Tuesday, February 6, 2024

 वृत्त क्र. 107 

 शिवचरित्रावर आधारित खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन

·         जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात  15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे महाराष्‍ट्र शासनाचे निर्देश आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव '  अंतर्गत राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदाननानाविध कलांचे जतन तथा संवर्धन होवून भारताच्या स्वातंत्र्य रणसंग्रामाची माहिती सामान्यजनांपर्यंततळागाळात पोहचविण्यासाठी 'महासंस्कृती महोत्सवातंर्गत जिल्हा प्रशासन नांदेड च्या वतीने  शिवचरित्रावर आधारित  जिल्हास्तरीय भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  

या स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगावर नेमून दिलेल्या जागेत रेखीव व सुबक रांगोळी काढणेअसा असणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. वय व लिंगभेदाशिवाय या स्पर्धेत भाग घेता येईल. रांगोळी जास्तीतजास्त आकर्षितरेखीव व सुबक काढणे अपेक्षित आहे. या स्पर्धेचे आयोजन  18  फेब्रुवारी रोजी आयटीआय ग्राऊंड नांदेड येथे सकाळी 10 ते 12 या दोन तासात  केल्या जाणार आहे. प्रशासनाने नियुक्त केलेल्या परीक्षकांच्यावतीने अंतिम निकाल घोषित केल्या जाणार आहेत. प्रथम येणाऱ्या तीन रांगोळीस तथा काही रांगोळीस उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार 10 हजार रुपयेसन्मानपत्र व सन्मानचिन्हद्वितीय पुरस्कार हजार रुपयेसन्मानपत्र व सन्मानचिन्ह तथा तृतीय पुरस्कार हजार रुपयेसन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे राहणार आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ काही पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

स्पर्धेकरीता लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी सोबत आणणे आवश्यक आहे. सदरील  रांगोळी स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे  स्पर्धेपूर्वी नोंदणी करणे गरजेची आहेत. नाव नोंदणी करीता सुनील कोमवाडसुनील मुत्तेपवार व राजेश कुलकर्णीसंजय भालके यांच्याकडे जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूलच्या पाठीमागेस्काऊट गाईड कार्यालय वजिराबाद नांदेड येथे सकाळी 11 ते यावेळेत 16 फेब्रुवारी 2024 पर्यत करण्यात यावी.

नोंदणीसाठी लागणारे प्रपत्र nanded.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या रांगोळी स्पर्धेत सहभागी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  मिनल करनवालनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ सविता बिरगे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 106 

 

पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र शासन कृषि विभागाअंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने नवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गटातील महिला तसेच सर्वसामान्य महिला यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे नांदेड जिल्हा कृषि महोत्सवातील नोंदणी कक्षात 7 फेब्रुवारी 2024 सकाळी 11 वाजेपर्यंत स्पर्धकांनी नोंदणी करावी. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमीत्त ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इ. पौष्टिक तृणधान्या पासून बिस्कीट, लाडू, पापड, चिक्की, थालीपीठ, धपाटे, खिचडी, खीर, पराटे, चकल्या, बेकरी पदार्थ इ. असे विविध पदार्थ बनवून आणावेत. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र, भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गटातील महिला तसेच सर्वसामान्य महिला यांनी या तृणधान्य पाककला स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 105  

 

जिल्हा भरडधान्य महोत्सवास

नागरिकांनी भेट द्यावी

 ·         कृषी विभागाचे आवाहन                                       

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा भरडधान्य महोत्सवाचे आयोजन दिनांक  7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील प्रांगणात करण्यात आले आहे. या महोत्सवात भरडधान्यावर आधारित 40 ते 45 स्टॉलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोडो, राळा , भगर इत्यादी धान्यांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांनी तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी  महोत्सवास भेट देऊन लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

तसेच भरडधान्यापासून बनविलेले पदार्थ हुरडा, नाचणीचे लाडू, बिस्किट्स, राजगिरा पापड, लाह्या, धपाटे इत्यादी खाद्य विक्री स्टॉल लावण्यात येणार आहेत.  तसेच इतरही कृषी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. महिलांसाठी भरड धान्य पाककृती स्पर्धा घेण्यात येणार आहे. या महोत्सवात कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र , महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सेंद्रिय उत्पादक शेतकरी सहभागी होणार असून भरडधान्यांचे लागवड तंत्रज्ञान, भरडधान्यांचे पोषणमूल्य आणि आहारातील महत्त्व इत्यादी विषयी कृषी शास्त्रज्ञ आणि आहार तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

000000

Monday, February 5, 2024

 वृत्त क्रमांक 104 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे समन्वय कार्यशाळा संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाएक्सिस बँक फाउंडेशन व भारत रुरल लाईव्हलिहूड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्या अध्यक्षतेखाली High Impact Mega Watershed प्रकल्पासंदर्भात समन्वय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप कुलकर्णीरोहयो उप मुख्यकार्यकारी अधिकारी अमित राठोड तसेच कृषीसिंचनवनपरीक्षेत्रसामाजिक वनविभागजल व मृद संधारणसिंचनरेशीम पशुसंवर्धन आदी विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.

