Monday, September 24, 2018


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 24 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 सप्टेंबर 2018 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 ऑक्टोंबर 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.  
00000

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित
अर्जावर कार्यवाही करण्याचे आवाहन
नांदेड दि. 24 :- महाविद्यालय संस्थेत ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती / फ्रीशीपचे अर्ज ऑनलाईन भरलेले आहेत. ( सन 2011-12 ते 2016-17) अशाच सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. महाईस्कॉल पोर्टल काही मर्यादीत कालावधीसाठी सुरु असल्याने महाविद्यालयीन स्तरावरील ऑनलाईन प्रक्रिया करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. सन 2011-12 पासून राज्यामध्ये महाविद्यालयीन स्तरावर एकुण 1 लाख 42 हजार 228 अर्ज प्रलंबित आहेत ते निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर 2018 पर्यंत संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रलंबित पात्र व परिपुर्ण अर्जासह व बी स्टेटमेंट ऑनलाईन सादर न केल्यास प्रलंबित अर्ज रद्द झाल्याचे समजण्यात येतील. हे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीमधून काढून टाकण्यात येतील तसेच या विद्यार्थ्यांनी प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क अदा करण्याची जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही याची सर्व संबंधित प्राचार्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000000

जिल्हा उद्योग केंद्राच्या
विविध सभांचे 28 सप्टेंबरला आयोजन
नांदेड दि. 24 :-  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या विविध सभा जिल्हा उद्योग मित्र समिती सभा जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजार  उद्योग पुनर्जिवन जिल्हास्तरीय समिती सभा शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


रास्तभाव धान्य दुकानात
तीन महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 24 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने सप्टेंबर, ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2018 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 1902.5 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड - 162.5 , हदगाव- 91.5, किनवट- 458.5, भोकर-89, बिलोली- 64.5, देगलूर- 135.5, मुखेड- 201.5, कंधार- 18, लोहा- 124.5, अर्धापूर- 17.5, हिमायतनगर- 30.5, माहूर- 196, उमरी- 84.5, धर्माबाद- 76, नायगाव- 114.5, मुदखेड- 38 याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.
0000000

Sunday, September 23, 2018


महाराष्ट्र विधान परिषद
विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 23 :- महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 24 सप्टेंबर 2018 रोजी परळी वैजनाथ येथून सकाळी 10 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून Trujet 2T-413  या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


"आयुष्यमान भारत" योजना वंचित गरिबांसाठी
लाभदायक ; आरोग्य सुविधेचा मोफत लाभ घ्यावा 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 23 :- आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वंचित गरिबांसाठी लाभदायक असून यात मोफत आरोग्य उपचार मिळणार आहेत. या आरोग्य सुविधेचा गरीब पात्र कुटुंबांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.    
सर्वांना आरोग्य चांगले मिळावे यासाठी आज देशभरात आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे करण्यात आला. या योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, श्री. धनगे, संतोष बोडलेवार, पंचायत समिती सभापती मायाताई राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, केंद्र शासनाने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1 हजार 349 आजारांचे उपचार निश्चित केले आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 971 आजारांचा या उपचारात समावेश केला आहे. या दोन्ही योजनेतील उपचारांचा आढावा घेऊन यादी तयार करण्यात आली आहे. ई-कार्डद्वारे लाभार्थी कुटुंबाना या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. एका कुटुंबाला प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. योजनेंतर्गत त्या कुटुंबाला ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील. आरोग्य व शिक्षण चांगले राहिले तर गावाचा विकास होतो, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसात तालुका, गाव व वार्डनिहाय सर्व लाभार्थ्यांना ई-कार्ड देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.  
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांनी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आरोग्य उपचाराचा मोफत लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.    
 झारखंड रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला. त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील 10 लाभार्थ्यांना ई-कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.    
प्रास्ताविकात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी या योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 77 हजार 999 कुटुंब पात्र आहेत अशी माहिती दिली. तर सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी व उपजिल्हा रुग्णालय मुखेड या दोन रुग्णालयात या योजनेत उपचार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गादास रोडे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आशा कार्यकर्ती, आरोग्य मित्र, नागरिक उपस्थित होते. 
00000

Saturday, September 22, 2018

लेख - महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासीक उपक्रम जनता व शासनातला संवाद म्हणजे "लोकराज्य"


महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासीक उपक्रम
जनता व शासनातला संवाद म्हणजे "लोकराज्य"
         
