Wednesday, April 10, 2024

 वृत्त क्र. 326 

सीईओ मीनल करनवाल यांनी

मतदार जागृतीसाठी बारड येथील कन्या शाळेस दिली भेट 

नांदेड दि. 10 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा बारड येथे भेट दिली. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनीना व शिक्षकांना मतदार जनजागृती विषयी माहिती विचारली. कु. वैष्णवी कदम व शिक्षिका हंबर्डे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच सीईओ मीनल करनवाल यांनी मुलींना मतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे त्यांनी अभिनंदन केले. शाळेचे काम पाहून समाधान व्यक्त केले.

0000




 वृत्त क्र. 325 

धर्म व समुदायाच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या

5 नेटकऱ्यावर नांदेडमध्ये गुन्हे दाखल

 

फेसबुक, इन्स्टाग्रामवरील समाजकंटकांची झाडाझडती

 

नांदेड दि. 10 एप्रिल : ऐन निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्या पाच असामाजिक तत्त्वांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांची माथी भडकवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्ह्याच्या पाच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहे.

    

निवडणुकीमध्ये जात, धर्म, पंथ ,याचा वापर करू नये, अशी आदर्श आचारसंहिता आहे. मात्र ऐन निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने काही पोस्ट तयार करणाऱ्या पाच जणांना सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने हुडकून काढले आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत ही समिती कार्यरत कार्यरत आहे.

 

धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्यावर हिमायतनगर अंतर्गत 295 (अ) अंतर्गत, मुखेड मध्ये 505 ( 2), अर्धापूर मध्ये 505 (2) व 506 ( दोन आरोपी ) माहूर 505 (2) असे दाखल केलेल्या कलमांचा तपशील आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे नाव जाहीर केलेले नाहीत. निवडणुका लागल्यापासून पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

 

 तथापि, तरुणांनी निवडणूक काळामध्ये जाती धर्माच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही पोस्ट एकमेकांना फॉरवर्ड करू नये. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर आल्यानंतर एकमेकांची डोकी गरम करण्यापेक्षा व अफवा पसरविण्यापेक्षा थेट माहिती नांदेड पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

 

शहरात सण,उत्सवाचा व निवडणुकीचा काळ असताना काही समाजकंटक हेतूपुरस्सर अशा पोस्ट टाकतात. काही पोस्ट या जुन्या असतात, तर काही कुठल्या अन्य राज्यातील असतात. त्यामुळे अशा कुठल्याही पोस्टमुळे तणाव निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी जागृत असावे. आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवावे. कोणत्याही पोस्टवर मत बनवू नये. तसेच विचलित होऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

 

थेट संपर्क साधा....

आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 324 

नांदेड लोकसभा उमेदवारांची 12 एप्रिलला प्रथम खर्च तपासणी

उमेदवारांना उपस्थिती अनिवार्य

 

नांदेड, दि. 10 एप्रिल : नांदेड लोकसभा निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा खर्च खर्च समितीकडे सादर करण्यासाठी 12 एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 6 या कालावधीत उमेदवारांना निरीक्षकांसमक्ष खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे.

 

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी यासंदर्भातील आज पत्रक जारी करून 12 एप्रिलच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार काही नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे या बैठकांना उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अनिवार्य असते.

 

लोकसभा निवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी प्रथम तपासणी तारीख निश्चित करण्यात आली आहे.कै.डॉ शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह पहिल्या मजल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही प्रथम तपासणी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीद्वारे नामनिर्देशित करण्यात आले,अशांकडून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केलेल्या तारखांना स्वतंत्र व अचूक हिशोब सादर करणे आवश्यक आहे.

 

अनुपस्थितीत राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांच्या अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी कसूर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये ३ वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह (अपात्र) ठरविण्यास पात्र असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

Tuesday, April 9, 2024

 वृत्त क्र.  323 

वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह,

ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

 

नांदेड दि. 9 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 8 ते 12 एप्रिल 2024 हे पाच दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 8 ते 12 एप्रिल 2024 ह्या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 322

नांदेड जिल्‍ह्यात मतदानाच्‍या दिवशीचे सर्व आठवडी बाजार बंद राहणार


नांदेड व हिंगोलीसाठी 26 एप्रिल ; तर लातूरसाठी 7 मे ला बंद

 

नांदेड दि. 9 :- नांदेड जिल्‍ह्यातील जे विधानसभा क्षेत्र  नांदेड, हिंगोली व लातूर मतदार संघात येतात त्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी येणा-या बाजाराच्‍या तारखांमध्‍ये बदल केला आहे. मतदानाच्‍या दुस-या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहे. जिल्‍हाधिका-यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत.

 

या ठिकाणी २६ एप्रिलला बंद

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 83-किनवट, 84-हदगाव व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील 85-भोकर, 86-नांदेड उत्तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड या 8 विधानसभा मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.   

