Wednesday, April 22, 2020


बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा
रस्त्यांची कामे दर्जेदार
, गुणवत्तापूर्ण वेळेत पूर्ण करा  
-
   सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड दि. 22 :- जिल्ह्यातील रस्त्यांची मंजूर व प्रलंबित कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण विहित कालावधीत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नांदेड जिल्ह्यातील मंजूर व प्रगती पथावरील, प्रलंबित, प्रस्ताविक नवीन कामांचा आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात (काल दि. 21 रोजी) संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तसेच जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, कंत्राटदार यांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व त्याची यादी सादर करण्याबाबत निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्गाचा कामाचा आढावा घेऊन कोल्हार ते नरसापुर 57 कि.मी. काम वीस टक्के झाले असून मुदत संपून एक वर्ष झाले तरी ती कामे अपूर्ण आहेत सदर कामे तात्काळ पूर्ण करावीत. वसमत ते नांदेड 30 किमी पैकी 14 किमी रस्त्याचे काम 50 टक्के झाले आहे. नांदेड-बारड-भोकर-म्हैसा रस्त्याचे काम सुरू असून बारसगाव ते राहटीपर्यंन्‍तचे काम लॉकडाऊनमुळे प्रलंबित आह. रस्ता कामासाठी डांबर कमी होते ते निदर्शनास आणून देणे आवश्यक होते त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
भोकर ते राहाटी पर्यंतचे काम पूर्ण करावे. त्यापुढील काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडे देण्यात यावे. यासाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याशी चर्चा करावी. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याशीही समन्वय ठेवून तीन कामांच्या मोजण्याचे काम पूर्ण करावे. नांदेड ते जळकोट रस्त्याचे कामाच्या मोबदला देण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी कामे अडवले असून तीन कामे रस्त्याची शिल्लक आहेत. या कामाची सविस्तर माहिती सादर करावी. लखमापुर चार पॉईंट 50 किमीचे काम परमिट आहे, तेंव्हा या कामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित कामांचा आढावा घ्याव. नांदेड-वारंगा बायपास रस्ता 30 मीटर शासकीय जमीन आहे, परंतु रस्ता करण्यास विरोध होत असल्यास रस्त्याचे काम पोलिस संरक्षणात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे 184 कामे प्रगतिपथावर आहेत. ती अठरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावयाची आहेत. कामाची प्रगती 25 टक्के असून तसेच 2015 व 2016 मधील मुखेड, हातराळचे काम अपूर्ण आहेत. या कामाचे अंदाजित रक्कम दहा कोटी रुपये आहे. हे काम चार वर्षापासून अपूर्ण आहे ही बाब गंभीर आहे. तेंव्हा संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. याबाबत या कामाची बैठक पुढील आठवड्यात घेऊन अहवाल सादर करावा करावा, असेही निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.
ज्या-ज्या ठिकाणी प्रलंबित कामे आहेत त्या-त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदरच्या अडचणी सोडविण्यात याव्यात. शंभर गाव काकांडी येथील रस्त्याच्या कामासाठी संपादनाची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. शासकीय कामासाठी लागणारे लोखंड, सिमेंट, डांबर उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी ठेवली आहेत. ट्रक वाहतुकीसाठी पोलिस विभागाकडून पास देण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी यांनी शासकीय प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामास परवानगी दिली आहे.
ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे व जी कामे झाली आहेत तेंव्हा निधी देत असतांना केलेल्या कामाची गुणवत्ता तपासून निधी उपलब्ध करुन दयावा. शासकीय रस्ते, पूल, इमारतीची कामे विहित कालावधीत चांगले गुणवत्तेने व मुदतीत पूर्ण होतील याकडे लक्ष देण्यात यावे. कंत्राटदार यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
तसेच मजूरांची संख्‍या जास्‍त असल्‍यास कामाच्‍या ठिकाणीच जवेणाची व निवासाची स्‍वच्‍छतागृहे, मास्‍क, सॅनिटायझर इत्‍यादी उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी. सोशल डिस्‍टन्‍स पाळले जाईल याचीही दक्षता घेण्‍यात यावी, असेही पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी बैठकीत सुचना दिल्‍या.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत म्हणून जीजी कंट्रक्शन श्री कदम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाख एक हजार रुपयाचा निधी धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांना सुपूर्द केला.
00000


