Saturday, November 7, 2020

 

बारावी-दहावी लेखी परीक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा शिवाजीनगर पुणे यांच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात येणार आहे. यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर विभागीय मंडळात 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. 

नियुक्ती करण्यात आलेल्या मंडळ अधिकारी / कर्मचारी यांची माहिती पुढील प्रमाणे असून विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडी अडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव यांनी कळविले आहे. 

इयत्ता बारावी लेखी परीक्षेचा कालावधी 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 पर्यंत सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत एच. पी. (व.अ.) कोणेरी भ्र. 9527295491, दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत एम. व्ही. केंद्र (प.लि) 73508431111, रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत एस. सी. आरसुलवाड (क.लि) 7767825495 हा  भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांक. 

इयत्ता दहावी लेखी परीक्षेचा कालावधी 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 पर्यंत एन. एन. (व.अ.) डूकरे यांना सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत 8379072565. ए. पी. चवरे (सा.अ.) दुपारी 2 ते रात्री 10 यावेळेत 9421765683. रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत जाधवर एम. डी. (प.लि.) 8855865435 संपर्क करावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

00000

 

दहावी, बारावी परीक्षेसाठी

समुपदेशकाची नियुक्ती 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता बारावीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 

विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांकावर समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

00000

 

दहावी व बारावी 2021 परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट

होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज करावीत 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आालेली आहे. 

त्यानुसार 2021 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरुन घेण्यात येणार असून त्यासाठी पुढे नमूद केलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे. 

इयत्ता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.  नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी तारखा सोमवार 2 ते शनिवार 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे. मंगळवार 3 ते सोमवार 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज ऑलनाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे. शुक्रवार 4 डिसेंबर 2020 रोजी संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे याप्रमाणे तपशील आहे.   

शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धारण्यात यावा. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावी,  इयत्ता बारावीचा फेब्रुवारी-मार्च 2020 चा निकाल जुलैमध्ये लागलेला असल्याने, खाजगी विद्यार्थी ऑनलाईन नाव नोंदणीबाबत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा-कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख 30 सप्टेंबर, 2020 अशी ग्राह्य धरण्यात यावी. हा बदल कोविड-19 मुळे फक्त 2021 च्या परीक्षेपुरताच लागू राहील. परंतू विद्यार्थ्यांच्या वयासाठी 30 जून 2020 ही तारीख राहील. 

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्यावाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावी साठी  http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in  हे आहे. 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.   इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क राहिल. 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र  ( इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यामापन करावयाचे आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यायाना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. 

इयत्ता दहावी , इयत्ता बारावी- 2021 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतूनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणो आवश्यक आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

00000


 

मोटार सायकलसाठी

एमएच 26-बीव्ही ही नविन मालिका 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- मोटार सायकलसाठी एमएच 26-बीव्ही (MH 26-BV) ही नविन मालिका बुधवार 11 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होत आहे.  ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज बुधवार 11 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुरुवार 12 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30  वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व लिखित संदेशाद्वारे (Text message) संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. संबंधितांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 

पक्षी सप्ताहनिमित्त हरण खरब येथे

जिल्हाधिकाऱ्यांसह निसर्ग मित्रांचे पक्षीनिरिक्षण 

 

नांदेड जिल्ह्यातील हरण खरब देतोय पर्यटकांना साद 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- किनवट तालुक्यातील अनेक जैववैविध्य असलेल्या पर्यटनस्थळापैकी हरणांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हरण खरब थंडीच्या वैशिष्ट्यासह पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने निसर्ग, पर्यावरण आणि पक्षांप्रती जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हरण खरब येथे दि. 6 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील निसर्गप्रेमींनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, भा.व.से.च्या प्रोबेशनरी अधिकारी मधुमिता यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षी निरिक्षणासह येथील जल व मृद संधारणाच्या विविध कामांचाही आढावा घेतला. 

नुकतीच सुरु झालेली थंडी, सुर्योदयावेळी हलकेशी पडणारी धुक्याची चादर, पशू-पक्षांमध्ये सुर्योदयामुळे संचारलेली ऊर्जा याचा अनोखा मिलाप येथे पर्यटकांना वेगळा अनुभव देऊन गेला. जवळच असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्यातून कोसळणारे पाणी वळसा घेत हरण खरबच्या परिसरातून पेनगंगेद्वारे पुढे मार्गस्थ होत असल्याने इथल्या जैवविविधतेत पडणारी भर याचा एकत्रित परिणाम इथल्या पक्षांच्या विविध प्रजातीतही आढळून येतो. एरवी सर्वत्र आढळणाऱ्या चिमन्यांसह घार, पोपट, कोकिळा, कावळा, मोर, सुतारपक्षी, पावश्या, बगळा, घुबड, वटवागूळ, टिटवी, भारद्वाज, पानकोंबडी, पारवा, किंगफिसर, तीतर, लावरू, होला (हुलगा), बहिरी ससाणा, गिधाड, लांडोर, मोठा बगळा, साळुंकी, मैना, गुंगी, बुलबुल या सर्व पक्षांची मांदियाळी या परिसरात आढळून येते. 

