Friday, January 20, 2023

वृत्त क्रमांक 31

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023

मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2023 च्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पडावी तसेच या कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू केले आहेत.

 

या मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकाराचे मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश सकाळी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंतच्‍या कालावधीसाठी लागू राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

Thursday, January 19, 2023

लेख क्रमांक 1

 लेख

निरोगी आरोग्यासाठी तृणधान्यांचे महत्व !

 

दैनंदिन जीवनात आहारात जंकफूड, मैद्याचे पदार्थ, बिस्किट, तळलेले पदार्थ, फास्टफूड यांचा मोठया प्रमाणात समावेश दिसून येत आहे. अशा आहारामुळे व खानपानामुळे आरोग्यावर परिणाम होवून विविध गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. आपल्या आहारात पौष्टीक तृणधान्याचा समावेश नसल्याने आरोग्याच्या समस्यात वाढ झालेली आहे.  निरोगी आरोग्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. संतुलित आहारात सर्व प्रकारचे धान्य, तृणधान्य, पालेभाज्या, फळे, सुकामेवा आदीचा समावेश असणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी सर्व समावेशक विभिन्नतेचा आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

आपल्या देशात सणाच्या दिवशी पौष्टिक तृणधान्य युक्त पदार्थाचा वापर आहारामध्ये करण्याची परंपरा आहे. तृणधान्याचे आहारातील महत्व ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे.  या अनुषंगाने राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकरी व  सर्व सामान्य व्यक्तींना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत, त्याचबरोबर तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ इ. विषयाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व लोकांना समजण्यासाठी मकर संक्रांती-भोगी हा दिवस या वर्षापासून दरवर्षी “पौष्टिक तृणधान्य दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे.

 

तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर लघु तृणधान्ये राळा, वरई, राजगिरा यांचा तृणधान्यांत समावेश होतो. या तृणधान्यातून कॅल्शियम, लोह, झिंक, आयोडिन इ. सारखे पोषक घटक शरीराला मिळतात. या घटकांमुळे लहान बालके व स्त्रियांना कुपोषण, रक्तक्षयाच्या समस्येपासून दूर ठेवता येते.  पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी विविध विभागांनी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. अन्न धान्यासोबत शेतकऱ्यांनी तृणधान्याचे उत्पादन वाढवावे म्हणून अनेक प्रोत्साहनपर योजना कृषि विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहेत. तसेच बचतगटांच्या माध्यमातून तृणधान्य व तृणधान्यापासून बनविलेले पदार्थ याची विक्री व जनजागृती मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. तृणधान्यांच्या उत्पादनाचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत. शेतकऱ्यांना श्वाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणूनही याकडे बघता येईल. इतर पिकांच्या तुलनेत ही पिके कमी पाण्यावर घेता येतात. तृणधान्य हे अन्नधान्यासोबत जनावरांना चारा म्हणून सुध्दा देता येतात. इतर पिकांच्या तुलनेत कीड-रोग समस्या कमी असते. छोटया क्षेत्रातही ही पिके घेता येतात. पोषक मूल्यांमूळे या पिकांना परिपूर्ण आहार आणि पोषण मिळते.

 

प्रौढ व्यक्तीना दिवसभरात 25 ग्रॅम एवढी फायबरची आवश्यकता असते. तृणधान्यापासून बनवलेल्या दोन ब्रेड मधून सहा ग्रॅम एवढे फायबर मिळते. अर्धी वाटी पांढरे तांदळाच्या भाता मधून दोन ग्रॅम  एवढे फायबर मिळते. अर्धी वाटी ब्राऊन तांदळाच्या भातापासून सहा ग्रॅम एवढे फायबर मिळते. तृणधान्याचे नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. पॉलिश केलेले तृणधान्ये शिजविण्यासाठी सोपे आणि पचनासाठी हलके असते मात्र हे धान्य ज्यावेळी पॉलिश केले जाते त्यावेळी त्यातील पोषण मूल्य निघून जातात. यामुळे चकाकणारा पांढरा तांदूळ असो की चकाकणारी ज्वारी या धान्यातील कोंडा आणि अंकुर हे घटक काढून टाकले जातात. त्यामुळे त्यात फक्त एन्डोस्पर्म हाच घटक उरलेला असतो. पांढऱ्या तांदळात केवळ स्टार्च उरलेला असतो आणि त्यातील जीवनसत्वे कमी प्रमाणात शिल्लक राहतात. आपल्या व आपल्या परिवाराच्या गरजेप्रमाणे आहाराचे नियोजन असले पाहिजे.  तृणधान्याच्या सेवनामुळे 50 टक्के पेक्षा अधिक आजारांना आळा घालने सहज शक्य होईल. आपल्या आहारामध्ये नियमितपणे तृणधान्यांचा समावेश करावा,  आहारात चरबीयुक्त पदार्थाचे सेवन टाळून फायबरचा वापर जास्तीत जास्त करा. फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते तसेच तृणधान्य पचन होण्यास वेळ लागत असल्याने लगेच भूक लागत नाही. तृणधान्याच्या नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो. ‘मिलेट्स आर कन्सिडर टू बी पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिशन’ हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

