Friday, December 10, 2021

 राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 11 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीकांत आणेकर व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायाधीश राजेंद्र रोटे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बॅंकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असलेली आदी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येण्याबाबतची दाखल पूर्व प्रकरणे तसेच विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.  या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीकांत ल. आणेकर व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश राजेंद्र एस. रोटे यांनी केले आहे.

00000

युवक-युवतींसाठी रोजगारांची संधी

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत इंडिया@75 मिशन आपुलकी व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये इच्छूक युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पुढील स्टेप्स वापरावे rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन नोकरी साधकाने जॉब सिकर (Job Seeker) नोंदणी करावी. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्हा निवडून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे. व्हॅकन्सी लिस्टींग Vacancy Listing हा पर्याय निवडून पात्रतेनुसार इच्छुक पदासाठी अर्ज करावे. काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462)-251674 किंवा या कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

 

विशेष लेख -

दृष्टी गमावण्याच्या काठावर असलेल्यांना दृष्टी देण्याची किमया !

नांदेड जिल्हा सोळा तालुक्यात विस्तारलेला असून आकाराने तेवढाच मोठा आहे. जिल्ह्यास तेलंगना आणि कर्नाटक राज्याच्या सिमा लागून आहेत. अशा या विस्तीर्ण नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा हा काळ शासन व प्रशासनासाठी आव्हानात्मक होता. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाला अनेक निर्णय घ्यावे लागले. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आरोग्य सेवेसाठी तर हा काळ कस लावणारा होता. याकाळात प्रशासनात सर्वात जास्त ताण आरोग्य विभागावर पडला. जिल्ह्यात अनेक रुग्णांलयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करुन 90 हजार 502 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन आतापर्यत 87 हजार 829 बाधितांना घरी पाठविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. जिल्ह्यात 7 लाख 83 हजार 66 बाधिताचे स्वॅब तपासणी करण्यात येवून उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के एवढे आहे. अतिगंभीर असलेल्या 2 हजार 654 कोरोना बाधितांनी जीव गमावला आहे.

दीड वर्षाच्या काळात कोरोना संसर्गासोबतच इतर आजारावरही उपचार सुरुच होते. जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोरोना व्यतिरिक्त इतर सेवा-सुविधा देण्यात तसुभरही कमी पडले नाही. मानवी आरोग्यात डोळयाचे अन्यन साधारण महत्व आहे. इतर आजाराच्या मानाने डोळयाचे आजार व समस्या या अधिक नाजूक व गंभीर असतात. दुर्लक्ष करुन चालत नाही. वेळीच उपचार नाही केले तर कायमचा अधुंकपणा येण्याची शक्यता असते. अशावेळी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र चिकित्सा विभागातील सर्व डॉक्टर व नर्सच्या टीमने दृष्टी गमावण्याच्या काठावर असलेल्यां अनेक रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले. कोरोना कोरोना कालावधीत नेत्रविकार आणि विशेषत: मोतीबिंदू शस्त्रक्रियावरही भर देण्यात आला. अनेक नेत्रविकार रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करुन घरी पाठविले.

जिल्हा नेत्र चिकित्सा विभागाच्यावतीने शासकीय सेवेच्या पलिकडे जावून डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी टीमवर्क ने कार्य केले.  या विभागात 5 नेत्र सर्जन व 5 नर्स कार्यरत असा स्टाफ कार्यरत आहेत. कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर माहे जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 1 हजार 182 शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. तसेच दुसरी लाट ओसरल्यानंतर एप्रिल 2021 ते ऑक्टोंबर 2021 या कालावधीत 730 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  कोरोनाचा कहर जास्त असलेल्या कालावधीत शस्त्रक्रीया करणे थांबवले होते. डोळयावरील प्राथमिक उपचार ओपीडीत करणे सुरु होते. ओपीडीत रुग्णांवर स्क्रिनींग उपचार करण्यात येत होते. कारण मोतीबिंदू अधिक दिवस राहीला तर त्यांचे काचबिंदुत रुपांतर होवून दृष्टी कायमस्वरुपी गमावण्याचा धोका असतो. त्यामूळे कोरोना कालावधीत ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक होती. त्या रुग्णांना स्क्रिंनीग उपचार करण्यात आले. त्यामूळे शस्त्रक्रियेस विलंब झाला तरी डोळयाना काहीही धोका होत नाही असे नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिरसीकर यांनी सांगितले. या सर्व टीमने रुग्णांवर उपचार करताना रुग्णांची खुप काळजी घेतली.

शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर रुग्णांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे या सर्व बाबी करण्यासाठी वेळप्रसंगी त्यांना कठोर वागावे लागले. यासोबतच लसीकरण करण्यावर जास्त भर देण्यात आला. रुग्णांचे लसीकरण केल्यानंतर डोळ्यांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. माहे ऑक्टोंबर मध्ये एका रुग्णांवर बुबुळ प्रत्यारोपन शस्त्रक्रीयाही करुन एका दृष्टीहिनाला दृष्टी देण्याचे काम करण्यात आले. तर या कालावधीत शाळेतील 145 विद्यार्थ्यांच्या डोळयाची तपासणी करुन शालेय विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. 

