Tuesday, February 4, 2020


धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर, नायगाव
नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोटनिवडणूक
क्षेत्रातील मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम  
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील नगरपरिषद धर्माबाद व बिलोली, नगरपंचायत हिमायतनगर व नायगाव येथील रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक 2020 साठी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. या मतदान केंद्र व परिसरात तर शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अधिकाराचा वापर करुन निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील नगरपरिषद धर्माबाद व बिलोली, नगरपंचायत हिमायतनगर, नायगाव येथील रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक 2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवथा अबाधित राहण्यासाठी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी 3 फेब्रुवारी 2020 रोजी निर्गमीत केला आहे.  
00000


जागतिक कर्करोग दिन, सप्ताहाचे उद्घाटन
कर्करोगाची तपासणी करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 4 :- जागतिक कर्करोग दिन हा आज 4 फेब्रुवारी राज्यात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने आज (मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी) येथील जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिन जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी रुग्ण व त्यांची नातेवाईकांना कर्करोगाच्या प्रमुख लक्षणाबद्दल माहिती दिली. एखाद्या व्यक्तीस या आजाराची लक्षणे दिसून आल्यास जिल्हा रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या तपासणी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. साईप्रसाद शिंदे, तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव व सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
00000


व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांनी
प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 4 :-  महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पुर्नवसन योजनेंतर्गत नोंदणीकृत संस्थांना सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पुर्नवसन योजनेंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी त्यांचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन बारा संस्थांना (प्रत्येक महसूल विभागातून दोन संस्था प्रत्येकी) रुपये 11 लक्ष प्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी प्राप्त प्रस्तावामधून गुणवत्तेच्या निकषाप्रमाणे शासन स्तरावरील निवड समितीकडून संस्थांची / केंद्राची निवड करण्यात येते.
पुणे समाज कल्याण आयुक्त यांचे निर्देशानुसार सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य काम करणाऱ्या संस्थांकडून अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शासन निर्णय 10 मार्च 2017 नुसार योजनेच्या नियमावलीस मान्यता दिली आहे. ही नियमावली, विहित नमुन्यातील अर्ज आदी बाबीची माहिती https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधीत जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात अर्ज सादर करावीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
00000

Monday, February 3, 2020


नगरपरिषद / नगरपंचायत पोटनिवडणूक हद्दीत
मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद
नांदेड दि. 3 :- नगरपरिषद बिलोली व नगरपंचायत नायगाव हद्दीत पोटनिवडणूकीच्या दिवशी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहे.
दि मार्केट ॲड फेअर ॲक्टर 1862 चे कलम 5 (अ) अन्वये प्रदान अधिकाराचा वापर करुन  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हा आदेश निर्गमीत केला आहे. हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000000


हिमायतनगर, बिलोली, धर्माबाद, नायगाव
नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोटनिवडणूक
हद्दीत मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत
नांदेड दि. 3 :-  जिल्ह्यातील हिमायतनगर प्रभाग 2, बिलोली प्रभाग 5-अ, धर्माबाद प्रभाग-2 व 4-अ, नायगाव प्रभाग-1 येथे घेण्यात येणाऱ्या नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोट निवडणूकीसाठी त्या-त्या प्रभागातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी दोन तासाची सवलत देण्यात येणार आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केली आहे.
मतदानाच्या दिवशी मतदार मतदानापासून वंचित राहू नये, जर मतदाराकडून मतदानाकरीता दोन तासाची सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधीत आस्थापना, व्यावसायिकाविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी,  असे अधिसुचनेत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नमूद केले आहे.
000000


शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा
महाशिबीरात विविध नागरिकांना लाभ  
नांदेड दि. 3 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व डॉ. झाकीर हुसैन शिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील गरजु, आर्थिकदृष्टया मागासलेल्या व्यक्तींना, योग्य न्याय मिळण्याच्या उद्देशाने देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या महाशिबीर रविवार 2 फेब्रुवारी रोजी हजरत फातेमा मुलींचे ऊर्दु हायस्कुल गाडेगाव रोड देगलुर नाका नांदेड येथे संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध शासकिय योजनांच्या 32 स्टॉलचे उद्धाटन केले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेद्र रोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, तहसिलदार अरुण जऱ्हाड, जिल्हा सरकारी वकिल आशिष गोधमगावकर, जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष मिलींद लाठकर, डॉ. झाकीर हुसेन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. झेड. सिद्दीकी यांच्या उपस्थित महाशिबीराचे उद्घाटन संपन्न झाले.  
अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया म्हणाले, नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना, शासकीय सेवा उपलब्ध असतात परंतू त्याची प्रचिती सामान्य जनतेला नसते त्यामुळे ते योजनांपासुन वंचित राहतात. त्या योजनाचा लाभ नागरिकांना होत नाही यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून या शासकिय योजनाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मिळणा-या लाभाचा गरजूंनी फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे यांनी महाशिबीरात लावण्यात आलेल्या स्टॉल, योजनांची सविस्तर माहिती दिली. या महामेळाव्यासाठी येणाऱ्या गरजुंनी मिळणाऱ्या प्रत्यक्ष लाभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या महामेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय अंतर्गत येणा-या योजनांचे 4 स्टॉल होते. समाजकल्याण, महापालिका, महिला आर्थिक विकास मंडळाच्या योजनाचे प्रत्येकी 3 स्टॉल, जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या योजनांचे 5 स्टॉल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, एस.टी. महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, पशुसंवर्धन आदी शासकिय कार्यालयाचे स्टॉल लावण्यात आले होते. 
या महाशिबीरास सात हजारापेक्षा जास्त नागरिकांनी भेटी दिल्या. यामध्ये तहसिल कार्यालयाच्या स्टॉलला 2 हजार 500 ते 3 हजार लोकांनी भेटी दिल्या. तहसिल कार्यालयाच्या रेशनकार्ड योजनेंतर्गत 210 जणांना रेशन कार्ड योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये नविन राशन कार्ड काढणे, दुरुस्ती करणे, नाव कमी करणे अथवा वाढविणे इत्यादीचा लाभ देण्यात आला. पंधरा व्यक्तींना उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात आले व 25 व्यक्तींना रहिवाशी दाखले देण्यात आले. तसेच 20 ते 25 लोकांना मतदान ओळखपत्र योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी तहसिल कार्यालयाकडून 10 व्यक्तींना वेगवेगळया स्वरुपाचे दाखले देण्यात आले. डाक विभागाने 80 लोकांना आधार कार्ड योजनेचा तर साठ लोकांना सुकन्या योजनेचा लाभ देण्यात आला. 20 क्युआर कार्डचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. एस. टी. महामंडळाने 25 ते 30 जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ दिला. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्हा समन्वयक यांनी 25 ते 30 लोकांना गोल्डन कार्ड अदा केले. महानगरपालिका यांच्याकडून 30 ते 40 लोकांना विविध प्रकारचे दाखले देण्यात आले.  
या महामेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 10 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरकुल वाटपाचा लाभ देण्यात आला. सिंचन विहिर योजनेअंतर्गत 5 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिंचन विहिरीचे वाटप करण्यात आले. कृषी अधिकारी कार्यालय नांदेड तर्फे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. कामगार आयुक्त कार्यालयातर्फे 10 लाभार्थ्यांना सामुहिक रित्या सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. पोस्ट कार्यालयातर्फे डाक जीवन विमा पासबुक,पॉलीसीचे तीन लाभार्थ्यांना तसेच 10 लाभार्थ्यांना क्युआर कार्डचे वाटप करण्यात आले.
या महामेळाव्यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिधापत्रिका, रहिवाशी दाखले, यांचे लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करण्यात आले. आधार कार्ड दुरुस्ती, नविन आधार कार्ड देणे शिधापत्रिका दुरुस्ती, सुकन्या योजना, एस.टी महामंडळाची स्मार्ट कार्ड योजना, रमाई घरकुल योजना, बचतगट या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमास नांदेड जिल्हा न्यायालय मुख्यालयातील सर्व न्यायाधीश उपस्थित होते. पत्रकार, विधीज्ञ, सर्व शासकिय कार्यलयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ सचिन पाटील यांनी केले तर आभार शहाजन सिद्दीकी यांनी मानले. महाशिबीर यशस्वी होण्यासाठी सुभाष बेंडे, नयुमखान पठाण, रिटेनर लॉयर, पॅनल विधीज्ञ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचा-यांनी परिश्रम केले. 
0000


उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा दौरा
नांदेड दि. 3 :-  राज्याचे उद्योग आणि खणिकर्म, मराठी भाषा  मंत्री सुभाष देसाई हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 4 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबई येथून सायं 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील. लातूर येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे रात्री 10 वा. आगमन व मुक्काम.
बुधवार 5 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7 वा. कृष्णूर औद्योगिक क्षेत्रास भेट. सकाळी 10.50 वा. विमानाने नांदेडहून मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...