Wednesday, February 5, 2025
वृत्त क्र. 151
नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे
12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त
महसूल विभागाची धाडसी कारवाई
नांदेड दि. 5 फेब्रुवारी :- नांदेड तालुक्यातील मौजे कल्लाळ बोरगाव येथे गोदावरीनदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे 3 इंजिन जप्त करून क्रेनच्या साह्याने तहसील कार्यालयामध्ये रात्री उशिरा आणण्यात आले. ज्याची किंमत अंदाजे 12 लाख रुपये आहे.
गोदावरी नदीमध्ये शासनाच्या अधिकृत वाळू डेपो शिवाय कोणी उत्खनन करून आढळून आल्यास यापुढे सुद्धा करून आवश्यकता पडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रशासनातर्फे गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आले. महसूल विभागाने केलेली ही धाडसी कारवाई समजली जाते.
याकामी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वरकड यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी नहणू कानगुले, कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, ग्राम महसूल अधिकारी रणवीरकर, खेडकर, कदम, सकवान, माधव भिसे इत्यादी सहभागी होते.
00000
वृत्त क्र. 150
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 5 फेब्रुवारी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरूवार 6 फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरूवार 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वा. मुंबई विमानतळ येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वाराकडे प्रयाण. दुपारी 12.35 वा. श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.50 वा. मोटारीने नवा मोंढा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. जाहीर आभार सभा. स्थळ- मार्केट कमिटी मैदान नवा मोंढा नांदेड. दुपारी 2.45 वा. मोटारीने विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. विविध पदाधिकारी, शिष्टमंडळ प्रतिनिधी व महत्वाच्या व्यक्ती यांच्यासमवेत चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं 6 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.15 नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.
0000
वृत्त क्र. 149
नांदेडकरांचा कार्यकर्तृत्वाला सलाम !
जिल्हाधिकाऱ्यांना निरोप द्यायला रिघ लागली
नांदेड दि. 5 फेब्रुवारी :- बदली शासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील आकस्मिक मात्र अविभाज्य घटना. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बदलीने समाजमन हळवे होते. आज कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक, प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांची थबकलेली पाऊले जिल्हाधिकारी कार्यालयात बघायला मिळाली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची काल बदली झाली. अडीच वर्षांपासून अधिक न बोलता प्रत्यक्ष काम करणारे एक व्यक्तिमत्त्व नव्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी निघाले आहेत. दिलदार ! नांदेडकरांनी आज या कार्यकर्तृत्वाला आदराने सलाम केला.
आज दिवसभरात विविध क्षेत्रातील नागरिकांनी एका गुणवान, मितभाषी, कार्यतत्पर अधिकाऱ्याला निरोप दिला. काही पत्रकारांनी यावेळेत सिंहावलोकन केले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. गेल्या अडिच वर्षातील एक - एक कामांची यादीच पुढे आली. सुरुवात झाली ती सप्टेंबर 2022 रोजीच्या रुजू होण्यापासून. जिल्हाधिकारीही हळवे झाले. बदली अनिवार्य ,अपरिहार्य असते पण नांदेड सारखा जिल्हा कायम मनात राहणार आहे. एक गोड आठवणही त्यांनी सांगितली. माझ्या चिमुकलीचा जन्म नांदेडचा आहे, असे ते गौरवाने म्हणाले.
श्री. गुरूगोविंद सिंघजी यांच्या पदस्पर्धाने पावन झालेल्या नांदेडमध्ये डिसेंबर 2022 मध्ये घेतलेला वीर बाल दिवस कार्यक्रम, जून 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेला शासन आपल्या दारी कार्यक्रम, फेब्रुवारी 2024 मध्ये आयोजित केलेला महासंस्कृती व महानाट्य महोत्सव, ऑक्टोबर 2024 मध्ये आयोजित केलेला मुख्यमंत्री लाडकी बहिण महिला मेळावा.त्यांच्या नेतृत्वातील हे मोठे कार्यक्रम ठरले. डोक्यावर बर्फ, पायात भिंगरी आणि जिभेवर खडीसाखर हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य.या सर्व कार्यक्रमात दिसून आले.
