Monday, July 4, 2022

 लाभार्थ्यांना रहिवासी व जात प्रमाणपत्राचे वितरण,

वन धन केंद्रामार्फत मोहफुले खरेदीची सुरवात

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  किनवट तालुक्यातील बेल्लोरी धानोरा येथे देवगिरी कल्याण आश्रम आणि बेल्लोरी धानोरा वन धन विकास केंद्रामार्फत जात व रहिवासी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात आदिवासी विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी गावचे प्रमुख शामराव हुरदुके, संस्थेचे सचिव प्रकाशजी टारपे, संतोष मरस्कोले, रामकिशन टारपे तसेच गावातील प्रमुख व जेष्ठ भगवानराव हुरदुके , आदिवासी विकास प्रकल्पाचे किशन गारोळे, उपसरंपच भाऊराव डवरे, देवराव गारोळे, शाम आर केंद्रे, पोलीस पाटील देविदास चव्हाण, वन धन विकास योजनेचे अध्यक्ष  सुभाष हुरदुके, सचिव शंकर डवरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विमलताई दुरदुके तसेच परिसरातील महिलाची उपस्थिती होती.

 

सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व वन धन विकास केंद्रामार्फत शासकीय अधिकृत परवानगीने उपजिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते गौण वनोपज मोहफुले खरेदीची सुरवात करण्यात आली. गावातील नागरिकांना गावातच रहिवासी आणि जातीचे दाखले देण्यात आले. गावात गौण वनोपज खरेदी होत असल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. वन धन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल व वन धन केंद्राचा प्रस्ताव मंजूर करुन बीज भांडवल मिळून देणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच वन हक्क व्यवस्थापनासाठी आराखडे बनविण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी वनांचल फौडेशनतर्फे पाऊस कसा मोजावा याचे तंत्र समजावून सांगण्यात आले. जेणेकरुन शेतीचे कामे व पाणलोट क्षेत्राचे काम करणे सोपे होईल. त्याचबरोबर मागील 17 मे ते 19 मे कालावधीत आदिवासी विकास कौशल्य प्रशिक्षण वर्ग किनवट येथे देवगिरी कल्याण आश्रम आणि तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे यांच्या मार्फत घेण्यात आला असता त्या वर्गाच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. शेतातील पिकांची काळजी कशी घ्यावी, पिकाला आवश्यक जीवन सत्व कोणत्या प्रकारे दिले पाहीजे यावर कृषि तज्ञ सुहास आजगावकर यांचे मार्गदर्शन झाले. तसेच शेतीसाठी पाण्याची बचत कशी करता येईल व गौण वनोपज साठी विक्री व्यवस्थापन कसे करावे यावर जल व्यवस्थापनाचे रणजीत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेती उत्पादन कंपनीचे अधिकारी आणि इतर प्रशिक्षणार्थ्यांची मनोगत झाली.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...