 

शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी हदगाव तालुक्यात हदगाव, किनवट तालुक्यात इस्लापूर, माहूर तालुक्यात सिंदखेड, अर्धापूर तालुक्यात अर्धापूर, धर्माबाद तालुक्यात करखेली, कारेगाव फाटा, नायगाव खै. तालुक्यात बरबडा, देगलूर तालुक्यात माळेगाव म., बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहर, आदमपूर, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद, जांब बु. तर नांदेड येथील साठे चौक ते आयटीआय रस्ता, शिवाजीनगर ते ज्योती टॉकीज रोड तसेच गोकुळनगर ते रेल्वेस्टेशन या मार्गावर व रोड क्र. 26 येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 27 एप्रिल 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

 

याठिकाणी ७ मे रोजी बंद

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील 88-लोहा या विधानसभा मतदारसंघात मंगळवार 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.   

 

मंगळवार 7 मे 2024 रोजी लोहा तालुक्यातील मारतळा, कलंबर व लोहा येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार 8 मे 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

00000 

वृत्त क्र. ३२१

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त

मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

 

नांदेड दि. 9 :- जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा केला जातो. यावर्षीचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य "माझे आरोग्य माझा अधिकार" हे आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, जनऔषध वैद्यशास्त्र विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. फॅमेली अॅडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत मार्कंड हे गाव वैद्यकीय महाविद्यालयाने दत्तक घेतलेले आहे. त्याअनुषंगाने येथे नियमित कुटुंब आरोग्य तपासणी करण्यात येते.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. पी. एल. गट्टाणी तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. आर डी. गाडेकर, डॉ. आय. एफ. इनामदार डॉ. ज्योती भिसे प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिका अचमवाड, मुख्याध्यापिका सौ वंदना चव्हाण, ग्रामसेवक टि. एम. शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. गट्टाणी यांनी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपचार आणि निरोगी आरोग्य, आहार, तसेच वायुप्रदुषणामुळे होणारे आजार टाळण्यासाठी सामुहिकरित्या पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे महत्व पटवून दिले.

 

या आरोग्य शिबीरामध्ये जनऔषध वैद्यकशास्त्र, औषध वैद्यकशास्त्र, नेत्र शल्यचिकीत्साशास्त्र तसेच बालरोगशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबीरात 146 महिला, 107 पुरुष व 85 बालके असे एकूण 338 रुग्णाची तपासणी करुन त्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले व आवश्यकतेप्रमाणे काही रुग्णांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे संदर्भित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. फिरोज शेख तर आभार डॉ. संतोष जोगदंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सर्व निवासी डॉक्टर, समाजसेवा अधिक्षक गजानन वानखेडे, प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

0000

वृत्त क्र. ३२०

 उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 16 ते 25 एप्रिल कालावधीत आयोजन 

नांदेड दि. 9 एप्रिलः - क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, व नांदेड जिल्हा विविध एकविरा क्रीडा संघटना यांचे संयुक्‍त विद्यमाने विविध खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबीर 16 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत सर्व वयोगटातील विद्यार्थी खेळाडूंसाठी मोफत असणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभागी होणेसाठी 15 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत आपली नांवे चंद्रप्रकाश होनवडजकर (7972953141), बालाजी शिरसीकर (7517536227), श्रीमती शिवकांता देशमुख (9657092794) यांचेकडे नोंदणी करावेत व अधिक माहितीकरीता संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

 

यामध्ये विविध खेळातील बदलणारे तंत्रज्ञान, खेळाच्या नियमातील बदल, सद्यस्थीत खेळाचे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अद्यावत स्थितीबाबत नांदेड जिल्हयातील खेळाडूंना या कार्यालयामार्फत अद्यावत ज्ञान, प्रात्याक्षिक व इतर विविध पध्दतीने तज्ञ प्रशिक्षक, अनुभवी खेळाडू आणि विविध पदाधिकारी यांच्याद्वारे देण्यात येणार आहे. हे शिबीर सन 2024-25 च्या स्पर्धेची पूर्वतयारी लक्षात घेऊन निश्चि करण्यात आलेला आहे. तसेच या शिबीरामध्ये शासनाचे क्रीडा मार्गदर्शक तसेच विविध खेळ संघटना, इतर अकॅडमीचे तज्ञ क्रीडा मार्गदर्शक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू व तज्ञ पदाधिकारी यांच्याद्वारा खेळनिहाय तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

यामध्ये आर्चरी, टेनिक्कॉईट, मैदानी, जिग्रॅस्टिक्स, तलवारबाजी, सिकाई मार्शल आर्ट, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सींग, खो-खो, बुध्दीबळ, ज्युदो, सेपक टकरों, नेटबॉल, टेबल टेनिस, फुटबॉल, सॉफटबॉल, कराटे, कॅरम, रग्बी, तेंग-सु-डो, बेल्ट-रेसलींग, हॉकी, तायक्काँदो, हॅन्डबॉल, मल्लखांब, स्केटींग, बेसबॉल व इतर खेळाचा समावेश असुन नांदेड शहरातील व जिल्हयातील विविध ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...