, शिवदास नंदगावे, दिलीप जाधव यांनी मदत केली.

000000

 घोडज येथील कामेश्वर या बालकाशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021 साठी नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांची निवड झालेली आहे. भारतातील निवड झालेल्या राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांची आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. कामेश्वरच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांचा एक प्रकारे गौरव झाला असून याबद्दल कामेश्वरचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

000000



सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, दंत चिकित्सा महाविद्यालयाची उपलब्धता करून देऊ
- पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठा आहे. येथील प्रत्येक तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा नांदेड येथील आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही गंभीर आजार झाले तर त्यांना त्यावर उपचार घेणेही परवडत नाही, हे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधा अधिक भक्कम करू, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 200 विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृहाचे भूमीपूजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार मोहनअण्णा हंबर्डे, सदस्य आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे, डॉ. करुणा जमदाडे, डॉ. दि. बा. जोशी, आशाताई शिंदे आदींची उपस्थिती होती.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण असले पाहिजे. याचबरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी घेतांना त्यांचेही आरोग्य सदृढ राहिले पाहिजे, हे लक्षात घेऊन शेजारीच असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यभागी क्रीडा संकुल विकसीत करता येईल का याबाबत आम्ही प्रयत्न करू. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्या प्रामुख्याने कोविड-19 साठी आपण नव्यानेच उभारल्या. यात कोविड वार्ड, लहान मुलांचा वार्ड, दवाखाण्यातील वापरलेले पाण्यावर प्रक्रिया करुन त्याला निसर्गपूरक करण्यासाठी उभारण्यात आलेला मलनिस्सारण प्रकल्प, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर या सुविधांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. जे करू ते चांगलेच करू, यात तडजोड नाही असे स्पष्ट करून या सुविधा पुरेशा नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. येत्या काही दिवसात याठिकाणी चागल्या दर्जाचे कॅन्सर उपचार केंद्र व्हावे, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, दंतचिकित्सा महाविद्यालयाच्या इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर योग्य ती पावले उचलू असे सूचक विधानही त्यांनी केले.

याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहाला भरघोस 19 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. येथील नवीन प्रशासकीय इमारतीला चांगल्या सुविधाजनक कार्यपद्धती डोळ्यापुढे ठेवून फर्नीचरही देण्यात आले आहे. आपल्या नांदेड येथे साकारलेले वैद्यकीय हब लक्षात घेता चांगल्या नर्स ही उपलब्ध व्हाव्यात यासाठी नर्सींग कॉलेजही आपण येत्या शैक्षणीक वर्षापासून सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले तर आभार बोडके यांनी मानले.

00000




Saturday, January 22, 2022

 नांदेड जिल्ह्यात 857 व्यक्ती कोरोना बाधित

तर 619 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 258 अहवालापैकी 857 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 749 तर अँटिजेन तपासणीद्वारे 108 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 97 हजार 709 एवढी झाली असून यातील 91 हजार 1 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 50 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 454, नांदेड ग्रामीण 56, भोकर 5, देगलूर 25, धर्माबाद 4, कंधार 19, हदगाव 2, किनवट 53, लोहा 21, मुदखेड 5, मुखेड 13, नायगाव 8, हिमायतनगर 12, बिलोली 8, उमरी 4, अर्धापूर 2, माहूर 5, हिंगोली 9, परभणी 19, अकोला 1, पुसद 2, निझामाबाद 3, आदिलाबाद 1, लातूर 10, जालना 3, उस्मानाबाद 1, बीड 1, बुलढाणा 1, औरंगाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 26, नांदेड ग्रामीण 7, बिलोली 14, देगलूर 6, धर्माबाद 8, किनवट 31, माहूर 3, नायगाव 8, उमरी 2, हदगाव 3 असे एकुण 857 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 566, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 47, खाजगी रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 619 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 743, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 248, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 26, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 50 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 30 हजार 46

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 17 हजार 536

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 97 हजार 709

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 91 हजार 1

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.13 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-145

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 50

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 आरोग्याच्या सुविधेत कमतरता पडू देणार नाही