रुग्णांवर उपचार करताना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य साक्षरता व लसीकरणासाठी समुपदेशन करण्यात आले. याचबरोबर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर देण्यात आला. आरोग्य विभागाने जिल्ह्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ञाच्या माध्यमातून मोतीबिंदु शस्त्रक्रीया व डोळयावर उपचार सुरु होते. यासाठी मागील वर्षात त्रिसुत्रीचा वापर करुन जिल्ह्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिनता कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. नेत्रदान व डोळ्याच्या उपचारासाठी  नेत्रदान पंधरवडा, दृष्टिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन, काचबिंदु जनजागृती आठवडा अभियान राबविले. जेणेकरून नागरिकांमध्ये नेत्रदानाचे महत्व वाढवून गरजूंना दृष्टी देण्याची किमया साधता येईल.

अलका पाटील,

माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

00000

Thursday, December 9, 2021

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 927 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 502 एवढी झाली असून यातील 87 हजार 829 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 19 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 3 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यातील 2  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 19 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 19 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 83 हजार 66

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 79 हजार 68

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 502

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 829

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-19

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कार्यालयांतर्गत

तक्रार निवारण समिती अनिवार्य

प्रभारी जिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कार्यालयातर्गंत तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी केले. 

कामाच्या ठिकाणी महिलांचे छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) या अधिनियमाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त आज डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बाल विकास विभागाच्यावतीने या अधिनियमाविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा स्थानिक तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा जयश्री गोरे, विधिज्ञ आणि अशासकीय सदस्य छाया कुळजाईकर, महिला बाल विकास अधिकारी अब्दूल रशिद शेख, महसुल सहाय्यक श्रीमती स्वाती पंदेवाड, मनपाच्या उपायुक्त श्रध्दा उदावंत, लेखाधिकारी श्रीमती मुंडे मॅडम तसेच सर्व विभागाच्या महिला अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. 

घर किंवा कार्यालयीन काम असो ती समन्वयाने केले तर उत्कृष्ट होऊ शकते, असेही प्रभारी जिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी सांगितले. प्रतिकार करण्याचे सामर्थ्य प्रत्येक महिलेत असले पाहिजे. लिंग समभाव हे मूल्य सगळ्यांमध्ये झिरपले पाहिजे.  तसेच समाजात अजूनही कायद्याची पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. म्हणून महिलांचे सक्षमीकरण होण्यास कमतरता दिसून येते. लैगिंक व अनेक छळातून अनेकदा महिला जातात. कायद्याने आता महिलांना सक्षम केले असून याबाबत शारीरिक, मानसिक साक्षर होण्यासाठी  महिलांनी एकत्रित आले पाहिजे. लैगिंक छळ प्रतिबंध करण्यासाठी कार्यालयात प्रत्येक महिलेला सखी, मैत्रिण असणे गरजेचे आहे, असे माजी शिक्षणाधिकारी जयश्री गोरे यांनी सांगितले. कामाची व्याप्ती वाढल्यामुळे महिलांना अनेकदा उशिरापर्यंत थांबावे लागते. त्यावेळी कार्यालयातील सुरक्षित वातावरण असणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांवर छळ झाल्यास 30 दिवसाच्या आत तक्रार व 90 दिवसांच्या आत अपिल करणे गरजेचे असल्याचेही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी विधिज्ञ आणि अशासकीय सदस्य छाया कुळजाईकर यांनी महिलांनी ठरविले तर महिला या कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिलांना आपल्या संस्कृतीत दुय्यम स्थान आहे हे चुकीचे असून शासनाने सर्व महिलांना कायद्याने भक्कम संरक्षण देऊन सक्षम बनविले आहे. महिलांवर होणाऱ्या शाररिक, आर्थिक, मानसिक कायदेविषयक कलमाची सविस्तर माहिती दिली. महिलांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी व विशेषत: महिलांनी महिलांना मदत केली पाहिजे. कार्यालय हे कुटूंबाप्रमाणे असून प्रत्येकांने त्या जबाबदारीने वागले पाहिजे. 

यावेळी महसूल सहाय्यक स्वाती पेदेवाड यांनी कायद्याच्याबाबीचे पीपीटीद्वारे सादरीकरण करुन शासनाच्या उपाययोजनामूळे सध्या महिलांची संख्या पुरुषाच्या मानाने जास्त झाली आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या हक्काबाबतच्या सर्व कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रस्तावना ॲङ सोनकांबळे मॅडम यांनी केली . यावेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठातील समाजकार्याचे विद्यार्थ्यांनी वाय फाय काळातील ती या विषयावरील पथनाटयाचे सादरीकरण करुन जनजागृती केली.

00000

कोविड-19 आजारामूळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला

सानुग्रह सहाय्यासाठी अर्ज करण्यास संकेतस्थळ विकसीत   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्यात बाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोंबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. 

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm  यावर देखील लिंक देण्यात आली आहे.  

अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल, तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील. 

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. 

अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. 

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वसतिगृहातील प्रवेशासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- मागासवर्गीय मुलां-मुलींचे सर्व शासकीय वसतिगृहे सुरु झालेली आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याबाबतची प्रक्रीया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी बुधवार 15 डिसेंबर 2021 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तसेच इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी  प्रथम वर्षात व पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरून द्यावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...