 

या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्यातील नांदेडलोहाकंधारमुखेडकिनवट व हदगाव या सहा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश रोहयो अंतर्गत भूपृष्ठावरील सिंचन सुधारणेभूजल पुनर्भरण वाढवणेशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे असून गाव पातळीवर रोहयोची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध विभागामार्फत योजना राबविल्या जातात या योजनांचा लाभ घेण्याबाबत भारत रुरल लाईव्हलिहूड फाउंडेशनच्या माध्यमातून WOTR संस्था नांदेडलोहा, AGVSS संस्था कंधारमुखेड आणि RAES संस्था किनवट व हदगाव या संस्थेच्या मार्फत सहा तालुक्यातील गावांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहेअसे BRLF चे राज्य समन्वयक सुनील सहारे यांनी सांगितले. तसेच या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागीय समन्वयक अभिलाष पटेलक्षमता बांधणी तज्ज्ञ अरविंद कुमार उईके यांनी सहकार्य केले.

00000



वृत्त क्र. 103

 मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी

पोलीस यंत्रणा कटिबद्ध

-         विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर

 

·   शेजारील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद येथील

     पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदान याला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराला आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी भयमुक्त वातावरण सहाय्यभूत ठरते.  निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया आदर्श आचारसंहितेप्रमाणे पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी प्रशासन व पोलीस विभागावर आहे. तेलंगणा, कर्नाटक या दोन राज्यांच्या 200 कि.मी. सीमा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील भयमुक्त वातावरणासाठी निर्मल, आदिलाबाद, कामारेड्डी, बिदर, निजामाबाद या जिल्ह्यातील पोलीस विभागाचा परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या चार जिल्ह्यातील पोलीस विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निजामबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर, नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निर्मलच्या पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. जी. जानकी शर्मिला, कामारेड्डीच्या पोलीस अधिक्षक सिंधू शर्मा, बिदरचे पोलीस अधिक्षक एस. एल. चेन्ना बसवन्ना, आदिलाबादचे पोलीस अधिक्षक गौस आलम, नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, भोकरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक खंडेराव धरने व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिक्षक उपस्थित होते.  

 

कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टिने शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद या जिल्ह्यातील प्रशासन व पोलीस विभागाशी परस्पर समन्वय हा महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीला आळा घालण्याची दक्षता पोलीस प्रशासन घेते आहे. शेजारील जिल्ह्यांच्या सीमावर विशेष पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना सर्व पोलीस यंत्रणेला दिल्या असून नेहमीसाठीच ही दक्षता घेत आहोत असे नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी सांगितले.

 

नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत शेजारील जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून एक चांगला अनुभव आपण घेतला आहे. या अनुभवाला अधोरेखीत करून पुढील निवडणुका अधिक चांगल्या भयमुक्त वातावरणात पार पडतील असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी निजामबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर यांनी सीमेवरील गावांचा आढावा सादर केला. याचबरोबर निर्मल, आदिलाबाद, बिदर, कामारेड्डी या जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी सीमावर्ती गावातून गुटखा, इतर बंदी असलेल्या पदार्थांची छुपी होणारी वाहतूक, निवडणूक काळात घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीचे संचलन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती गावांचा आलेख ठेवला.

0000 










Saturday, February 3, 2024

 वृत्त क्र. 102

 

सारथी 4.0 संगणकीय प्रणाली

अद्ययावत करण्याचे काम सुरू  

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सारथी प्रणाली 4.0 च्या सर्व्हरचे तांत्रिक कामकाज लवकरच पूर्ण होणार असून तद्नंतर अर्जदारांना सारथी प्रणालीवरून अर्ज करणे सुलभ होईल. सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागातर्फे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

 

नागरिकांना अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक इतर सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4.0 प्रणालीवर अर्ज करणे व शासकीय शुल्क भरणे आवश्यक असते. परंतु मागील दोन दिवसपासून सारथी 4.0 प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे देखभाल / दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्रातर्फे सुरू आहे. त्यामुळे परिवहन विभागाची संगणकीय सारथी 4.0 प्रणाली संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अर्जदारांना काही अर्ज व तद्षनुंगीक शासकीय शुल्क भरताना अडचणी निर्माण होत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 101 

हौशी छायाचित्रकारांसाठी

क्लिक नांदेड छायाचित्र स्पर्धा

 

·    महासंस्कृती महोत्सवानिमित्त आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा च्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून महोत्सवाचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील विविध जैवविविधता, पर्यटनस्थळ, पशु-पक्षी, वनसंपदा, धबधबे, नदी, शिल्प, ऐतिहासिक स्थळे आदी विषयांना प्रतिबिंबीत करणारे क्लिक नांदेड छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

छायाचित्र स्पर्धेत पुढील विषय देण्यात येत आहेत. यात निसर्ग, पशु-पक्षी, शिक्षण, कला, स्थापत्य, जीवनशैली, खेळ, पर्यटन, खाद्यसंस्कृती, जैवविविधता, परंपरा, संस्कृतीवरील छायाचित्रांचा समावेश असावा. हे छायाचित्र  जानेवारी 2023 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत काढलेले छायाचित्र असावेत. यासाठी पुढील नियमावली, अटी ठेवण्यात आल्या आहेत.

