Monday, June 1, 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने फेसबुक लाईव्हवर 2 जून रोजी सायं. 7.30 वा. साधणार संवाद



नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात आपले शासन आणि विविध सेवाभावी संस्था एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या प्रयत्नांना आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेने समर्थ साथ दिली आहे. आपली ही प्रयत्नांची पराकाष्ठा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सावरण्याची आहे. शेतकरी, कष्टकरी व कामगारांना, समाजातील सर्वच घटकांना सावरण्याची आहे. 
अशा या काळात जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यासाठी आपल्याशी फेसबुक लाईव्हद्वारे आपले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उद्या सायं. 7.30 ते 8.30 वा. ह्रदयस्पर्शी संवाद साधणार आहेत. त्यांचा हा संवाद https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/  या फेसबुक पेजवर सर्वांना साधता येईल.
*संवाद दिनांक 2 जून 2020*
*वेळ सायंकाळी 7.30 ते 8.30 वा*
*लाईव्ह पहा https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/ या लिंकवर*
 *******

सोळा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी तीन रुग्ण पॉझिटिव्ह



नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणुची बाधा झालेल्या आज 16 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली असून या रुग्णांच्या परिवारातील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळीच आषोधोपचार त्यांनी सुरु केल्यामुळे या रुग्णांना कोरोनावर यशस्वीरित्या मात करता आली.
जिल्ह्यात सोमवारी 1 जून रोजी सायं.  5  वा. प्राप्त झालेल्या 116 अहवालापैकी 108 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 3 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 149 झाली आहे. या तीन रुग्णांपैकी 25 व 35 वर्षांचे दोन पुरुष रुग्ण हे देगलूर नाका येथील तर 40 वर्षे वयाचा एक रुग्ण शिवाजीनगर नांदेड येथील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 21 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. या 21 रुग्णांपैकी तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.
आतापर्यंत एकूण 149 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 21 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 9 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्ण असून एक रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आला आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
          कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 40 हजार 307, घेतलेले स्वॅब 3 हजार 995, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 486, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 3, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 149, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 152, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 28, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 120, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 21, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 176 एवढी आहे.
दिनांक 31 मे  रोजी पाठविण्यात आलेल्या 187 स्वॅब तपासणी अहवालापैकी 116 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 71 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 1 जून रोजी  105 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
000000


नांदेड जिल्ह्यात कलम 144 लागू  
सायं. 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी
केश कर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर बंद राहतील
नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयात सोमवार 1 जून 2020 पासून पुढील आदेशापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये लागू करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात सायं. 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. याचबरोबर आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टिने केश कर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी दिलेली मुभा रद्द करण्यात आली आहे.
अंत्यविधीमध्ये 50 नागरीकांना पर्यंत सहभागाची दिलेली मुभा कमी करुन त्याऐवजी 20 नागरीकांपेक्षा जास्त नागरीकांना सहभागी होता येणार नाही. संचारबंदीच्या काळात कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्त रुग्ण व त्यांच्यायसोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्य्क्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
 नांदेड जिल्हा नॉन रेड झोनमध्ये असल्याने यापूर्वी या कार्यालयाकडून दुकाने व आस्थापना व इतर परवानगी दिलेल्या‍ बाबी प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन्स) वगळून उर्वरित क्षेत्राकरिता नियम व अटीच्या अधीन सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत यापुढेही चालू राहतील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
अत्यावश्यक साधने, सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द सर्व संबंधित यंत्रणांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश 31 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
00000

Sunday, May 31, 2020


रविवारी दोन नवीन रुग्ण ; एक पुरुष रुग्ण बरा
चौतीस रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु
नांदेड (जिमाका) दि. 31 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 31 मे 2020 रोजी सांयकाळी  5  वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 30 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 28 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले तर 2 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 146 झाली आहे. रविवार 31 मे रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील एक पुरुष रुग्ण बरा झाला असून आतापर्यंत 104 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात उर्वरीत एकुण 34 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील 2 नवीन पॉझीटीव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय 27 व 32 वर्ष आहे. त्यांच्यावर मुखेड उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत. औषधोपचार चालू असलेल्या 4 रुग्णांपैकी 2 स्त्री रुग्ण ज्यांचे वय 52 व 65 आणि दोन पुरुष ज्यांचे वय 38 व 80 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
          कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 39 हजार 674, घेतलेले स्वॅब 3 हजार 890, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 378, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 2, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 146, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 148, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 27, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 104, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 34, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 187 एवढी आहे.
शनिवार 30 मे  रोजी पाठविण्यात आलेल्या 152 स्वॅब तपासणी अहवालापैकी 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 122 अहवाल रविवार 31 मे रोजी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. रविवार 31 मे रोजी  65 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल सोमवार 1 जून रोजी सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
एकूण 146 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 104 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 34 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण 14, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथील कोविड केअर सेंटर येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
000000


गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या 306 किटचे वाटप
नांदेड, (जिमाका) दि. 31 :- कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांचे रोजगार बंद झाले असून कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली. ही परिस्थिती लक्षात घेऊन नांदेडचे जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेंद्र रोटे व मुख्य न्यायदंडाधिकारी सतीश हिवाळे यांनी समाजातील गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या साधारणता 306 किटचे वाटप केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कंत्राटी कर्मचारी मंगेश दमाने हे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या कार्यामुळे प्रेरित झाले. त्यांनी त्यांच्या लग्नकार्यासाठी होणार अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कामासाठी ती रक्कम वापरण्याचा निश्चय केला. 24 मे रोजी त्यांचा विवाह शिवानी गोविंद सालमोटे यांच्याशी संपन्न झाला. लग्नामध्ये करण्यात येणाऱ्या अनावश्यक खर्च टाळून लग्न अगदी साध्या पद्धतीने केले. लग्नाच्या विधीनंतर वधू-वरांनी सुमारे 51 अन्नधान्याच्या किटचे वाटप केले व समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
000000


नागरिकांच्या समुपदेशासाठी
सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती
नांदेड, (जिमाका) दि. 31 :- कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना मानसिक आधार देवून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सिडको नांदेड येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्या भागातील नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होत असल्याने रुग्णाच्या परिवारासह शेजारच्या नागरिकांना मोठया मानसिक आधाराची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. ही गरज लक्षात कोव्हिड आजाराबाबत समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देण्याची जबाबदारी सहयोगी प्राध्यापकांना दिली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दितील विवेकनगर, इतवारा, मिल्लतनगर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर), जोशी गल्ली (सराफा होळी परिसर), शिवाजीनगर या क्षेत्रात कोव्हिड 19 रुग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्रामध्ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून या कंटेनमेंट झोन मध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून
या झोनमध्ये सहयोगी प्राध्यापक दिवसातून वेळोवेळी भेट देवून तेथील नागरिकांना धीर देवून अडचणीची माहिती घेतील. या अडचणी अपर जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने त्या दूर करण्याची कार्यवाही करतील.
समुपदेशनासाठी महानगरपालिका हद्दीतील विवेकनगर येथे डॉ. एस. व्ही. जगताप, इतवारा- डॉ. ए. टी. शिंदे, मिल्लतनगर- डॉ. एफ. एम. सौदागर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर)- डॉ. एस. एस. पाईकराव, जोशी गल्ली (सराफा, होळी परिसर)- डॉ. एन. के. वाघमारे, शिवाजीनगर- डॉ. श्रीमती के. बी. गित्ते यांची नेमणुक करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या आदेशात देण्यात आलेल्या अटी व शर्ती जशास-तशा लागू राहतील. जे कोणी व्यक्ती, समुह या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
00000

Saturday, May 30, 2020


 विशेष श्रमिक रेल्वेने  नांदेड येथून 1420 प्रवासी
 पश्चिम बंगालकडे रवाना
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साधला समन्वय
नांदेड, (जिमाका) दि. 29 :- कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या 1 हजार 420 प्रवाशांना घेवून आज नांदेड येथून विशेष श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगालकडे रवाना झाली.  जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवासी, यात्रेकरु, विद्यार्थी, मजूर यांना त्यांच्या मुळगावी परतता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करुन प्रत्येक तालुक्यातून प्रवाशांना एकत्र करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत या सर्व प्रवाशांची प्राथमिक  वैद्यकीय चाचणी करुन त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसल्याची खातरजमा करुन घेण्यात आली. त्यांना तसे वैद्यकीय प्रमाणपत्र देवून पुन्हा आज रेल्वेत बसण्यापुर्वी आरोग्य विभागातर्फे तापमान व इतर तपासणी करण्यात आली. आवश्यक ती सर्व वैद्यकीय खबरदारी घेवून सर्व प्रवाशांना आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी भेट देवून सर्व परिस्थितीची पाहणी करुन योग्य त्या सुचना दिल्या.
यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त सुनिल लहाने, निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, प्र. तहसीलदार सारंग चव्हाण, तहसीलदार अर्धापूर सुजित नरहिरे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे आदि संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.   
नांदेड येथून निघालेल्या या प्रवाशांमध्ये लातूर येथील 49, बीड येथील 125 , परभणी येथील 140, नांदेड येथील 402 , जालना येथील 18, औरंगाबाद येथील 288, अमरावती येथील 200, यवतमाळ येथील 198 असे एकूण 1 हजार 420 प्रवासी आहेत. ही रेल्वे रात्री 2-00 च्या सुमारास बडनेरा येथे पोहचल्यावर तेथून कांही प्रवासी घेण्याचे नियोजन झाले आहे.
दोन दिवसांच्या या प्रवासात प्रवासी उपाशी राहू नयेत यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन, सराफा असोसिएशन नांदेड, ओमप्रकाश पोकर्णा मित्र मंडळ व इतर सेवाभावी संस्था यांच्यावतीने विशेष नियोजन केले. सर्व प्रवाशांना दोन दिवस पुरेल ऐवढे अन्नाची पाकिटे, फळ व पाण्याच्या बॉटल्स पुरविण्यात आल्या. याचबरोबर सर्व प्रवाशांना मास्कही पुरविण्यात आले. 
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...