Tuesday, January 11, 2022

 फोटो ओळी : 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. श्री. संजय तुबाकले यांनी उमेद अभियान अंतर्गत स्थापित स्वयंसहायता समूहांच्या स्टॉल्सला भेट देऊन खरेदी केली.



0000000

 कृषि क्षेत्रासमवेत शिक्षणाच्या सुविधाही भक्कम व्हाव्यात 

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

·         डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण   

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- भारताच्या खेड्यापाड्यात असलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी “जय जवान जय किसान” हा नारा दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी दिला. यातून  शेतकऱ्यांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला. कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्रांती तर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जलक्रांतीसाठी दिलेल्या योगदानाने कोरडवाहू क्षेत्रालाही हक्काचे पाणी मिळू शकले. असंख्य योजना ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे राबविल्या जात आहेत. काळानुरूप या योजनांमध्ये बदल करून त्याला नवतंत्रज्ञानाची जोडही दिली आहे. शेतीसमवेत ग्रामीण भागात शिक्षणाच्या सेवा-सुविधाही अधिक भक्कम होणे गरजेचे असून नव्या काळाशी सुसंगत यात बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने  कै. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सन 2020-21 वितरण सोहळा आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपा महापौर जयश्री पावडे, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर,  दिनकर दहीफळे, नामदेव आईलवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष तुबाकले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदींची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्यात माहूर, हिमायतनगर, किनवट व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषि क्रांती योजना या भागासाठी राबविल्या जातात. आदिवासी क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्र यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या ग्रामीण पातळीपर्यंत यशस्वीपणे पोहल्या पाहिजेत. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी निजामकाळातील असलेल्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. या धोकादायक असलेल्या शाळांच्या इमारती काढून त्याठिकाणी नवीन इमारती उभ्या करण्यावर भर देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

आपल्या जिल्ह्याचे क्षेत्र मोठे आहे. सर्व भागाच्या समतोल विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून ग्राम विकासात नांदेड जिल्हा मागे राहणार नाही यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी यावर भर देऊन काम करतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जलजीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाला शुद्ध व स्वच्छ पाणी पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे. अर्धवट बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित कशा होतील याकडे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे. ज्या ठिकाणी नवीन योजना प्रस्तावित केल्या आहेत ती कामे अधिक चांगल्या प्रतीचे झाली पाहिजेत. येत्या दोन वर्षात जलजीवन मिशनमधील उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांना उच्च कृषि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा-सुविधा देण्याच्यादृष्टिने माती व परीक्षण करता यावे, यासाठी फिरत्या तपासणी व्हॅनची आवश्यकता आहे. यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मागच्यावर्षी 110 तर यावर्षी 70 लाभार्थ्यांना सानुगृह अनुदान दिले आहे. कृषिसमवेत पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना नांदेड जिल्ह्यात राबविल्या जात असल्याची माहिती कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी दिली.

 

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी कृषी विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या यशोगाथा बळीराजाची या पुस्तिकाचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी कै. वसंतराव नाईक व कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात विश्वास अंबेकर यांनी गायलेल्या वंदेमातरम्  गीतने झाली. 

 

“माझी शेती व माझे शिवार” या डेमो हाऊसचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवडक शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील 70 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदानाचे धनादेश देण्यात आले. सर्पदंशामुळे मृत्यू जनावरांच्या मालकास प्रत्येकी वीस हजार रुपये नुकसानभरपाईचे 5 लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधकामाचा कार्यारंभ आदेश प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांना प्रधान करण्यात आले. 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी तर आभार कृषी विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमनशेटे यांनी मानले. तीत प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक, नाविन्यपूर्ण पद्धतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने प्रयोगशील शेतकऱ्यांचा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.  स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, फेटा, साडी-चोळी व वृक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 

डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे हे आहेत मानकरी       

 

या समारंभात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात दत्तात्रय कदम (धामदरी अर्धापूर),  बालाजी शामनवाड (नागापूर भोकर), बळवंत पाटील (बोरगाव थडी बिलोली),  सदाशिव वाडीकर (खुतमापूर देगलूर),  प्रमोद हेमके (करखेली धर्माबाद),  कैलास पोगरे (हदगाव),  अर्जुन राठोड (बळीराम तांडा हिमायतनगर),  गोविंद काळम  (उस्माननगर कंधार),  पांडुरंग खुपसे (टिंगणवाडी किनवट),  अर्जुन जाधव (डेरला लोहा), संजय गायकवाड (हिवळणी माहूर), संजय पवार (निवघा मुदखेड),  केशव इंगोले (बेरळी बु मुखेड),  कमलबाई अण्णाराव धोतरे (नाळेश्वर नांदेड),  नागनाथ हुलकुडे (मांजरमवाडी नायगाव),  माधव कदम (शेलगाव उमरी) व बालाजी जाधव (लखमापूर मुखेड) यांचा समावेश आहे. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव इंगळे व धोंडीराम सुपारे यांचाही यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

