Monday, April 4, 2022

 प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने

शिकाऊ, पक्के अनुज्ञप्तीसाठी मासिक शिबिराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी एप्रिल 2022 महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधिन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट 5 एप्रिल 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येणार आहे. अपॉइटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याबाबची नोंद घेऊन शिबिर कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

तालुक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे शिबिराचे आयोजन केले आहे. नांदेड तालुक्यासाठी 9 ते 23 एप्रिल 2022, मुखेड तालुक्यासाठी 7 एप्रिल, किनवट तालुक्यासाठी 13 एप्रिल, हदगाव तालुक्यासाठी 20 एप्रिल, धर्माबाद तालुक्यासाठी 22 एप्रिल, हिमायतनगर तालुक्यासाठी 26 एप्रिल तर माहूर तालुक्यासाठी 29 एप्रिल 2022 रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000  

 परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र

नूतनीकरण, पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- केंद्र शासनाने 4 ऑक्टोंबर 2021 च्या अधिसूचनेद्वारे केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 व नियम 81 मध्ये सुधारणा करुन विविध शुल्कात वाढ केली आहे. या सुधारणेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. ही अधिसूचना केंद्र सरकारच्या morth.gov.in  या संकेतस्थळावर व तसेच कार्यालयीन सुचना फलकावर उपलब्ध आहे. या अधिसूचनेप्रमाणे वाहन 4.0 प्रणालीमध्ये परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 कोविड-19 च्या अनुषंगाने लागू केलेले निर्बंध मागे

 ·  नव्या मार्गदर्शक सूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोविड-19 रुग्णांची कमी झालेली संख्या व आरोग्य सुविधेवरील कमी झालेला ताण तसेच कोविड-19 च्या प्रतिबंधाच्या अनुषंगाने सध्याची स्थिती नियंत्रणात आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात करावयाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत.    

·नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये निर्गमीत केलेल्या आदेशान्वये लागू केलेले सर्व निर्बंध याद्वारे 1 एप्रिल 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आले असून ते पुढे अंमलात राहणार नाहीत.

·कोविड-19 चे व्यवस्थापन व प्रतिबंधाचे अनुषंगाने भारत सरकार कडील 22 मार्च आणि 23 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेले मार्गदर्शक सूचना सर्व संबंधित अधिकारी, स्थानिक प्रशासनाने तंतोतंतपणे पालन करावे.

· जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व संस्थांनी कोविड अनुरुप वर्तनाचे (ज्यामध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आदीचा समावेश आहे) पालन करावे, कारण ते व्यक्ती आणि समाजाचे आरोग्य व सुरक्षेसाठी सर्वात मोठी ढाल म्हणून कार्य करते.

· जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साथरोगाच्या उद्रेक याबाबत विविध परिमाणे जसे प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नविन रुग्णांची संख्या, उपचाराधिन रुग्णांची संख्या (ॲक्टीव्ह केसेस), बाधित रुग्णसंख्येचा दर (पॉझिटीव्हीटी रेट) तसेच दवाखान्यात उपराधिन रुग्णांसाठी वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे.

· कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथरोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात तात्काळ कळविण्यात यावे. जेणेकरुन साथरोगाचा पुन:श्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.

· जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य शासनाचे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व जनजागृतीचे कार्यक्रम चालू ठेवावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 मार्च 2022 रोजी निर्गमीत केले आहेत.

000000

 जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे होणार जल पूर्नभरण

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

· “जल शक्ती अभियान कॅच द रेन 2022” मोहिमेसाठी व्यापक बैठक

·  बांबू लागवडी संदर्भात विशेष कार्यशाळा

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भविष्यातील पाण्याचे संकट ओळखून महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी व्यापक प्रमाणात जल संधारणाची चळवळ रुजलेली आहे. नांदेड जिल्ह्यातही लोकसहभागातून अनेक संस्थांनी पाणी प्रश्नांवर चांगले काम केले आहे. चांगल्या कामांपासून प्रेरणा घेत ही चळवळ जिल्ह्यातील गावोगावी रुजली पाहिजे, पोहचली पाहिजे. या दृष्टिकोणातून जिल्ह्यात “जल शक्ती अभियान कॅच द रेन 2022” ही मोहिम व्यापक प्रमाणात वृद्धींगत करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. याचा प्राथमिक टप्पा म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे जल पूर्नभरण, जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक जलसाठे व वैयक्तिक जलसाठ्याचे जीओ टॅगींग, गावपातळीवरील जलसंधारण आराखडा व वार्षीक कृति योजना करून त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे या मोहिमेसंदर्भात जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी, जलसंधारण, कृषि व सर्व संबंधित विभाग प्रमुखांची व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, आदींची उपस्थिती होती.