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·         भोकर तालुक्यातील विविध विकास कामांचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भुमीपूजन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- गत दोन वर्षात कोविड-19 सारख्या आव्हानातून सावरत आहोत. आरोग्याच्या या संकटाशी सामना करतांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व सेवा-सुविधेत कोणतीही कमतरता पडणार नाही याची खबरदारी आपण घेतली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करण्यावर आम्ही अधिक भर दिला आहे. आरोग्य, पिण्याचे पाणी, सुधा प्रकल्पासह पिंपळढोह प्रकल्पाची उंची वाढवून पाण्याचे नियोजन भक्कम करणे, गाव तिथे स्मशानभूमी, पांदण रस्त्यांचा विकास एवढी महत्वाची कामे डोळ्यासमोर ठेवून यात अधिक चांगला बदल येत्या काही दिवसातच तुम्हा सर्वांच्या प्रत्ययास येईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

मोजे सावरगावमाळ येथे प्राथमिक उपकेंद्राच्या नवीन इमारतीसाठी गावात जागा उपलब्ध नव्हती. गावातील आरोग्याच्या सुविधेला अधिक नव्या स्वरुपात करता यावे, नव्या इमारतीला जागा मिळावी या उदात्त हेतूने गावातीलच बालाजी विठोबा कोल्हाटकर व त्यांच्या परिवाराने त्यांच्या मालकीची असलेली 5 गुंठे जमीन गावाच्या सेवेपोटी दवाखाण्यास विनामोबदला उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या निर्णयाचे आणि सामाजिक कृतज्ञतेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर कौतूक करून यथोचित सत्कार केला.

 

भोकर तालुक्यातील सावरगाव माळ व पाळज आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते गावकऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. प्रत्येकी 80 लक्ष रुपये खर्चून सावरगावमाळ व पाळज येथे परिसरातील गावकऱ्यांच्या सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नवीन उपकेंद्र इमारत बांधकाम करण्यात येत आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, भोकर पंचायत समितीच्या सभापती सौ. निता रावलोड, गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर, भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा या राज्य पातळीवर चांगल्या दर्जाच्या निर्माण केल्या जात आहेत. आपल्या शासकीय महाविद्यालयाच्या सेवा-सुविधांपासून जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत, त्या ठिकाणी सिटी स्कॅन सारख्या नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधा, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना एक्सरेच्या मशीन्स, प्रत्येक तालुक्यात गरजू रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नवीन घेण्यात आलेल्या 62 रुग्णवाहिका यातून मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो. भोकर येथे 100 खाटांचे नवीन रुग्णालय आपण उभारत असून तालुक्यातील जनतेला आता भोकरमध्येच आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होत असल्याने मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत सक्षम आरोग्य यंत्रणा आपण उभी करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

भोकर व इतर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे याची मला कल्पना आहे. मागील चार वर्षांपासून याविषयीचा मी सातत्याने पाठपुरावा करून मागील वर्षी सुधा प्रकल्प, पिंपळढोह प्रकल्प यांची उंची वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. ही उंची वाढविल्यामुळे आता पाण्याचा साठाही अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. या दोन प्रकल्पांसह इतर जलसंधारणाच्या प्रकल्पाबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला आहे. याबाबत आवश्यक ते शासन निर्णयही निर्गमीत झाले असून येत्या काही दिवसात या कामाचेही भूमीपूजन करून त्यात नवा बदल तुम्हाला दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

या भूमीपूजन समारंभा पाठोपाठ पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी धावरी, थेरबन, किनी, पाळज ते राज्य सिमा रस्त्याच्या रुंदीकरणासह सीसी रस्त्यासह सुधारणा करणे, सावरगावमाळ ते देवठाणा रस्त्यावरी लहान पुलांचे बांधकाम, सोमठाना-पाळज-दिवशी रस्त्याची सुधारणा, नांदा (मप) ते रावणगाव रस्त्यावरील लहान पुलाचे व रस्त्याचे बांधकाम, पाळज येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम, रावणगाव येथे सभागृहाचे बांधकाम आणि तेथीलच ग्रामपंचायतीच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

00000






 