Tuesday, April 21, 2020


नांदेड शहरातील पिरबुरहान भागात
64 वर्षीय कोरोनाचा संशयित रुग्ण पॉझिटिव्ह ;
जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करावे
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन ;
पिरबुरहान भागाचा पाच कि.मी. परिसर पूर्णतः सील
नांदेड दि. 22 :-  कोव्हीड-19 चे अनुषंगाने नांदेड शहरातील पिरबुरहान भागातील 64 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जनतेने घाबरून न जाता, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
हा रुग्ण सोमवार 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी शासकीय महाविद्यालय नांदेड येथे ताप खोकला व दम लागणेच्या तक्रारीमुळे दाखल झाला होता. या रुग्णावर उपचार सुरु असून पिरबुरहान भागाच्या आसपासचा पाच कि.मी.चा परिसर पूर्णतः सील करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सील केलेल्या भागात रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. 
000000



प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा सुधारीत आदेश निर्गमीत ;
वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी,
मास्क व सॅनिटायजरचा वापर आवश्यकच;
ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने
आवश्यक परवानगीसह चालू ठेवता येतील
            नांदेड दि. 21 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम 144 ची मुदत 20 एप्रिल ते 3 मे 2020 पर्यंतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहे.
महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडील अधिसुचनेनुसार राज्य शासनाचे आदेश 21 एप्रिल 2020 अन्वये प्राप्त निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील जमावबंदी आदेशामध्ये नमुद बाबींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारीत आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (i) मधील “प्रसारमाध्यमासह इलेक्ट्रॉनिक मिडिया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असले. (तथापि वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करता येणार नाही)” ऐवजी “प्रसारमाध्यमासह इलेक्ट्रॉनिक मिडिया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असले (वृत्तपत्राची घरपोच सेवा मागणीदाराला पूर्वकल्पना देवून सुरु करता येईल. तथापी घरपोच वृत्तपत्र, दैनिक, मासिके वितरण करणाऱ्या व्यक्तिने चेहऱ्यावर मास्क वापरणे, हाताला वारंवार सॅनेटायझरचा वापर करणे आणि सामाजिक सुरक्षेच्या मानकाची पूर्तता करणे या अटीवर वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.)”
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (V) मधील “ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने आवश्यक त्या परवानगीसह चालू ठेवता येतील. ज्यामध्ये अन्न, औषधे, वैद्यकिय उपकरणे आणि विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे या सारख्या सर्व प्रकारचे वस्तु आणि मालाचा पुरवठा” ऐवजी  “ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने आवश्यक त्या परवानगीसह चालू ठेवता येतील. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अन्न, औषधी आणि वैद्यकिय उपकरणे” असा बदल करण्यात येतो.
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (XIII) मधील “कन्फेशनरी, फरसाणा, मिठाई दुकान (उक्त ठिकाणी खाण्याची बैठक व्यवस्था नसावी) ही परवानगी (वगळण्यात) रद्द करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 13, 15 व 19 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश दि. 3 मे 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले आहे. तसेच 20 एप्रिल 2020 रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये शासकीय, निमशासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारी आस्थापना व त्यांच्याशी निगडीत दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने (केवळ अशा आस्थापना, दुकाने ज्यांना 13, 15 व 19 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशानुसार चालू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे) हे केवळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतील असे याद्वारे आदेशित केले आहे.
          सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
            तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले दि. 13, 15, 19 एप्रिल 2020 वर नमूद आदेश व दिनांक 20 एप्रिल 2020 वर नमूद शुद्धीपत्रकाद्वारे दिलेले वेळेचे बंधन इत्यादीसह अंमलात राहील, असे सुधारीत आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 21 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केले आहे.  
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...