Tuesday, December 20, 2022

 माळेगाव यात्रेत बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र  सरकारच्या 8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण सेवा या विषयांवर अधारीत भव्य बहूमाध्यम प्रदर्शानाचे आयोजन लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी  दुपारी 2.00 वा. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

 

हे प्रदर्शन दिनांक 22 ते 26 डिसेंबर 2022 कालावधी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यत सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे.  या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो नांदेडच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहुमाध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात येणार आहे.

 

केंद्र सरकारच्या 8 वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याण सेवा निमित्त सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती  या बहूमाध्यम प्रदर्शानातून दर्शवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदींची उपस्थिती राहणार आहे. या बहुमाध्यम  प्रदर्शनास  भाविकांनी  भेट द्यावी, असे आवाहन नांदेड येथील केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

Monday, December 19, 2022

सकाळी 9 पासून ग्रामपंचायत

सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून पुढे सुरू केली जाईल. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. नांदेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह, प्रशासकिय इमारत येथे सकाळी 9 वा. मतमोजणी सुरू होईल. अर्धापूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा., भोकर येथे तहसिल कार्यालय तळमजला येथे सकाळी 10 वा. हदगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

 

हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वा., किनवट येथे तहसिल कार्यालय येथे सकाळी 10 वा., माहूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., धर्माबाद येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू होईल. उमरी येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा., बिलोली येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., नायगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., मुखेड येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., कंधार येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., लोहा येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. तर देगलूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

 

भोकर तालुक्यात सर्वाधिक 89.34 टक्के मतदान

दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 89.34 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदेड तालुक्यात 71.19 टक्के, अर्धापूर तालुक्यात 88.01 टक्के, हदगाव तालुक्यात 84.12 टक्के, हिमायतनगर तालुक्यात 88.06 टक्के, किनवट तालुक्यात 82.25 टक्के, माहूर तालुक्यात 81.96 टक्के, धर्माबाद तालुक्यात 83.63 टक्के, उमरी तालुक्यात 88.84 टक्के, बिलोली तालुक्यात 85.84 टक्के, नायगाव तालुक्यात 86.82 टक्के, देगलूर तालुक्यात 86.68 टक्के, मुखेड तालुक्यात 73.39 टक्के, कंधार तालुक्यात 81.69 टक्के, लोहा तालुक्यात 86.57 टक्के एवढे मतदान झाले आहे.

 

सार्वत्रिक निवडणूक 160 ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आली. यामध्ये नांदेड तालुक्यात 6 ग्रामपंचायती, अर्धापूरमध्ये 2, भोकर 3, हदगाव 4, हिमायतनगर 1, किनवट 50, माहूर 26, धर्माबाद 2, उमरी 1, बिलोली 8, नायगाव 8, देगलूर 1, मुखेड 14, कंधार 12, लोहा 22 अशा एकुण 160 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राबविला गेला. यातील 160 ग्रामपंचायतीसाठी एकुण 489 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाले. यात एकुण 77 हजार 467 स्त्री मतदार तर 84 हजार 563 पुरूष मतदार व इतर दोन मतदार अशी एकुण 1 लाख 62 हजार 32 मतदार संख्या होती. यापैकी 62 हजार 999 स्त्री मतदार, 70 हजार 179 पुरूष मतदार असे एकुण 1 लाख 33 हजार 178 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची सरासरी टक्केवारी 82.19 एवढी होते.

0000

 जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात

26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन   

नांदेड (जिमाका) दि. 19 :- नांदेड जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

भूमि अभिलेख विभागातून दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती योजनेशी संबंधीत लाभाच्या काही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे. या पेन्शन अदालतमध्ये येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या बद्दल लेखी म्हणणे आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी केले आहे.

00000

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू   

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 डिसेंबर 2022 ते 19 जानेवारी 2023 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

Saturday, December 17, 2022

 नांदेड जिल्ह्यात 160 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान

·         मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत

 

नांदेड, (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी दिनांक 18 डिसेंबर रोजी 160 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत या कालावधीत होईल. मतदान होत असलेल्या या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

मतदानाची मतमोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी होईल. या मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाईल. याबाबतची अधिसुचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुक्रवार 23 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 16 तालुक्यात 181 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 554 एवढी आहे. यात 1 हजार 391 ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा मुदत होती. सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड तालुक्यामध्ये 7 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक असून यातील एकुण प्रभागाची संख्या 24 आहे तर सदस्य संख्या 61 आहे.

