Sunday, January 22, 2017

लेख क्र. 1

करा..पालन राष्ट्रध्वजसंहितेचे , राष्ट्र अभिमान प्रतीकाचे

            भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हा तिरंगा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी कित्येक लोक सशस्त्र बलांच्या जवानांसह त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावत आहेत. भारतीय ध्वजसंहितेची थोडक्यात माहिती येथे देण्यात येत आहे.
        जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींनी ध्वजारोहण करणे, राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे कलम एक 2.1 बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 आणि राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यात तरतूद केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त उपरोक्त अधिनियमांच्या तरतुदी विचारात घेता सर्वसाधारण जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादीनी (एक) बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, 1950 चा भंग करुन वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता कामा नये. (दोन) एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. याव्यतिरिक्त राष्ट्रध्वज लावण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. (तीन) ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यांवर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. (चार) खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. (पाच) ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोषाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हातपुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किवां छपाई करता येणार नाही. (सहा) ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत. (सात) ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे बांधण्याचे किंवा वाहुन नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. परंतु विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही. (आठ) एखाद्या पुतळयाचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल अशाप्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. (नऊ) ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. (दहा) ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये. (अकरा) ध्वजाचा मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही. (बारा) ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही आणि (तेरा) ध्वजाचा 'केसरी' रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
        बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे- कलम 2 या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर (अ) 'बोधचिन्ह' याचा अर्थ अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले असे कोणतेही बोधचिन्ह, मुद्रा, ध्वज, अधिचिन्ह, कुलचिन्ह किंवा चित्र प्रतिरुपण असा आहे. कलम 3 त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन विहित करील अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरीजकरुन एरव्ही कोणत्याही व्यक्तीला अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही आभासी प्रतिकृती यांचा, केंद्र शासनाच्या किंवा शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यापार, व्यवसाय, आजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शिर्षकात अथवा कोणत्याही व्यापार चिन्हात किंवा चिन्हाकृतीत वापर करता येणार नाही किंवा वापर चालू ठेवता येणार नाही. टीप-भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये बोधचिन्हे म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आला आहे.
        राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम 2 जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरुप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रूप करील, नष्ट करील, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृतीद्वारे असो) त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. स्पष्टीकरण 1-कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने, भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किंवा त्यावर टीकाटिप्पणी करण्याने या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही. स्पष्टीकरण 2- 'भारतीय राष्ट्रध्वज' या शब्दप्रयोगात कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थावर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे अगर भागांचे चित्र, रंगीत चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र अथवा अन्य दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे. स्पष्टीकरण 3- 'सार्वजनिक ठिकाण' या शब्दप्रयोगाचा अर्थ जनतेने वापरावी म्हणून योजलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा असा आहे व त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा अंतर्भाव आहे.  2.2 राज्यातील सदस्य खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा राष्ट्रध्वज फडकविता, लावता येईल. (एक) ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येतो अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. (दोन) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. (तीन) ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. (चार) या संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊमध्ये अंतर्भूत केलेल्या तरतूदीव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये. (पाच) जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेंव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्याकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठीमागे वरच्या बाजूला लावावा. (सहा) जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा. जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू त्यांच्या (ध्वजाच्या ) उजव्या बाजूस असावी (म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावी) (सात) राष्ट्रध्वज या संहितेच्या भाग एकमध्ये विहित केलेल्या प्रमाण विनिर्देशांशी शक्य तेवढया प्रमाणात अनुरुप असावा. (आठ) राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणत्याही ध्वज किंवा पताका लावू नये तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यांसह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. (नऊ) ध्वजाचा अन्य कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी उपयोग करुन नये. (दहा) कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल तथापि असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी. (अकरा) जेव्हा ध्वज मोकळया जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सूर्यादयापासून सूर्यास्तपर्यंत लावण्यात यावा. (बारा) ध्वज फाटेल अशा कोणत्याही पध्दतीने तो लावू नये किंवा बांधू नये. (तेरा) ध्वज फाटला असेल किंवा मळाल्यामुळे खराब झाला असेल तर तो विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पध्दतीने खाजगीरीत्या संबंधच्या संबंध नष्ट करावा.
        ध्वज लावण्याची योग्य पध्दत : 3.5 ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशारीतीने लावला पाहिजे. 3.6 जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे तेथे त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरुन सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये तरतूद केली असेल ती खेरीजकरुन हवामान कसेही असले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. अशा इमारतींवर रात्रीसुध्दा ध्वज लावता येईल. मात्र काही अगदी विशेष प्रसंगीच तो रात्री लावावा. 3.7 ध्वजारोहणाचे वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. ध्वजरोहण व ध्वजावतरण जेव्हा बिगुलाच्या प्रसंगोचित सुरांवर करावयाचे असेल अशा वेळी ध्वज चढविण्याची आणि उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे. 3.8 जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरुन ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. 3.9 जर ध्वज इतर प्रकारे म्हणजे भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वंजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावी म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तींच्या डाव्या बाजूस असावी. 3.10 एखाद्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या वरच्या बाजूस लावावा. 3.11 पुतळयाच्या अनावरणासारख्या प्रसंगी ध्वज लावताना तो स्पष्ट दिसेल अशा वेगळया जागी लावण्यात यावा. टीप-पुतळयाचे अगर स्मारकाचे आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. 3.12 ध्वज मोटारीवर लावावयाचा असेल तर तो मोटारीच्या बॉनेटवर मध्यभागी किंवा मोटारीच्या समोरील उजव्या बाजूस मजबूतपणे बसवलेल्या सळईवर लावण्यात यावा. 3.13 मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकत न्यावयाचा असेल तर तो चालणाऱ्यांच्या उजव्या म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा अगर अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजांची रांग असेल तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे ठेवावा.
        ध्वजाचा चुकीचा वापर : 3.14 फाटलेल्या अथवा चुरगळलेल्या ध्वज लावता कामा नये. 3.15 एखाद्या व्यक्तीस अगर वस्तूस मानवंदना करण्यासाठी ध्वज खाली आणू नये. 3.16 दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूस अगर राष्ट्रध्वजावर आणि पुढे नमूद केलेले काही अपवाद सोडल्यास त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत अथवा बोधचिन्ह लावू  नये. 3.17 ध्वजाची तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी कोणत्याही प्रकारे उपयोग करु नये. 3.18 वक्त्याचे टेबल             झाकण्यासाठी अथवा व्यासपीठावर आच्छादन वा पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.  3.19 ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खाली येईल अशा रीतीने ध्वज लावू नये. 3.20 ध्वजाचा जमिनीस स्पर्श होऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेण्यात येऊ नये. 3.21 ध्वज फाटेल अशा पध्दतीने लावू नये अथवा बांधू नये.
        गैरवापर : 3.22 ध्वजाचा कोणत्याही स्वरुपात आच्छादन म्हणून वापर करता कामा नये. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दले यांच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील, असे प्रसंग पुढे दिले आहेत. 3.23 ध्वजाचा वाहन अथवा रेल्वेगाडी अगर जहाज यांच्या झडपांवर, छतांवर, बाजूंवर अथवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करता कामा नये.3.24 ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल अशा प्रकारे वापरु नये किंवा ठेवू नये.  3.25 ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा इतर प्रकाराने सबंधच्या सबंध नष्ट करावा. 3.26 ध्वजाचा इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करु नये. 3.27 ध्वजाचा पोषाखाचा अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून वापर करु नये तसेच त्याचे उशा, हातरुमाल यावर भरतकाम करुन नये. अगर त्याची हात पुसण्याचे रुमाल किंवा पेटया यांवर छपाई करु नये. 3.28 ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. 3.29 ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरुपात वापर करु नये अथवा ध्वजस्तंभाचा जाहिरात लावण्यासाठी म्हणूनही वापर करुन नये. 3.30 ध्वजाचा काही घेण्यासाठी, देण्यासाठी बांधण्यासाठी अगर वाहून नेण्यासाठी साधन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. विशेष प्रसंग आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रवध्वज फडकविण्यापूर्वी राष्ट्रध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यात कोणतीही हरकत असणार नाही. 
-         संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

