Wednesday, August 30, 2017

बालक, गरोदर मातांसाठी लसीकरणाची
जिल्हात विशेष मोहिम राबविण्यात येणार  
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- लसीपासून वंचित 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना आजारापासून संरक्षीत करण्यासाठी "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" ही विशेष मोहिम ऑक्टोंबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
           
जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" सन 2017 समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) एस. व्ही. शिंगणे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. नितीन बोडके, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे, डॉ. अमोल गायकवाड, श्री. प्रमीत वाघमारे, समितीचे सदस्य, आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात ग्रामपातळीपासून ते महानगरपालिकेपर्यंत आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, लिंक वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन असंरक्षीत बालके व गरोदर माता यांच्या याद्या तयार करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या भागात असरंक्षीत लाभार्थी जास्त आहेत त्या भागात ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2017 या महिन्यात 7 ते 14 तारखेला व जानेवारी 2018 या महिन्यात 8 ते 15 तारखेपर्यंत  जिल्ह्यात  "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" मिशन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरुन जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व तालुकास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक जिल्ह्यातील लसीकरणाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी व पर्यवेक्षण करणार आहेत. लसीकरणासाठी लसीचा पुरेशा साठा जिल्हास्तरावर वरिष्ठ कार्यालयामार्फत प्राप्त होणार असून सर्व संस्थांना लस पुरवठा जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचे आई-वडील, पालक, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, खासगी वैद्यकीय व्यवसायीक व सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांचे या मोहिमेत योगदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात असंरक्षीत मात व बालकांना त्यांच्या वयोगटानुसार लसीकरण करुन या मोहिमेत लसीकरणाद्वारे जिल्ह्यामध्ये 90 टक्केच्यावर लाभार्थ्यांना संरक्षीत करण्यात येणार आहे. म्हणुन या मोहिमेस सर्वांनी सक्रीय सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. डोंगरे यांनी केले आहे.
            जिल्ह्यात लसीकरणाचे काम कमी असणारे भाग, जोखीमग्रस्त भाग (घटसर्प, गोवर, धनुर्वात, उद्रेक झालेला भाग) अतिदुग्रम भाग, डोंगराळ भाग, सलग तीन सत्रे रद्द झालेले गावे , विभाग, ए.एन.एम.ची पदे रिक्त असलेल्या उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, पल्स पोलीओ कार्यक्रमात असलेले जोखीमग्रस्त भाग, विटभट्टी, बांधकामे, स्थलांतरीत वस्त्या, ऊस तोडणी वस्त्या, इतर (पेरिअर्बन एरिया) या भागामध्ये ही मोहिम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. शुन्य ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना बी.सी.जी., पोलीओ, आय.पी.व्ही., इंजे. पेंटाव्हॅलेंट, डी.पी.टी. व गोवर या लसी, अ जीवनसत्वाच्या मात्रा तसेच गरोदर मातांना धनुर्वाताची मात्रा व लोहाच्या गोळ्या देण्यात येणार आहेत. तसेच बालकांना क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदुज्वर, कावीळ या आजारासाठी रोग प्रतिबंधक लसी देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
            यावेळी नांदेड जिल्ह्यात "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" ही मोहिम राबविण्यासंबंधी सादरीकरणातून माहिती  देण्यात आली.

000000

Tuesday, August 29, 2017

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा रद्द   
नांदेड दि. 29 :- मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्थेअभावी राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दि. 29 व 30 ऑगस्ट 2017 रोजीचा पुर्वनियोजित नांदेड जिल्हा दौरा रद्द झालेला आहे.    

