Friday, March 21, 2025

 वृत्त क्रमांक 320

केमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम

नांदेड, दि. २१ मार्च:-  दु.१.२४ वाजताची वेळ ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय अंतर्गत ज‍िल्‍हा आपत्‍तकालीन कार्य केंद्रात फोन, धर्माबाद येथील एका रसायन कंपनीत केमीकल ल‍िकेजची घटना घडली असून परिस्‍थिती हाताळण्‍यासाठी मदत करावी असा दुरध्‍वनी संदेश कंपनीकडून आला.

आणि ज‍िल्‍हा आपत्‍कालीन कार्य केंद्रातील कर्तव्‍यावरील कार्यरत कर्मचारी ही बाब लगेचच दौ-यावर असलेल्‍या ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी यांना कळव‍िले . परीस्‍थ‍िती लक्षात घेता तात्‍काळ ज‍िल्हाध‍िकारी व न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी यांच्‍याशी चर्चा करुन एनडीआरएफ पथकाला या आपत्‍तीपासून बचाव करण्‍याकामी पाचारण करण्‍याचे ठरले.

तात्‍काळ एनडीआरएफ  पुणे येथील ५ नं.बटालीयनला संर्पक साधुन तात्‍काळ पाचारण केले. तोपर्यत स्‍थानीक अग्‍नीशमन पथक मनपाचे व एम.आय.डी.सी.चे अग्‍नीशमन अध‍िकारी हे तेथील पर‍िस्थित न‍ियंत्रणात आणन्‍याचा शर्तीने प्रयत्‍न करत होते.  यांच्‍यासोबत कंपनीचा सुरक्षा व‍िभागही प्रयत्‍न करत होता. 

उपव‍िभागीय अध‍िकारी,तहस‍िलदार, गटव‍िकास अध‍िकारी, मुख्‍याध‍िकारी व आरोग्‍य अध‍िकारी हे आपल्‍या पथकासह समन्‍वय साधुन घटनास्‍थळी हजर होते. एन.डी.आर.एफ.च्‍या केमिकल आपत्‍ती पासुन बचाव करणा-या पथकाचे आगमन झाले त्‍यांना स्‍थानीक प्रशासन व व‍िव‍िध यंत्रणांच्‍या मदतीने अचुक केमिकलची माहिती घेऊन काही वेळात ही टॅकरमध्‍ये केमिकल भरतांना ल‍िकेजमुळे लागलेली आग आटोक्‍यात आणली. लगेचच यादरम्‍यान जखमी झालेल्‍यांना कंपनीच्‍या रुग्‍णवाहीकेतून उपचारासाठी नेण्‍यात आले. अशा प्रकारे ही केमिकल आपत्‍ती मध्‍ये आपत्‍तीचे निवारण शोध व बचाव कार्य कसे करायचे एकंदरीत आपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन कसे करायचे याबाबतचा सराव अभ्‍यास सर्व यंत्रणाच्‍या व एन.डी.आर.एफ.च्‍या सहकार्याने ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेड यांनी हा रंगीत तालीम-सराव अभ्‍यास घडवून आणला.

२० मार्च २०२५ रोजी युनायटेड स्‍प‍िरीट ल‍ि.बाळापूर ता. धर्माबाद ज‍ि. नांदेड येथे  एनडीआरएफ 5 न. पुणे यांच्‍या सहकार्याने ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेडच्‍यावतीने ज‍िल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष राहुल कर्ड‍िले, न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी तथा मुख्‍य कार्यकारी अध‍िकारी जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्गदर्शनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कु-हे यांनी ही केमिकल आपत्‍ती बाबत टेबल टॉक व मॉक एक्‍सरराईज  दोन सत्रामध्‍ये सकाळी १०.३० ते दु.४.३० या दरम्‍यान घडवून आणली. 

यावेळी धर्माबाद च्या उपविभागीय अधिकारी स्‍वाती दाभाडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य ध‍ि.रा.खिरोडकर उपसंचालक, एनडी आरएफ निरीक्षक बृजेश कुमार रेंकवार, अग्नीशमन अधिकारी डी.एन.गायकवाड , न‍िलेश कांबळे, आडळकर ए.आर राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, कंपनीचे प्रकाश बोदडे,सुदीप त‍िवारी ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणाचे गौरव त‍िवारी, बारकुजी मोरे व धर्माबाद उपव‍िभागील धर्माबाद, उमरी येथील नगर परीषद, पंचायत समिती, अग्‍नीशमन, पोलीस, आरोग्‍य व इतर सर्व यंत्रणांचे अध‍िकारी कर्मचारी यांची उपस्‍थ‍िती होती.

