Wednesday, December 30, 2020

 

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकस्पर्धा

नांदेड, (जिमाका) दि. 30:- शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धांचे आयोजन कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे. 

खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सुर्यफुल या 11 पिकांचा तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या 06 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 10 आर. (0.10 हेक्टर) सलग क्षेत्र असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला आला आहे. ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे. अशा सर्व पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी तीनशे प्रति शेतकरी प्रति पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच तीनशे प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरुन पिककापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. त्याबाबचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे, असेही प्रसिध्दपत्रकान्वये कृषि आयुक्तालयाने कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...