Thursday, January 14, 2021

 

जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतींच्या

निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनातर्फे संपुर्ण तयारी झाली असून याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या निवडणुका खेळीमेळीच्या आणि सौहार्दपुर्ण वातावरणात व्हाव्यात यासाठी त्यांनी आवाहन केले असून मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे सांगितले. 

सोळा तालुक्यातील एकूण 1 हजार 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणूका कार्यक्रम जाहिर झाला होता. यापैकी 106 ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने 907 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 2 हजार 853 मतदार केंद्र तयार करण्यात आले असून सुमारे 11 हजार 412 शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी यासाठी जबाबदारी पार पाडतील. जिल्ह्यात एकूण 13 लाख 21 हजार 296 मतदार या निवडणूकीत आपला हक्क बजावणार असून यात 6 लाख 32 हजार 138 महिला मतदार तर 6 लाख 89 हजार 146 पुरुष मतदार मतदान करणार आहेत.

0000

जिल्ह्यातील 17 हजार 19 नोंदणी असलेल्या

हेल्थ वर्करना कोरोना लसीची उपलब्धता

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

जिल्ह्यात कोरोना लसीचे स्वागत

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-कोरोना प्रादुर्भावातून नवसंजीवन देणाऱ्या कोविड लसीची उपलब्धता नांदेड जिल्ह्यासाठी झाली असून लसीकरणाच्या पहिल्या फेरीत सुमारे 17 हजार 19 हेल्थ वर्करना आपण हा डोस येत्या 16 तारखेपासून देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. आज जिल्हा परिषदेच्या औषध भांडार येथे या लसी शितकरणाच्या पेटीमध्ये अत्यंत सुरक्षितरित्या पोहचल्या. या लसी स्विकारण्यासाठी आर्वजून आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक व इतर अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अंत्यंत शर्थीचे प्रयत्न करुन कोरोना बाधितावर उपचार केले. समाजाचे स्वास्थ सुदृढ ठेवण्यात ज्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांच्यापासून लसीकरणाची ही मोहिम टप्याटप्याने सर्व लोकापर्यंत उपलब्ध होईल असे डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे 17 हजार लसी उपलब्ध झाल्या असून एका लसीच्या मात्रेमध्ये जवळपास 10 डोस उपलब्ध होऊ शकतात. हे लक्षात घेता लसीची कसलीही कमतरता जिल्ह्यासाठी कमी न पडता सहज उपलब्ध होईल यासाठी जिल्हा शासकीय यंत्रणा सिद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

00000




Wednesday, January 13, 2021

 

ग्रामपंचायत मतदानासाठी

कामगारांना भरपगारी सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालाधीत मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी सुट्टी जाहिर केली आहे.   

या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदार असलेले शासकीय / निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इ. येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शुक्रवार 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना यांना दोन तासाची सवलत देण्यात यावी. दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना व माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. याप्रकरणी संबंधित मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्यास संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी अधिसुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे.

00000

 

56 कोरोना बाधितांची भर तर

46 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 13 :- बुधवार 13 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 56 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 42 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 14 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 46 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 903 अहवालापैकी 838 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 959 एवढी झाली असून यातील 20 हजार 813 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 367 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, देगलूर कोविड रुग्णालय 3, भोकर तालुक्यांतर्गत 10, मुखेड कोविड रुग्णालय 8, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, माहूर तालुक्यांतर्गत 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 46 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.78 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 28, लोहा तालुक्यात 1, हदगाव 2, मुदखेड 3, माहूर 1, कंधार 5, बिलोली 1, उमरखेड 1 असे एकुण 42 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, परभणी 1, मुखेड तालुक्यात 4 असे एकुण 14 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 367 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 29, मुखेड कोविड रुग्णालय 11, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 22, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 10, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 151, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 51, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, खाजगी रुग्णालय 41 आहेत.   

बुधवार 13 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 92 हजार 714

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 66 हजार 604

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 959

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 813

एकुण मृत्यू संख्या-578

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.78 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-367

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12.           

00000

 

दहावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना

तंत्रनिकेतन प्रवेशासाठी सुवर्ण संधी

नांदेड (जिमाका) दि. 13 :- अलीकडेच दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल लागला असून यात उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या पुढील प्रवेशासाठी एक वर्षाचा खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यांच्या प्रवेशाची कट ऑफ डेट (अंतिम दिनांक) 15 जानेवारी पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना पदविका प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.  दहावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन मुळ कागदत्रांसह तात्काळ शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे (मोजक्या शिल्लक असलेल्या जागांच्या प्रवेशासाठी ) येण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले आहे. 

कोविड-19  मुळे यावर्षी तंत्रनिकेतन  मधील प्रवेश  प्रक्रिया ऑनलाइन घेण्यात आली. कोरोनाची  पार्श्वभूमी असूनही विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. मागील  वर्षाच्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांची आणि प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.  या प्रवेशासाठी अर्ज केलेले व न केलेले विद्यार्थी पात्र असून अधिक महितीसाठी प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. एस. आर. मुधोळकर  यांच्याशी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे संपर्क करावा, असेही आवाहन  प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले आहे.

00000

 

मोटार सायकलसाठी  एमएच 26-बी डब्लू ही नविन मालिका

नांदेड (जिमाका) दि. 13 :- मोटार सायकलसाठी एमएच 26-बी डब्लू (MH 26-BW) ही नविन मालिका गुरुवार 21 जानेवारी 2021 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह अर्ज बुधवार 20 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 21 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व लिखित संदेशाद्वारे (Text message) संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. संबंधितांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

000000

Tuesday, January 12, 2021

 

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर 46

कर्मचाऱ्यांवर पोलीस गुन्हा होणार दाखल

नांदेड (जिमाका) दि. 12 :- लोहा तालुक्यातील 77 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती व त्यांना दोन प्रशिक्षण देण्यात आले पण या दोन्ही प्रशिक्षणासाठी नियुक्ती आदेश दिलेले 46 कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना आज बुधवार दुपारी 3 वाजेपर्यंत संधी देण्यात आली आहे. यावेळेत ते तहसील कार्यालयात उपस्थित झाले नाही तर त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध पोलीस गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली. 

लोहा तालुक्यातील 77 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम 1959 चे नियम (6) अन्वये उपरोक्त दिनांकास होणाऱ्या निवडणुकीसाठी तहसीलदार यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना पहिले प्रशिक्षण 26 डिसेंबर व दुसरे प्रशिक्षण 7 जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात देण्यात आले. या प्रशिक्षणात राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी त्यासाठीचे प्रशिक्षण तहसीलदार विठ्ठल परळीकर व टीमने दिले. 

ज्या कर्मचाऱ्यांची या निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली होती त्यात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी असे 46 जण दोन्ही प्रशिक्षणास गैरहजर राहिले. त्यांना तहसील कार्यालयाने रीतसर नोटीस बजावली तरीही त्यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले नाही व ते कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर झाले नाहीत. 

तहसीलदार परळीकर यांनी यासर्व गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत हजर राहावे अन्यथा लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 134 अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल यांची संबंधित गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आदेश तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या व अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तहसीलदार यांनी कायद्याचा 'बडगा" उगारला आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...