Saturday, November 11, 2017

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची मौजे धनगरवाडी येथे
रेशीम शेती क्षेत्रास भेट व  रेशीम किटक संगोपन गृहाचे भुमिपूजन 
नांदेड, दि. 11:-   येथील मौजे धनगरवाडी ता . जि. नांदेड येथे रेशीम शेती  क्षेत्र व मौजे धनगरवाडी येथील सहा शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत सहा शेतकऱ्यांना किटक संगोपन गृह मंजूरी मिळाली. या किटक संगोपन गृहाचे भुमिपूजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते झाले.  
तसेच या कार्याक्रमांप्रसंगी मौ. धनगरवाडी येथील मारोती रंगनाथ पगडे, तुळशीराम पगडे यांना माती परिक्षण अहवालाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  
यावेळी शेतकरी गोविंद दत्ताराम पगडे, पुंडलिक काकडे, माधव दादाराव कदम यांनी आपआपली यावेळी मनोगते व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, भोकर येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती क्षिरसागर, रेशीम विकास अधिकारी पी. जे. पाटील, रेशीम विकास अधिकारी श्री. ढावरे, वैज्ञानिक डी. परभणी ए. जे. कारंडे, प्रकल्प अधिकारी, रेशीम पी. बी. नरवाडे, तहसीलदार किरण अंबेकर, तसेच प्रगतीशील रेशीम उत्पादक शेतकरी सत्कार हरीभाऊ पगडे , धनगरवाडी ता. नांदेड, सईदखान आयुबखान, दिग्रस ता. हदगाव, आनंद बळीराम कदम मुगट ता. मुदखेड, दत्तराव आबाराव क्षिरसागर ता. आडगाव ता. लोहा , प्रभाकर व्यंकटी पांचाळ कोंडा ता. अर्धापूर , सर्व तालुक्यांचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पोहरे, समतादुत अविनाश जोंधळे, विनोद पांचगे, शेतकरी, संरपंच आदिं विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.


****    

शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून तुतीची लागवड करावी
 --- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 11:- दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत महारेशीम -2018 राबविण्यात येत आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 50 गावांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच तुती लागवड उद्योग हा पर्यावरणपुरक आहे. शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून तुतीची लागवड करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की,  भारत रेशीम धागा आयात करत आहे. रेशीम धाग्याची उत्पादन क्षमता वाढवून आपली गरज भागविण्यासोबतच अन्य देशांनादेखील मागणीप्रमाणे रेशीम धागा पुरविण्याची संधी भारताला आहे, काही शेतकऱ्यांनी पंधरा वर्षा पूर्वी शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून रेशीम शेतीचा पर्याय निवडला आहे. रेशीमची मागणी पाहता उत्पादन फक्त देश पातळीवर 15% आहे. शेतकरी रेशीम शेती करत आहे, असे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.  
महा-रेशीम  अभियान -2018  संबंधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यशाळा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन , प्रेक्षागृह जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपन्न झाली .
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, भोकर येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती क्षिरसागर, उपजिल्हाधिकारी श्री.कांबळे, रेशीम विकास अधिकारी पी. जे. पाटील, रेशीम विकास अधिकारी श्री. ढावरे, वैज्ञानिक डी. परभणी ए. जे. कारंडे, प्रकल्प अधिकारी, रेशीम पी. बी. नरवाडे, तहसीलदार किरण अंबेकर, अर्धापूर तहसीलदार अरवींद नरसीकर, मुदखेड तहसीलदार सुरेश घोळवे, देगलूर प्र. तहसीलदार वसंत नरवडे, तसेच प्रगतीशील रेशीम उत्पादक शेतकरी सत्कार हरीभाऊ पगडे , धनगरवाडी ता. नांदेड, सईदखान आयुबखान, दिग्रस ता. हदगाव, आनंद बळीराम कदम मुगट ता. मुदखेड, दत्तराव आबाराव क्षिरसागर ता. आडगाव ता. लोहा , प्रभाकर व्यंकटी पांचाळ कोंडा ता. अर्धापूर , सर्व तालुक्यांचे तहसीलदार,

 उपविभागीय अधिकारी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पोहरे, समतादुत अविनाश जोंधळे, विनोद पांचगे, तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहाय्यक , पर्यवेक्षक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी , मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शेतकरी, संरपंच आदिं विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.   
रेशीम विकास अधिकारी श्री. ढावरे म्हणाले की, रेशीम शेती ही एक शास्वत स्त्रोत आहे.यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. तुती लागवड कमी भांडलातून करता येते.  रेशीम शेती कशी करावी. तसेच त्यासाठी लागणारे वातावरणाविषयीची माहिती दिली.
परभणीचे डी. वैज्ञनिक ए.जे . कारंडे म्हणाले की, रेशीम अळीचे जीवनचक्र व किटक संगोपनाबाबतची माहिती दिली. भारतात तुती रेशीम, टसर रेशीम, एरी रेशी , मुगा रेशीम हे प्रकार आहेत. तसेच तुतीची लागवड , खते, तापमान तसेच शेतकऱ्यांना तुती लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
प्रकल्प अधिकारी रेशीम श्री. पी.बी. नरवाडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. मोटे यांनी तुती लागवडीचे संगोपन तसेच त्याला पोषक वातावरण व कृषि विभागामार्फत शेततळे , जलयुक्त अभियानामार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी तुती लागवडीबाबत तसेच अन्य अडचणींचा प्रश्नोत्तरे झाली. या कार्यक्रमात विभाग प्रमुखामार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडूरंग मामीडवार यांनी केले . तर आभार रेशिम विकास अधिकारी पी. जी. पाटील यांनी मानले.

