वृत्त क्र. 1153
निवडणुका पारदर्शीतेत पार पाडण्यात माध्यमांचे सहकार्य : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांचे मानले आभार
नांदेड दि. 2 डिसेंबर : निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर माध्यमांनी सहकार्य केले, त्यामुळे निवडणुकीचे कार्य अधिक पारदर्शितेत पार पाडणे शक्य झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीनंतर पत्रकारांसोबत शासकीय विश्रामगृहात रविवारी अनौपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते.
व्यासपीठावर यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार विजय जोशी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी,ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे,म.अब्दूल सत्तार आरेफ,केशव घोणसे पाटील, प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स व समाज माध्यमांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती.
यावेळी माध्यमांशी अनौपचारिक गप्पा करताना त्यांनी गेल्या वर्षभरापासून यंत्रणा निवडणुकीच्या संदर्भातील कामांमध्ये व्यस्त असल्याचे स्पष्ट केले.मात्र यावेळी नांदेडच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाने निवडणूक कार्यामध्ये उत्तम प्रसिद्धी दिली. त्यामुळे शासनाने सामान्य जनता यामध्ये निवडणुकीची पारदर्शकता आणखी उठून दिसली. विशेषतः नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित असताना निवडणुकी संदर्भातील प्रत्येक गोष्ट आम्ही माध्यमाला सांगितली. कोणतीही गोष्ट बाजूला ठेवली नाही. लपवून ठेवली नाही. त्यामुळे पारदर्शतेने जनतेपुढे आमचेही कार्य आले. त्यासाठी माध्यमांचे आम्ही आभारी आहोत ,असे कौतुक त्यांनी यावेळी केले.
दोन्ही निवडणुका एकत्रित असल्यामुळे काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया खूप वेळेपर्यंत चालली.सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक मतदाराचे मत घेता आले. त्या संदर्भातील सर्व व्हिडिओ फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्हाला याबाबत योग्य तो खुलासा करता आला.
पुन्हा मतमोजणी मागण्याची संधी
निवडणूक मतमोजणी संपल्यानंतर 45 दिवसांनंतर C and V ही तपासणी न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून केली जाते. मतमोजणीतील द्वितीय व तृतीय स्थानावरील उमेदवारांना ठराविक EVM बाबत शंका असेल ते उमेदवार प्रत्येक ईव्हीएम साठी 47 हजार दोनशे रुपये भरून चेकिंग वेरिफिकेशन करू शकतात. यात डमी मतदानाद्वारे मशिनची तपासणी केली जाते. तसेच दुसरा पर्याय म्हणजे न्यायालयाकडे दाद मागू शकतात.
राजकीय पक्षाचा सहभाग
विशेष म्हणजे मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रिया, प्रशासन डोळ्यात तेल घालून करत असते. प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना प्रशासन सहभागी करून घेते. मशीनचे वाटप असो, मशीन लावणे असो, मशीन मतमोजणीला घेणे असो, राजकीय प्रतिनिधीचा सहभाग असतो. एवढेच नाही तर प्रत्येक मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉक पोल घेतले जाते. या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला दोन मते दिली जातात. ही प्रक्रिया देखील मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये मतदानाच्या टक्केवारी वाढल्याबद्दल फारशा नकारात्मक बातम्या आल्या नाही. कारण मतमोजणीत महत्त्वपूर्ण असणाऱ्या सतरा सी या अर्जातील आकडे आणि मशीन वरील आकडे यामध्ये कुठेही तफावत राहिली नाही. तसेच वेळोवेळी माध्यमांना माहिती तात्काळ उपलब्ध करण्यात आली. कुठे? का? वेळ झाला याचे खुलासेही जिल्हा प्रशासनाने लगेच दिले.
एका मताचा फरक नाही
तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होत असताना 75 मशीनमध्ये झालेल्या मतदानाची आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची रँडम जुळवणी केली आहे. एकाही ठिकाणी एकाही मताचा फरक नाही. पूर्णतः ताळमेळ जुळलेला आहे. त्यामुळे कुठेही शंकेला वाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.
२९ विभागाचे सातत्यपूर्ण कार्य
यावेळी विशेषतः मीडिया कक्षाने सतत 45 दिवस या निवडणुकीत केलेल्या सातत्यपूर्ण कामकाजाचे कौतुक केले. तसेच निवडणुकांमध्ये जवळपास 29 विभाग विविध पातळीवर काम करत होते. दररोज नवीन काम व ठरल्याप्रमाणे काम असे कामाचे स्वरूप होते. प्रत्येक कामाचे वेळापत्रक निवडणुकीत ठरले राहते. ते त्याच दिवशी करावे लागते. तथापि, प्रत्येकाने मन लावून काम केल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. विशेषतः स्वीप अभियान राबविणारे अधिकारी कर्मचारी तपासणी, छापे घालणाऱ्या पथकातील कर्मचारी, सायबर सेल ते बंदोबस्तासाठी कार्यरत पोलीस प्रशासन, जिल्ह्यापासून तर तालुक्यापर्यंत काम करणारे महसूल कर्मचारी, गावागावातील कोतवाल, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांच्या ज्या ठिकाणी त्यांची भूमिका असेल त्या त्या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने काम केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
माध्यमांच्या सकारात्मकतेचे कौतुक
तसेच माध्यमांनी सकारात्मकतेने यासर्व बाबीचे वृत्तांकन केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. दिलेले वृत्त वेळेत प्रसिद्धीस दिले. काही खुलासे लगेच प्रसिद्ध केले. मतदार लोकप्रतिनिधी यांच्यासाठी निवडणूक काळामध्ये वेगवेगळ्या सूचना वेळोवेळी द्याव्या लागतात. अशावेळी प्रशासन माध्यमांवर अवलंबून असते. जनजागृती पासून तर वेगवेगळ्या सूचनांना वेळेत प्रसिद्धी दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांचे आभार मानले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी पत्रकारांसोबत या स्नेह निमंत्रण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली.
पत्रकार विजय जोशी, शंतनु डोईफोडे, म. अब्दूल सत्तार आरेफ, डॉ. दिलीप शिंदे, श्रीनिवास भोसले, राम तरटे, किशोर वागदरीकर यांनी आपल्या संबोधनात प्रशासनाचे आभार मानले. तसेच गतिशील पद्धतीने माहिती दिल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाच्या यंत्रणेची व मीडिया पक्षाचे स्वागत केले.
विश्राम गृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
०००००
No comments:
Post a Comment