पक्षीनिरिक्षणासाठी सकाळची वेळ ही अधिक सोईची असून यावेळी विविध प्रकारचे पक्षी आपणास सहज आढळून येतात. याचबरोबर पक्षांचे विविध आवाजही अधिक स्पष्टपणे जाणवतात, असे उपवनसंरक्षक अधिकारी राजेश्वर सातेलीकर यांनी सांगितले. सहायक जिल्हाधिकारी  किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या परिसरातील वनविभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.  

0000





Friday, November 6, 2020

 

56  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

41 कोरोना बाधितांची भर  तर दोघांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- शुक्रवार 6 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 56 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 41 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 21 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 96 अहवालापैकी  1 हजार 48 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 378 एवढी झाली असून यातील  18  हजार 255 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 436 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 24 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार दोन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी बिलालनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, शुक्रवार 6 नोव्हेंबर 2020 होळी नांदेड येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 521 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 13, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 17, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 11, खाजगी रुग्णालय 8,  बिलोली कोविड केअर सेटर व गृहविलगीकरण 4 असे एकूण 56 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 16, हदगाव तालुक्यात 1, मुखेड 3, देगलूर 1 असे एकुण 21 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 7, मुदखेड तालुक्यात 5, देगलूर 2, हिमायतनगर 1, नांदेड ग्रामीण 1, भोकर 2, कंधार 1, परभणी 1 असे एकूण 20 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 436 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 42, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 138, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 23, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 17, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 17, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 17, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 51 आहेत.  

शुक्रवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 19 हजार 740

निगेटिव्ह स्वॅब- 96 हजार 830

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 378

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 255

एकूण मृत्यू संख्या- 521

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 501

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 436

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 24. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

 

मिपा रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती

निमित्त वेबिनार संपन्न 

औरंगाबाद, दिनांक 6(विमाका) :- मिपा संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि नेतृत्व यावर चर्चा घडवून आणण्याचा महत्वाचा उपक्रम घडवून आणला या बद्दल अभिनंदन करत त्रिभाषासूत्र अवलंबिणे, मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देणे, आदिवासी क्षेत्रात तेथील बोली भोषेतून शिक्षण देण्यासाठी नवीन उपक्रम निर्माण करणे तसेच आनंददायी शिक्षणाचा संपूर्ण राज्यभर विस्तार करणे या करीता एकविसाव्या शतकाचा सामना करण्यासाठी कौशल्य विकास करणे गरजेचे असल्याचे सुतोवाच राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी केले.

            महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन मिपा,औरंगाबाद या संख्येने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि नेतृत्व या आधारित वेबिनार सिरीजचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे दिनकर पाटील, मिपाच्या संचालक डॉ. नेहा बी. बेलसरे यांची उपस्थिती होती.

            एकविसाव्या शतकाचा सामना करण्यासाठी कौशल्य विकासामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन त्यांचा संपुर्ण राज्यभर कसा विस्तार होईल यावर चर्चा घडावी असे सांगून श्रीमती कृष्णा म्हणाल्या की, शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणे, गरजाभिमूख प्रशिक्षण कसे व त्याचे मूल्यमापन कसे करावे, शिक्षकांची पदोन्नती, पी.टी.आर. धोरण, शाळा समूह धोरण, आदी विविध धोरणावर वेबिनार सिरीजमध्ये चर्चा घडवून यावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी  व्यक्त केली.

            राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे, दिनकर पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मिपा ही राज्याची शैक्षणिक नेतृत्व करणारी संख्या असून शिक्षण क्षेत्रात सर्व अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी मिपावर आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी चांगल्या रितीने होण्यासाठी प्रमुखांची भूमिका महत्वाची असते, जसे की , शालेय गुणवत्ता ही तेथील प्रमुख मुख्याध्यापक यावर निर्भर असते. “जसा मुख्याध्यापक तशी शाळा” या तत्वाने नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या प्रमुखांची भूमिका महत्वाची आहे. मिपा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त शुभेच्छा देऊन दिनकर पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणाची सांगता केली. 

            शिक्षण विभागाचे  आयुक्त विशाल सोळंकी आपल्या अध्यक्षीत भाषणात म्हणाले की, कोविड-19 च्या काळात वेबिनार सिरीजच्या आयोजनाने मिपा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या वेबिनार सिरीजमध्ये नवीन शैक्षणिक धोरण यावर चर्चा करण्यात येत आहे. शिक्षणांची गुणवत्ता विकसित करणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग यांना प्रशिक्षण देणे, याकरीता मिपाचे नुतनीकरणाचे कामही पूर्णत्वास आले आहे. तसेच संस्थेमार्फत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चांगले मोडयूल्स् तयार करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शैक्षिणक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या मार्फत पाच दिवसीय वेबिनार मालिका संचालक, डॉ.नेहा बी. बेलसरे यांच्या मार्गदर्शना नुसार नुकतीच संपन्न झाली. या वेबिनार सिरीजच्या यशस्वीतेसाठी वैशाली कांबळे, उपसंचालक अरुणा भूमकर व डॉ. ज्योती कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

-------------***----------------

 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...