Friday, February 1, 2019


 दिव्यांगासाठी साहित्याचे विहित पद्धतीने अर्ज ;
संस्थेकडून प्राप्त शिफारशीचा विचार नाही
नांदेड दि. 1 :- आमदार व खासदार यांचेकडून दिव्यांगासाठी साहित्य पुरवठा करण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर विहित पद्धतीने लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. त्यामुळे आमदार व खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत साहित्य पुरवठा करण्यासाठी एखादा संस्थेकडून प्राप्त शिफारशीचा विचार करता येणार नाही. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींने अशा संस्थाकडून दिव्यांग साहित्य उपलब्ध होण्यासाठी विनंती अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास अथवा संबंधीत संस्थेकडे करु नये, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तीना आमदार व खासदार निधीतून साहित्य पुरवठा करण्यासाठी काही संस्थांकडून आमदार व खासदारांच्या नावाने शिफारस पत्र गोळा करणे चालू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
000000


सेवानिवृत्त वेतनधारकांना
सातवा वेतन आयोगानुसार वेतन प्रदान
नांदेड दि. 1 :- राज्य शासनाच्या सेवेतून 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारकांना जानेवारी 2019 चे निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगानुसार तत्परतेने वेळेत आज 1 तारखेला प्रदान करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेडचे जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात जिल्ह्यात 21 हजार पैकी 18 हजार निवृत्तीवेतनधारकांना सातवा वेतन आयोगानुसार हे वेतन देण्यात आले आहे. एक जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत निवृत्ती वेतनातील फरकाची रक्कम समान 5 हप्त्यात प्रतिवर्षी जूनमध्ये रोखीने देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 24 जानेवारी 2019 अन्वये जिल्हा कोषागार कार्यालयाने सात दिवसात 18 हजार निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्याचे काम पूर्ण केले. निवृत्तीवेतन विभागात महिला कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करुन 1 तारखेला वेतनाची अदायगी नेहमी प्रमाणे केली आहे. यासाठी अप्पर कोषागार अधिकारी विशाल हिवरे, श्री. राजे, उपकोषागार अधिकारी श्री संगवे, देशमुख, दिपक गवलवाड, सारिका सुंकेवार, योगीता मामडी, आरती बोचकरी, तृप्ती माने, किर्ती अंबरकर, माया सुर्यवंशी, गवारे, काटोडे, वसमी यांनी परिश्रम घेतले.
00000


जिल्हा रुग्णालयात ईपिलेप्सी
फेफरे / फिट्स आजाराचे मोफत शिबीर
नांदेड दि. 1 :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ईपिलेप्सी फाऊडेशन मुंबईच्या सयुंक्त विद्यमाने रविवार 10 फेब्रुवारी रोजी श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय वजिराबाद नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत भव्य ईपिलेप्सी (फेफरे/फिट्स) या आजाराबाबत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रुग्णांची न्युरोलॉंजिस्टतर्फे मोफत इसीजी चाचणी, फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, समुपदेशन व रक्त तपासणी तसेच रुग्णांसाठी मोफत औषधी देण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थी व इतर ईपिलेप्सी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ए. पी. वाघमारे यांनी केले आहे.
00000

Thursday, January 31, 2019


मागेल त्याला शेततळे योजनेची
टंचाई काळात शेतकऱ्यांना झाली मदत
योजनेत सहभागी व्हावे - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चलवदे

