Friday, May 5, 2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात

मंगळवारी पेन्शन अदालत

 

नांदेड (जिमाका) दि. 5  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 9 मे 2023 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

0000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 5 :- नांदेड जिल्ह्यात 12 मे 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 28 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 12 मे 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 कर्नाटक राज्याच्या सीमेलगत गावातील

मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- कर्नाटक सार्वत्रिक निवडणूक-2023 ची निडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांच्या ठिकाणचे किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. हा आदेश मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत म्हणजे 8 मे 2023 रोजी सायं 5 वाजेपासून ते 10 मे 2023 रोजी मतदान संपेपर्यंत तर मतमोजणीच्या दिवशी 13 मे रोजी संपूर्ण दिवस हा आदेश लागू राहिल. हा आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार निर्गमित केला आहे.  

 

या निवडणुकीचे मतदान 10 मे 2023 रोजी तर मतमोजणी 13 मे 2023 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करणे तसेच कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी देशी विदेशी व ताडी मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.  

000000

 नीट (युजी) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

नांदेड (जिमाका) दि. 5 :- नीट (युजी) NEET(UG) 2023 परीक्षा रविवार 7 मे 2023 रोजी दु. 2 ते  सायं. 5.20 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 57 परिक्षा केंद्रावर  घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये म्हणून तसेच ही परीक्षा स्वच्छ व सुसंगत वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  नुसार या 57 परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 7 मे 2023 रोजी दु. 12 ते सायं. 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी याव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000 

 वृत्त

 

प्रत्येक शनिवार व रविवारी नांदेड येथील सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- कार्यालयीन कामामुळे अनेक नागरिकांना सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करणे अवघड झाले होते. नागरिकांना सुटीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करता यावीत यादृष्टीने प्रत्येक शनिवार रविवार सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. पक्षकारांना सुट्टी घेऊन किंवा आपले महत्त्वाचे काम सोडून दस्त नोंदणीच्या कामासाठी येण्याची आवश्यकता आता राहिली नाही. पक्षकार शनिवार रविवार दस्त नोंदणीचे कामकाज करून घेऊ शकतील.

ही सुविधा देताना सह दुय्यम निबंधक नांदेड क्रमांक दोन हे कार्यालय आता दर सोमवार मंगळवारी बंद राहणार आहे. तथापि दर सोमवार मंगळवारी दोन दिवसासाठी नांदेड शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालय एक व तीन हे जनतेसाठी खुले राहणार आहे. ही कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत.

 

पक्षकारांना सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे विशेषतः दस्त नोंदणीच्या कामी नोकरीनिमित्त किंवा इतर कारणांमुळे कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यासाठी त्यांना सुट्टी घेऊन किंवा आपले निगडीचे कामे बाजूला ठेवून दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून नोंदणी विभागाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये ज्या महानगरपालिका क्षेत्रात एकापेक्षा जास्त सामायिक क्षेत्रासाठी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत, त्या कार्यालयांपैकी काही कार्यालय नोंदणीच्या व इतर कामासाठी दर शनिवार रविवारी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

Thursday, May 4, 2023

 सामंजस्यातून लेंडी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संघर्ष समितीसह सर्वांची सहमती

 

लेंडी प्रकल्पाबाबत जिल्हा नियोजन भवनात बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- लेंडी आंतरराज्य प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी लेंडी प्रकल्प संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्तांनीही अधिक सकारात्मक होऊन या कामास सहकार्य केले पाहिजे. प्रकल्पग्रस्त गावाच्या पूनर्वसनाबाबत शासनाने जे निकष ठरवून दिले आहेत त्यानुसार आम्ही निधीच्या उपलब्धतेने कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. यात शासन व प्रकल्प संघर्ष समिती यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी प्रत्येक प्रकल्पग्रस्त गावासाठी समिती स्थापन केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. या समितीत गावचा तलाठी, ग्रामसेवक, शाखा अभियंता व गावातील पाच प्रतिनिधी यांचा समावेश असेल. या समितीच्या सचिवपदी जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंत्यावर जबाबदारी राहील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

लेंडी प्रकल्पाबाबत आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके, संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, गुणवंतराव हंगरगेकर, प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता व पारदर्शकता यावी यादृष्टीने गावपातळीवरील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये नायब तहसिलदार अथवा बिडीओ यांच्या अध्यक्षतेखाली समिती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. पूर्नवसनासाठी ज्या सुविधा मंजूर आहेत त्या व्यतिरिक्तही इतर महत्त्वाच्या कामांसाठी शासनाने आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समिती / आमदार निधीतून याबाबत विचार करू असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

लेंडी प्रकल्पाला झालेली दिरंगाई यामुळे केवळ या प्रकल्पाचा आर्थीक खर्च वाढला नाही तर शेतकऱ्यांनाही अतोनात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. हा प्रकल्प वेळीच पूर्ण झाला असता तर पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथला शेतकरी व जमीन सुजलाम सुफलाम झाली असती, असे प्रतिपादन आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केले.

 

पुनर्वसनाबाबत लोकांच्या अनेक अडचणी आहेत. गावात पायाभूत सुविधा नाहीत, हे लक्षात घेता या प्रलंबित प्रश्नांबाबत यथाशक्य इतक्या लवकर राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याची हमी शासनाने दिली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो परंतू कोणत्याही परिस्थितीत संबंधित मंत्री यांचे समवेत जोपर्यंत बैठक होत नाही तो पर्यंत सुरू केलेले कामकाज तात्काळ स्थगीत करावे, असे आवाहन लेंडी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव रावणगावकर यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे गुणवंतराव हंगरगेकर व इतर सदस्यांनीही आपली भूमिका मांडली.

0000




Wednesday, May 3, 2023

 मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :-   मधमाशा उद्योगामध्ये सातेरी, मेलीफेरा व आग्या मधमाशाचे संगोपन करुन मधाचे उत्पादन घेण्याऱ्या व्यक्ती, संस्था यांची मित्र पुरस्कारासाठी निवड करण्यांत येणार आहे. इच्छुक व्यक्ती, संस्था यांनी या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, शिवाजी नगर, नांदेड येथे अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शिवशंकर तानाजीराव भोसीकर व मधुक्षेत्रिक शंकर नारायण खंदारे यांच्याशी तसेच दु.क्र. 02462-240674 / 9921563053 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड केले आहे.

 

मध संचालनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे  20 मे 2023 रोजी जागतीक मधमाशी दिनाचे औचित्य साधुन मधमाशा पालन उद्योगांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या लाभार्थीस मधमाशी मित्र पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. मंडळाचे मध संचालनालय महाबळेश्वर येथे पुरस्कार वितरण सोहळा 20 मे 2023 रोजी आयोजीत केलेला आहे असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.   

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...