00000
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 29 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 30 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन मोटारीने सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शेतकरी कंपनीच्या बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. सकाळी 11.30 वा. "संकल्प ते सिद्धी" कार्यक्रम व शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा. स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. दुपारी 2 वा. श्रमदानातून शौचालय बांधणी कार्यक्रम. स्थळ- कासराळी ता. बिलोली. दुपारी 2.30 वा. सगरोळी येथुन मोटारीने नायगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा व पीक परिस्थिती आढावा बैठक (कृषि, पणन व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) स्थळ- तहसिल कार्यालय नायगाव बा. दुपारी 4.30 वा. नायगाव बा. येथुन मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
 जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 13.11 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 52.45 टक्के पाऊस
           नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात मंगळवार 29 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.11 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 209.83  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 501.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी नुसार आतापर्यंत 52.45 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 12.25 (755.02), मुदखेड- 20.33 (705.84), अर्धापूर- 26.67 (613.00), भोकर- 12.75 (516.25), उमरी- 13.67 (503.67), कंधार- 10.67 (488.85), लोहा- 5.00 (511.16), किनवट- 20.00 (473.43), माहूर- 18.50 (396.40), हदगाव- 9.86 (525.61), हिमायतनगर- 6.00 (373.49), देगलूर- 9.67 (312.32), बिलोली- 13.40 (453.00), धर्माबाद- 9.00 (461.33), नायगाव- 15.20 (466.06), मुखेड- 6.86 (463.57) आज अखेर पावसाची सरासरी 501.19 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 8019.00) मिलीमीटर आहे.

00000 
नोंदणीकृत मदरसांना पायाभुत सुविधा,
विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी अनुदान  
अर्ज करण्याची 18 सप्टेंबर पर्यंत मुदत   
नांदेड, दि. 29 :-  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा आणि विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी सहाय्यक अनुदान 2017-18 साठी ज्‍या मदरशांमध्‍ये फक्‍त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्‍यात येत आहे आणि ज्‍यांना आधुनिक शिक्षणासाठी  शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा मदरशांकडून राज्य अल्‍पसंख्‍याक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्‍छुक मदरशांनी विहित नमुन्‍यातील परिपुर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे.  
मदरसाची धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणी आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. शासन निर्णयाच्‍या तरतुदीनुसार पुढील बाबींसाठी विहित नमुन्‍यात अर्ज करता येतील. विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍यासाठी शिक्षकांना मानधन देणे. पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान आणि मदरशांमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांसाठी शिष्‍यवृत्ती. शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतुदीनुसार जास्‍तीतजास्‍त तीन डी. एड / बी. एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. यामध्‍ये मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्यवस्था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इत्यादी व प्रयोगशाळेचे साहित्‍य. यासाठी किमान 3 वर्षापूर्वी नोंदणी केलेल्‍या व अल्‍पसंख्‍याक बहुल मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राहय धरले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

00000
अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय,
औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अपंग शाळेसाठी पायाभुत सोयी सुविधा अनुदान योजना
नांदेड दि. 29 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा  यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा योजनेकरीता परिपुर्ण अर्ज जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्‍याकडून शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व नगरपालिका, नगरपरिषद शाळामध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी विहीत नमुन्‍यात अर्ज मागविण्‍यात येत आहे.
शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडूजी. ग्रंथालय अद्ययावत करणे. संगणक कक्ष उभारणे/अद्यावत करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्‍यक फिर्निचर. इन्‍व्‍हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर, इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. शुध्‍द पेयजलाची व्‍यवस्‍था करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे / डागडूजी करणे. झेरॉक्‍स मशीन. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर. या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत.

0000000
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर  
नांदेड, दि. 29 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळामार्फत 18 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.

निकालाची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिला असून त्याची प्रिंट घेता येईल. परीक्षार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप संबंधीत माध्यमिक शाळेमार्फत करण्यात येणार आहे. त्याची तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी विहित नमुन्यात व शुल्कासह 8 सप्टेंबर 2017 पर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करावीत. अर्जासोबत ऑनलाईन निकालाचे गुणपत्रक जोडणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसात पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात, विहित शुल्क भरुन संबंधीत विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधीक महितीसाठी संबंधीत माध्यमिक शाळा, विभागीय मंडळाकडे संपर्क करावा. मार्च 2018 मधील दहावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणारे, अन्य विद्यार्थ्यांची अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याचा तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2017 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन देय संधी उपलब्ध राहील, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...