Monday, December 2, 2024

 ​वृत्त क्र. 1154

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार

योजनेसाठी नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबरपर्यत मुदतवाढ

                                                                                                                                                                                    नांदेड, दि. २ डिसेंबर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 साठी पात्र विद्यार्थ्यांना नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  पात्र विद्यार्थ्यांनी http://hmos.mahait.org या संकेतस्थळावर 16 डिसेंबर 2024 पर्यत कार्यालयीन वेळेपर्यत ऑनलाईन भरलेला अर्ज भरल्यानंतर 2 दिवसांत अर्जाची 1 प्रिंट आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक नांदेड येथे कार्यालयीन वेळेत स्वाधार विभागाकडे सादर  करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

                                                                                                                                                                                   लाभाचे स्वरूप 

या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये, प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपये वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.                       

                                                                                                                                                                                      या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष

विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवासी असावा, शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्यागृने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी  (केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असलेल्या) विद्यार्थ्यानी अर्ज करणे आवश्यक आहे. परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसावा, विद्यार्थ्यास इयत्ता 10,11,12 वी तसेच पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यासाठी  3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल, विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50  लाखापेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहीवासी नसावा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महापालिका हद्दीपासून 05 किमी परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यानीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 02 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा, विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75  टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल, विद्यार्थ्याची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही, तसेच या प्रणालीमध्ये आपल्या महाविद्यालय महानगर पालिकेच्या हद्दीपासून 5 किमी च्या आत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 

                                                                                                                                                                                    सूचना

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल.

तसेच अपूर्ण भरलेले, आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 वृत्त क्र. 1153

निवडणुका पारदर्शीतेत पार पाडण्यात माध्यमांचे सहकार्य : जिल्हाधिकारी 

 जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांचे मानले आभार  

नांदेड दि. 2 डिसेंबर : निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर माध्यमांनी सहकार्य केले, त्यामुळे निवडणुकीचे कार्य अधिक पारदर्शितेत पार पाडणे शक्य झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीनंतर पत्रकारांसोबत  शासकीय विश्रामगृहात रविवारी अनौपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. 

व्यासपीठावर यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार विजय जोशी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी,ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे,म.अब्दूल सत्तार आरेफ,केशव घोणसे पाटील, प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स व समाज माध्यमांच्या  प्रतिनिधीची उपस्थिती होती. 

यावेळी माध्यमांशी अनौपचारिक गप्पा करताना त्यांनी गेल्या वर्षभरापासून यंत्रणा निवडणुकीच्या संदर्भातील कामांमध्ये व्यस्त असल्याचे स्पष्ट केले.मात्र यावेळी नांदेडच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाने निवडणूक कार्यामध्ये उत्तम प्रसिद्धी दिली. त्यामुळे शासनाने सामान्य जनता यामध्ये निवडणुकीची पारदर्शकता आणखी उठून दिसली. विशेषतः नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित असताना निवडणुकी संदर्भातील प्रत्येक गोष्ट आम्ही माध्यमाला सांगितली. कोणतीही गोष्ट बाजूला ठेवली नाही. लपवून ठेवली नाही. त्यामुळे पारदर्शतेने जनतेपुढे आमचेही कार्य आले. त्यासाठी माध्यमांचे आम्ही आभारी आहोत ,असे कौतुक त्यांनी यावेळी केले. 

दोन्ही निवडणुका एकत्रित असल्यामुळे काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया खूप वेळेपर्यंत चालली.सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक मतदाराचे मत घेता आले. त्या संदर्भातील सर्व व्हिडिओ फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्हाला याबाबत योग्य तो खुलासा करता आला. 

 पुन्हा मतमोजणी मागण्याची संधी 

 निवडणूक मतमोजणी संपल्यानंतर 45 दिवसांनंतर C and V ही तपासणी न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून केली जाते. मतमोजणीतील द्वितीय व तृतीय स्थानावरील उमेदवारांना ठराविक EVM बाबत शंका असेल ते उमेदवार प्रत्येक ईव्हीएम साठी 47 हजार दोनशे रुपये भरून चेकिंग वेरिफिकेशन करू शकतात. यात डमी मतदानाद्वारे मशिनची तपासणी केली जाते. तसेच दुसरा पर्याय म्हणजे न्यायालयाकडे दाद मागू शकतात. 

