Wednesday, October 24, 2018


  हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन  
नांदेड दि. 24 :- राज्य हातमाग महामंडळ नागपूर यांच्यावतीने स्पेशल हॅण्डलूम एक्स्पो 2018 नांदेड या हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 22 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर 2018 या कालावधीत सौभद्र मंगल कार्यालय चैतन्यनगर शिवमंदीर विमानतळ रोड नांदेड येथे करण्यात आले आहे.
हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ महापौर शिलाताई भवरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देवून दुर्मिळ हातमाग कापड खरेदी करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकिय संचालक विजय निमजे तसेच प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.   
या ठिकाणी राज्यातील हॅण्डलूम मार्क नोंदणीकृत सहकारी संस्था, हातमाग बचतगट, महाटेक्स इद्रायणी हॅण्डलूमचे हॅण्डलुम ब्रॅड प्राप्त हातमागाचे उत्पादित कॉटन व सिल्क कापड वेगवेगळ्या चाळीस दालनामध्ये विक्रीस ठेवण्यात आले आहे. हातमाग विणकर कारागिरांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन त्यांनी तयार केलेल्या कापडाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी अशा प्रदर्शनाचे आयोजन राज्य शासनाच्यावतीने एकाच ठिकाणी करण्यात येते. या प्रदर्शनात राज्यातील पारितोषीक प्राप्त सहकारी संस्था सहभागी झाले असून प्रदर्शनातील विक्रीस ठेवलेल्या कापडावर 20 टक्के ग्राहकांना दिवाळी सूट देण्यात येत आहे. हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


हरवलेल्या व्यक्तीबाबत आवाहन

नांदेड दि. 24 :- धनेगाव येथील खदीर पिता मकदुम शेख (वय 40 वर्षे) हा व्यक्ती 16 ऑक्टोंबर 2018 रोजी मित्रासोबत गाडीवर जातो म्हणून दुपारी 4 वाजेच्या सुमारास निघून गेला तो परत घरी आला नाही.

या हरवलेल्या इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग सावळा, बांधा मजबुत, चेहरा गोल, केस काळे, उंची 5 फुट सहा इंच, पोशाख अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाची चप्पल, भाषा मराठी, हिंदी, उर्दू समजते. अशा वर्णनाचा हरवलेला इसमाची माहिती मिळाल्यास ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
00000
व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीस सुरुवात ;
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रक्रियेची पाहणी करावी - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 24 :- व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीसाठी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत शासकीय गोदाम खुपसरवाडी येथे भेट देवून या प्रक्रियेची पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्याला एकूण 3 हजार 670 व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. यापुर्वी बॅलोट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी 22 ऑक्टोंबर पासून खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात सुरु झाली आहे.
ही प्रथमस्तरीय तपासणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बँगलोर (BEL) येथील तज्ज्ञ अभियंते तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी / कर्मचारी आणि मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत होणार आहे. ही तपासणी 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत दररोज काम पूर्ण होईपर्यंत करण्यात येणार आहे.
प्रथमस्तरीय तपासणीसाठी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या कालावधीत शासकीय गोदाम मौजे खुपसरवाडी येथे भेट देवून या प्रक्रियेची पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
0000000

केळी पिकाचा कृषि संदेश  
नांदेड दि. 24 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापूर या तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश देण्यात आला आहे.
केळीच्या झाडाच्या खालील भागातील 2-3 प्रादुर्भावग्रस्त पाने काढून टाकावीत. केळीच्या बागेस जास्तीचे पाणी देण्याचे टाळावे व बागेत पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रादुर्भावग्रसत पाने काढून टाकावीत व स्वच्छ मशागत करावी. जर पानावरील ठिपक्याचा रंग पिवळ्यावरुन काळपट होत असले तर प्रोपेकोनेझॉल 0.05 टक्के 1 मिली / 1 लि. अधिक स्टिकर 1 मिली प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. जर काळपट ठिपकेचा आकार वाढत जावून ठिपके एकमेकात मिसळून मोठा काळपट डाग होत असल्यास कार्बेन्डॅक्झिम 0.5 टक्के (0.5 ग्रॅ / लि) अधिक मिनरल ऑईल 1 टक्के 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून बागेची फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000000


