Thursday, January 23, 2020



अल्पसंख्यांक विकास व औकाफ,
मंत्री नवाब मलिक यांचा दौरा
नांदेड, दि. 23 :- राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार 24 जानेवारी 2020 सांताक्रुझ अंतरदेशीय विमानतळ येथून विमानाने दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ॲड मोहम्मद खान पठाण प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड यांच्या निवासस्थानी राखीव. सायंकाळी 4 वा. नांदेड गुरुद्वारास भेट. दुपारी 4.30 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील. रविवार 26 जानेवारी 2020 रोजी परभणी येथून मोटारीने दुपारी 12.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 1 वा. चार्टर विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


शालेय शिक्षण मंत्री
प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा 
नांदेड, दि. 23 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शनिवार 25 जानेवारी 2020 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.45 वा. नांदेड येथे आगमन. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सकाळी 10 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. रविवार 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वा. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमानंतर संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथून मोटारीने धर्माबाद मार्गे बासरकडे प्रयाण करतील.
00000


प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी ध्वजवंदनाचा
मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर
नांदेड, दि. 23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2020 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 23 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 23 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापुर या तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात येत आहे.
केळीच्या प्लॉट  स्वच्छ व तणविरहीत ठेवावा. तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थीत करावा, पाणी साचणार नाही यांची काळजी घ्यावी. केळीच्या पानावरील ठिपके आढळल्यास तो भाग काढुन टाकावा. व बागेच्या बाहेर  नेऊन नष्ट  करावा, असे आवाहन आर. टी. सुखदेव उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या
महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास नगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या मार्फत  विनामुल्य अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे.
या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलींसाठी ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके दिली जातात. विविध वर्तमानपत्रे वाचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे चालु असून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु महिला उमेदवारांनी शासनाच्या या मोफत अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रा. सो. खंदारे सहायक यांनी केले आहे.
0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...