     
नांदेड दि. 31 :- “मागेल त्याला शेततळे” ही योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना असून शासन निर्णय  17 फेब्रुवारी 2016 नुसार नांदेड जिल्हयात ही योजना सुरु करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी “मागेल त्याला शेततळे” या योजनेत मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
या योजनेत शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज तथा संमती अनिवार्य असून शेतकऱ्यांनी त्यांची मागणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी करावयाचे अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेे आहेत.
जिल्ह्यात वार्षीक पाऊसाचे सरासरी प्रमाणे 955 मि.मि. इतके असून पावसाच्या अनियमिततेमुळे शेती करताना अडचणी, घटणारे पिकांचे उत्पादन तसेच दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी  “मागेल त्याला शेततळे” योजना ही लाभदायक ठरत आहे. या शेततळयांमुळे पावसाच्या पाण्याचा उपयोग संरक्षित सिंचन, फलोत्पादन व पुरक कृषि उद्योगासाठी (मत्स्योत्पादन) होतो. शेततळे कार्यक्रमाचा विविध विस्तार योजनांशी सांगड घालून संरक्षित सिंचनामुळे पिकाचे उत्पादनात वाढ होते.
नांदेड जिल्ह्यास 4 हजार शेततळयाचे लक्षांक देण्यात आले असून आज आखेरीस 2 हजार 44 शेतकऱ्यांनी शेततळे या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे.
            देगलूर तालुक्यातील रामपुर प.शहापुर येथील विजय पुताजी कोकणे या शेतकऱ्याने मे 2018 मध्ये शेततळयाचा लाभ घेतला. खरीप हंगामामध्ये या शेतकऱ्याने 5 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतले असून जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या 20 ते 25 दिवस पावसाच्या खंड कालावधीत शेततळयातून सोयाबीन पिकास एक संरक्षीत सिंचन देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातील घट थांबवता आली. या शेतकऱ्यांने  त्यांच्या उत्पन्नात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे सांगितले. तसेच शेततळयाला लागुन असलेल्या बोअरवेलच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे श्री. कोकणे यांनी सांगितले.
या योजनेतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयांपैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळयाची मागणी करता येते. यात जास्तीतजास्त 30 बाय 30 बाय 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 बाय 15 बाय 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येते. इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारात किमान 20 बाय 15 बाय 3 मीटर आकारमानाचे शेततळे घेता येते. आकारमानानुसार कमाल अनुदान 50 हजार रुपये इतके असून अनुदानाची रक्कम काम पूर्ण झाल्यावर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


सातारा अखिल भारतीय सैनिकी स्कूलमध्ये
इयत्ता सहावी प्रवेशासाठी पुनर्परिक्षा पेपर
        नांदेड दि. 31 :-  अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी 6 जानेवारी रोजी घेण्यात आलेला इयत्ता 6 वीचा पेपर पहिला हा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. ही परीक्षा रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे.
            या परीक्षेसाठी जे विद्यार्थी 6 जानेवारी रोजी उपस्थित होते अशा विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येईल. या पुनर्परिक्षेसाठी परीक्षा प्रवेशपत्र शाळेकडून उपलब्ध करुन दिली जातील. पुर्वी 6 जानेवारी रोजीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र स्विकारले जाणार नाही. तसेच पुनर्परिक्षेचे प्रवेशपत्र www.sainikschooladmission.in या संकेतस्थाळावरुन शुक्रवार 8 फेब्रुवारी 2019 पासून डाऊनलोड करता येतील. जे विद्यार्थी रविवार 24 फेब्रुवारी रोजी पुनर्परिक्षेला उपस्थित राहणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य यांनी केले आहे.  
000000


दहावी परीक्षेसाठी कलचाचणी,
अभिक्षता चाचणीसाठी मुदतवाढ  
        नांदेड दि. 31 :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2019 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी व अभिक्षमता चाचणी मोबाईल ॲपद्वारे आयोजित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास मंगळवार 5 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            ही चाचणी नियोजनाप्रमाणे 18 डिसेंबर 2018 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत घेण्यात आली होती. परंतू काही विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात न आल्याने तसेच नव्याने मान्यता मिळालेल्या शाळांसाठी वेळेची मर्यादा वाढविण्याबाबत कलचाचणी व अभिक्षमता चाचणीसाठी 5 फेब्रुवारी पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. याची शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
000000


हमीभावाने तूर खरेदीची नोंदणी सुरु
        नांदेड दि. 31 :- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने हंगाम 2018-19 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, देगलूर या तीन ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
            नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था- कृषी उत्पन्न बाजार समिती संगणक विभाग नवा मोंढा नांदेड, मुखेड तालुका खरेदी विक्री संघ यांचे कार्यालय मुखेड, पूर्वारेश्वर ॲग्रो प्रोइयूस कं. लि. करडखेड देगलूर- आर्य समाज मंदिर रोड जुन्या तहसीलजवळ देगलूर येथे तूर खरेदी नोंदणी सुरु आहे.  शेतकऱ्यांनी तूर नोंदणीसाठी येताना सोबत ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला सात/बारा, आधारकार्ड झेरॉक्स, आधार लिंक असलेल्या बँक पासबूकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दाड यांनी केले आहे.
0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...