 

छायाचित्र नांदेड जिल्ह्यातीलच असावीत. प्रती छायाचित्र (IMAGE) जास्तीत जास्त 10 एमबी व कमीत कमी 03 एमबी ची छायाचित्रे ग्राह्य धरल्या जातील. स्पर्धकाने आपली छायाचित्रे clicknanded@gmail.com या ईमेलवर पाठवावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत दोन ते तीन वाक्यात छायाचित्राबाबत मराठी भाषेत माहिती युनिकोड फॉन्टवर टाईप करुन पाठवावी. एका छायाचित्रकाराला स्पर्धेत दिलेल्या विषयासाठी एकुण 10 छायाचित्र देता येतील. आयोजकांतर्फे मुळ थीमशी जुळणारी त्यांची मूळ डिजिटल छायाचित्रे मागणी केली गेल्यास, स्पर्धकास ती सादर करावी लागतील. स्पर्धेत जानेवारी 2023 ते फोटो स्पर्धा सामिल होण्याच्या अंतिम तारखे पर्यंत काढलेली छायाचित्रच ग्राह्य धरल्या जातील. ब्लर झालेली छायाचित्रे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. DSLR आणि Mobil फोटोग्राफी या दोन्ही फॉर्ममध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. ड्रोन द्वारे काढलेली छायाचित्र स्वीकारली जाणार नाही. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशनचे जेपीजी JPEG किंवा पीएनजी PNG मध्ये असने आवश्यक आहे. फोटोवर कोणत्या प्रकारचा लोगो, वॉटर मार्क, कॉपीराईटमार्क,ओळखीचे चिन्ह, अथवा कोणतीही अन्य दृष्य स्वरुपाची बाब टाकता येणार नाही.

 

रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस ऍडजस्टमेंट आणि फोटो (चे) क्रॉप करणे यासह मूलभूत संपादन स्वीकार्य आहे, परंतु असे कोणतेही संपादन फोटोच्या सत्यतेवर आणि/किंवा वास्तविकतेवर परिणाम करत नाही. स्पर्धा सर्व वयोगटातील सर्व फोटोग्राफी प्रेमींसाठी खुली आहे. जिल्हा प्रशासन नांदेड यांना स्पर्धा आणि त्याच्या थिमशी सादर केलेली छायाचित्रे भविष्यात संबंधित प्रचारात्मक हेतूंसाठी वापरण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा अधिकार असेल. त्याबाबत भविष्यात कुठलीही आर्थिक अथवा मानधन स्वरुपाची मागणी, स्पर्धकास करता येणार नाही. छायाचित्रकार आणि कलाकारांचे तज्ञ पॅनेल सर्जनशीलता, तांत्रिक गुणवत्ता, रचना आणि थिमसह संरेखन यावर आधारित निवड करेल. निवड झालेल्या विजेत्यांना थेट जिल्हा प्रशासनाकडून निवडी बाबतकळविले जाईल. सर्व विषयातून प्रत्येकी एका विजेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात येईल. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. अयोग्य वाटली जाणारी किंवा नमूद केलेल्या स्पर्धेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही प्रवेशास अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे. स्पर्धक वय वर्षे 18 खालील असल्यास वरील अर्जावर पालकांची स्वाक्षरी त्यांचा आधार कार्ड नंबर सह नोंदविणे क्रमप्राप्त आहे. छायाचित्राचा मुळ हक्क हा छायाचित्र स्पर्धकाचा असून, संबंधीतछायाचित्र इतरत्र वापरण्याची मुभा छायाचित्रकारास असेल. छायाचित्रे पाठवण्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी 2024 असेल. परिक्षेच्या निकालाबाबत सर्व अधिकार निवड समिती व जिल्हा प्रशासनाकडे राखीव राहतील. सर्व सहभागी छायाचित्र स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त होईल.

 

छायाचित्र स्पर्धेतील निकाल अंतीम करण्याचे / नाकारण्याचे सर्व हक्क आयोजन समितीचे राहतील. स्पर्धेचा विहित नमुन्यातील अर्ज नांदेड जिल्हाचे https://nanded.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात हौशी छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

निवड झालेल्या 100 छायाचित्रांचा समावेश प्रशासनामार्फत आयोजीत प्रदर्शन कालावधीत महासंस्‍कृती महोत्‍सवात लावण्यात येणाऱ्या प्रदर्शनीमध्ये करण्यात येईल. महोत्सव प्रदर्शनी पश्चात निवडक 100 छायाचित्रे विविध कार्यालयात प्रदर्शनी भागात लावण्यात येतील. निवड झालेल्या 100 छायाचित्रांना गौरविण्यात येईल व त्यामधील सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना विविध पारितोषिके देण्यात येतील.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...