*****  

Friday, November 10, 2017

लेख_ ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वितरणात नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर

ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वितरणात
नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रणाली अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण ई-पॉस यंत्रणेद्वारे नांदेड जिल्ह्यात करण्यात येत आहे. यामुळे गरजु लाभार्थी कुटुंबाला त्यांचे हक्काचे धान्य मिळत आहे. या तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक झाली आहे. ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वाटपामध्ये नांदेड जिल्हा राज्यात दुसरा तर विभागात प्रथमस्थानी कायम आहे.
ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) यंत्रणेद्वारे बायोमॅट्रीक पध्दतीने सर्व रास्त भाव धान्य दुकानात धान्य वाटपामध्ये नांदेड जिल्ह्यानेही कात टाकली आहे. सार्वजनिक वितरण संगणकीकरण प्रणाली अंतर्गत शासनस्तरावरुन धान्य वाटपाबाबत अचुकता येण्यासाठी गरजु लाभार्थ्यांना धान्य देऊन त्याची पोच त्यांना तात्काळ प्राप्त होणे शक्य झाले आहे. धान्य वितरण प्रणालीमधील डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रत्येक लाभार्थी कुटूंबांला त्यांच्या हिश्याचे धान्य मिळत आहे. तसेच यामध्ये कोणतीही फसवणूक होत नाही, धान्य दिल्याबाबतची पोच पावती जागेवरच मिळते. कोणत्या लाभार्थ्यांना किती धान्य मिळेल याबाबतची माहिती ग्रामपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत ऑनलाईन दिसणार आहे. ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) या तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम होण्यास मदत होणार आहे, यासाठी गावकऱ्यांची साथ मोठी आहे.  
            तालुका स्तरावर रास्त भाव दुकानदारांना या विषयाचे महत्व पटवून देवून मशीन हाताळणी ते आधारकार्ड व्हेरिफाईड ट्रान्झेक्शन यशस्वी होण्यासाठी दुर्गम भागातील अडचणी  दुर करुन प्रत्येक तहसील कार्यालयात एक सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अचुक पध्दतीने व परिपूर्ण ट्राझेक्शन होण्यात यशस्वी झाले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रणालीतंर्गत ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) द्वारे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात आले आहे.
           
या ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) द्वारे धान्य वितरणाचा शुभारंभ तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते 16 जानेवारी 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गोपाळवाडी येथे पार पडला. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाची शंभर टक्के आधार सिंडींग करण्यात आली आहे. या गावातील शालेय मुलांना महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वाटप करण्यात आले असून लोकशाही दिन, भ्रष्टाचार निर्मुलन, लोकायुक्त, आपले सरकार आदी विषयातील प्रकरणे प्रलंबित नसलेले हे गोपाळवाडी गाव आहे.   
गावकऱ्यांना सार्वजनिक वितरण संगणकीकरण अंतर्गत ई-पॉस  योजनेचे महत्व पटवून देवून, प्रायोगिक तत्वावरील कामे नजीकच्या काळात सर्व दुकानांसाठी अंमलात आणुन लाभार्थ्यांसाठी अधिक सुलभता व पारदर्शकतेकडे पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यात या मशिनद्वारे धान्य घेतलेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन बक्षिस मिळणार आहेत. याबाबत जनसमुदायामध्ये जनजागृती करुन योजनेचा हेतू साध्य करण्यात येणार आहे. अशी ही अविस्मरणीय तंत्रणाची वाटचाल सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण सद्यस्थितीला रास्त भाव दुकानांची संख्या 1 हजार 988 असून रास्त भाव दुकानानुसार ई-पॉस मशिन वाटप करण्यात आले आहे. मार्च 2017 पासून ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटपास सुरुवात झाली आहे.
नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथील दुकानदार डी. आर. चिटमलवार  यांच्या दुकानातील कार्डधारक 292 आहेत. येथील माधव शिंदे यांनी या प्रणालीबाबत आम्ही खूप समाधानी असून खऱ्या गरजू लाभार्थ्यांनाच लाभ मिळतो आहे. आम्हाला लगेच त्याची पावती जसे की, योजनेतून किती धान्य वाटप झाले याची माहिती आमच्या हातात येते. गोर-गरिबांसाठी शासनाने उचलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वितरण व्यवस्था संगणकीकृत करण्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले असून सर्व प्रशासकीय यंत्रणा, रास्त भाव दुकानदारांच्या सहकार्यामुळे या प्रणालीचा वापर यशस्वी ठरु शकला आहे.
- काशिनाथ आरेवार,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड .
स्वातंत्र्य सैनिकांशी जिल्हाधिकारी
 डोंगरे यांनी केली मनमोकळी चर्चा  
            नांदेड, दि. 10 : - स्‍वातंत्र्य सैनिकांची जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आस्‍थेने विचारपुस करुन त्‍यांच्‍याशी मनमोकळी चर्चा केली. त्‍यांच्‍या अडी-अडचणी जाणुन घेतल्‍या. यावेळी स्‍वातंत्र्य सैनिकांनी हैद्राबाद मुक्‍ती संग्रामातील त्‍यांचे व्‍यक्‍तीगत अनुभव सांगितले. शहरातील ज्येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिकांची सदिच्‍छा बैठक जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी नुकतीच घेतली. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी यांची उपस्थिती होती.
राज्‍य शासन स्‍वातंत्र्य सैनिकांना केंद्र शासनाच्या स्‍वातंत्र्य सैनिकांप्रमाणे महागाई भत्‍ता लागु करावा. स्‍वातंत्र्य सैनिक वैद्यकीय प्रतिपुर्ती मर्यादा 10 हजार रुपयाच्‍या ऐवजी 25 हजार रुपये करावा. परिवहन महामंडळाच्‍या बसेसमध्‍ये कायम स्‍वरुपी दोन जागा राखीव ठेवणे. स्‍वातंत्र्य सैनिक पाल्‍यांना उद्योग सुरु करण्‍यासाठी कमी व्‍याजदराने कर्ज देण्‍याची योजना आणणे आदी मागण्‍यांबाबत जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सकारात्‍मक प्रतिसाद देऊन त्‍याबाबत शासनस्‍तरावर पाठपुरावा करण्‍यात येईल, असे सांगीतले.
            जिल्‍हाधिकारी यांनी स्‍वातंत्र्य सैनिकांना प्रथमच अशा प्रकारे स्‍वतंत्ररित्‍या वेळ दिल्‍यामुळे उपस्थित स्‍वातंत्र्य सैनिकांनी समाधान व्‍यक्‍त करुन जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांचे आभार मानले. बैठकीस जेष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक नारायणराव भोगावकर, शिवानंद राहेगावकर, पी. के. कदम, बालाजीराव जोशी, प्रभाकरराव नांदुसेकर, गुलाबसिंघ जहागिरदार, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.

000000
जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक   
            नांदेड, दि. 10 :- पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार 13 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2.30 वा. आयोजित करण्यात करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न होणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  अरुण डोंगरे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नांदेड यांनी केले आहे.

00000
"आयसीडीएस" आठवडा
साजरा करण्याच्या सुचना    
नांदेड, दि. 10 :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना आठवडा 14 ते 19 नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषगांने जिल्ह्यात संबंधीत विभागाने महिला व बाल विकास विभागाच्या परिपत्रकात दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
या कार्यक्रमामध्ये मुलांसाठी कार्यक्रम, बालकांचे आपापसात स्वयंस्फुर्ततेने आदान-प्रदानाबाबत प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये समंजस्याची भावना आणि कुपोषणाचे परिणाम अंगणवाडी स्तरावर समजावून सांगणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी क्षेत्रात अहिंसा संदेशाचा प्रसार करणे व बालकांचा आणि महिलांचा समावेश करुन त्यांना या कार्यक्रमात केंद्रित करणे, तसेच अंगणवाडीमध्ये बालकांची आरोग्य तपासणी झालेली आहे. पुर्व शालेय शिक्षणाची प्रगती, अंगणवाडीचे बांधकाम झालेले आहे काय, गरम ताजा आहाराचा पुरवठा योग्य प्रकारे होत आहे, त्याचप्रमाणे बालकांचे अतितीव्र कुपोषित कमी वजनाची बालके शोधून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, नागरिकांना पौष्टिक आहाराबाबत माहिती व नियमित जेवणात पौष्टिक आहाराचा समावेश करुन, पौष्टिक आहार घेण्याचे महत्व पटवून देणे व पौष्टिक आहार घेण्यास प्रोत्साहन देणे इत्यादीबाबत कार्यक्रम हाती घ्यावेत. हा आठवडा सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात व नागरिकांनाही या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घ्यावे, असे शासन परिपत्रकात नमुद केले आहे.

00000
शासनास जमीन विक्रीसाठी तयार
असणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करावेत
            नांदेड, दि. 10 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यान्वित शासकीय मुलींचे वसतिगृह देगलूर व मुखेड तालुक्याच्या ठिकाणी शहरालगत बहुसंख्य शैक्षणिक संस्था कार्यरत असलेल्या आणि विशेषत: मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे होईल, अशा ठिकाणी इमारत बांधकामासाठी प्रत्येकी चार एकर जमिन खरेदी करावयाची आहे.
            इच्छूकांनी सातबारा उतारा व जमीन मालकाचे संमतीपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड यांच्या नावे अर्ज करावेत. अधीक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा, असे अवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त नांदेड यांनी केले आहे

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...