कोणतेही शासन हे लोकाभिमुख असावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. महाराष्ट्र शासनाने गेल्या 70 वर्षांपासून सातत्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि काळाची पावले ओळखत छपाई तंत्रज्ञानाची सांगड घालत "लोकराज्य"चा आकर्षक, दर्जेदार, वेगवेगळ्या विषयांना समर्पित असा अंक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नांना एक नियमित वाचक म्हणून सलाम करावा वाटतो. खरे तर महाराष्ट्र शासनाचा हा एक ऐतिहासीक उपक्रमच असून जनता-जनार्दन व शासनातला संवादरुपी दुवा म्हणजे "लोकराज्य" होय.
       मासिक सातत्याने चालवणे तसे एक महान कार्य. माझा प्रिंट मीडियातील दैनिकात काम करण्याचा 20 वर्षांचा अनुभव. अंकातील सातत्य, गुणात्मकता, विविध विषयांची त्या-त्या प्रसंगी मिळविलेली अधिकृत आकडेवारी, जोडीला रंगसंगती, आकर्षक व दर्जेदार छायाचित्रे, अंकाची वेगळ्या व डोळ्यांची पारणे फेडणारी मांडणी, टाईपफाँड आदी वाखण्याजोगेच आहे. एखादे मासिक शासनामार्फत प्रसिद्ध होते म्हणजे केवळ शासनाची वाहवा करणारे असेल, अशी काहींची समजूत होते; परंतु "लोकराज्य" हे याबाबी पासून बऱ्याच अंशी दूर राहिलेले आहे हे प्रकर्षाने जाणवते. जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठी घेतलेले शासनाचे निर्णय जनतेकरिता सुरु केलेल्या "लोकराज्य" मधून मांडणे हे क्रमप्राप्त नव्हे तर ते प्रथम कर्तव्यच होय. यात कुणाचा बडेजाव वैगैरे काही नव्हे !
      
गत वर्षभरातील अंकाचा धुडोंळा घेतला तर त्यामध्ये फेब्रुवारीतील साहित्य संमेलन, मराठी भाषेला समर्पित अंक प्रसिद्ध करणे एखाद्या दैनिकाला, साप्ताहिकाला किंवा अन्य मासिकाला सध्याच्या कार्पोरेट जगतात, जाहिरातींच्या युगात शक्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. मार्च महिन्याचा "अस्मिता" माझा गौरव, माझा हक्क हा महिलांविषयी योजना व कायदे, सुरक्षा ॲप्स, यशकथा अंक वाचनीय आहे. वाचकांची एखाद्या विषयाची सर्व विषयव्यापी भूख भागवण्याचे काम "लोकराज्य" मासिक करते आहे. त्याबद्दल गौरवौद्-गारास संपूर्ण टीम पात्र आहे. "लोकराज्य" चे काम टीमरुपी आहे. त्याला शासनाची भरभक्कम साथ व पाठिंबा आहे. त्यामुळे वाचकांना काय हवे आहे ते देण्याचा प्रयत्न अनेक प्रसिद्ध झालेल्या अंकामधून प्रकर्षाने जाणवतो.
       एप्रिल 2018 च्या अंकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत तब्बल 92 पाणी दर्जेदार अंक वाचकांच्या हाती देणे हे खरेच मोठे कौतुकास्पद काम "लोकराज्य" ने केले आहे. "लोकराज्य" मासिकातून केवळ शासनाची स्तुतीच झालेली नाही तर समाजाच्या भल्यासाठीच्या बाबीही वाचकांच्या हाती देण्याचा यशस्वी प्रयोग झाल्याचे समोर आले आहे. 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम असो की, पंढरीची वारी असो अंक हाथी घेतला की वाचक म्हणून "लोकराज्य" ची सुबक छपाई, आकर्षक मांडणी पाहून माझ्या परिचयातील किमान शंभरावर नियमित वाचकांची आपआपल्या परिचितांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला अंक भेट देण्याचा एक वेगळा पायंडा पाडला आहे. यात काही शासनाची वाहक करण्याचा प्रयत्न नाही. परंतु शासन उपक्रमही आजच्या कार्पोरेट युगात परफेक्ट बसू शकतो याचेच उदाहरण म्हणजे "लोकराज्य" आहे.
      
स्पर्धा परीक्षा असो की, इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या विविध परीक्षा असोत. त्यासाठी विद्यार्थी- विद्यार्थींनीनी "लोकराज्य"चा संदर्भग्रंथ म्हणून वापर करायला हवा. यातील संदर्भ हे अधिकृत असतात. दैनिके वाचण्याबरोबरच "लोकराज्य" मासिकही नियमितपणे वाचल्यास त्याचा परीक्षार्थ्यांना निश्चितच लाभ होवू शकेल. "लोकराज्य" चे हे कार्य खरेच खूप मोठे आहे. ज्ञानरुपी, संदर्भरुपी हा मासिकाचा भांडार आगामी काळातही असेच कार्य करत राहो, राहील अशी माझी खात्री आहे.
       "लोकराज्य"च्या यशासाठी अहोरात्र प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिश्रम घेणाऱ्या हातांना एक वाचक म्हणून मानाचा मुजरा. समाजात जे-जे चांगले, ते-ते मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे व सुरुही आहे. पुढेही वर्षांनुवर्षे रहावा व "लोकराज्य" शंभर वर्षांचा यशाची परंपरा अशाच यशदायी वाटेने पूर्ण करावी, ही तमाम महाराष्ट्राच्यावतीने सदिच्छा…!                
                                                        
    डॉ. भास्कर प्र. भोसले ,  
                                                                        कैलासनगर, नांदेड 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...