 

या योजनेसमवेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. मिशन आपुलकी, प्रशासन आपल्या दारी या योजनांसह कॅच द रेन ही योजनाही राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 7 लाख 50 हजार घरांना नळाने पाणी पुरविण्याच्या उद्देश ठेवला पाहिजे. जिल्हा प्रशासनातर्फे या सर्व योजनेअंतर्गत जो कृति आराखडा तयार केला आहे त्यानुसार सिंचन, महसूल, शालेय शिक्षण, कृषि, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण, सामाजिक वनीकरण, वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कृती आराखडा प्रत्यक्षात साकारण्यासाठी सर्वांनी एक कटिबद्धता स्विकारून पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

 

पाण्याची क्षमता वाढवायची असेल तर जे मध्यम तलाव व इतर स्त्रोत आहेत त्याला भक्कम केले पाहिजे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून यातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गाळाने भरलेले तलाव मोकळे करणे हे केवळ त्या तलावाची पाणी क्षमता वाढविणे एवढ्यापुरताच उद्देश नाही तर या छोट्या कामातून प्रकल्पाला पूर्नजन्म दिल्याचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 75 किमी नाला सरळीकरण, 75 गॅबीएन स्ट्रक्चर / वनराई बंधारे, ग्रामीण भागातील शाळांमध्ये लहान रोपवाटिका, 750 एकर बांबू लागवड, पोकरा अंतर्गत 750 जलसंधारणाची विविध कामे, 75 अवजारांची बैंक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण आदी कामे लोकसहभागातून अधिक भक्कम करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर बांबू लागवडी संदर्भातही विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यात बांबुचे विविध प्रकार, जमिनीच्या प्रकारानुसार त्याची लागवड, मृदसंधारण यावर मार्गदर्शन करण्यात आले.

0000000

Saturday, April 2, 2022

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा  

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

 

शनिवार 2 एप्रिल 2022 रोजी सायं 5 वा. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथून सोईनुसार मोटारीने नांदेडकडे प्रयाण व रात्री नांदेड येथे मुक्काम. 

 

रविवार 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.10 वा. मोटारीने नायगाव तालुक्यातील कुंटूरकडे प्रयाण. सकाळी 11 वा. कुंटूर येथील प्रेरणास्थळ परिसर येथे आगमन. सकाळी 11 वा. स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर माजी राज्यमंत्री यांच्या स्मारकाचे लोकार्पण व धुरंधर स्मृतिग्रंथ प्रकाशन. सोईनुसार मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000


होट्टल महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी

होट्टलच्या ग्रामस्थांचा पुढाकार

 

·        जिल्हा प्रशासनातर्फे होट्टल मंदिरात सर्वसमावेशक बैठक 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- होट्टल महोत्सव गावकऱ्यांच्या दृष्टिनेही तेवढ्याच महत्वाचा असून तो आमचाही उत्सव आहे. लोकसहभागाला प्राधान्य देत होट्टल येथील गावकरी, युवक स्वयंस्फूर्त यात सहभागी होऊन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नाची शर्त करतील, असा विश्वास आज गावकऱ्यांनी दिला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होट्टल महोत्सवाचे नियोजन केले जात असून अधिकाधिक स्थानिकांचा लोकसहभाग घेऊन तो लोक उत्सव होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आमदार अमर राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर यांचे विशेष योगदान आहे. 

नांदेड जिल्ह्यातील चालुक्य परंपरेचा वारसा लाभलेल्या होट्टल नगरी येथील महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी आज होट्टल मंदिरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावकऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार जितेश अंतापूरकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर नाईक, तहसिलदार राजाभाऊ कदम, सरपंच हनिफा युसूफ शेख, उपसरपंच माधव दासरवाड, इन्टॅक्टचे सदस्य सुरेश जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

होट्टल महोत्सवाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. याठिकाणचे वास्तुस्थापत्य, मंदिराचे कोरीव काम, शिल्प, ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता जागतिक पर्यटकांनाही आकर्षक ठरणारे हे केंद्र म्हणून विकसीत होऊ शकते. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाच्यादृष्टिने वेगळा संदेश पर्यटकांपर्यंत पोहचेल असा विश्वास आमदार जितेश अंतापूरकर यांनी व्यक्त केला. या महोत्सवात बचतगटांमार्फत महिलांना रोजगार मिळावा, या भागातील गुणवंताचा गौरव व्हावा व पर्यटकांसह भाविकांपर्यंत महोत्सवाची माहिती पोहचावी अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.   

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांना त्या-त्या विभागानुसार जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने वाहतुकीचा प्रश्न महत्वाचा आहे. अधिकाधिक लोकांना या महोत्सवाला उपस्थित राहता यावे यादृष्टिकोणातून योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या. मंदिर परिसरातील स्वच्छता, विद्युत विभाग, आरोग्य, कृषि विभाग, पंचायत समिती, महसूल या सर्वांच्या योगदानातून घ्यावयाच्या कार्यक्रमासंदर्भात या बैठकीत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. देगलूर नगरपरिषदेने होट्टल महोत्सवासाठी स्वयंस्फूर्त सहभाग घेतला असून स्वच्छता व त्या अनुषंगिक जबाबदारी घेतली आहे. बचतगटांचे स्टॉल या ठिकाणी उभारुन त्यांनाही महोत्सव काळात व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

00000

Friday, April 1, 2022

 खाजगी वाटाघाटीने आणखी

38 गावांना हक्काची स्मशानभूमी

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- “गाव तेथे स्मशानभूमी” ही प्रत्येक गावकऱ्यांच्या संवेदनेचा गाभा असलेली विशेष मोहिम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सुमारे 300 खेड्यांपेकी 200  गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. यातील 174 गावांचे आदेशही निर्गमीत करण्यात आले. उर्वरीत गावासंदर्भात युद्धपातळीवर प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असून जिल्ह्यातील आणखी 38 गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला आहे.

 

उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील गावांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यात 2 गावे, कंधार तालुक्यात 3, भोकर 5, देगलूर 4, धर्माबाद तालुक्यात 4, हदगाव तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 9 गावे आहेत. स्मशानभूमी संदर्भात शासन निर्णयानुसार संबंधित गावांच्या भूधारकांची जमीन खाजगी वाटाघाटीतून उपलब्ध करून देण्यात आली.  

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...