Friday, January 21, 2022

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

नांदेड जिल्ह्यातील विकास कामांचे कौतुक

 जिल्ह्याच्या विकास कामांना वाढीव निधी उपलब्ध करून घेवू

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सोळा तालुक्यांसह अनेक वैविध्य असलेल्या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेद्वारे समतोल विकास साध्य करण्याचे आव्हान नांदेड जिल्ह्याने यशस्वी पैलून दाखविले. गतवर्षी नांदेड जिल्ह्याच्या मंजूर प्रारुप आराखड्यानुसार आरोग्याच्या सेवा-सुविधांसह एकात्मिक विकासाच्यादृष्टिनेही चांगले काम झाले आहे. नाविन्यपूर्ण योजनेद्वारे विकासाचे नवे स्वरूपही दिसून आले आहे. जिल्ह्यातील या उपक्रमाचे कौतूक करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2022-23 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेला इतर जिल्ह्यांचा आढावा घेऊन वाढीव तरतूद उपलब्ध करून देऊ असे सांगितले. 

नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड येथून आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व इतर अधिकारी बैठकीस उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा सचित्र आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत सादर केला. यात श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीन, अद्ययावत कोविड-19 वार्ड, नांदेड जिल्ह्यात 14 मॉडिलर ऑपरेशन थेअटर, जिल्ह्यातील सर्व भागांना आरोग्य सुविधेशी जुळता यावे या उद्देशाने 62 नवीन रुग्णवाहिकांची खरेदी, प्रत्येक तालुक्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता एक्सरे मशीन्स, महिला रुग्णालय येथे अद्ययावत सोनोग्राफी कक्ष, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे अद्ययावत कोविड अतिदक्षता बालरोग कक्ष, मिशन स्वास्थ अंतर्गत क्रीडा सुविधांवर भर, नाविन्यपूर्ण योजना व लोकसहभागातून महसूल कॉलनी येथे 3 सिंथेटिक टेनिस कोर्ट, जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक 3 बॅडमिंटन कोर्ट, जिल्ह्यात शासकीय कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खुल्या जागेत ओपन जीम, नांदेड क्लब येथे हेरीटेज रोड, पाच नगरपरिषदांकरीता अत्याधुनिक अग्निशमन वाहन, नांदेड जिल्ह्यातील रुग्णालय, मनपा व नगरपरिषदांमध्ये विकेंद्रीत मलनिस्सारण केंद्राची उभारणी, नियोजन भवन येथे विविध बैठका, परिषदा यादृष्टिने व्हिडिओ कॉन्फरन्सकरीता डिजिटल एलईडी डिस्पले, सहस्त्रकुंड येथे मेगा ॲडव्हेन्चर स्पोर्ट आदी  उपलब्ध असलेल्या निधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून साध्य करुन दाखविता आली असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

कोरोना सारख्या आरोग्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सक्षम करण्यासह एकात्मिक जिल्हा विकासालाही समतोल न्याय दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेतांना माहिती दिली. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2022-23 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी भरीव वाढीव तरतूद मिळावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जिल्हा नियोजन विभागाने जिल्ह्यासाठी 303.52 कोटी मर्यादेत आराखडा सादर करण्याचे निर्देशीत केले होते. तथापि जिल्ह्याचा विस्तार व विकास कामांची अत्यावश्यकता लक्षात घेता वाढीव तरतुदीचा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी धरला.

00000










 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

शनिवार 22 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.30 वा. सावरगावमाळ आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. पाळज आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भुमीपूजन समारंभास उपस्थिती.

 

रविवार 23 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील परिसरात दोनशे मुलांच्या वसतीगृहाच्या बांधकामाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. भोकर पाणी टंचाई आराखडा बैठकीस उपस्थिती. स्थळ नियोजन भवन नांदेड.

 

सोमवार 24 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वा. बैठकीसाठी राखीव. स्थळ नियोजन भवन नांदेड.

 

मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वा. अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील विविध विकास कामाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजन/लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वा. अर्धापूर ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.

 

बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. स्थळ पोलीस मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद नांदेड. दुपारी 1.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.  

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...