Monday, August 12, 2024

वृत्त क्र.  701

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन

हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना

नांदेड, दि. 12 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी 4 वाजता  नांदेड, हिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले. श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

#नांदेड विमानतळावर आ. बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे,अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित कावड यात्रेस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झालेत.

***

















 वृत्त क्र.  700

सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  सद्यास्थितीत मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. पुढीलप्रमाणे रोगाची लक्षणे ओळखुन एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे.

 रोगाची लक्षणे :-  हिरवा मोझॅक : यामध्ये झाडाची पाने ही जाडसर, आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात. प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते. हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडी द्वारे केला जातो.

पिवळा मोझॅक : सोयाबीन च्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.

 रोगास कारणीभूत घटक :

·   केवडा रोग उबदार तापमान, अति दाट पेरणी या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरते.

·  आद्र हवामानात हा रोग वाढत जातो.

नुकसानीचा प्रकार :- दोन्हीही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

सोयाबीनवरील पांढरी माशी, मावा, आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन :-

काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा वरोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये १२ इंच x १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत. नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करावा. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासूनरोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. पीक तणमुक्त ठेवावे. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे

दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असिटामिप्रीड २५% + बाइफेन्द्रीन २५ % डब्ल्यूजी १०० ग्रॅम (५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) (लेबल क्लेम कीटकनाशक) किंवा थायमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६% झेडसी ५० मिली (२.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) (लेबल क्लेम नाही) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी. वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणीसाठी वापरण्यात येनाऱ्यां पाण्याचा सामू ५ ते ७ असावा, शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयारकरताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे, तोंडावर मास्क व संरक्षित कपडयाचा वापर करावा तसेचघुटका, तंबाखु  खाऊ नये व बीडी पिऊ नये. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो.

00000

 वृत्त क्र.  699

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महावीर चौकापर्यंतच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौक पर्यंतच्या परिसरात मुख्य रोडवर 13 ऑगस्ट 2024 रोजीच्या मध्यरात्री पासून ते 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. 

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2024 रोजी ध्वजारोहनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.  त्याअनुषंगाने शहरातील      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौकापर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (दिनांक 12 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री ) ते 16 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषणे,आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, रस्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

000000

 वृत्त क्र.  698

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुर्नभरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

विषेशत: उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेततील महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी  करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित तेल कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गावात येऊन ई-केवायसी करुन घेतील किंवा आपणास शक्य असल्यास संबंधित ऑईल कंपनीच्या एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी. सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्र.  697

समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनासाठी 26 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 20 टक्के सेस मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनासाठी पात्र लाभार्थ्यांनी 26 ऑगस्ट 2024 पर्यत पंचायत समितीकडे सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

या योजनांमध्ये मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन, प्रिंटर, लहान मशिन अनुदान,  मागासवर्गीयांना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे, मागासवर्गीय महिलांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन अनुदान,  मागासवर्गीयाना मिरची कांडप अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी प्रोत्साहनपर अनुदान, मागासर्गीय व्यक्तीना दुग्ध व्यवसायासाठी गाई व म्हैस पुरविणे, निराधार/विधवा/परितक्त्या, घटस्फोटीत एकल मागासवर्गीय महिलांना उपजिविकेसाठी सहाय्य करणे या योजनाचे अर्ज माहिती पत्रकासह सर्व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे संपर्क साधून अर्जामध्ये नमुद केलेल्या सर्व कागदपत्रासह अर्ज 26 ऑगस्ट पर्यत पंचायत समिती कार्यालयात सादर करावेत.  तसेच अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  

00000

 वृत्त क्र.  696

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन    

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://hmos.mahait.org   संकेतस्थळावर  30 ऑगस्ट 2024 या कालावधीत  कार्यालयीन वेळेत ऑनलाईन भरावा. भरलेला अर्ज 2 दिवसात अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहाकडे जमा करावा. सदर पात्र लाभार्थ्याची पहिली निवड यादी अंतिम  व प्रसिध्द 4 सप्टेंबर 2024 पर्यत करण्यात येईल. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन संबंधित वसतीगृह गृहपाल यांनी सही शिक्क्यासह 3 सप्टेंबर 2024 पर्यत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी खर्चाची बाबीत भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम  51 हजार रूपये एवढी आहे.  नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुज्ञेय रक्कम  आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.  

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी/ अकरावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.  विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. 

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 


वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...