 राजकीय पक्षाचा सहभाग 

विशेष म्हणजे मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रिया, प्रशासन डोळ्यात तेल घालून करत असते. प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना प्रशासन सहभागी करून घेते. मशीनचे वाटप असो, मशीन लावणे असो, मशीन मतमोजणीला घेणे असो, राजकीय प्रतिनिधीचा सहभाग असतो. एवढेच नाही तर प्रत्येक मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉक पोल घेतले जाते. या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला दोन मते दिली जातात. ही प्रक्रिया देखील मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये मतदानाच्या टक्केवारी वाढल्याबद्दल फारशा नकारात्मक बातम्या आल्या नाही. कारण मतमोजणीत महत्त्वपूर्ण असणाऱ्या सतरा सी या अर्जातील आकडे आणि मशीन वरील आकडे यामध्ये कुठेही तफावत राहिली नाही. तसेच वेळोवेळी माध्यमांना माहिती तात्काळ उपलब्ध करण्यात आली. कुठे? का? वेळ झाला याचे खुलासेही जिल्हा प्रशासनाने लगेच दिले.

 एका मताचा फरक नाही 

तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होत असताना 75 मशीनमध्ये झालेल्या मतदानाची आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची रँडम जुळवणी केली आहे. एकाही ठिकाणी एकाही मताचा फरक नाही. पूर्णतः ताळमेळ जुळलेला आहे. त्यामुळे कुठेही शंकेला वाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.

२९ विभागाचे सातत्यपूर्ण कार्य  

यावेळी विशेषतः मीडिया कक्षाने सतत 45 दिवस या निवडणुकीत केलेल्या सातत्यपूर्ण कामकाजाचे कौतुक केले. तसेच निवडणुकांमध्ये जवळपास 29 विभाग विविध पातळीवर काम करत होते. दररोज नवीन काम व ठरल्याप्रमाणे काम असे कामाचे स्वरूप होते. प्रत्येक कामाचे वेळापत्रक निवडणुकीत ठरले राहते. ते त्याच दिवशी करावे लागते. तथापि, प्रत्येकाने मन लावून काम केल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. विशेषतः स्वीप अभियान राबविणारे अधिकारी कर्मचारी तपासणी, छापे घालणाऱ्या पथकातील कर्मचारी, सायबर सेल ते बंदोबस्तासाठी कार्यरत पोलीस प्रशासन, जिल्ह्यापासून तर तालुक्यापर्यंत काम करणारे महसूल कर्मचारी, गावागावातील कोतवाल, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांच्या ज्या ठिकाणी त्यांची भूमिका असेल त्या त्या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने काम केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

 माध्यमांच्या सकारात्मकतेचे कौतुक 

तसेच माध्यमांनी सकारात्मकतेने यासर्व बाबीचे वृत्तांकन केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. दिलेले वृत्त वेळेत प्रसिद्धीस दिले. काही  खुलासे लगेच  प्रसिद्ध केले. मतदार लोकप्रतिनिधी यांच्यासाठी निवडणूक काळामध्ये वेगवेगळ्या सूचना वेळोवेळी द्याव्या लागतात. अशावेळी प्रशासन माध्यमांवर अवलंबून असते. जनजागृती पासून तर वेगवेगळ्या सूचनांना वेळेत प्रसिद्धी दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांचे आभार मानले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी पत्रकारांसोबत या स्नेह निमंत्रण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. 

पत्रकार विजय जोशी, शंतनु डोईफोडे, म. अब्दूल सत्तार आरेफ, डॉ. दिलीप शिंदे, श्रीनिवास भोसले, राम तरटे, किशोर वागदरीकर यांनी आपल्या संबोधनात प्रशासनाचे आभार मानले. तसेच गतिशील पद्धतीने माहिती दिल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाच्या यंत्रणेची व मीडिया पक्षाचे स्वागत केले. 

विश्राम गृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

०००००



Sunday, December 1, 2024

​वृत्त क्र. 1152

​जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साहात सुरुवात 

नांदेड, दि. १ डिसेंबर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ व युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 01-02 डिसेंबर,2024  या कालावधीत मंच क्रं.01- जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान, नांदेड,  मंच क्रं. 02- डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड व  मंच क्रं.03- जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड,  या ठिकाणी करण्यात आले.

