Wednesday, May 8, 2019


दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात
निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
•       औरंगाबाद आणि जालना दोन जिल्ह्यांसाठी. ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक
•       दुष्काळ निवारणाच्या तक्रारी, सूचना आणि मागण्या या व्हॉटस् ॲप क्रमांकावर नोंदवा.

मुंबई,  दि. ८: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आज आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांनी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यु पी एस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, यांच्यासह जवळपास ५०० जण सहभागी झाले होते.  
राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू असे आवाहन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना  या दोन जिल्ह्यासाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप  क्रमांक जाहीर केला.  टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीक विमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर  पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार या सर्व प्रशासकीय यंत्रणेने संवादात तसेच व्हॉटस्ॲप क्रमांकावर नोंदवल्या जाणाऱ्या बाबींची नोंद घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा.
मुख्यमंत्री म्हणाले, टँकरने पाणीपुरवठा करताना २०१८ ची लोकसंख्या विचारात घेऊन टँकरची संख्या निश्चित करण्यात यावी अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.  अधिग्रहित विहिरींसाठी पूर्वी फिक्स रक्कम दिली जात होती आता त्या विहीरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले यावर निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  गरजेनुसार चारा छावण्यांच्या अटी  शिथील करण्यात येतील, असे ही मुख्यमंत्र्यांनी या संवादादरम्यान सांगितले.
रस्त्याची कामे करताना तलावांना क्षती पोहोचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सर्व दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी त्यांच्या गावात जलसंधारणाची अधिकाधिक कामे घ्यावीत, त्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. नरेगाअंतर्गत २८ प्रकारची कामे कन्व्हर्जन करून करता येणार आहेत. त्यातूनही ग्रामसेवक-सरपंचांनी गावात जास्तीत जास्त कामे करावीत, त्यातून रोजगार निर्माण होताना मत्ताही उभी राहील, असेही ते म्हणाले.
ज्या ठिकाणी अतिरिक्त चारा छावण्यांची, टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून नोंदवली जावी असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात टँकरने पाणीपुरवठा करताना त्यावर जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्या टँकरच्या कुठे आणि किती फेऱ्या झाल्या हे लक्षात येऊ शकेल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करत असून त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जात आहे, यात काही अडचणी असल्यास त्याचे निकष तपासून मदतीचे काम ही वेगाने केले जाईल.
ज्या गावात पाणीपुरवठ्याची योजना बंद पडली आहे पण तिथून गावाला पाणी मिळू शकते, अशा योजनेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावेत, ती योजना दुरुस्त करून गावांना पाणीपुरवठा सुरु केला जाईल. चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांसाठी  प्रती जनावर ९० रुपये आणि लहान जनावरांसाठी प्रती जनावर ४५ रुपये  दिले जातात. मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यांमधील जनावरांना टॅग करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे चारा छावण्यांमध्ये किती जनावरे आहेत याची माहिती मिळू शकेल असेही ते म्हणाले.
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना- जिल्हा औरंगाबाद
•          सर्व ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर
•          जिल्ह्यात १०५४ टॅकर्सनी पाणीपुरवठा
•          १५६ विंधन विहिरी, ५२ नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, १४ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, ५०१ विहिरींचे अधिग्रहण, ८ राष्ट्रीय पेयजल योजना तर ४ मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वंरित योजना प्रगतीपथावर
•          पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १०० लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.
•          चार तालुक्यात ६ शासकीय जनावरांच्या छावण्या. ६७३३ मोठी, ९३६ लहान अशी मिळून ७६६९ जनावरे चारा छावणीत दाखल
•          १३५५ गावातील ५ लाख ४० हजार २३६ शेतकऱ्यांना ३७६ कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात
•          महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ७७४ कामे सुरु त्यावर ९३५३ मजूरांची उपस्थिती. ६४ हजार ७६७ कामे शेल्फवर.
•          जिल्ह्यात ४ लाख, ८७ हजार ०६९ शेतकऱ्यांची १६३ कोटी रुपयांची पीक विम्यासाठी नोंदणी. त्यापैकी ४ लाख ८७ हजार ०६८  शेतकऱ्यांना  २६५ .६० कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित
•          प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात १.७४ लाख शेतकऱ्यांची नोंदणी, त्यापैकी १.२३ लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी  २४. ७३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित.
•          उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना- जिल्हा जालना
•          जिल्हयातील ८ पैकी ७ तालुक्यात दुष्काळ घोषित
•          एकूण ५३२ टँकर्सद्वारे जिल्ह्यात पाणी पुरवठा
•          १९४ नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, ३९ तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, ६३० विहिरींचे अधिग्रहण, ४ राष्ट्रीय तर १३ मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वरित कामे प्रगतीपथावर
•          पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची २३७.९७ लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.
•          ११ शासकीय छावण्यांमध्ये जिल्ह्यात ४९९२ मोठी, ९९७ लहान अशी मिळून ५९८९ जनावरे दाखल
•          ८५४ गावातील ४ लाख ७३ हजार ८७६ शेतकऱ्यांना ३३०.३९ कोटी रुपयांची दुष्काळी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात.
•          मग्रारोहयोअंतर्गत २६३ कामे.  त्यावर ७३६८ मजूरांची उपस्थिती. २३४१० कामे शेल्फवर
•          २ लाख ६४ हजार ६३७ शेतकऱ्यांची ६३ कोटी रुपयांची पीक विम्याची  नोंदणी, पैकी ३७.२७ कोटी रुपयांची रक्कम अदा
•          प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत १.६२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी. त्यापैकी५९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ११.७६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.