एकाच व्यक्तीला एकाच वर्षात 3 निवडणुका कोणत्याही वादाशिवाय संपन्न करता आल्या. मार्च 2024 मधली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक त्यानंतर नोव्हेंबरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अतिशय उत्तमपणे त्यांनी हाताळली.दोन्ही निवडणुकांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत होते.विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षात संपूर्ण मराठवाडा परिसरात सामाजिक अंदोलने सुरू होती. मात्र नांदेड मध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जिल्हादंडाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्यात शांतता राखण्यात यश मिळवले आहे.
शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये त्यांना विशेष आवड होती. त्यामुळेच त्यांनी उत्पन्न वाढीसाठी उच्च मूल्य शेती अभियान सुरू केले. केळी निर्यात संदर्भात कार्यशाळा आयोजित केली. रेशीम, फुलशेती याबाबतही त्यांनी लक्ष घातले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात जवळपास 812 कोटींची मदत त्यांच्या कार्यकाळात झाली. सेंद्रीयशेती संदर्भातही काम उल्लेखनीय ठरले.
संकट कोणतेही येऊ दे रात्री-बेरात्री शून्य इगो ठेऊन मदतीला धावणारा अधिकारी म्हणून अनेकांनी त्यांना लक्षात ठेवले आहे. त्यामुळेच त्यांच्या काळात अभ्यागतांच्या रांगा दिसायच्या. केवळ गर्दीसाठी नव्हे तर भेटीतून शंभर टक्के तोडगा काढण्याची त्यांची क्षमता त्यांच्याकडे होती. गर्दीला रिझल्ट हवा असतो.प्रत्येकाला शांततेने ऐकण्याचे औदर्य त्यांच्याकडे होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या सुवर्ण महोत्सवी आयोजनात त्यांनी घेतलेला पुढाकार स्मरणीय आहे. जलसंधारणाच्या कामात त्यांनी घेतलेला पुढाकार लक्षणीय आहे. मन्याड नदीच्या खोलीकरणात दाखविलेली रुची सुखद आठवण आहे. 164 ठिकाणी गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासोबतच माझी शाळा हा एक सामाजिक उपक्रम नांदेडकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे. प्रशासनात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी एक-एक शाळा दायित्व म्हणून सांभाळायला घेतली. आवश्यक सुधारणांसाठी पाठपुरावा केला आणि त्यातून एक मोठी सामाजिक चळवळ जिल्ह्यामध्ये उभी राहिली. अंतर्गत रस्ते व प्रमुख रस्त्यांच्या दुरूस्ती व देखभालीबाबत ते अतिशय आग्रही होते त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची त्यांनी विशेष काळजी घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पासाठी या तरुण अधिकाऱ्याने पाठपुराव्याचे जाळे विणले. मंत्रालयापासून ते स्थानिक स्तरापर्यंत त्यांचा पाठपुरावा कायम होता. या प्रकल्पाचे पूनवर्सन अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचे भूसंपादन जवळपास 98 टक्के झाले आहे तर नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाचे भूसंपादन 95 टक्क्यांवर झाले आहे. रस्ते, रेल्वेमार्ग विकासाच्या वाटा असतात. त्या कायम पूर्णत्वाकडे नेणे उत्तम प्रशासनाचे लक्ष असल्याचे ते मानतात.
आरोग्याबाबत अतिशय जागरूक असणारे जिल्हाधिकारी आपली आरोग्य यंत्रणा अधिक प्रतिसाद देणारी असावी याबाबत आग्रही होते. त्यांनी एका नव्या विषयाला जिल्ह्यामध्ये हात घातला. बदलत्या जीवनशैलीमुळे मुले न होणे, संतती प्राप्तीमध्ये अडचण येणे नवी सामाजिक समस्या आहे. यावर समुपदेशन व उपचाराने लगेच मार्ग काढता येतो. त्यामुळे वंधत्व निवारण क्लिनिक त्यांनी आरोग्य यंत्रणेत निर्माण केले. यामुळे विनाकारण होणारे महिलांचे शोषण, कुटुंबातील कलह यामध्ये एक नवा अधुनिक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण करण्यास मदत झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील क्रिडाचे केंद्र करण्यासाठी त्यांची धडपड उल्लेखनीय होती. एका वर्षामध्ये जवळपास 14 राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन नांदेडमध्ये झाले आहे. 25 क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत. प्रत्येक खेळाचे मैदान आहे. त्यामुळे या ठिकाणावरून सर्व प्रकारच्या खेळामध्ये खेळणारे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी त्यांचे कायम प्रयत्न राहिले आहे.