000000





Monday, January 10, 2022

 नांदेड जिल्ह्यात 164 व्यक्ती कोरोना बाधित

तर 29 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 510 अहवालापैकी 164 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 145 तर अँटिजेन तपासणीद्वारे 19 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 145 एवढी झाली असून यातील 87 हजार 946 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 544 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 121, नांदेड ग्रामीण 3, भोकर 2, देगलूर 1, धर्माबाद 1, हदगाव 1, कंधार 1, किनवट 2, माहूर 1, उमरी 1, बिलोली 1, हिंगोली 2, यवतमाळ 2, वाशीम 1, परभणी 5 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, मुखेड 2 असे एकुण 164 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 27, नांदेड तालुक्यांतर्गत एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  

 

आज 544 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 88, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 422,  खाजगी रुग्णालय 10 अशा एकुण 544 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 7 हजार 30

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 2 हजार 158

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 145

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 946

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.49 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-51

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-544

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत गोवर्धनघाट येथील स्मशानभूमी व परिसर आधुनिक पद्धतीने विकसीत करण्याच्या कामाचे आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यात गॅस दाहिणीसह इतर कामांचा समावेश आहे. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री पावडे, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आदी.



 महाआवास अभियांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 ·         मुखेड व भोकर डेमो हाऊसचे ऑनलाईन उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- ग्रामीण भागातील स्वत:च्या घरापासून वंचित असलेल्या नागरिकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळावे यासाठी महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. यादृष्टिने ज्या विविध योजना आहेत त्यात परस्पर पुरक स्मन्वय साधत सूक्ष्म नियोजन करून त्याला अधिक प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महाआवास अभियान-2 कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. 

या कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे व्ही. आर. पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला. 

संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयामध्ये किफायतशीर गृहनिर्माणावर भर दिला आहे. राज्य शासनानेही यावर भर देऊन उपलब्ध असलेल्या आवास योजना अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात याला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय घरकुलाची मागणी लक्षात घेता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यांनी पुढाकार घेऊन अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. मागणीप्रमाणे अधिक उद्दीष्ट निर्धारीत केले पाहिजे. याचबरोबर जी घरकुलाची कामे हाती घेतली आहेत ती अधिकाधिक गुणत्तापूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या कामाच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता यावी यादृष्टिने ही कार्यशाळा महत्वपूर्ण असून तालुकास्तरावर संबंधित यंत्रणा व लाभार्थी यांच्या समन्वयासाठी अशा कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. 

कमी किंमतीत कसे घर बांधता येते हा विश्वास ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाकडून डेमो हाऊसची उभारणी भोकर व मुखेड तहसिल कार्यालय परिसरात करण्यात आली आहे. या दोन डेमो हाऊसचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महाआवास योजनेंतर्गत माहितीचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरवण्यात आले होते. सुरुवातीला या प्रदर्शनास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देऊन माहिती घेतली. 

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात महाआवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजनेत केलेल्या कामाचे दिलेले उद्दिष्ट, मंजूर घरकुल त्यापैकी पुर्णत्वास आलेल्या घरकुलाच्या कामाची माहिती त्यांनी दिली.

00000




 11 जानेवारी रोजी आयोजित सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम रद्द

नांदेड (जिमाका) दि. 10 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 जानेवारी 2022 रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नांदेड जिल्ह्यात नवीन व्हेरिंएटचा शिरकाव व कोरोना रुग्ण संख्येमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेवून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच अशासकीय संस्था यांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाप्रशानच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
000000

Sunday, January 9, 2022

 नांदेड जिल्ह्यात 147 व्यक्ती कोरोना बाधित

तर 10 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 363 अहवालापैकी 147 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 122 तर अँटिजेन तपासणीद्वारे 25 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 981 एवढी झाली असून यातील 87 हजार 917 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 409 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 72, नांदेड ग्रामीण 6, अर्धापूर 3, भोकर 1, देगलूर 1, धर्माबाद 1, कंधार 6, लोहा 5, मुदखेड 1, नायगाव 1, मुखेड 3, हदगाव 1, माहूर 4, किनवट 5, पुणे 1, उस्मानाबाद 1, लातूर 1, आदिलाबाद 1, हिंगोली 1, पुसद 1, परभणी 6 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 10, अर्धापूर 1, बिलोली 6, देगलूर 4, माहूर 1, मुदखेड 2, नायगाव 1 असे एकुण 147 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, खाजगी रुग्णालयातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.   

आज 409 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 309,  खाजगी रुग्णालय 10 अशा एकुण 409 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 5 हजार 520

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 865

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 981

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 917

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.63 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-409

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...