Sunday, August 14, 2016

पशुसंवर्धन, वस्त्रोद्योग राज्यमंत्री
अर्जुन खोतकर यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 14 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
  रविवार 14 ऑगस्ट, 2016 रोजी देविदहेगाव येथून मोटरीने सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे  आगमन व राखीव (मुक्काम).
 सोमवार 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन. सकाळी 9.05 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधुनिकीकरण झालेल्या शाखेचे उद्घाटन तसेच आपले नांदेड “एन्ड्राईड मोबाईल ॲप्लिकेशन”चे उद्घाटन स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. 9.50 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून मोटारीने पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेडकडे प्रयाण. 9.55 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे आगमन व सायबर लॅबचा उद्घाटन कार्यक्रम व इतर कार्यक्रमास उपस्थिती. 10.54 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथून मोटारीने गुंडेगाव तालुका नांदेडकडे प्रयाण. 11.30 वा. गुंडेगाव तालुका नांदेड येथे आगमन व जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामाची पाहणी व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायं. 5.55 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आदेश
नांदेड, दि. 14 :-  नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात रविवार मध्यरात्री 12 वाजेपासून सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
सोमवारी 15 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर रविवार मध्यरात्री 12 वाजेपासून सोमवार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलन करण्यात येऊ नयेत. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये  बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून देण्यात आली.

000000
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 621 मि.मी. पाऊस
हंगामात पावसाची टक्केवारी 64.99 इतकी 
          नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात रविवार 14 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 53.93 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 3.37  मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे.  तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 621.00 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  64.99 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात रविवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 2.63 (601.72), मुदखेड- निरंक (523.68), अर्धापूर- 1.33 (656.32) , भोकर- 10.50 (848.00) , उमरी- निरंक (482.93), कंधार- 11.00 (501.48), लोहा- 8.33 (619.83), किनवट- 7.29 (729.86), माहूर- 1.00 (875.25), हदगाव- 1.14 (758.98), हिमायतनगर- 3.67 (719.65), देगलूर- 0.50 (410.51), बिलोली- निरंक (620.20), धर्माबाद- 3.00 (537.36), नायगाव- 1.40  (535.60), मुखेड- 2.14 (514.69) आज  अखेर  पावसाची सरासरी 621.00  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9936.06) मिलीमीटर आहे.  

000000
स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात आज
राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्याच्या  69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट, 2016  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

0000000

Saturday, August 13, 2016

जिल्हा न्यायालय नांदेड येथे
राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न
नांदेड, दि. 13 :-  जिल्हा न्यायालय नांदेड येथे 13 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालया तर्फे बॅंक प्रकरणे: सेक्शन 138 (एन.आय.अॅक्ट), बॅंकांची वसुली दावे,  इत्यादी प्रलंबित व दाखल पुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित केले होते. सदर लोकन्यायाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, मा. सविता टी. बारणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, मा. न्या. ए. आर. कुरेशी, यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाले.
            जिल्हयातील सर्व न्यायालयात घेण्यात आलेल्या या लोकन्यायालयात 138 (एन.आय.अॅक्ट) चे एकुण 68 प्रकरणात तडजोड करण्यात येवून रू. 3528551 वसुल करण्यात आले. बॅंकांची वसुली प्रकरणांमध्ये 14 प्रकरणात तडजोड होवून रू. 2252597 वसुल करण्यात आले.  तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणांमध्ये विविध बॅंकांची मिळून एकुण 42 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात येवून रू. 2582000 वसुल करून देण्यात आली. म्हणजे एकुण 124 प्रकरणांमध्ये तडजोउ होवून एकुण रक्कम रू. 8363148 रू. वसुल करण्यात आले. नांदेड जिल्हा न्यायालयात एकूण 4 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात पॅनल प्रमुख म्हणून मा. श्री. एस. आर. नरवाडे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड, मा. श्रीमती सी. व्ही. सिरसाठ, सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर, नांदेड, मा. श्री. एम. के. सोरटे, 2रे सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर, नांदेड, मा. श्रीमती इ. व्ही. धांडे, 4थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी काम पाहिले. तसेच यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. एम.एल.गायकवाड, अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम, अॅड. बी. जी. नरवाडे, अॅड. सिध्देश्वर खरात, अॅड. ए. वाय. चंदनशिवे, अॅड. सय्यद साजिद, अॅड. कु. एस. पी. गायकवाड, अॅड. आर. एम. लोणे यांचे सहकार्य लाभले या लोकन्यायालयात मा. सन्माननिय विधीज्ञ, विविध बॅंकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. पी. एस. तुप्तेवार, अधिक्षक श्री कबिर सिध्दीकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक पी. आर. खरात, श्री. कावळे, सौ. एम. व्ही. वाहेगावकर, रणजित कदम, किशोर महाजन, संगमेश्वर मंडगे, सुनिल मुदिराज यांचे व इतर न्यायालयीन कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

000000000
जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 13 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडून नुकतेच जिल्हा कारागृह नांदेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. ए. आर. कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. एस. एन. सचदेव, सह दिवाणी न्यायाधीश एम. के. सोरते, अॅड. इद्रिस कादरी, अॅड. मो., अॅड. बाळासाहेब  नरवाडे व अॅड. ए. वाय. चंदनशिवे हे उपस्थित होते. 
न्या. सचदेव यांनी बंद्यांना जामिनावर सुटण्याचा हक्क याविषयी माहिती देतांना पॅरोल बेलवर सुटण्यासाठी कारागृहातील आपली वागणुक महत्वाची असते असे सांगून त्यांनी याबाबत माहिती देतांना महाभारतातील कर्ण-दुर्योधन यांचे उदाहरण देवून विस्तृत माहिती दिली.
 न्या. कुरेशी यांनी उपस्थित बंद्यांना मार्गदर्शन करतांना समाजामध्ये वावरताना आपल्या हातून कुठलेही वाईट कृत्य होणार नाही याची काळजी घ्या. संयम बाळगा असे सांगीतले. न्या. एम. के. सोरते यांनी प्ली बारगेनिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. इद्रिस कादरी यांनी कैद्यांचे विविध अधिकार याबाबत माहिती दिली. अॅड. बाळासाहेब नरवाडे यांनी जामिनाबाबत असलेल्या तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली. अॅड. चंदनशिवे यांनी सुध्दा बंदी व न्यायधीन बंदी यांचे अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक. जी. के. राठोड यांनी आभार मानले. यावेळी कारागृहातील जवळपास 320 पुरूष व महिला बंदी उपस्थित होते.

00000000
ग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार सन 2016-17 साठी पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज 10 सप्टेंबर,2016 पर्यंत व्दिप्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन श्री.किरण गं.धांडोरे, ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणा-या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार" देण्यात येतो.
      राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील "अ" "ब" "क" "ड" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये, 20 हजार रुपये, 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्‍मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली  विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 15 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व  स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...