Monday, November 7, 2016

निवृत्तीवेतन, कुटुंबवेतनधारकांनी  हयात

  प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन

नांदेड , दि. 7 :- सन 2016 या वर्षाचे हयात प्रमाणपत्र कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन 1 ते 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीमधील हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी , असे आवाहन कोषागार अधिकारी एम. एस. गग्गड यांनी केले आहे.

00000

बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवारी

भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड , दि. 7 :-  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-4 चे आयोजन करण्यात आले आहे. अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शुक्रवार  11 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास बिल्डींग श्रीनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
एसआयएस इं. लि. हैद्राबाद या कंपनीत सेक्युरिटी गार्डच्या पुरुषांसाठी 100 पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 8 ते 12 हजार रुपये दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच ग्लोसरी सॉफ्ट टेक प्रा. लि. हैद्राबाद या कंपनीत महिला व पुरुषांसाठी सेल्समनच्या 100 पदासाठी  पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 11 हजार व  भत्ते दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आवश्यक आहे.
ऑनलाईन सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन आयडी पासवर्ड टाकून लॉगइन व्हायचे. जॉब फेअरमध्ये जावून जॉब इन्व्हेन्टमधून जिल्हा निवडणे. नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-3 च्या उजव्या बाजूस ॲक्शनमध्ये जावून पार्टीसिपेशनला क्लिक करणे. टर्म अन्ड कंडीशनला आय ॲग्री करुन अप्लाय करणे. पुन्हा ॲक्शनवर येवून इंट्री पास काढून घेणे व हा इंट्री पास घेवूनच मेळाव्यात यावे लागेल. काही अडचण आल्यास दूरध्वनी क्र. 02462-251674 यावर संपर्क साधावा.
या मेळाव्यासाठी ऑनलाईन सहभाग, इच्छुकता दर्शविल्याशिवाय सहभागी होता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवाराची नोंद झाली नाही त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. इंट्री पास शिवाय मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. याबाबत होणारा प्रवास खर्च व इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

000000
विधान परिषद निवडणुकीसाठीच्या
मतदान केंद्राना आयोगाकडून मान्यता
नांदेड , दि. 7 :- महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2016 साठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानाकरीता जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली होती. या केंद्राना भार‍त निवडणूक आयोगाने मान्‍यता दिल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
मतदान केंद्रांची यादी मतदान केंद्राचे ठिकाण, केंद्र ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीचे नाव,  त्या मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव अशा क्रमाने पुढीलप्रमाणे.
नांदेड- तहसील कार्यालय नांदेड : जिल्‍हा परिषद नांदेड  (सर्व पं.स. सभापतीसह) नांदेड वाघाळा मनपा व नगर पंचायत अर्धापूर.
किनवट- तहसील कार्यालय किनवट :  नगर पंचायत माहूर व नगर परिषद किनवट.
हदगाव- तहसील कार्यालय हदगाव :  नगर पंचायत हिमायतनगर व नगर परिषद हदगाव.
भोकर- तहसील कार्यालय भोकर : नगर परिषद भोकर व नगर परिषद मुदखेड.
कंधार- तहसील कार्यालय कंधार :  नगर परिषद लोहा व नगर परिषद कंधार.
धर्माबाद- तहसील कार्यालय धर्माबाद : नगर परिषद उमरी व  नगर परिषद धर्माबाद.
बिलोली- तहसील कार्यालय बिलोली : नगर पंचायत नायगाव, नगर परिषद कुंडलवाडी व नगर परिषद बिलोली.
देगलूर- तहसील कार्यालय देगलूर : नगर परिषद देगलूर व नगर परिषद, मुखेड. याची संबंधित मतदार तसेच यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर
लघुपट सादर करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ
नांदेड , दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर ' महाराष्ट्र माझा शेतकरी राजा ' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे.या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास दि.30 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी  संपर्क साधावा.
******


Saturday, November 5, 2016

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या
पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
नांदेड, दि. 5 :- संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी सीडीएसची परीक्षा 5 फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2016 अशी आहे. परीक्षेची जाहिरात 9 नोव्हेंबर 2016 रोजी रोजगार समाचारमध्ये आणि संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचे www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
सीडीएस परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 18 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालवधीत सीडीएस कोर्स क्र. 53 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे मंगळवार 15 नोव्हेंबर 2016 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावरील recruitment tab ला क्लीक करुन त्यामध्ये सीडीएस-53 कोर्ससाठी उपलब्ध महत्वाच्या तारखा व चेक लिस्ट सोबत असणारी सर्व परिशिष्टांचे अवलोकन करुन त्यांना डाऊनलोड करुन त्याची दोन प्रतीतमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी केले आहे.

000000
नेव्ही माजी सैनिकांची 25 नोव्हेंबर रोजी बैठक
नांदेड, दि. 5 :-  नेव्ही कॅप्टन पी. प्रशांत हे शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे भेट देत आहेत. जिल्ह्यातील नेव्हीमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाबरोबर ते चर्चा करणार आहेत. नेव्हीमधून निवृत्त झालेले माजी सैनिक व माजी सैनिक संघटना अध्यक्ष व प्रतिनिधी यांनी शुक्रवार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद तुंगार यांनी केले आहे.

000000
आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांसाठी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड, दि. 5 :-  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात गुरुवार 1 डिसेंबर 2016 पासून सुरु होणाऱ्या 92 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धापरीक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016  तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रवेशाच्या अटी- उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवाराचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परिक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परिक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदविधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2016 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.  प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँकेमध्ये चालू खाते आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा या प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनाची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 25 नोव्हेंबर 2016 पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या व जातीच्या प्रमाणापत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट जि. नांदेड यांनी कळविले आहे. अधिक माहिती व तपशीलासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुलेनगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड दूरध्वनी 02469-221801 येथे संपर्क साधावा. 

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...