Tuesday, April 30, 2019

महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ उत्साहात संपन्न
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केलेल्या
हुतात्म्यांना वंदन करणारा दिवस
-         पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 1 :- संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक हुतात्म्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांचे आपण ऋणी असून या हुतात्म्यांना वंदन करणारा हा दिवस आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती. 
ध्वजवंदनानंतर आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असून 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली. भाषावाद, प्रांतरचना झाल्यानंतर गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्य वेगळी झाली. देशात जवळपास 29 राज्य अशी भाषावाद, प्रांतरचनेनुसार स्थापन झालीत. राज्याच्या सिमेवरील अनेक मराठी बांधव आजही संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी सातत्याने मागणी करत असून निश्चितपणे मराठी बांधवांना न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.  
आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांना त्यांचे न्याय हक्क सन 1889 ला मिळाले आणि त्या दिवसापासून जवळपास 100 देशात हा कामगार दिवस साजरा केला जातो, असे सांगून त्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
समारंभात सुरवातीला पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री कदम यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील आणि सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक शहादेव पोकळे यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस बल हिंगोली, सशस्त्र पोलीस पथक नांदेड प्लाटूनसह, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक साधना प्रशिक्षण विभाग नांदेड,  शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, मिनी रेस्क्यू फायर टेंडर संचलनात सहभागी झाले.
पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात आदर्श तलाठी पुरस्कार मनोजकुमार जाधव (तलाठी सज्जा हातणी ता. लोहा), पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेतील पोलीस महासंचालक यांनी सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, कर्मचारी नांदेड ग्रामीणचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चॉदखान जब्बार खान, चालक दहशतवाद विरोधी पथकाचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्रसिंघ हिरासिंघ, वाचक शाखेचे पोलीस हवलदार वामन कोकाटे, पोलीस स्टेशन अर्धापुरचे नईमखान मैनोद्यीन खान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे मिर्झा ईब्राहिम बेग, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नथू भोसले, दशहतवाद विरोधी पथकाचे महम्मद तय्यब म. अब्बास, काझी महम्मद अदिलोद्यीन, गुन्हे अन्वेषण विभागाचे संजय राखेवार, पो. स्टे. वजिराबादचे पोलीस नायक उमाकांत दामेकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सतीश मुधोळकर, राज्य गुप्तवार्ताचे विलास शिंदे, नागरी हक्क संरक्षण विभागाचे महिला पोलीस नायक सविता केळगद्रे यांचा समावेश होता. त्यानंतर पालकमंत्री कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांनाही शुभेच्छा दिल्या. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
0000000

No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...