00000










 वृत्त क्रमांक 319

बौद्धीक अक्षम मुलांच्या आरोग्य शिबीरात देशातील तज्ञ डॉक्टरांचा उपचार

मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रमाचे जिल्हयाधिकाऱ्यांकडून कौतुक

नांदेड दि. 21 मार्च : नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला असून सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाले आहे.अशावेळी सातत्यपूर्ण 15 वर्ष मेंदूचे विकार असलेल्या बौद्धीक अक्षम मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार 20 मार्च रोजी प्रारंभ झाला. पुढील दोन दिवस हे शिबीर चालणार आहे. 

आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड व विविध मान्यवरांनी आरोग्य शिबिरास भेट देवून माहिती घेतली. यावेळी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, डॉ. सुरेश दागडीया, अंकित अग्रवाल, कुणाल मालपाणी, गोवर्धन बियाणी, द्वारकादास साबू, नारायण कलंत्री, रयत रुग्णालयाचे कोषाध्यक्ष सुधिर चिंतावार, नेरली कुष्ठधामचे सहसचिव एम. आर. जाधव व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांची उपस्थिती होती.

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राजस्थानी शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहे. यापुढेही आरोग्य शिबिराची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी होऊन अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले यांनी दिली. 

दोन दिवसात जवळपास 500 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नियोजनात आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व रामप्रताप मालपाणी मुक बधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ होत आहे. हे आरोग्य शिबीर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य तर त्यांच्या पालकात समाधान व्यक्त करणारे ठरले आहे.

टीम डॉ. अनैता हेगडेंचे कार्य प्रशंसनीय - डॉ. सचिन खल्लाळ

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अनैता हेगडे, डॉ.अवि शहा व डॉ.आशा चिटणीससह 35 डॉक्टरांची टीम सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत रुग्णांवर मोफत तपासणी व  उपचार करीत आहे.समाजाचे देणे लागतो याभावनेतून केलेले हे कार्य प्रशसनीय असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा मुलांसोबत वाढदिवस 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज या शिबिराला भेट दिली.या ठिकाणी उपस्थित पालक,मुले यांच्याशी चर्चा केली. देशातील तज्ञ डॉक्टर आज या ठिकाणी त्यांच्या तपासणीला आले होते. अशा मुलांसाठी आपण जिल्हास्तरावर काय करू शकतो, या संदर्भातही त्यांनी यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा केली. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांची देखील त्यांनी चर्चा केली. आपल्या वाढदिवसाला या मुलांसोबत काही वेळ घालवता आला याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

00000







Thursday, March 20, 2025

  वृत्त क्रमांक 318

​महत्वाचे वृत्त /तातडीची प्रसिद्धी दयावी

 बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक

 शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे शासनाचे विभागाचे आवाहन

नांदेड दि.२१ मार्च : बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे.त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या नियमानुसार विभाग या धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यास बांधील आहे. कोणत्याही क्षणी बाभळी बंधाऱ्यातून तातडीने पाणी सोडले जाणार आहे, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

      जलसंपदा विभागामार्फत दिनांक 17 मार्च रोजी जाहीर निवेदन देऊन बाभळी बंधार्‍यालगतच्या शेतकऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आली होती. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या ऊर्जाव्यय व्यवस्थेचे क्षतिग्रस्त काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याकारणाने बाभळी बंधार्‍यातून काही प्रमाणात अंशतः पाणी नदीपात्रात सोडून ऊर्जाव्यय व्यवस्थेचे काम हाती घेतले जाणार आहे.

        20 मार्च रोजी बाभळी बंधाऱ्याचे पाणी सोडण्याकरिता जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही करण्याकरिता कर्मचारी बंधार्‍यावर आले असता, बळेगाव व बाभळी बंधाऱ्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाणी सोडण्यास विरोध केला.

20 मार्चला शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे. बाभळी बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने शेताचे नुकसान होईल व शेतीसाठी पुढे पाणी राहणार नाही अशा काही अफवाही या भागात पसरविण्यात आल्या आहे. यामध्ये तथ्य नाही, असा खुलासा जलसंपदा विभागाने केला आहे.

     बंधाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर नियंत्रणासाठी जलसंपदा विभागाला काही कामे वेळेत करणे आवश्यक असते. त्याचा एक टाईम टेबल ठरला असतो. त्यामुळे सदरचे काम हे वर्षातील बाकीच्या वेळी हाती घेणे शक्य नाही. कारण जून, जुलैमध्ये गोदावरी नदीत केव्हाही पावसामुळे पाणी येऊन पूर परिस्थिती उद्भवू शकते. हे काम पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी केले नाही तर पुराच्या पाण्यामुळे क्षतीग्रस्त भागात आणखी नुकसान होऊन बंधाऱ्याच्या फाउंडेशनला धोका उत्पन्न होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी भविष्यात होणाऱ्या अकल्पित नुकसानाला लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या क्षतिग्रस्त ऊर्जाव्यय व्यवस्थेचे काम पूर्ण करू द्यावे, असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे.

      त्यामुळे वृत्तपत्राद्वारे जाहीर निवेदनातून कळविण्यात येते की, बाभळी बंधाऱ्यातील पाणी अंशतः कमी करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागामार्फत कोणत्याही क्षणी करण्यात येऊ शकते. त्यामुळे बळेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे. बळेगाव बंधाऱ्याच्या खालील बाजूच्या शेतकऱ्यांना यामुळे आवाहन करण्यात येते की, या कार्यवाहीला सहकार्य करावे. कोणत्याही अफवा व चुकीच्या गैरसमजावर अवलंबून जलसंपदा विभागाच्या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण केल्यास धरण सुरक्षिततेचा कायदा 2021 तसेच पाटबंधारे अधिनियम 1966 अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कृपया सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता प्रणव मुदगल यांनी केले आहे.
0000

 वृत्त क्रमांक 317

 रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून यशस्वी जीवनाची वाटचाल 

- कुलगुरु डॉ. मनोहर चासकर

मेळाव्यातून 291 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मेळाव्यास भेट देवून विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नांदेड दि. 20 मार्च :   रोजगार मेळाव्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कंपन्यांना मुलाखत द्यावी आणि यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू करावी, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. या मेळाव्यास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही भेट देवून उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात केले होते.  यावेळी माजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री मा. डी.पी. सावंत, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन,  कुलसचिव डॉ. डी.डी. पवार,  व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण,  डॉ. हनमंत कंधारकर, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, अरविंद कंग्रालकर, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके,  डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. डी. एम. खंदारे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील अब्दुल करीम यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोजगार मेळावा आयोजन करण्याची विद्यापीठाची ही पहिलीच वेळ असून येथून पुढे वर्षातून दोन वेळा नियमितपणे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपनीसोबत सामजंस्य करार करण्यात येईल अशी माहिती कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दिली. 

या मेळाव्यास 3 हजार 200 ऑनलाईन विद्यार्थ्यांनी तर  मेळाव्याच्या ठिकाणी 1 हजार 200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, असे एकूण जवळपास 4 हजार 400 विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी जवळपास 50 कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखत घेण्यासाठी आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 291 विद्यार्थ्याची प्राथमिक निवड झाली. 

विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्याबाबत स्वतःला नेहमी अद्यावत ठेवावे. विद्यार्थी दशेत इतर गोष्टीपेक्षा स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना 13 भाषा अवगत होत्या. आज इतर भाषा तर सोडाच मातृभाषेवरही आपले पुरेसे प्रभुत्व राहिलेले नाही. इंग्रजी सारखी महत्त्वाची भाषा अवगत करून तिच्यावर प्रभुत्व मिळविणे ही काळाची खरी गरज आहे असल्याचे मार्गदर्शन व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण यांनी केले. 

मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळणार यशस्वी जीवनाचा मार्ग

- माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विद्यापीठाने हा एक चांगला पुढाकार घेतलेला आहे. अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाची सुरुवात होत असते, असे प्रतिपादन माजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री मा. डी.पी. सावंत यांनी व्यक्त केले.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. बालाजी मुधोळकर, प्रा. डॉ. बी सुरेंद्रनाथ रेड्डी, प्रा. डॉ. शैलेश वाढेर, प्रा. डॉ. कृष्णा चैतन्य, प्रा. डॉ. एल.एच. कांबळे, प्रा. डॉ. निना गोगटे, प्रा. डॉ. सुहास पाठक, प्रा. डॉ. अर्चना साबळे, प्रा. डॉ. योगेश लोलगे, प्रा.डॉ. महेश जोशी, प्रा. डॉ. काशिनाथ बोगले, प्रा. डॉ. राजकुमार मुन यांनी परिश्रम घेतले आहे. 

00000











 वृत्त क्रमांक 316

जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन 

नांदेड दि. २० मार्च :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई  व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे शनिवार 22 मार्च 2025 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबीक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व न्यायाधीश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. 

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅंकांचे कर्ज वसुली प्रकरण, थकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आाहेत. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फी  रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही. अशाप्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो.  सर्व पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा  लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

 वृत्त क्रमांक 315

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. २० मार्च :- देशातील युवकांना कंपनी, आस्थापनेमध्ये अनुभवाची संधी प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिपसाठी नांदेड जिल्ह्यात एकूण 11 आस्थापनांनी http://pminternship.mca.gov.in/ यासंकेतस्थळावर रिक्तपदे अधिसुचित केली आहेत.

या योजनेचा जिल्हयातील दहावी, बारावी,  ग्रॅज्युएट, आयटीआय या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या  सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९४२००४०९६४, ७०८३०९६५५४,८८३०८०७३१२  वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे. 

कंपनी, आस्थापनाचे नाव  बजाज फायनान्सं लि., बायरक्रॉप सायन्सं लि., हॅवल्स इंडिया लि. गोदरेज कंज्युमर प्रॉडक्टस लि., एच.डी.एफ.सी. बँक लि.,  इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.,  इंड्युसंड बँक लि. ज्युब्लीयंट फूडवर्कस लि., रिलायंन्स इंडस्ट्रीज लि., मेघा इंजिनियरिंग & इन्फ्रास्ट्रक्चरलि. टाटा कन्सन्टल्सी सर्व्हिसेस लि. या नामांकीत कंपनी/आस्थापना यांनी http://pminternship.mca.gov.in/ यासंकेतस्थळावर रिक्तपदे अधिसुचित केलेली आहेत. यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 24 पर्यंत असावे व दहावी/बारावी/ ग्रॅज्युएट/ आय.टी.आय. या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा : या योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाईल तयार करावी व विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. या योजनेंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिपचा लाभ घेता येईल. तसेच यासोबतच त्यांना दरमहा 5 हजार रुपये इंटर्नशिप रक्कम मिळेल. याशिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये एकरकमी अनुदान मिळेल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाईल.

000000

 वृत्त क्रमांक 314

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिण्याचा

                                                                                                                                                                        नांदेड दि. 20 मार्च :   राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधीत आस्थापनेत पुन्हा रुजु झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय असेल. 

                                                                                                                                                                        ज्या प्रशिक्षणार्थीचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधीत आस्थापनेत रुजु होण्यासाठी उमेदवार रुजुची अंतीम तारीख ही 30 एप्रील 2025 असून संबंधीत आस्थापनांनी प्रत्यक्षात उमेदवारांना रुजु करुन घेऊन आस्थापनेच्या लेटरहेडवर नियुक्ती आदेश हार्डकॉपीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय, पहीला माळा शासकिय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड बाबानगर, नांदेड येथे प्रत्यक्ष जमा करावे.

या योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी Certificate of Incorporation/उद्यम आधार व EPF/ESIC/GST/DPIT यापैकी एक अशाप्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत सादर करावे. उमेदवार रुजु होते वेळी तो संबंधीत आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधीत इतर आस्थापना/कार्यालयात यापूर्वी कधीही कायम/तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.

तसेच संबंधीत आस्थापनेने ही कार्य प्रशिक्षणासाठी रुजु होणारा प्रशिक्षणार्थी यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधीत इतर आस्थापना/ कार्यालयात कायम/तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.

हे दोन्ही प्रमाणपत्र संबंधीत आस्थापनेने उमेदवार रुजु झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयास सादर करावे.

अधिक माहितीसाठी तसेच टेक्नीकल बाबीसाठी या मो.क्र.9420040964, 7083096554, 8830807312 क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...