उर्मिला जाधव, आहार तज्ज्ञ, पोषण पुनर्वसन केंद्र, स्त्री रुग्णालय, नांदेड

शब्दांकन- अलका पाटील, उपसंपादक, जिमाका, नांदेड

00000



 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2023

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

 

औरंगाबाद,दि.१९, (विमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी,2023 रोजी होणार आहे. ज्या मतदारांना निवडणूक आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे त्यांनी ते सादर करणे आवश्यक आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य

1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी वितरीत केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

 

******

Wednesday, January 18, 2023

वृत्त क्रमांक 30

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

फिरते पथक व व्हिडीओ देखरेख पथकाला

विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- 05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 अनुषंगाने नियुक्त केलेले फिरते पथक व व्हिडीओ देखरेख पथकाला शासनाने 11 जानेवारी 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 नुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. या संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील अधिकार प्रदान केले आहेत.

 

याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशासोबत संलग्न केलेल्या यादीनुसार निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले फिरते पथक संख्या-32 व व्हिडिओ देखरेख पथक संख्या-32 यांना निवडणूक कालावधीपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील अधिकार प्रदान केले आहेत. हे आदेश पुर्वलक्षी प्रभावाने अधिसुचना प्रसिद्ध झालेला दिनांक 11 जानेवारी 2023 पासून अंमलात राहतील, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 29

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार

मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

§   औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीबाबत दुसरे प्रशिक्षण संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 18 :-05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी  भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दक्षता घेवून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 


05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी  करावयाच्या प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकुळे, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसिलदार राम बोरगावकर व  निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व तालुक्याचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.


ही निवडणूक जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रावर होत असून यासाठी प्रत्येक केंद्रावर 4 याप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. ही निवडणूक प्रक्रीया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशिवाय होत आहे. मतपत्रिका व बॅलेट नुसार ही निवडणूक प्रक्रीया होत असल्याने निवडणूक कामात नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपुर्वक कामकाज करावे असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. तसेच निवडणूकीत मतदारांना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत यावेळी माहिती दिली.


या निवडणूक प्रक्रीयेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूकीच्या एक दिवस अगोदरपासून ते मतदान प्रक्रिया संपूर्ण होईपर्यत करावयाच्या कर्तव्याबाबत तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी मतदानाची पध्दत, मतदान पध्दतीबाबत मार्गदर्शक सूचना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, मतपत्रिका व मतदान याद्या तपासणी, मतदानाच्या दिवशी अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना घावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.


तसेच मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक राहील.  मतदान सुरु होण्यापूर्वी तसेच मतदान संपल्यानंतर मतपेटी व इतर मतदानाचे साहित्य हाताळण्याबाबत चे प्रात्यक्षिक यावेळी करुन दाखविले. या प्रशिक्षणास अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतपेटी हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र वितरीत केले.

0000







वृत्त क्रमांक 27

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे /

चिन्हांचे कापडी फलके, भाषण देण्यावर निर्बंध

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत  यांनी सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे / चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर प्रतिबंधित केले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी शनिवार 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 28

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

मतदान केंद्राची अंतिम यादी गुरुवारी होणार प्रसिद्ध

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक 2023 साठी निश्चित करण्यात आलेली मतदान केंद्राची अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर व संबंधित कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी  प्रसिद्ध  होणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...