Thursday, May 9, 2024

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 वृत्त क्र. 413

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात

बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         बाल विवाह होणार नाहीत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विभागांना निर्देश

·         ग्रामीणसाठी ग्रामसेवक तर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अधिकार

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-   अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाचा समजला जाणारा मुहूर्त उद्या 10 मे रोजी आहे. या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. तसेच बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास चाईल्ड हेल्प लाईन 1098 ला तात्काळ माहिती देण्याचेही आवाहन त्यांनी केले.

 

भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक प्रक्रीया आहे. साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह समारंभ  आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना निर्देश जारी केले आहेत. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदेशिर ठरतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक नियुक्त असून शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागात अंगणवाडी पर्यवेक्षिका नियुक्त केल्या आहे. बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक आहे.बालविवाह उघडकीस आल्यास पालकांपासून तर सर्वच सहभागी आरोपी ठरविले जातात त्यामुळे अशा प्रकरणात समाजातील सर्व सुशिक्षितांनी लक्ष वेधून असावे. समाजातील ही प्रथा बंद करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

आपल्या अधिकार क्षेत्रात बालविवाह होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व असे बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील संबंधित विभागांना दिले आहेत.

00000

Wednesday, May 8, 2024

 वृत्त क्र. 412

पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कुठेही पाणी टंचाई नसून  केवळ जलवाहिनीच्‍या तांत्रिक बिघाडामुळे शहरात काही दिवस पाणी पुरवठा खंडित झाला होता. येणाऱ्या काळात नांदेड शहराला पुरवठा करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आरक्षित असून नागरिकांनी पाणी टंचाईबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

नांदेड जिल्‍हयातील पाणी टंचाई संदर्भात नांदेड शहरासाठी विष्‍णुपूरी प्रकल्‍पातून 43 दलघमी व उर्ध्‍व पैनगंगा प्रकल्‍पातून 06 दलघमी पिण्‍याचे पाणी आरक्षित करण्‍यात आले आहे. मागील आठवड्यामध्‍ये नांदेड शहरासाठी विष्‍णुपूरी प्रकल्‍पातून काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाण्‍याची मुख्‍य जलवाहिनी जीर्ण होवून फुटल्‍यामुळे व विद्युत मोटारीमध्‍ये तांत्रीक बिघाड झाल्‍यामुळे शहरासाठी काही दिवस पाणी पुरवठा बंद झाला होता. जलवाहिनी दुरुस्‍तीचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून साधारणपणे दोन दिवसात शहराचा पाणी पुरवठा सुरुळीत होईल, असे मनपा प्रशासनाने कळविले आहे. 

तसेच शहराच्‍या पाणी पुरवठा करण्‍याच्‍या दृष्‍टीने अतिरिक्‍त उपाययोजना म्‍हणून उर्ध्‍व पैनगंगा प्रकल्‍पातील आरक्षित पिण्‍याच्‍या पाण्‍यापैकी 02 दलघमी पाणी सांगवी बंधाऱ्यामध्ये सोडण्‍याबाबत आदेश केले होते. त्‍यानुसार आता नांदेड महापालिकांतर्गत सांगवी बंधाऱ्यातून आवश्‍यकतेनुसार पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुरुळीत झाला आहे. सध्‍या नांदेड शहरामध्‍ये 25 टॅंकरव्‍दारे व 250 बोअरवेल व्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. 

ग्रामीण भागातील 15 वाडी, गावांमध्‍ये 15 खाजगी टॅंकरव्‍दारे व 141 खाजगी विहीर अधिग्रहणपैकी साधारणपणे मुखेड तालुक्‍यात 10, कंधार 4 व माहूर तालुक्‍यात 1 टॅंकरव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. तसेच भोकर-11, हिमायतनगर-16, नायगाव-43, मुखेड-29, लोहा-13 व किनवट 16 या तालुक्‍यात विहीर अधिग्रहण प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले आहेत.  टंचाईग्रस्‍त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत हे तालुक्‍याच्‍या ठिकाणी आढावा बैठक घेत आहेत. तसेच तालुक्‍यातील टंचाईग्रस्‍त गावामध्‍ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्‍येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.

0000

  वृत्त क्र. 411

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार  

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.  

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000

Tuesday, May 7, 2024

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

 वृत्त क्र. 410

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

नांदेड दि. 7 :- सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप्त रेती साठ्याचा सहाशे रुपये दराने लिलाव 8 मे 2024 रोजी सकाळी 11 तहसिल कार्यालय, नायगाव येथे करण्यात येणार आहे.

जप्त रेती साठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, नायगाव (खै.) च्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छूकांनी लिलावात सहभाग घ्यावा, असे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Monday, May 6, 2024

 वृत्त क्र. 409 

वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह,

ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

 

नांदेड दि. 6 मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 6 व 7 मे 2024 हे दोन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 6 व 7 मे 2024 ह्या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 408

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत  


नांदेड दि. 6 मे :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे 2024 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवार 7 मे 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 






वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...