Tuesday, October 10, 2023

मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे 

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्र, गावातील कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

लाभार्थी पात्रता

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची पध्दत

महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

शेततळयासाठी आकारमान

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी (34x34x03 ते 15x15x03) कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. या योजनेअंतर्गत अस्तरीकरणासह (प्लास्टिक फिल्मसह) शेततळयासाठी 1 लाख 50 हजार प्रति शेततळे अनुदान देय आहे. शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील. जिल्ह्यात आज 9 ऑक्टोंबर 2023 अखेर  सन 2022-23  व 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 591 शेतकऱ्यांची निवड झाली आहे. यापैकी 650 अर्ज प्रक्रीयेत असून 362 शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत मागेल त्याला शेततळयाच्या धर्तीवर लाभार्थ्यांनी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्याबरोबर त्यांना या योजनेतून पूर्व संमती मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Monday, October 9, 2023

 मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीचा 11 व 12 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयाचा दौरा

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज 2 ते 4 या वेळेत उपलब्ध करून देण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर,दि.9: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे 11 व 12 ऑक्टोबर  २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयाचा दौरा करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

 

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत. पुरावे दुपारी 2 ते 4 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी 2 ते 4 या वेळेत नागरिकांकडून पुरावे स्विकारले जाणार आहेत. पुरावा शक्यतो साक्षांकित असावा.

जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 2 ते 4 या वेळेत नागरिकांकडून पुरावे स्विकारले जाणार आहेत, असे  विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

 

*****


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 152 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 152 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         19 रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         150 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 661

 

 नांदेड, (जिमाका) दि. 9 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 150 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 661  रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 7 ऑक्टोंबर ते  8 ऑक्टोबर च्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  125 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  152 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात 12 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 2 नवजात बालक (पुरुष जातीचे 2) व बालक 1 (पुरुष जातीचे 1) व प्रौढ 9 (पुरुष जातीचे 7, स्त्री जातीचे 2) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 19 शस्त्रक्रिया झाल्या. यात 12 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 7 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 18  प्रसुती करण्यात आल्या. यात 8 सीझर होत्या तर 10 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम सुरु असल्याने वाहतुकीस प्रतिबंध पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत

 रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम सुरु असल्याने वाहतुकीस प्रतिबंध

पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :-  रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडी चे काम सुरु असल्यामुळे बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडर ब्रिज 357 A मधून जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंधीत करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  

रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडी 357 A चे काम सुरु असल्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.  बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडरब्रीज 357 A मधून जाणारा रस्त्याऐवजी कामठा रोड ते नमस्कार चौक दरम्यानच्या रोड वरील विद्यमान मालटेकडी ओव्हर ब्रीज व देगलूर नाका-बाफना टी पॉईट या रस्त्यावरील विद्यमान बाफना रोड ओव्हर ब्रिज या पर्यायी मार्गाने ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 10 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

Sunday, October 8, 2023

 वृत्त

 

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता

अंबादास दानवे यांचा नांदेड दौरा       

                                                                                                    

नांदेड, (जिमाका) दि. 8 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

सोमवार 9 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून खाजगी विमानाने दुपारी 12.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.45 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे रुग्ण संख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे यासंदर्भात अधिष्ठाता यांच्या समवेत चर्चा. दुपारी 1.40  वा. नांदेड येथून खाजगी विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.  

0000  

 सुधारित


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात
 गत 24 तासात 97 रुग्ण बरे होऊन परतले घरी

▪️रुग्णालयामध्ये 732 रुग्ण भरती
▪️622 रुग्णांवर उपचार 
▪️59 रुग्णांवर शस्त्रक्रिया 

 नांदेड, (जिमाका) दि. 8 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 622 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 732 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 6 ते 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 154 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 97 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर 15 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 6 नवजात बालक (पुरुष जातीचे 5, स्त्री जातीचे 1 ) व बालक 2 (स्त्री जातीचे) व प्रौढ 7 (पुरुष जातीचे 5, स्त्री जातीचे 2) यांचा समावेश आहे. 

गत 24 तासात एकूण 59 शस्त्रक्रिया झाल्या. यात 44 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 15  रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 16  प्रसुती करण्यात आल्या. यात 8 सीझर होत्या तर 8 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 
 00000

Saturday, October 7, 2023

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला

औषध व यंत्र सामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता प्रदान
▪️जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दैनंदिन भेटीत सार्वजनिक बांधकाम, मनपा यांना समन्वयाच्या दिल्या सूचना
▪️खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीला उपलब्ध
नांदेड (जिमाका), दि. 7 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या दैनंदिन भेटीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करून तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा यांचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनासमवेत परस्पर समन्वय साधून दिला असून आपआपली जबाबदारी व कर्तव्य काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने येत्या काळात काही आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर यशस्वी नियोजन करता यावे यादृष्टिने औषध व यंत्रसामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता देऊन ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीसाठी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून दररोज 800 ते 1 हजार या संख्येच्या मर्यादेत रुग्ण उपचार घेत आहेत. अतिगंभीर असलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून गत 3 दिवस दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये जे अति गंभीर आजारी असेलेले रुग्ण आहे त्यांचा मृत्यू दर 0.7 टक्क्याहून कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
00000







वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...