००००


 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यात 23 मे 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 9 मे 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 23 मे 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


Tuesday, May 7, 2019


हरवलेल्या मुलीचा शोध
नांदेड, दि. 7 :- लोहा तालुक्यातील डोनवाडा येथील व्यंकटी रुस्तुमा गाढे यांची मुलगी जयश्री गाढे  (वय 22 वर्षे) ही 26 एप्रिल रोजी डोनवाडा येथून तिच्या मामाच्या गावी अजोळी कहाळा खु येथे लग्नासाठी वडिलासोबत गेली होती. त्या दिवशी दुपारी 12 वा. सुमारास जयश्री ही लग्नाचे घरुन कोणाला काही न सांगता निघुन गेली आहे. तिचा शोध घेतला असता सापडली नाही. याबाबत पोलीस स्टेशन कुंटूर येथे तिचे वडील व्यंकटी गाढे यांनी अर्ज केला आहे.
हरवलेली जयश्री व्यंकटी गाढे ही बि.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेते, तिचा रंग गोरा, उंची 4 फुट 6 इंच, चेहरा गोल, नाक मोठे, अंगात बदामी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, मराठी व हिंदी भाषा बोलता येते. ही मुलगी आढळल्यास पोलीस स्टेशन कुंटूर येथे 02465-288533 (मो. 9823971641, 9527732100) वर संपर्क साधावा, असे आवाहन कुटूंर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद एस. मरे यांनी केले आहे.
00000


Monday, May 6, 2019

प्रलंबीत करातील जुन्या थकबाकीतून
मुक्तीसाठी तडजोड कायदा  
नांदेड, दि. 6 :- मुंबई विक्रीकर कायदा 1959 व महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायदा 2005 तसेच विक्रीकर विभागामार्फत राबविण्यात जाणाऱ्या विविध कायद्यांतर्गत प्रलंबीत कर, व्याज, दंड तसेच प्रलंबीत लेट फी यांचा ठरावीक प्रमाणात भरणा केल्यास उर्वरीत रक्कम तडजोड कायद्याअंतर्गत माफ करुन घेण्याची संधी महाराष्ट्र शासनाने सर्व नोंदीत व अनोंदीत व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.
यात प्रमुख दोन टप्पे असून पहिला टप्पा एप्रिल 2019 ते जून 2019 पर्यंत व दुसरा जुलै 2019 असून यामध्ये प्रलंबीत थकबाकीपैकी आवश्यक असणाऱ्या विवादीत कर, व्याज व दंडाची ठरावीक रक्कम भरणा करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास व्यापाऱ्यांना मोठा लाभ मिळून जुन्या वसुलीबाबत सुटकारा मिळू शकतो.
विवादीत कर व दंडासाठी वैधानिक आदेशाविरुद्ध अपिल दाखल केलेली असेल किंवा नसेल तरीही निर्धारीत रकमेचा भरणा करुन या योजनेचा लाभ घेता येतो. वैधानिक आदेश जरी पारीत नसले तरीही व्यापारी स्वयंनिर्धारण करुन अविवादीत व विवादीत रक्कम भरल्यास काही प्रमाणात विवादित एकूण व्याज व दंडाच्या रक्कमेत सेटलमेंट कायद्यांच्या तरतुदीप्रमाणे सवलतीचा लाभ घेऊ शकतो. अपिलामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या प्रकरणामध्ये अविवादित व विवादीत रक्कमेत व्याज, दंडा काही प्रमाणात भरल्यास 2009-10 व पुर्वीच्या आर्थिक वर्षाची प्रलंबित थकबाकी असल्यास ज्यादा सवलत कायद्यामध्ये अंतर्भूत आहे. एप्रिल 2010 नंतरच्या कालावधीसाठी तुलनेने कमी सवलत आहे.
1 जुलै ते 30 जुलै या कालावधीत अविवादित व विवादीत रकमेचा भरणा करुन अर्ज केल्यास मिळणारी सवलत ही पहिल्या चरणापेक्षा कमी असल्याने सर्व व्यापाऱ्यांना पहिल्या म्हणजेच 30 जून 2019 च्या आत अत्यावश्यक रकमेचा भरणा करुन त्वरीत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
जीएसटी विभागाची अधिकृत वेबसाईट mahagst.gov.in मधील whats new वर या कायद्याची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची पद्धत सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.
जीएसटी भवन माझगाव तसेच राज्यातील सर्व जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योजनेबाबत माहिती तसेच ऑनलाईन पद्धीने अर्ज करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश राज्यकर आयुक्त राजीव जलोटा यांनी दिले आहेत. या तडजोड कायद्यातील तरतुदी विषयी काही अडचणी सुचना व प्रश्न असल्यास vatamnesty2019@gmail.com या मेलवर विचारण्यात याव्यात अथवा नजीकच्या जीएसटी कार्यालयास भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000