 

अर्धापूर तालुक्यात 2 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक असून प्रभागाची संख्या 6 आहे तर सदस्य संख्या 16 आहे. भोकर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीमध्ये 9 प्रभाग संख्या असून एकुण सदस्य संख्या 21 आहे. मुदखेड तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी प्रभागाची संख्या 3 असून एकुण सदस्य संख्या 7 आहे.

 

हदगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 18 असून एकुण सदस्य संख्या 48 आहे. हिमायतनगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 3 असून एकुण सदस्य संख्या 7 आहे. किनवट तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 161 असून एकुण सदस्य संख्या 403 आहे. माहूर तालुक्यात 27 ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 82 असून एकुण सदस्य संख्या 205 आहे.

 

धर्माबाद तालुक्यात 3 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 9 असून एकुण सदस्य संख्या 23 आहे. उमरी तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 3 असून एकुण सदस्य संख्या 7 आहे. बिलोली तालुक्यात 9 ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 27 असून एकुण सदस्य संख्या 67 आहे. नायगाव तालुक्यात 8 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 25 असून एकुण सदस्य संख्या 66 आहे.

 

मुखेड तालुक्यात 15 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 45 असून एकुण सदस्य संख्या 111 आहे. कंधार तालुक्यात 16 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 48 असून एकुण सदस्य संख्या 122 आहे. लोहा तालुक्यात 28 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 88 असून एकुण सदस्य संख्या 220 आहे. देगलूर तालुक्यात एका ग्रामपंचायतमध्ये प्रभागाची संख्या 3 असून एकुण सदस्य संख्या 7 एवढी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

0000

 अनुज्ञप्तीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन  

 

नांदेड, (जिमाका) दि. 17:-  मोटार वाहन कायदा व अनुषंगीक नियमांमध्ये नमूद अनुज्ञप्ती विषयक कामांसाठी आवश्यक असलेला नमुना-1 (अ) हे वैद्यकिय प्रमाणपत्र पात्र डॉक्टरांमार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यावसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त) ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यातील 11 वैद्यकीय व्यवसायिकांनी युजर आयडी प्राप्त करुन घेतला आहे. नागरिकांनी अनुज्ञप्तीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना-1(अ) प्राप्त करण्याकरीता त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


वैद्यकीय व्यवसायिकाचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. डॉ. हिरामन अळणे अक्षय क्लिनिक, डॉक्टर लेन नांदेड 9850607800. डॉ. प्रशांत खंडागळे अविरत मॅर्टनीटी हॉस्पिटल मुखेड, नांदेड 7588914659. डॉ. अब्दुल राफे हेल्थ केअर क्लिनिक, हतई, नांदेड 9552587336. डॉ. मो. रिजवान पॉप्युलर हॉस्पीटल, देगलूर नाका, नांदेड 9764889980. डॉ. अजिंक्य पुरी ओम क्लिनिक, वाई बाजार माहूर, नांदेड 9420446389. डॉ. विजय बरडे, बरडे डायबीटीज हॉस्पीटल,भावसार चौक नांदेड 7020762727. डॉ. अब्दुल समी डॉ जावेद क्लिनीक, वाघी रोड, नांदेड 8446953633. डॉ. लालू बोरडे मोतोश्री मल्टी क्लिनीक, छत्रपती चौक नांदेड 9359807675. डॉ. आफरीन फातेमा पटेल राहत आय हास्पीटल, हैदरबाग, नांदेड 9970055334. डॉ. सारिका देशपांडे श्री हॉस्पिटल, गणेशनगर, नांदेड 7709485995. डॉ. भीमराव जोंधळे जोंधळे हॉस्पीटल, सिडको, नांदेड 7030322356 याप्रमाणे आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना-1 (अ) प्राप्त करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

19 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 17:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...