आज येणाऱ्या प्रत्येकाकडे एक आठवण होती. हस्ते पर हस्ते झालेल्या मदतीची नोंद होती. कुणाकडे शाळा कुणाकडे दवाखाना अद्यावत झाल्याची आठवण होती. अडलेल्या खाजगी कामांनाही मोकळ्या केल्याची आठवण होती तर काही विद्यार्थ्यांनी तातडीने मिळालेल्या प्रमाणपत्राची आठवण काढून दिली. कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या काही क्षणांची आठवणही सांगितली ज्यांना काही बोलता आले नाही कधीच, त्यांनीही आज आभार व्यक्त केले.
0000
वृत्त क्र. 148
शासकीय कार्यालयामध्ये सौरऊर्जेच्या वापराकडे विशेष लक्ष द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक
नांदेड, दि. ५ फेबुवारी : केंद्र व राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेने काम करावे. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जे संदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा, अशी सूचना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.
उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई येथून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना ( डीपीसी ) संदर्भातील राज्यस्तरीय बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे घेण्यात आली. या बैठकीला मंत्रालयातून इतर मागास बहुजन कल्याण,पशुसंवर्धन,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे,आमदार प्रताप पाटील चिखलीकर, यांची उपस्थिती होती. बैठकीला वित्त नियोजन राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, नवी दिल्लीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,अप्पर मुख्य सचिव राजगोपाल वर्मा,वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य माध्यमाने उपस्थित होते.
तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून दृकश्राव्य माध्यमातून आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी लोकप्रतिनिधींनी गाव तिथे स्मशानभूमी, पानंद रस्ते, शाळांची दुरुस्ती, मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमांसाठी वाढीव निधी, माळेगाव यात्रा, जलजीवन मिशन, नव्या रोहित्रांसाठी वाढीव निधी, तसेच शाळा व सर्व शासकीय कार्यालयांवर सोलर सिस्टम बनविण्याबाबतची मागणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला समजून घेतले. उपस्थित लोकप्रतिनिधींच्या प्रारूप आराखड्यासंदर्भातील मतांना लक्षात घेतले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्याच्या अंतिम आराखड्याला मान्यता देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025 -26 च्या प्रारूप आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. जिल्ह्यासाठी नियोजन विभागाने दिलेल्या रुपये 477.47 कोटी मर्यादेत आराखडा सादर करून विविध योजनेसाठी रुपये २०० कोटींची अतिरिक्त मागणी यावेळी करण्यात आली.
00000
Tuesday, February 4, 2025
वृत्त क्र. 147
नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी
नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे वस्तू व सेवा कर सहआयुक्त पदावर बदली झाली आहे.
मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदली जाहीर केल्या. यामध्ये सन 2015 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असणारे राहुल कर्डिले यांची नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी ,परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,वर्धा जिल्हाधिकारी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदी विविध पदे भूषविली आहेत.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची सह आयुक्त वस्तू व सेवा कर छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत गेल्या अडीच वर्षापासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी ते नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर रुजू झाले होते.विविध जन उपयोगी उपक्रम ,सामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे अधिकारी, उत्कृष्ट प्रशासक म्हणून अभिजीत राऊत यांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी आहे.
00000
वृत्त क्र. 146
दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू
तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त
नांदेड दि. 4 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळस्तरावर 10 वी साठी 02382-251633 तर 12 वी साठी 02382-251733 हा हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले नावे व भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव) मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक बारावीसाठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.
माध्यमिक (दहावी) साठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस.एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं. 7620166354 हे भ्रमणध्वनी क्रमांक असतील. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत साधावा.
भयमुक्त-तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्र. परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल. नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कच्छवे बी.एम. 9371261500, कारखेडे बी.एम. 9860912898, सोळंके पी.जी. 9860286857, पाटील बी. एच. 9767722071 असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.
00000
वृत्त केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)