या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन आज 01 डिसेंबर,2024 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सान्वी जेठवाणी (राज्य निवडणुक दुत,भारत सरकार), श्रीमती चंदा रावळकर (युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड), मा.श्रीमती कविता जोशी (जिल्हा समन्वयक,सी.सी.आर.टी न्यु दिल्ली) व्यासपीठावर संजय बेतीवार (क्रीडा अधिकारी), बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन), चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक), राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी), विपुल दापके (क्रीडा अधिकारी), संतोष कनकावार (वरिष्ठ लिपीक) आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युवा महोत्सव म्हणजे युवकाना आपल्या मधील कलागुण दाखविण्याचे एक खुले व्यासपीठ असुन  या मध्ये युवकांचा सर्वागिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढिस लावणे, युवकाना तृणधान्याचे महत्त्व पटवुन देणे, शिक्षण, उद्योग व्यवसाय, या सोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करून देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्त्व युवकाना पटवुन देणे इत्यादी बाबीवर युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तसेच यामध्ये प्राविण्य प्राप्त करणारे स्पर्धक हे लातूर येथे संपन्न होणा-या विभागीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहे. तसेच राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजनाचे यजनाम पद नांदेड जिल्हयास मिळालेले असल्यामूळे नांदेड जिल्हयातील जास्त-जास्त स्पर्धक सहभागी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

या युवा महोत्सवामध्ये 1) सांस्कृतिक कला प्रकार:- समुह लोकनृत्य, लोकगीत 2) कौशल्य विकास:- कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), कविता (500 शब्द मर्यादा  सहभाग संख्या 01), 3) संकल्पना आधारीत स्पर्धा:- विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना (Innovation in science and Technology) 4) युथ आयकॉन:- युथ ऑयकान जिल्हयातुन युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित कार्य केलेल्या 15 ते 29 वयोगटातील 5 युवांना विभागीयस्तरावर सहभागी होता येणार आहे.

उदघाटन  प्रसंगी श्रीमती सान्वी जेठवाणी (राज्य निवडणूक दुत,भारत सरकार) यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांचे कलागुण विकसित व्हावेत यासाठी शासनाने हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे. त्याचा स्पर्धकांनी उपयोग करुन घ्यावा. त्याचबरोबर मनोरंजनाबरोबरच स्पर्धकांनी खेळाकडे वळावे याबाबत मार्गदर्शन केले.

या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाकरीता श्रीमती सान्वी जेठवाणी यांचेबरोबरच विविध कलाप्रकाराचे परिक्षक म्हणुन संदीप काळे, डॉ. पांचाळ पांडुरंग, डॉ.संदीप देवुळगांवकर, डॉ.मनिष देशपांडे, डॉ.शिवराज शिंदे, डॉ.आनंद आष्टुरकर, डॉ.संभाजी मनुरकर, डॉ.बालाजी पेनूरकर, श्रीमती कविता जोशी, आदी परीक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तावीक बालाजी शिरसीकर यांनी केले तर सुत्र संचलन डॉ. पांचाळ पांडुरंग यांनी केले.

​हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यालयातील संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, इक्रम शेख, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, यश कांबळे आदी परिश्रम घेत आहेत.

या युवा महोत्सवाचा नांदेड जिल्हयातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे.

०००००




Friday, November 29, 2024

वृत्त क्र. 1151

​महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबत उमेदवारांना सूचना

· रविवार 1 डिसेंबर रोजी परीक्षेचे आयोजन

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांच्यामार्फत आयोजित महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा-2024 परीक्षा रविवार 1 डिसेंबर 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील 33 उपकेंद्रावर होणार असून उमेदवारांनी पुढीलप्रमाणे दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

या परीक्षेसाठी उमेदवाराने अद्यावत प्रवेश प्रमाणपत्र (डाऊनलोड करुन ) त्‍याची प्रत आणणे सक्‍तीचे आहे. परीक्षेस येतेवेळी उमदेवाराने ओळखीच्‍या पुराव्‍यासाठी स्‍वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्‍मार्ट कार्ड प्रकारचे ड्राईव्हिंग लायसन्‍स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच सकाळ सत्रासाठी आणि दुपार सत्रासाठी मुळ ओळखपत्राची स्‍वतंत्र छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. मुळ ओळखपत्राच्‍या पुराव्‍याऐवजी त्‍यांच्‍या छायांकित प्रत अथवा कलर झेरॉक्‍स अथवा अन्‍य कोणत्‍याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्‍यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमदेवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्‍यात येईल.

