Monday, July 4, 2022

 लाभार्थ्यांना रहिवासी व जात प्रमाणपत्राचे वितरण,

वन धन केंद्रामार्फत मोहफुले खरेदीची सुरवात

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  किनवट तालुक्यातील बेल्लोरी धानोरा येथे देवगिरी कल्याण आश्रम आणि बेल्लोरी धानोरा वन धन विकास केंद्रामार्फत जात व रहिवासी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात आदिवासी विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी गावचे प्रमुख शामराव हुरदुके, संस्थेचे सचिव प्रकाशजी टारपे, संतोष मरस्कोले, रामकिशन टारपे तसेच गावातील प्रमुख व जेष्ठ भगवानराव हुरदुके , आदिवासी विकास प्रकल्पाचे किशन गारोळे, उपसरंपच भाऊराव डवरे, देवराव गारोळे, शाम आर केंद्रे, पोलीस पाटील देविदास चव्हाण, वन धन विकास योजनेचे अध्यक्ष  सुभाष हुरदुके, सचिव शंकर डवरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विमलताई दुरदुके तसेच परिसरातील महिलाची उपस्थिती होती.

 

सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व वन धन विकास केंद्रामार्फत शासकीय अधिकृत परवानगीने उपजिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते गौण वनोपज मोहफुले खरेदीची सुरवात करण्यात आली. गावातील नागरिकांना गावातच रहिवासी आणि जातीचे दाखले देण्यात आले. गावात गौण वनोपज खरेदी होत असल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. वन धन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल व वन धन केंद्राचा प्रस्ताव मंजूर करुन बीज भांडवल मिळून देणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच वन हक्क व्यवस्थापनासाठी आराखडे बनविण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी वनांचल फौडेशनतर्फे पाऊस कसा मोजावा याचे तंत्र समजावून सांगण्यात आले. जेणेकरुन शेतीचे कामे व पाणलोट क्षेत्राचे काम करणे सोपे होईल. त्याचबरोबर मागील 17 मे ते 19 मे कालावधीत आदिवासी विकास कौशल्य प्रशिक्षण वर्ग किनवट येथे देवगिरी कल्याण आश्रम आणि तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे यांच्या मार्फत घेण्यात आला असता त्या वर्गाच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. शेतातील पिकांची काळजी कशी घ्यावी, पिकाला आवश्यक जीवन सत्व कोणत्या प्रकारे दिले पाहीजे यावर कृषि तज्ञ सुहास आजगावकर यांचे मार्गदर्शन झाले. तसेच शेतीसाठी पाण्याची बचत कशी करता येईल व गौण वनोपज साठी विक्री व्यवस्थापन कसे करावे यावर जल व्यवस्थापनाचे रणजीत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेती उत्पादन कंपनीचे अधिकारी आणि इतर प्रशिक्षणार्थ्यांची मनोगत झाली.

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 37.60 मि.मी. पाऊस 


नांदेड (जिमाका) दि. 4:- जिल्ह्यात सोमवार 4 जुलै  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 37.60  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 199.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात सोमवार 4 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 37.20 (179.90), बिलोली- 41.10 (155.80), मुखेड- 25.80 (250.60), कंधार-51.60 (286.70), लोहा-68.40 (206.20), हदगाव-32.30 (161.10), भोकर- 36.40 (134.10), देगलूर-24.70 (254.50), किनवट- 34.50 (220.90), मुदखेड- 32.20 (232.40), हिमायतनगर-78.90 (282.40), माहूर- 11.60 (144.80), धर्माबाद- 19.10(156.80), उमरी- 37.10 (186.90), अर्धापूर- 40.80 (139.90), नायगाव- 41 (131.40) मिलीमीटर आहे.

0000

Friday, July 1, 2022

नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  226 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 10 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 2, देगलूर 1, हिमायतनगर 1, लातूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे हदगाव तालुक्याअंतर्गत 1 बाधित आढळला आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 4 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 903 एवढी झाली असून यातील 1 लाख 160 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.   

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 42, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 6 असे एकुण 51 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 8 हजार 250

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 88 हजार 20

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 903

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 160

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-51

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 0000

 

 शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या सर्व शासकीय वसतिगृहात या शौक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 

इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या तसेच इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी  प्रथम वर्षात व पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरून द्यावेत. इयत्ता 8 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार 15 जुलै तर इयत्ता 10 वी व 11 वी साठी शनिवार 30 जुलै पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

 आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2022 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी बुधवार 27 जुलै 2022 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

 

आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या 103 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 27 जुलै 2022 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुले नगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 9881524643 / 7620304096 संपर्क करावा, असेही कळविले आहे. 

 

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण आसावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 31 जुलै 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थींचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 3 जुलै  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 17 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 3 जुलै 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 17 जुलै  2022 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 4 जुलै 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.

 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.

 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...