Thursday, March 24, 2022

 शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी

दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जनतेच्या सोयीसाठी दस्त नोंदणी तसेच इतर कार्यालयीन कामासाठी शनिवार 26 व रविवार 27 मार्च 2022 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 नांदेड क्र. 3 सुरु ठेवण्यात येत आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी कळविले आहे. 

ज्या पक्षकारांनी 31 मार्च 2022 पर्यंत दस्त निष्पादित करुन, सही करुन शासकीय ई-चलन मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कचा भरणा करुन ठेवल्यास त्यांचे दस्त पुढील चार महिण्यापर्यत नोंदणीसाठी विनादंड स्विकारण्यात येतील. वार्षिक मुल्यांकन दरवाढ झाल्यास संबंधितास अतिरिक्त भुर्दड बसणार नाही. त्यामुळे पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात अनावश्यक गर्दी न करता ई-स्टेपइनचा वापर करुन दिलेल्या निर्धारित वेळेत आपल्या दस्ताची नोंदणी करावी व गैरसोय टाळावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

सुधारीत वृत्त क्रमांक 286

महाराष्ट्र सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-2021 ही परीक्षा रविवार 3 एप्रिल 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 51 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे.  

नांदेड जिल्ह्यातील विविध 51  विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी  11 ते दुपारी 12  या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी  18 हजार 760 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील  100  मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

 

शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री व्हावी

यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

-    जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- शेतकऱ्यांनी मोठी स्वप्न पहावीत. याचबरोबर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यासाठी एकत्र येवून ग्राहकांना शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतः उद्योजक व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील धान्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह  परदेशी,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांची उपस्थिती होती.  या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहभागी शेतकरी, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी विभाग व आत्माचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

शेतमालाची  मूल्य साखळी निर्माण करून विक्री करावी असे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह  परदेशी यांनी यावेळी सांगितले.  या महोत्सवामध्ये 60 वैयक्तीक शेतकरी, 60 महिला व शेतकरी गट व 10 शेतकरी उत्पादक कंपनीने सहभाग नोंदविला. या माध्यमातून  शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्री झाला. विक्री झालेल्या शेतमालाची  किंमत सुमारे 30 लक्ष रुपये आहे. याशिवाय सुमारे 25 लाख रुपयांच्या शेतमालाची आगाऊ नोंदणी ग्राहकांनी शेतकऱ्यांकडे केली आहे.  या महोत्सवामध्ये नैसर्गिक शेती मधील गावरान लसूण, सेंद्रिय गुळ, धर्माबादची गावरान टाळकी ज्वारी, लोहा तालुक्यातील लोकवन गहू, खपली गहू, देगलूरचे लाकडी घाण्यावरील करडई तेल, कामठा तालुका अर्धापूर येथील सेंद्रिय टरबूज, गावरान तीळ, जवस, मोहरी, आळीव व अनेक प्रकारचे पापड, धान्य, हळद पावडर, लाल मिरची पावडर, विविध मसाले, जात्या वरील विविध कडधान्यांच्या डाळी, देशी गायीचे तूप, आवळा व उसाचा रस आधी शेतमालाला अधिक मागणी होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीमती माधुरी सोनवणे  यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी , बीटीएम, एटीएम व हरी बिराजदार यांनी  विशेष मेहनत घेतली.

00000




Wednesday, March 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 520 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 797 एवढी झाली असून यातील 1 लाख 97 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 8 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 असे एकुण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 92 हजार 235

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 72 हजार 316

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 797

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 97

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-8

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 शुक्रवारी जीएसटीवर कार्यशाळेचे आयोजन

आयुक्त मनोजकुमार रजक करणार मार्गदर्शन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्रीय वस्तु व सेवाकर तथा उत्पादन शुल्क कार्यालय नांदेड मंडळातर्फे नांदेड, हिंगोली आणि लातूर या तीन जिल्ह्यातील जीएसटी कर ते कर सल्लागार यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे.  ही कार्यशाळा शुक्रवार 25 मार्च 2022 रोजी सायं 4 वा. होटल सिटी प्राइड, एमजीएम कॉलेज रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व जीएसटी करदाता व कर सल्लागार यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्तु व सेवाकर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त एल.वी. कुमार यांनी केले आहे.  

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वस्तु व सेवाकर तथा उत्पादन शुल्क औरंगाबादचे आयुक्त मनोज कुमार रजक हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत करदात्यांना जीएसटी कार्यप्रणाली मध्ये राहून कार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जीएसटी कार्यप्रणालीमध्ये अपडेटस यावर मार्गदर्शन कार्यशाळा सीजीएसटी तर्फे घेण्यात येत आहे.

या कार्यशाळेत सीजीएसटी औरंगाबाद अधिक्षक दिपक गुप्ता हे जीएसटी मध्ये 1 जानेवारी 2022 पासून अंमलात येणारे बदलावर व तसेच केंद्रीय बजेट 2022 च्या जीएसटीमध्ये येणाऱ्या काळात होणारे अपेक्षित बदला-बदल सखोल पॉवर पॉइंट प्रोजेक्टवर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या शेवटी उद्योजक, करदाते व कर सल्लागार यांच्या शंकेचे निरासरन करण्यात येईल. या कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, आणि लातूर जिल्ह्यातील जीएसटी करदाता आणि कर सल्लागार यांची मोठी उपस्थिती असेल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

0000

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने

भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने शुक्रवार 25 मार्च रोजी रोजगार / शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार 25 मार्च रोजी सकाळी 11 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे. 

या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता आणि शिकाऊ उमेदवारांसाठी मानधन, आवश्यक व्यवसायाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार आयटीआय उत्तीर्ण (तात्पुरते आणि शिकाऊसाठी) फक्त मुलांसाठी वय मर्यादा 18 ते 28 वर्ष ( पेंटर जनरल ट्रेडसाठी 30 वर्षे ) असेल तर वेतन 9 हजार रुपये राहील. व्यवसाय- वेल्डर, पेन्टर, फिटर, मासन, मेकॉनिस्ट, टर्नर आणि टीडीएम या पदासाठी आहे. या मेळाव्यात स्थानिक नांदेड येथील तुलसी केमिकल्स ॲण्ड पेन्टस प्रा. ली.  हे सहभागी होत आहेत.

00000

 कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये

पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 23 : कोविड-19 आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास विभागाने केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महिला व बाल विकास विभागाला बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  तालुका स्तरावर गरजु लाभार्थ्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी  कार्यालय तर नांदेड मनपा क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांनी संरक्षण अधिकारी  कार्यालय किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर नांदेड येथून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रांसह मुळ अर्जासह प्रस्ताव सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अर्थ सहाय्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

मुळ अर्ज, बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई-वडील कोविड -19 ने मुत्यृ झाल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत, बालकाचे अथवा बालकांच्या पालकांचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते आधार संलग्न असल्याबाबत  पासबुक झेरॉक्स प्रत, बालकाचे आधार कार्ड, शासनाच्या किंवा इतर योजनाचा लाभ घेत नसल्याचे हमीपत्र असे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,  शास्त्रीनगर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...