कौशल्य सेतूमधील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या
विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी
अर्ज करण्यास 5 नोव्हेंबरची मुदत
नांदेड दि. 24 :- कौशल्य सेतूमधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक वर्षे 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या माध्यमिक शाळांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेता येईल.
दहावी प्रमाणपत्र परीक्षेकरीता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत परिपूर्ण व बिनचूक भरावा. या अर्जावर विहित जागेवर स्वत:ची स्वाक्षरी करावी. तसेच तो ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला इयत्ता दहावी प्रविष्ठ झाला आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची सही व शिक्का घेऊन सदर अर्ज संबंधित विभागीय मंडळात जमा करावा.
अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी सर्व परीक्षांचे गुणपत्रक व पीएमकेव्हीवाय (कौशल्य सेतू अभियान) प्रमाणपत्र इत्यादीच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी मुळ कागदपत्रावरुन पडताळणी करुन स्वाक्षरीसह प्रमाणित करणे आवश्यक आहे. अर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबत प्रक्रिया शुल्क 40 रुपये व गुणपत्रिका शुल्क 10 रुपये, असे एकुण 50 रुपये शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष / रोखीने विभागीय मंडळात जमा करावेत. धनाकर्ष डीडी विभागीय सचिव ....  विभागीय मंडळ .... यांचे नावे काढण्यात यावा. शाळांनी अर्ज 7 नोव्हेंबर 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत.
या विद्यार्थ्यांना शासन निर्णयातील तरतूदीनुसार कौशल्य सेतू अभ्यासक्रम एका कोर्ससाठी दोन विषयांचे याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देय असलेल्या एक किंवा दोन विषयासाठी (दोन भाषा व श्रेणी विषय वगळून) ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस् देण्यात येतील. मात्र या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्स माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील इयत्ता दहावी कोणत्या दोन विषयांसाठी (देय असलेल्या) घ्यावयाचे आहे. याची निश्चिती विहित नमुन्यातील अर्जात विद्यार्थ्यांने नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयातील तातुदीनुसार मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येतील. वरीलप्रमाणे ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस दिल्यानंतरही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास तो उर्वरित विषयासाठी पुनर्पपरीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ होऊ शकेल. ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस घेऊन विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यास पुन्हा मंडळाच्या या परीक्षेला नियमित अथवा पुनर्पपरीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ होऊ शकणार नाही.
शैक्षणिक वर्षे 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासन निर्णयातील तरतुदींचा लाभ घेण्यासाठी विहित कार्यपद्धतीनुसार अर्ज करावेत व संबंधित माध्यमिक शाळांनी या प्रकरणी वेळेत कार्यवाही करुन सहकार्य करावे, असे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे.
000000

Tuesday, October 23, 2018


नदीपात्रापासून पाचशे मीटरच्या आत
माती उत्खनन करण्यास प्रतिबंध 
नांदेड, दि. 23 :- वीटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकर, वीटभट्टी चालक यांना नांदेड जिल्हा हद्दीतील वाहणाऱ्या सर्व नदीपात्रापासून 500 मीटरच्या आत दोन्ही बाजुनी नदी काठा लगत असणाऱ्या खाजगी / शासकीय मालकीच्या शेतामध्ये माती उत्खनन करण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढला आहे.
जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 23 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 20 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्री पर्यंत हा आदेश लागू केला आहे.    
00000


