Wednesday, December 20, 2023

वृत्त क्र. 875

 अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध उपक्रमाचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- अल्पसंख्याक हक्क दिवस दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या उपक्रमातंर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतीय संविधान व अल्पसंख्याक समाजाचे हक्क तसेच आव्हाने या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक कु. वैभवी गजानन राजेगोरे, द्वितीय क्रमांक उध्दव धोंडिबा गायकवाड व तृतीय क्रमांक कु. रुबिना सादिक सयद यांना मिळाला. विजेत्यांना कवी, वक्ते पत्रकार रविंद्रसिंग मोदी याच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देण्यात आले. अल्पसंख्याक प्रशिक्षणार्थ्यांना विविध प्रकारच्या योजना व हक्क, सुविधाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हरप्रितसिंग लागरी, कौशल्य विकास विभागाच्या सौ. पाटील, प्राचार्य एस.व्ही. सूर्यवंशी, गटनिदेशका के.टी. दासवाड, एस.जी.खडसे व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी मोहन कलंबरकर यांनी परिश्रम घेतले.   

0000

वृत्त क्र. 874

 22 डिसेंबर रोजी उमरी व धर्माबाद येथे

 सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतीसाठी मेळावा

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतर्गत 17 ते 30 डिसेंबर 2023 हा कालावधी गतीमानता पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. या पंधरवड्या निमित्त सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 22 डिसेंबर 2023 रोजी उमरी व धर्माबाद येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा सकाळी 10 वा. पंचायत समिती सभागृह, उमरी व पंचायत समिती सभागृह, धर्माबाद येथे आयोजित केला आहे. धर्माबाद व उमरी तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन असे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्व समावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट- 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे. या योजनेत सन 2023-2024 मध्ये नांदेड जिल्हयास एकूण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्याचे लक्षांक आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजूरी प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे/मंजूरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे व बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घ्यावीत. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायनुंषिक इतर परवाने इ. कागदपत्रासह या मेळाव्यास उपस्थित राहावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी या योजनेच्या https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी, असे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Tuesday, December 19, 2023

वृत्त क्र. 873

 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतीसाठी

21 डिसेंबर रोजी उद्योग भवन येथे मेळाव्याचे आयोजन


नांदेड, (जिमाका) दि. 19 :- सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातर्गंत 21 डिसेंबर 2023 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी 11 ते सायं. 5 या कालावधीत उद्योग भवन, पहिला माळा, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे आयोजित केला आहे. नांदेड शहरातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 


वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन जिल्हास्तरावर असे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्व समावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. या योजनेत सन 2023-2024 मध्ये नांदेड जिल्हयास एकूण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्याचे लक्षांक आहे.

 

या मेळाव्यात कर्ज मंजूरी प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे/मंजूरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे व बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घ्यावीत. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने इ. कागदपत्रासह या मेळाव्यास उपस्थित राहावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी या योजनेच्या https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी, असे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 872

अतिवृष्‍टी अनुदानासाठी शेतकऱ्यांना

ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात जुन-जुलै 2023 मध्ये अतिवृष्‍टी व पुरामुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्‍या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रीक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्‍यावे. ई-केवायसी करण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याच्‍या आधार संलग्‍न बॅंक खात्‍यावर शासनाकडून रक्‍कम जमा करण्‍यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

 

जिल्ह्यात जुन-जुलै 2023 मध्ये अतिवृष्‍टी व पुरामुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्‍ह्यातील 6 लाख बाधित शेतकऱ्यांसाठी 420 कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. सद्यस्थितीत 3 लाख 50 हजार बाधित शेतकऱ्यांसाठी 250 कोटी रुपयाच्या रक्कमेच्या याद्या शासनाच्‍या ऑनलाईन पोर्टलवर तहसील कार्यालयामार्फत संबंधीत तलाठी यांनी अपलोड केल्‍या आहेत. ही माहिती अपलोड केलेल्‍या बाधित शेतकऱ्यांना वि. के. नंबर प्राप्‍त झाले असून हे नंबर संबंधीत गावाचे तलाठी यांच्याकडे उपलब्‍ध आहेत. बाधित शेतकऱ्यांनी तलाठी यांच्याकडून वि. के. नंबर प्राप्‍त करुन घ्‍यावेत.

 

ई-केवायसी होत नसल्‍याची बाब अनेक शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्‍याअनुषंगाने शासन स्‍तरावर संपर्क केला असता, केंद्र शासनाच्‍या युआयडीएआय आधार पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्‍याने बायोमॅट्रीक पडताळणी आणि ओटीपी तयार होत नसल्‍याबाबत माहिती मिळाली आहे. ही समस्‍या लवकरच सोडवली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

0000

Monday, December 18, 2023

 वृत्त क्र. 871 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवरी 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

वृत्त क्र. 870

मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी

“लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे या उद्देशाला साध्य करणारी “लेक लाडकी योजना” शासनाने आणली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना महत्त्वपूर्ण म्हणून पाहिली जाते. 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्माला आलेल्या दोन मुलीसाठी ही योजना अनुज्ञेय आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यावर 6 हजार, सहावीत गेल्यावर 7 हजार, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये असे एकुण 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते. ही योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. 

श्रीक्षेत्र माहुरगड येथील श्री रेणुका देवी, श्री दत्त शिखर संस्थान येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या योजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, जिल्हा माहिला व बालकल्याण विकास अधिकारी रमेश कांगणे व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी पोषण माह, बेटी बचाओ-बेटी पढाओ, माझी मुलगी माझा अभिमान याबाबत माहिती घेतली. महिला बचतगटाच्या माहूरगड येथील स्टॉलला त्यांनी भेट दिली.

00000



 










वृत्त क्र. 869

 शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  नांदेड जिल्ह्यातील शस्‍त्र परवानाधारकांनी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत / अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2023  रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा.  

परवानाधारकाने आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नियमानुसार नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे, आपले शस्‍त्र परवान्‍यात नमूद असलेल्या अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन, विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे 20.12.2023 पासून संबंधित विभागात दाखल करावा. याबाबत सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...