*******

Saturday, January 21, 2017

टपाल खात्याच्या पीए-एसए पदासाठी
29 जानेवारी रोजी टायपिंग-डाटाएन्ट्रीची पुनर्परीक्षा
नांदेड, दि. 21 :-  भारतीय टपाल खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या पीए-एसए संवर्गातील भरती चाचणीतील सर्व उमेदवारांची ( जे यापुर्वी पी.ए. / एस. ए. टायपिंग व डाटा इंट्री परीक्षेला बसले होते ) ‘टायपिंग व डाटाएन्ट्री’ परीक्षा पुन्हा रविवार 29 जानेवारी 2017 रोजी घेण्यात येणार असल्याचे नांदेड डाक अधीक्षक एस. एम. अली यांनी कळविले आहे. आहे.
ही रविवार 29 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ही परीक्षा पाच गटात होणार आहे. या परीक्षांसाठीची केंद्र पुढील प्रमाणे केंद्र- ए  भारतीय विद्यापीठ प्रौद्योंगिकी संस्थान- आयआयटी, सेक्टर 7 बेलपाडा, खारघर रेल्वे स्टेशन जवळ नवी मुंबई-400614,  केंद्र – बी - पिल्लाइज सूचना प्रौदयोगिकी संस्थान सेक्टर 16 नवीन पनवेल नवी मुंबई- 410 206. केंद्र – सी - एन. जी. एम. इंजीनियरी एवं प्रौदयोगिकी विद्यालय कामोठे, नवी मुंबई- 410 206 येथे घेण्यात येणार आहे.
इच्छूक उमेदवारांनी  http://www.pasadreexam2017.in या संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र डाउनलोड करुन घ्यावी. परीक्षेला बसण्यापुर्वी उमेदवारांनी दोन्ही परीक्षेसाठी अभ्यासासाठी पुढील युआरएल 23 ते 25 जानेवारी 2017 पर्यंत या कालावधीत उपलब्ध राहील. युआरएल अशी - cbtdemo.quizky.net
संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य पोस्ट मास्टर जनरल (भरती) मुंबई यांच्यावतीने डाक अधीक्षक नांदेड यांनी केले आहे.

