Monday, January 1, 2024

दि. 29 डिसेंबर 2023 वृत्त क्र. 911

 थेट कर्ज योजनेतील लाभार्थी निवड

5 जानेवारी रोजी लॉटरी पध्दतीने होणार

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये केवळ थेट कर्ज योजनेअंतर्गत 10 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले आहेत.

 

या कर्ज प्रकरणांची ईश्वरी चिठ्ठी (लॉटरी) द्वारे निवड करण्यासाठी अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा ईश्वर चिठ्ठी समिती यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिठ्ठीद्वारे लॉटरी पध्दतीने निवड करावयाची आहे. त्यासाठी 5 जानेवारी 2024 रोजी ठिक सकाळी 12 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी अर्जदारांनी या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

 

या योजनेअंतर्गत एकूण 71 अर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे सर्व कर्ज प्रस्ताव जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती समोर सादर केले असता त्यापैकी 71 अर्ज मागणी अर्ज पात्र आहेत. मागील वर्षातील उदिष्टा अभावी असलेले 311 कर्ज प्रस्ताव असे एकूण 382 पात्र प्रस्ताव आहेत.

00000  

दि. 29 डिसेंबर 2023 वृत्त क्र. 910

अन्नसुरक्षा अभियानांतर्गत घरगुती साठवणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) व पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत घरगुती साठवणुकीची कोठी (प्रती शेतकरी 5 क्विंटल क्षमता मर्यादेत) या घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (अर्जामधील अटींची पुर्ततेसह) तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

 

अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भुधारक इतर शेतकरी पात्र असतील. 5 क्विंटल साठवणूक क्षमतेच्या कोठीसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा रूपये 2 हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान दर लागु असेल. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पध्दतीचा अवलंब केला जाईल. या घटकाची खरेदी झाल्यानंतर शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी समवेत अक्षांश व रेखांशासह फोटो घेतल्यानंतर तपासणी करुन लाभार्थ्यांना डी.बी.टी. पध्दतीने त्यांच्या बँक खातेवर अनुदान देण्यात येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

दि. 29 डिसेंबर 2023 वृत्त क्र. 909

 अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकत असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.

 

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000 

दि. 29 डिसेंबर 2023

 वृत्त क्र. 908


सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सोमवारी भोकर व हिमायतनगर येथे

आणि मंगळवारी किनवट व माहूर येथे मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  सोमवार 1 जानेवारी 2024  रोजी  पंचायत समिती सभागृह  भोकर व पंचायत समिती सभागृह हिमायतनगर आणि मंगळवार 2 जानेवारी  2024 रोजी पंचायत समिती सभागृह  किनवट व पंचायत समिती सभागृह  माहूर येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकुण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने  ही आवश्यक  कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

दि. 29 डिसेंबर 2023

वृत्त क्र. 907

गुणवत्तापूर्ण कामे करणे ही सुद्धा देशसेवा

 - कर्नल मनकंवल जीत 

§  ‘पर्वत से सागर तिरंगा’ या साहसी अभियानात आज चार छोटी विमाने नांदेड विमानतळावर

नांदेड (जिमाका) दि. 29 :- बॉम्बे सैपर्स युध्द स्मारक शताब्दी आणि कारगिल विजयाच्या 25 व्या वर्षानिमित्त ‘पर्वत से सागर तिरंगा’ हे साहसी अभियान भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत नांदेड विमानतळावर अनुभवी वैमानिकांनी आज चार छोटी विमाने उतरविली. कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांचे शौर्य व त्यागाची माहिती नवीन पिढीपर्यत पोहोचावी तसेच युवा वर्गाने अशा अभियानापासून प्रेरणा घेवून देशसेवेसाठी गुणवत्तापूर्ण काम करण्यातच देशसेवा असल्याचे प्रतिपादन कर्नल मनकंवल जीत यांनी केले.

राष्ट्रीय सैन्य माइक्रोलाइट अभियानांतर्गत आज 4 मायक्रोलाइट विमानाचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी लेफ्टनंट कर्नल एबी टीएम, लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिवाच, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उप विभागीय अधिकारी विकास माने, विमानतळ सुरक्षा अधिकारी बोरगावकर, कॅप्टन संघमित्रा राई, मेजर गरिमा पुनियानी, कॅप्टन प्रियदर्शनी के आदींची उपस्थिती होती. राष्ट्रप्रेमाची भावना वृध्दीगत व्हावी तसेच नव्या पिढीला देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाचे शौर्य याबाबतची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय सैन्याच्यावतीने काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत चार माइक्रोलाईट विमानाने माइक्रोलाइट अभियान 2023-24 सुरु करण्यात आले आहे. या अभियानात ही विमाने काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यत एकूण 9 हजार 500 किमीचा प्रवास पार करतील. या अभियानाच्या माध्यमातून साहसाचे व सांघिक कामाचे प्रदर्शन होणार आहे. हे अभियान देशाच्या प्रादेशिक विविधता आणि सुंदरतेचे प्रतिक असल्याचे कर्नल मन कंवलजीत यांनी सांगितले.

विमानाचे वैमानिक राष्ट्रीय व सैन्य ध्वजाला गर्वाने अवकाशात फडकवणार आहेत. सैन्याचे हे अभिनव अभियान असून यापूर्वी कधीही असे अभियान झालेले नाही. भारतीय सैन्य माइक्रोलाइट अभियानात ही विमाने एकूण 37 ठिकाणी थांबणार असून 37 दिवसांचा प्रवास करणार आहे. हे अभियान महुपासून सुरु झाले असून आज या विमानाचे अमरावती येथून नांदेड विमानतळावर आगमन झाले आहे. नांदेड विमानतळावरुन ही माइक्रोलाइट विमाने उद्या बिदरकडे प्रस्थान करणार असल्याचे भारतीय सैन्याचे कर्नल मन कंवलजीत यांनी सांगितले.