विष्णुपूरी प्रकल्प जलाशय काठावरील बागायतदारांना
दोन पाळ्यासाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन
                    नांदेड, दि. 23 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशयाच्या काठावरील लाभक्षेत्रात अधिकृत परवानाधारक बागायतदारांना मंजुर क्षेत्रास रब्बी हंगाम 2018-19 मध्ये दोन पाळ्यात पाणी उचलता येणार आहे. अधिकृत परवानाधारक बागायतदारांनी नमुना नं.7 (अ) मध्ये पाणी अर्ज भरुन दिल्यास शासन नियमानुसार पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने केले आहे.
               शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातील सन 2018-19 यावर्षी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे दृष्टीकोनातुन 16 ऑक्टोंबर 2018 रोजी  मंत्री जलसंपदा यांचे अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या प्रकल्पात 16 सप्टेंबर 2018 रोजी शंभर टक्के पाणीसाठा होता. दिनांक 20 ऑक्टोंबर 2018 रोजी विष्णुपूरी जलाशयात 79.94 टक्के एवढा पाणीसाठा आहे. याप्रमाणे जलाशयातील पाण्याचा वापर झाल्यास विष्णुपूरी प्रकल्पातील पाणीसाठा फेब्रुवारी 2019 अखेर पुर्णपणे संपेल त्यामुळे नांदेड शहर व परिसरातील ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
               कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशयाच्या काठावरील लाभक्षेत्रात फ़क्त अधिकृत परवानाधारक बागायतदारांना मंजुर क्षेत्रास रब्बी हंगाम 2018-19 मध्ये दोन पाळ्यात पाणी उचलता येणार आहे.  पाणी उचलण्याचा कालावधी पुढील प्रमाणे आहे. प्रथम पाणीपाळी 1 ते 15 नोव्हेंबर 2018 तर द्वितीय पाणीपाळी  1 ते 15 डिसेंबर 2018 हा आहे.  केवळ या पाणीपाळी कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडुन विज पुरवठा चालु ठेवण्यात येणार आहे.                दिनांक 16 ते 30 नोव्हेंबर 2018 व दिनांक 16 डिसेंबर 2018 पासुन पावसाळा 2019 मध्ये जलाशयात समाधानकारक  पाणीसाठा येईपर्यंत विद्युत पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे.
               जिल्हाधिकारी नांदेड यांचे 15 ऑक्टोंबर 2018 च्या आदेशानुसार अनाधिकृत उपसा पुर्णपणे बंद करण्यासाठी आवश्यकतेनुसार विद्युत मोटारी / डिझेल पंप जप्तीची कार्यवाही करण्यात येईल तेंव्हा अधिकृत परवानाधारक बागायतदारांनी नमुना नं.7 (अ) मध्ये पाणी अर्ज भरुन दिल्यास खालील दर्शविलेल्या शर्तीचे अधीन राहुन प्रचलीत शासन नियमानुसार पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल.
               पाणी अर्जाचा विहीत नमुना क्रं. 7 (अ) संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य  मिळेल. सदर पाणी अर्जात पिकाची मागणी विस आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पुर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात दाखल करुन त्याची पोच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरते वेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालू  पिकाची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे.  म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल. मंजुर क्षेत्रास जलाशयाचे पाणी अग्रक्रमाणे घेता येईल नामंजुर व अनाधिकृत क्षेत्रास पाणी घेता येणार नाही. तेंव्हा मंजुरी घेऊन पिकांचे  नियोजन करावे. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपतीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाणे  टाळावा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक रहातील.
               नामंजुर क्षेत्रावरील उभ्या हंगामी / बारमाही पिकाचे पाण्याअभावी नुकसान झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही याची सर्व बागायतदारांनी नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार पाणी टंचाईची भिषण परिस्थिती विचारात घेऊन प्रकल्पातील पिण्यासाठीचा पाणीसाठा राखीव ठेवण्यास प्रत्येक बागायतदाराने सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेडचे कार्यकारी अभियंता मु. मो. कहाळेकर यांनी केले आहे.  
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...