Thursday, December 31, 2020

 

दि. 31 डिसेंबर 2020

 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2021 असा आहे.

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचेनाव

पारितोषिक

1

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

2

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

3

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

4

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

6

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

8

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9

समाज माध्यम पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

11

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)


विभागीय पुरस्कार

 

12

दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

नाशिक विभाग

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

13

अनंतराव भालेराव पुरस्कार,

औरंगाबाद आणि लातूर विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

14

आचार्य अत्रे पुरस्कार,

मुंबई विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

15

 

नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,

पुणेविभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

16

शि.म.परांजपे पुरस्कार,

कोकण विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

17

ग.गो.जाधव पुरस्कार,

कोल्हापूर विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

18

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,

अमरावती विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

19

ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार,

नागपूर विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

 

नियम व अटी

राज्य / विभागीय पुरस्कार

 

        पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी,उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत.पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिके सोबत मूळ लेखनाचे कात्रणत्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेतन सल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

            अर्जदाराने राज्य व विभागीय पताळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक(माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक(माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिके सोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.

            ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.

            जे पत्रकार बृहन्मुंबई, नवीमुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्यकरीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखण अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.

गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 पाठविता येतील.

            शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.

            2020 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणे आवश्य कआहे.

            प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

            प्रत्येकगट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

विकास योजना संदर्भातील

समाज माध्यम(सोशल मीडिया) पुरस्कार

            ही स्पर्धा वृत्तविषयक /चालू घडामोडी विषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

            केंद्र शासनाचे ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि राज्य शासनाचे ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

        इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी ‘पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’ देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीचीमाहितीतसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्रजोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी / कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता, उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून, पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. 

                                छायाचित्रकार पुरस्कार

‘तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार’ स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.

            महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्रमूळ स्वरुपातील असावे. फोटोप्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी यांचा विचार केला जाईल. एकाच छायाचित्रकाराला सलग दोनवर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास, तिसऱ्यावर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेल, त्यानियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख, नियतकालिकाचे नाव प्रवेशिके सोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोअीफोडे यांनी त्यांच्या लेखणीद्वारे समाजातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा यावर सातत्याने आसूड ओढले. आपल्याअग्रलेखांद्वारे प्रभावीरीत्या सामाजिक जाणीव जागृती करणारे संपादक म्हणून सुधाकर डोअीफोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. विविध विकास कामांची विशेषत: शासकीय विकास कामांची त्यांनी आपल्या अग्रलेखाद्वारे सकारात्मक प्रसिद्धी केली. विविधविकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.

            प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

            इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.

0000







Wednesday, December 30, 2020

 

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात

ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 जानेवारीपर्यंत वाढ

नांदेड (जिमाका) दि. 30 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 31 ऑक्टोंबर 2020, 4, 15 व 28 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 30 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

00000

 

 65 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 30 :- बुधवार 30 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 65 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 37 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 669 अहवालापैकी 894 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 425 एवढी झाली असून यातील 20 हजार 333 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 318 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 30 डिसेंबर रोजी लोहा तालुक्यातील देऊळ गल्ली येथील 83 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 573 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, हदगाव कोविड रुग्णालय 5, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, मुखेड कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.90 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 9, बिलोली तालुक्यात 1, देगलूर 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 4, नायगाव 11 असे एकुण 28 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, कंधार तालुक्यात 1, भोकर 1, नायगाव 5, हदगाव 3, उमरी 1, नांदेड ग्रामीण 2, लोहा 1, बिलोली 2, मुखेड 4, देगलूर 8, लातूर 2 असे एकुण 37 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 318 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 25, मुखेड कोविड रुग्णालय 16, देगलूर कोविड रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 1,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 140, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 63, हैद्राबाद येथे  संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 20 आहेत.   

बुधवार 30 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 174, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 59 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 80 हजार 354

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 54 हजार 653

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 425

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 333

एकुण मृत्यू संख्या-573

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-631

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-318

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.           

000000

 

भवानी चौक वाडी बु ते लिंबगावचा रस्ता

सकाळी 6 ते 9 यावेळेत जडवाहनास प्रतिबंध  

नांदेड, (जिमाका)दि. 30 :- भवानी चौक (निळा जंक्शन) वाडी बु. नांदेड पासून ते लिंबगाव पर्यंतचा रस्ता शनिवार 9 जानेवारी 2021 पर्यंत सकाळी 6 ते 9 यावेळेत सायकलींगसाठी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवासी वाहने, शासकिय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने सायकलींगसाठी हा रस्ता 11 डिसेंबर 2020 पासून 9 जानेवारी 2021 या 29 दिवसासाठी सकाळी 6 ते 9 या कालावधीत अत्यावश्यक सेवेची वाहने, शासकीय प्रवासी वाहने व शासकीय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंधीत केला आहे. या मार्गावरुन केवळ हलकी वाहने वगळता उर्वरित सर्व जडवाहनास पुर्णपणे प्रतिबंध करण्यात आले आहे. प्रतिबंधीत करण्यात आलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्ग लिंबगाव-नाळेश्वर-वाघी-नांदेड असा राहिल. या कालावधीत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

 

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकस्पर्धा

नांदेड, (जिमाका) दि. 30:- शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धांचे आयोजन कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे. 

खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सुर्यफुल या 11 पिकांचा तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या 06 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 10 आर. (0.10 हेक्टर) सलग क्षेत्र असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला आला आहे. ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे. अशा सर्व पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी तीनशे प्रति शेतकरी प्रति पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच तीनशे प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरुन पिककापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. त्याबाबचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे, असेही प्रसिध्दपत्रकान्वये कृषि आयुक्तालयाने कळविले आहे.

0000

 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर

पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमीचे आयोजन  


नांदेड
, (जिमाका) दि. 30 :- 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर नियमितपणे राबविण्यात येत असूनही पोलिओचे आव्हान पूर्णत: संपुष्टात आले असे नाही. महाराष्ट्रात 2010 मध्ये मालेगाव शहरात 4 व बीड जिल्ह्यात 1 असे एकुण 5 पोलिओ रुग्ण आढळले होते. यातील मालेगाव शहरातील 4 पोलिओ रुग्णांनी नियमित लसीकरणांतर्गत एकही लसीची मात्रा घेतली नव्हती तर बीड जिल्ह्यातील रुग्ण हा स्थलांतरीत कुटुंबातील असल्याने त्याला पोलिओची लस मिळाली नव्हती. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनातर्फे सातत्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जात असून नांदेड जिल्ह्यात ही मोहिम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून ही मोहिम यशस्वी करु असा निर्धार जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त केला.  

या समन्वय समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) एस. व्ही. शिंगने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष शिरसीकर यांची उपस्थिती होती.  

संपूर्ण देशात 13 जानेवारी 2011 नंतर आज पर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आला नाही हे आजवर सातत्यपूर्ण राबविल्या गेलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे यश आहे. तथापि आजूनही या मोहिमेची अत्यावश्यकता असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 17 जानेवारी 2021 रोजी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. या मोहिमेत (BOPV) बायव्हायलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येईल. मे 2016 पासून नियमित लसीकरणांतर्गत शुन्य ते 1 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची इंजेक्शन माध्यमातून आयपीव्ही लस देण्यात येते. या मोहिमेत 17 जानेवारी रोजी बुथवर व त्यानंतर ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस याप्रमाणे घर भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्र व स्थलांतरित / भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रात लसीकरणांतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे. यात अतिदुर्गम भाग, डोंगराळ भागातील पाडे, वस्त्या, शहरी भागातील झोपडपट्टी, विट भट्ट्या / बांधकामे, स्थालांतरीत वस्त्या / ऊसतोड वस्त्या, सलग तीन सदरे रद्द झालेली गावे यावर भर दिला जात आहे. या भागातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विभागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले.



000000

Tuesday, December 29, 2020

 


सशस्त्रसेना ध्वजनिधीस

या क्युआर कोडद्वारे देता येईल देणगी !

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 29  :- सशस्त्रसेना ध्वजनिधीस नांदेड जिल्ह्यातून 1 कोटीपेक्षा अधिक देणगी जमा करण्याचा निर्धार केला आहे. देणगीदारांना सशस्त्र सेना ध्वजनिधीस सुलभ पद्धतीने आपले योगदान  / देणगी देता यावी यासाठी राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने क्युआर कोडची निर्मिती करुन हा कोड उपलब्ध केला आहे. सामाजिक संस्था, विविध संघटना, व्यापारी प्रतिष्ठान,  महाविद्यालये / शाळा  व सामान्य जनता यांनी  या क्युआर कोडद्वारे देणगी रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

 

भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुंटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र सेनादलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पूनर्वसनासाठी विविध कल्‍याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्रसेना ध्वजनिधीचा विनियोग केला जातो. अशा या उदात्त कार्यासाठी समाजाकडून सढळ हाताने मदतीची अपेक्षा आहे.

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्रसेना ध्वजनिधीच्या पत्रकांची व क्युआरकोड स्टिकर्सचे सर्व ठिकाणी वाटप करण्यात येत आहेत.  सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपुर्ण रक्कम आयकर कायदा 1961, कलम 80 जी (5)  (VI) अन्वये करमुक्त आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9403069447  वर संपर्क करावा,  असे आवाहन  नांदेडचे  सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर  यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...