हिमायतनगर, धर्माबाद येथील
परिवहन कार्यालयाच्या मासिक शिबिराच्या तारखेत बदल
नांदेड, दि. 6 :- दरमहा आयोजित होणारे नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मासिक शिबीर तांत्रिक अडचणीमुळे हिमायतनगर येथील 17 मे 2019 ऐवजी गुरुवार 16 मे 2019 रोजी तर धर्माबाद येथील 16 मे 2019 ऐवजी शुक्रवार 17 मे 2019 रोजी होणार आहे. याबाबत हिमायतनगर व धर्माबाद तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 6 :- वेतन पडताळणी पथकाचा मे 2019 चा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हे पथक नांदेड जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी 8 मे 2019 ते 10 मे 2019 या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे वेतन पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000

Tuesday, April 30, 2019

महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ उत्साहात संपन्न
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केलेल्या
हुतात्म्यांना वंदन करणारा दिवस
-         पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 1 :- संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक हुतात्म्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांचे आपण ऋणी असून या हुतात्म्यांना वंदन करणारा हा दिवस आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती. 
ध्वजवंदनानंतर आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असून 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली. भाषावाद, प्रांतरचना झाल्यानंतर गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्य वेगळी झाली. देशात जवळपास 29 राज्य अशी भाषावाद, प्रांतरचनेनुसार स्थापन झालीत. राज्याच्या सिमेवरील अनेक मराठी बांधव आजही संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी सातत्याने मागणी करत असून निश्चितपणे मराठी बांधवांना न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.  
आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांना त्यांचे न्याय हक्क सन 1889 ला मिळाले आणि त्या दिवसापासून जवळपास 100 देशात हा कामगार दिवस साजरा केला जातो, असे सांगून त्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
समारंभात सुरवातीला पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री कदम यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील आणि सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक शहादेव पोकळे यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस बल हिंगोली, सशस्त्र पोलीस पथक नांदेड प्लाटूनसह, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक साधना प्रशिक्षण विभाग नांदेड,  शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, मिनी रेस्क्यू फायर टेंडर संचलनात सहभागी झाले.
पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात आदर्श तलाठी पुरस्कार मनोजकुमार जाधव (तलाठी सज्जा हातणी ता. लोहा), पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेतील पोलीस महासंचालक यांनी सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, कर्मचारी नांदेड ग्रामीणचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चॉदखान जब्बार खान, चालक दहशतवाद विरोधी पथकाचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्रसिंघ हिरासिंघ, वाचक शाखेचे पोलीस हवलदार वामन कोकाटे, पोलीस स्टेशन अर्धापुरचे नईमखान मैनोद्यीन खान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे मिर्झा ईब्राहिम बेग, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नथू भोसले, दशहतवाद विरोधी पथकाचे महम्मद तय्यब म. अब्बास, काझी महम्मद अदिलोद्यीन, गुन्हे अन्वेषण विभागाचे संजय राखेवार, पो. स्टे. वजिराबादचे पोलीस नायक उमाकांत दामेकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सतीश मुधोळकर, राज्य गुप्तवार्ताचे विलास शिंदे, नागरी हक्क संरक्षण विभागाचे महिला पोलीस नायक सविता केळगद्रे यांचा समावेश होता. त्यानंतर पालकमंत्री कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांनाही शुभेच्छा दिल्या. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
0000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...