आयोगाने मनाई केलेल्‍या स्‍मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्‍याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्‍लूटूथ, दुरसंचार साधने म्‍हणून वापरण्‍यायोग्‍य कोणतीही वस्‍तू, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोटस , परवानगी नसलेली पुस्‍तके, बॅग्‍ज, पॅड, पाऊच, परिगणक इत्‍यादी प्रकारची साधने, साहित्‍य परीक्षा केंद्राच्‍या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्‍यास स्‍वतः जवळ बाळगण्‍यास त्‍याचा वापर करण्‍यास अथवा त्‍याच्‍या वापरासाठी इतरांची मदत घेण्‍यात सक्‍त मनाई आहे. उमदेवारांना आयोगाने या परीक्षेच्‍या अनुषंगाने दिलेल्‍या सुचनाचे पालन करावे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000

 वृत्त क्र. 1150

शेतकरी ओळख क्रमांकासाठी संकेतस्थळाची निर्मिती 

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :-  भारत सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. 

शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी या संकेतस्थळाचा URL www.mhfr.agristack.gov.in याचा वापर करता येईल. या संकेतस्थळावर करावयाच्या कार्यवाहीचे सादरीकरण दिले आहे. त्यानुसार या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा. तसेच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने  दिले आहेत. 

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यामध्ये असणार आहे. 

शेतकऱ्यांचा माहिती संच निर्माण करण्यासाठी मोहीम स्वरुपात शेतकरी माहिती संच निर्माण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र राज्याचा शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी स्वयं नोंदणी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांना स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करता येईल व शेतकरी माहिती संचात समाविष्ट करता येणार आहे. 

00000

वृत्त क्र. 1149

चिकुनगुन्या प्रभावित क्षेत्रास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली भेट

प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजनाबाबत केले मार्गदर्शन

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :-  देगलूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात 23 नोव्हेंबर 2024 रोजी चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच पेडपल्ली या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक व उपचारात्मक प्रभावी काम कसे करायचे, या बाबतीत आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांना आवश्यक त्या सूचना केल्या. 

तसेच प्रतिबंधासाठी मरखेलचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. योगिता चामले, आरोग्य सहाय्यक डी. एल. कुलकर्णी, आरोग्य सेवक ए.एस. खांडरे, आरोग्य सेविका श्रीमती येदगिवार या वैद्यकीय पथकाद्वारे गावात रुग्णांवर उपचार केला जात आहे. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. तो विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस प्रजातींद्वारे पसरतो.  हे डास जेव्हा विषाणूने आधीच संक्रमित व्यक्तीला चावतात तेव्हा ते संक्रमित होतात. विषाणू प्राप्त केल्यानंतर, डास त्यांच्या चाव्याव्दारे इतर मानवांमध्ये पसरवू शकतात. 

चिकुनगुनियाची लक्षणे साधारणपणे संक्रमित डास चावल्यानंतर 4 ते 8 दिवसांनी सुरू होतात. सामान्य लक्षणांमध्ये अनेकदा अचानक आणि 102°F (39°C) पर्यंत पोहोचू शकते. सांध्यामध्ये तीव्र वेदना, विशेषत: हात आणि पाय जे अनेक दिवस टिकू शकतात. सामान्यत: स्नायूत  वेदना होतात. सौम्य ते गंभीर डोकेदुखी अत्यंत थकवा आढळून येतो. 

चिकनगुनियासाठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना केल्या जात असून, चिकुनगुनियाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घर परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. दर आठवड्यास शनिवारी कोरडा दिवस पाळावा. घर परिसरात फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादीची वेळीच सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. पाण्याचे साठे झाकणाने घट्ट झाकून ठेवावेत. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा बांधावा. तसेच ग्रामपंचायतीने गावातील पाणी साचणारे खड्डे बुजवून घ्यावेत. तुंबलेली नाली व गटारी वाहत्या कराव्यात. चिकुनगुनियाची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख यांनी केले.

00000







 


वृत्त क्र. 1149

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर

30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यत विशेष मेळाव्याचे आयोजन 

                                                                                                                                                                      नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ठिंबक व तुषार सिंचनाबाबत तालुकास्तरावर, मंडळस्तरावर व तसेच गावोगावी माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व  अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...