Thursday, February 27, 2020


बी.एस.चार वाहनाची नोंदणी
20 मार्च पूर्वी करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भारतात सद्य:स्थितीत वाहनांसाठीची प्रदुषण मानके बी.एस.चार चालू आहेत. ही मानके दि. 31 मार्च 2020 नंतर बंद केली जातील. कोणत्याही बी.एस.चार वाहनाची नोंदणी त्यानंतर केली जाणार नाही. वाहनाचे नोंदणी शुल्क, कर आदी भरलेला असला तरीही  31 मार्च 2020 नंतर बी.एस.चार वाहनांची नोंदणी होणार नाही.
सर्व वाहन वितरकांना व वाहन धारकांनी बी. एस. चार वाहन काही कारणास्तव नोंदणी करावयाचे प्रलंबित असेल जसे, वित्तदात्याकडील थकीत प्रकरण, वाहन मालकाचे आजारपण, वाहन मालकाचा अपघात इ. तर अशा वाहनाची नोंदणी 20 मार्च 2020 पूर्वी पूर्ण करुन घ्यावी. संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत 31 मार्च 2020 नंतर फक्त बी.एस.सहा मानकांच्या वाहनांची नोंदणी करता येणार आहे.
गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुकांनी 25 मार्च 2020 तत्पूर्वी किमान 6 ते 7 दिवस अगोदर आपण आपल्या वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता (जसे की शुल्क, कर इ. भरणे) पूर्ण करुन घ्यावी. जेणेकरुन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला वाहन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर  25 मार्च 2020 रोजी वाहन डिलिव्हरी देवू शकेल.
मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाहता व संगणकीय प्रणालीतील बदल पाहता वाहन वितरक व वाहन मालकांची कोणत्याही प्रकारची बी.एस.चार मानकांच्या वाहनांची नोंदणी अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपल्या वाहनाची नोंदणी प्रक्रीया 31 मार्च 2020 पूर्वीच पूर्ण करावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.  
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 फेब्रुवारी 2020 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 27 मार्च 2020 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000

स्व. डॉ. शंकरराव चव्हाण,
स्व. कुसुमताई शंकरराव चव्हाण यांना
पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन
नांदेड दि.27:-  स्व. डॉ. शंकरराव चव्हाण व स्व. कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरणा निमित्त धनेगाव ता. जि. नांदेड येथे त्यांच्या समाधीस्थळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पअर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव जवळगावकर, अमिताताई चव्हाण, श्रेजया चव्हाण, सुजया चव्हाण, महापौर दिक्षाताई धबाले, माजी महापौर मंगलाताई निमकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,गोविंदराव नागेलीकर, आनंद धारड आदिंची उपस्थिती होती.

00000











 जिल्हा ग्रंथालय कार्यालयात 
 मराठी भाषा गौरव दिन साजरा
नांदेड दि.27:- येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा दिवस जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. 
नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार गंगाधर पटणे व प्र. जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास यांनी केले. यावेळी ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक आणि विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.
00000








मराठी भाषा गौरव दिन साजरा 
नांदेड,दि.27:- येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा दिवस जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा ग्रथालय अधिकारी आशिष ढोक आदि . विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी उपस्थिती अधिकारी, कर्मचाऱ्यांना भाषा प्रतिज्ञा दिली. तसेच मराठी भाषा दिनाचे महत्व आणि कुसुमाग्रज यांच्या जीवन, कार्य आणि मराठी साहित्यातील योगदान याविषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमती अलोने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

00000

Wednesday, February 26, 2020


जिल्हा परिषद कृषि विभागाने राबविलेल्या
उपक्रमांची दखल शासन घेईल असे काम करु   
-                     कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम
नांदेड दि. 26 :- जिल्हा परिषद कृषि विभागाने राबविलेल्या विविध योजना व उपक्रमाची दखल राज्य शासन घेईल असे काम केले जाईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम (रावनगावकर) यांनी केले. कृषि विभागाच्या विविध योजनांचा आढावा सभापती श्री कदम यांचे अध्यक्षतेखाली नुकताच जिल्हा परिषद येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, पंचायत समितीस्तरावरील कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) तसेच जिल्हा परिषदेतील कृषि विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप संच, पाईपलाईन, बीबीएफ प्लांटर, ट्रॅक्टर, फळबाग योजना, मलचिंग, पोखरा योजनेअंतर्गत नविन विहीरीचा लाभ, शेडनेट, पॉली हाऊस, बंदीस्त शेळीपालन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सामुहिक शेततळे, रेशीम लागवड इत्यादी योजनांची माहिती दिली.
 जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांना नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण याबाबींचा लाभ देणेसाठी  निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. ज्या योजनांची मुदत  31 मार्च 2020 अखेर आहे अशा योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करुन लाभार्थ्यांना योजनेंतर्गत संपूर्ण लाभ देण्याच्या सूचना दिल्या. याच प्रमाणे जिल्हा परिषद उपकर योजने अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना व नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रम इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच जिल्हा परिषद कृषि विभाग अंतर्गत गुणवत्ता नियंत्रणाचा आढावा घेण्यात आला.
 कामे पुर्ण करण्यासाठी काही दिवासाचा अवधी शिल्लक राहिला असल्याने विभागाचे अधिकारी त्या प्रमाणे प्रयत्नशील असल्याची माहिती संतोष नादरे, कृषि विकास अधिकारी यांनी दिली.
सभापती महोदयांनी जिल्हा परिषद शेष निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा चालू वर्षाचा आढावा घेऊन पुढील वर्षी नियोजन करण्यात आलेल्या योजनांमध्ये कांही योजना नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत समाविष्ट करता येऊ शकतील काय या बाबत देखील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
कृषि सभापती  बाळासाहेब कदम यांनी सन 2020-21 मध्ये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या व नाविन्यपूर्ण योजनांसाठी 1 कोटी 65 लाखाचे नियोजन करुन अगामी अर्थ संकल्पीय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याच्या सूचना दिल्या.   
बैठकीचे समारोपात कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन शेतकऱ्यांचे हित जोपासण्यास विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शेवटी आभार पी. आर. माने यांनी  मानले.
000000


कौशल्य विकास रोजगार कार्यालयात
जागतिक महिला आरोग्य दिवस साजरा
नांदेड दि. 26 :- जागतिक महिला आरोग्य दिन 16 फेब्रुवारी निमित्ताने महिलांसाठी त्यांचे आरोग्य किती महत्वाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्यावतीने ग्रंथालय विभागातील महिलांसाठी जागतिक महिला आरोग्य दिवस आज साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सु. प्र. पाटील यांनी केले, कार्यक्रमासाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी व कुटुंब उपस्थित होते.
श्री. खंदारे यांनी महिलांना आरोग्याचे महत्व सांगितले. या धावपळीच्या युगात महिलांनी सर्व क्षेत्रात वावरतांना आपली कार्यक्षमता दाखवून देण्यासाठी आरोग्य किती महत्वाचे असते तसेच आरोग्य चांगले  राहण्यासाठी महिलांनी कोणता आहार घेतला पाहिले याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील उपस्थित काही महिलांनी देखील थोडक्यात महिला आरोगयविषयी आपले विचार माडले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांच्यावतीने श्रीमती सु. प्र. पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
00000



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...