00000000
स्तब्धता पाळण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्‍या हुतात्‍म्‍यांच्‍या स्‍मरणार्थ आदर व्‍यक्‍त करण्‍यासाठी 30 जानेवारी रोजी दरवर्षी देशभर 2 मिनिटे मौन (स्‍तब्‍धता) पाळून त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात येते. त्‍यानुसार यावर्षीही सोमवार 30 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वा. दोन मिनिटे मौन स्‍तब्‍धता पाळून हा दिवस हुतात्‍मा दिन म्‍हणून पाळण्‍यात येणार आहे.
मौन स्‍तब्‍धताची सुरुवात होण्‍यापुर्वी सकाळी 10.59 पासून 11 वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्‍यात येईल. इशारा भोंगा संपल्‍यानंतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, आस्‍थापना, शैक्षणिक संस्‍था, विद्यापीठे यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्‍तब्‍धता) पाळावे. सकाळी 11.02 मिनिटांनी मौन (सतब्‍धता) संपल्‍यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी 11.03 मिनीटांपर्यत वाजविण्‍यात येईल. जेथे भोंग्‍याची व्‍यवस्‍था नसेल तेथे वरीलप्रमाणे 11 वा. मौन (स्‍तब्‍धता) पाळण्‍याबाबत योग्‍य ते निर्देश संबंधितांना देण्‍यात आले आहेत. हुतात्‍म्‍यांना आदरांजली गंभीरपणे व योग्‍य त्‍या आदराने मौन (स्‍तब्‍धता) पाळून देण्‍यात येईल याची दक्षता घेण्‍यात यावी, असे जिल्‍हा प्रशासनाकडून कळ‍वण्‍यात आले आहे.

00000000
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या
पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
नांदेड, दि. 21 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये  अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी मंगळवार 14 फेब्रुवारी 2017 ते गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 40 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे बुधवार 8 फेब्रुवारी 2017 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या संकेतस्थळावर www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Cheek List आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊल लोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एकझामिनेशन (युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एकझामिनेशन (युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी “सी”  प्रमाणपत्र “ए” किंवा “बी” ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी नंबर 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
हरभरा पीक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 21 :- हरभरा पिकावरील घाटे अळीसाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.4 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कामगंध सापळ्यामध्ये सापडलेला पतंग रोज काढावेत. हा कृषि संदेश वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे, असे उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांनी कळविले आहे.

0000000
विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 21 :- महाराष्ट्र  लोकसेवा आयोग विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा-2016  ही  रविवार 29 जानेवारी 2017 रोजी  होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी  नांदेड  यांनी  कळवले  आहे.  
नांदेड  जिल्ह्यात रविवार 29 जानेवारी 2017 रोजी विविध 42 परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत  एका  सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व  सुसंगत  पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000000
समाजकल्याण विभागाचे शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना आवाहन
 नांदेड दि. 21 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https://mahaeschol.maharasthra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरलेनंतर विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र , जात वैधता प्रमाणपत्र, वय, उत्पन्न व रहिवास दाखला, मागील वर्षाचा उत्तीर्ण दाखला इत्यादी कागदपत्रे, शाळा / महाविद्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.
पात्र विद्यार्थ्यास मिळणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर आणि शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयाच्या बॅक खात्यावर परस्पर जमा केली जाते. अधिकृत बॅक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणेसाठी पुढील बाबींची पुर्तता विद्यार्थी, पालक यांनी त्यांच्या शाळा, महाविद्यालयाकडे करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्याचे आपल्या आधार क्रमांकाची खात्री पटविणेसाठी आधारकार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी. ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे त्या बँकेच्या खाते क्रमांकाची खात्री होणेसाठी पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी. आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न केले असलेबाबतचा पुरावा म्हणून बँकेकडून आधार संलग्नता केलेबाबतची पावती (आधार सिडींग स्लीप ) सोबत जोडावी.  विद्यार्थी / पालकांनी प्रस्तावासोबत आधार क्रमांक आणि बँकेशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा जोडला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम तसेच महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण शुल्काची रक्कम प्राधान्याने जमा केली जाईल. लाभार्थी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही त्याच्याच खात्यात जमा व्हावी व त्या खात्याचा गैरवापर इतरांनी करु नये या हेतूने प्रत्येकांना आपला आधार क्रमांक हा बँकेच्या खात्याशी संलग्न करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची अनियमितता व बोगसगिरी करण्यास वाव राहणार नाही. तेव्हा सर्व विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांनी आपापल्या बँकेत जावून आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावेत. त्यासाठी आवश्यक तो अर्ज भरुन बँकेकडे द्यावा आणि त्याची पोच पावतीची प्रत आपल्या स्कॉलरशिप अर्जाबरोबर जोडण्यासाठी सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यावतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

00000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...