00000




Thursday, December 28, 2023

वृत्त क्र. 906

अनाधिकृत धाबे अथवा हॉटेलमध्ये मद्य प्राशन कराल तर कारागृहात थेट रवानगी

- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे  

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यावर नियंत्रणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग दक्ष आहे. नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करतांना कोणाच्याही हातून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी ही प्रत्येकांवर आहे. मद्याची अवैध निर्मिती व विक्री याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढीलप्रमाणे नियोजन केले आहे.

 

अनुज्ञप्ती वेळेत शिथिलता

नववर्षाच्या स्वागताला शासनाने अनुज्ञप्त्याच्या बंद करण्याच्या वेळेत सुट देवून एफएल-2 व एफएल/बीआर-2 रात्री 1 वाजे पर्यंत, एफएल-3 म्हणजे परमीट रुम व एफएल-4 म्हणजे क्लब  पहाटे 5 वाजे पर्यंत, आणि सीएल-3 म्हणजे देशी दारु दुकान रात्री 1 वाजे पर्यंत अनुज्ञप्त्यांना मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली  आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची सहा पथके

या पथकामध्ये एक निरीक्षक, दोन दुय्य्म निरीक्षक व इतर कर्मचारी असे असणार आहे. या पथका मार्फत अवैध मद्य निर्मिती /विक्री/ वाहतूकीवर विशेष लक्ष राहणार आहे. आक्षेपार्ह काही काढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

 

रात्रगस्त

वरील पथक कार्यक्षेत्रात गस्त घेणार आहे. विशेषत: रात्रगस्त घेवून अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

 

नाकाबंदी

सिमावर्ती भागात व शहाराच्या मोक्याच्या ठिकाणी वरील पथके नाकाबंदी करणार आहे. ज्याव्दारे सर्व संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध मद्य वाहतूकीवर विशेष लक्ष राहणार आहे.

 

सराईत गुन्हेगारांवर पाळत

यापुर्वी बनावट व परराज्यातील मद्याच्या गुन्ह्यातील आरोपींवर व सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवून संशयास्पद हालचाल वाटल्यास अधीक लक्ष ठेवून आक्षपार्ह आढळून आल्यास कठारे कारवाई करण्यात येईल.

 

अवैध ढाबे/हॉटेल/खानावळ/रिसोर्ट/अन्य ठिकाणी होणाऱ्या पार्टीवर विशेष लक्ष

या विभागाच्या सहाही पथकाकडून विनापरवाना चालु असलेल्या अवैध ढाबे/हॉटेल/खानावळ/रिसोर्ट/अन्य ठिकाणी चालु असलेल्या सार्वजनिक दारुच्या गुत्त्यावर विशेष लक्ष ठेवून सातत्याने गस्त घेतली जाणार आहे. सदर ठिकाणी मद्य पिण्यास मालकाने परवानगी दिल्यास मालक/चालकावर तसेव मद्य प्राशन करण्याऱ्या ग्राहकावर कारवाई करण्यात येईल.

 

झालेली कारवाई

चालु वर्षात अनधिकृत ढाब्यावर, चायनीजवर किंवा हॉटेलात मद्य प्राशन करताना आढळल्यास मद्यपी आणि मालकांवर एकुण 18 प्रकरणात आता पर्यंत एकुण झालेला दंड 4 लाख 95 हजार रूपये इतका आहे.    महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी मध्ये शासन मान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाच वर्षा पर्यंत कारावासाची शिक्षा, किंवा रु.25 हजार ते 50 हजार रुपया पर्यंत दंड  किंवा दोन्ही होऊ शकते. तसेच ग्राहकांनाही कलम 84 अन्वये 5 रुपयापर्यंत दंड होवू शकतो.

 

एक दिवसासाठी परवाना

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतार्थ पार्टी अथवा मेजवानी मध्ये मद्यसेवनाचे आयोजन करावयाचे असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वतीने विशेष परवानाची तात्काळ सोय उपलब्ध आहे. नववर्ष स्वागताला हॉटेल, रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन केले जाते. यासाठी मद्य ठेवले जाते. हॉटेल, रिसॉर्टधारकांनी नववर्ष स्वागत पार्टीसाठी मद्य ठेवण्याबाबत एक दिवसाचा परवाना अर्ज करून घ्यावा. त्याकरिता या विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावून आगोदर प्रस्तावित जागेची Premises Registration या पर्यायावर जावून नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

जागेची नोंदणी करण्यासाठी जागेचा पुरावा नमुना 7/12 अथवा नमुना 8 चा उतारा, बांधकाम परवाना, जागेचे नकाशे, जागामालकाचे आधार कार्ड  व इतर प्रकरण निहाय आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जागेची नोंदणी झाल्यानंतर विहित शुल्क भरणा केल्यास तात्काळ नमुना FL-IV A अनुज्ञप्ती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळावर भेट द्यावी. अथवा 8379825826 या क्रमांकावर संपर्क करावा. मद्यसेवन परवाना नसतांना मद्य सेवन केल्यास किंवा मद्य बाळगल्यास कारवाई करण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

00000

वृत्त क्र. 905

 सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे

करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28  :- राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दिनांक 27 डिसेंबर 2023 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिपत्रकातील परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केले आहे.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...