दृष्टी गमावण्याच्या काठावर असलेल्यांना दृष्टी देण्याची किमया !
नांदेड जिल्हा सोळा तालुक्यात विस्तारलेला असून आकाराने तेवढाच मोठा आहे. जिल्ह्यास तेलंगना आणि कर्नाटक राज्याच्या सिमा लागून आहेत. अशा या विस्तीर्ण नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा हा काळ शासन व प्रशासनासाठी आव्हानात्मक होता. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाला अनेक निर्णय घ्यावे लागले. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आरोग्य सेवेसाठी तर हा काळ कस लावणारा होता. याकाळात प्रशासनात सर्वात जास्त ताण आरोग्य विभागावर पडला. जिल्ह्यात अनेक रुग्णांलयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करुन 90 हजार 502 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन आतापर्यत 87 हजार 829 बाधितांना घरी पाठविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. जिल्ह्यात 7 लाख 83 हजार 66 बाधिताचे स्वॅब तपासणी करण्यात येवून उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के एवढे आहे. अतिगंभीर असलेल्या 2 हजार 654 कोरोना बाधितांनी जीव गमावला आहे.
दीड वर्षाच्या काळात कोरोना संसर्गासोबतच इतर आजारावरही उपचार सुरुच होते. जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोरोना व्यतिरिक्त इतर सेवा-सुविधा देण्यात तसुभरही कमी पडले नाही. मानवी आरोग्यात डोळयाचे अन्यन साधारण महत्व आहे. इतर आजाराच्या मानाने डोळयाचे आजार व समस्या या अधिक नाजूक व गंभीर असतात. दुर्लक्ष करुन चालत नाही. वेळीच उपचार नाही केले तर कायमचा अधुंकपणा येण्याची शक्यता असते. अशावेळी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र चिकित्सा विभागातील सर्व डॉक्टर व नर्सच्या टीमने दृष्टी गमावण्याच्या काठावर असलेल्यां अनेक रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले. कोरोना कोरोना कालावधीत नेत्रविकार आणि विशेषत: मोतीबिंदू शस्त्रक्रियावरही भर देण्यात आला. अनेक नेत्रविकार रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करुन घरी पाठविले.
जिल्हा नेत्र चिकित्सा विभागाच्यावतीने शासकीय सेवेच्या पलिकडे जावून डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी टीमवर्क ने कार्य केले. या विभागात 5 नेत्र सर्जन व 5 नर्स कार्यरत असा स्टाफ कार्यरत आहेत. कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर माहे जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 1 हजार 182 शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. तसेच दुसरी लाट ओसरल्यानंतर एप्रिल 2021 ते ऑक्टोंबर 2021 या कालावधीत 730 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोरोनाचा कहर जास्त असलेल्या कालावधीत शस्त्रक्रीया करणे थांबवले होते. डोळयावरील प्राथमिक उपचार ओपीडीत करणे सुरु होते. ओपीडीत रुग्णांवर स्क्रिनींग उपचार करण्यात येत होते. कारण मोतीबिंदू अधिक दिवस राहीला तर त्यांचे काचबिंदुत रुपांतर होवून दृष्टी कायमस्वरुपी गमावण्याचा धोका असतो. त्यामूळे कोरोना कालावधीत ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक होती. त्या रुग्णांना स्क्रिंनीग उपचार करण्यात आले. त्यामूळे शस्त्रक्रियेस विलंब झाला तरी डोळयाना काहीही धोका होत नाही असे नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिरसीकर यांनी सांगितले. या सर्व टीमने रुग्णांवर उपचार करताना रुग्णांची खुप काळजी घेतली.
शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर रुग्णांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे या सर्व बाबी करण्यासाठी वेळप्रसंगी त्यांना कठोर वागावे लागले. यासोबतच लसीकरण करण्यावर जास्त भर देण्यात आला. रुग्णांचे लसीकरण केल्यानंतर डोळ्यांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. माहे ऑक्टोंबर मध्ये एका रुग्णांवर बुबुळ प्रत्यारोपन शस्त्रक्रीयाही करुन एका दृष्टीहिनाला दृष्टी देण्याचे काम करण्यात आले. तर या कालावधीत शाळेतील 145 विद्यार्थ्यांच्या डोळयाची तपासणी करुन शालेय विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले.
रुग्णांवर उपचार करताना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य साक्षरता व लसीकरणासाठी समुपदेशन करण्यात आले. याचबरोबर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर देण्यात आला. आरोग्य विभागाने जिल्ह्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ञाच्या माध्यमातून मोतीबिंदु शस्त्रक्रीया व डोळयावर उपचार सुरु होते. यासाठी मागील वर्षात त्रिसुत्रीचा वापर करुन जिल्ह्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिनता कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. नेत्रदान व डोळ्याच्या उपचारासाठी नेत्रदान पंधरवडा, दृष्टिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन, काचबिंदु जनजागृती आठवडा अभियान राबविले. जेणेकरून नागरिकांमध्ये नेत्रदानाचे महत्व वाढवून गरजूंना दृष्टी देण्याची किमया साधता येईल.
अलका पाटील,
माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
00000
No comments:
Post a Comment