Friday, November 2, 2018

लेख -

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
                                      
 अनिल आलुरकर
                                                                                जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                                   नांदेड


फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. शासन निर्णयानुसार राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेविषयीची ही माहिती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि. 20 जून 2018 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे. तसेच, ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे, फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होणार आहे. शासन निर्णयानुसार राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.


योजनेचे उद्दिष्ट :
या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे.
योजनेत समाविष्ट पिके
आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर.

नाविन्यपूर्ण बाबी
• फक्त कलमांद्वारे लागवड (अपवाद नारळ रोपे)
• घन लागवडीचा समावेश
• ठिबक सिंचन अनिवार्य
• शेतकऱ्यांचा सहभाग

समाविष्ट बाबी
शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे - जमीन तयार करणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, कुंपण करणे, खते देणे, आंतर मशागत करणे.
शासन अर्थसहाय्यित बाबी / कामे - खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड, नांग्या भरणे, ठिबक सिंचन करणे, पीक संरक्षण.
अटी व शर्ती
या योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थी व्यतिरीक्त इतर लाभार्थींना या योजनेतून लाभ घेता येईल.
यासाठी शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे किमान 20 गुंठे शेत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे 7/12 असावा. जर लाभार्थी उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास, 7/12 वर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक असून लाभार्थ्याच्या 7/12 वर नोंदणी बंधनकारक आहे.
महाराष्ट्रात कमाल सहा हेक्टर पर्यंत लाभ अनुज्ञेय राहील. सदर कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एका पेक्षा जास्त फळ पिके लागवडीकरिता देखील पात्र राहील. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ यापूर्वी घेतला असल्यास लाभ क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करताना ज्यांची उपजीविका पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. तसेच, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.
लाभार्थी निवड कार्यवाही
इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करावा. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची तालुकानिहाय सोडत पद्धतीने निवड उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी संयुक्तपणे करतील. लक्षांकाप्रमाणे अर्ज प्राप्त न झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या मार्फत पुन्हा जाहिरात देण्यात येईल.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी  ही योजना फायदेशीर ठरणार आहे. यात शंका नाही.

0000

परदेशातील उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी
10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 :- उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना परेदशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही योजना उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात येणार आहे.
संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आणि आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे यासाठी 15ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत10 नोव्हेंबरपर्यंत (सायंकाळी 5वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे / कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र आणि औषण निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणचे विभागीय कार्यालय यांना 17 नोव्हेबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) जमा करणे आवश्यक आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत अर्ज संबंधित कोणत्याही विभागीय कार्यालयात मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक असणार आहे.
000000

Thursday, November 1, 2018


आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड दि. 1 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जिल्हा नांदेड या प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबर 2018 पासून सुरु होणाऱ्या 98 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय किनवट येथे बुधवार 28 नोव्हेंबर 2018 तत्पुर्वी पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठीची अटी पुढीलप्रमाणे राहील. उमेदवार अनुसूचित जमातीपैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीतकमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवरांचे वय 30 नोव्हेंबर 2018 रोजी 18 वर्ष पूर्ण असावेत व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षार्थींचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या बँकेमध्ये चालू खाते असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा हे प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाते. पात्र अशा इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 28 नोव्हेंबर 2018 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र , पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट जि. नांदेड या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02469-221801 या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 
0000



धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीस प्रशासन सज्ज
नांदेड दि. 1 :- धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्याक्षेत्रात धर्माबाद तालुल्यातील 56 गावे व उमरी तालुक्यातील (धानोरा खु बोळसा बु व बोळसा खु) येथे 3 नोव्हेबर 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी धर्माबाद नगरपालिका सभागृहात 4 नोव्हेंबर 2018 रोजी होणार आहे. प्रचार दि. 2 नोव्हेबर 2018 रोजी सकाळी 8 वाजेपासुन बंद होणार आहे.
मतदान दिवशी व मतमोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उपविभागिय दंडाधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्लाळ व सहायक पोलिस अधिक्षक धर्माबाद नुरुल हसन यांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रमुखाची बैठक घेण्यात आली. निवडणुकीत सहा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत गैर वर्तणुक  करणा-यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. संवेदनशील केंद्रावर व इतर केंद्रावर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे 250 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले असुन त्यांचे 3 प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्षांना स्वतंत्रपणे मतपेटी सिल करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या निवडणूकीचे मतदान हे मतपत्रीकेवर देण्यात येणार आहे.
निवडणूकीत 15 शेतकरी गण ,  1 व्यापारी गण व 1 हमाल मापाडी गण असुन मतदान हे त्याचे मतदान हे बान फुलीद्वारे करुन मतपेटीत टाकण्यात येणार आहे.
3 नोव्हेबर 2017 रोजी  मतदान दिवशी जारीकोट व चिकना येथील मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार भरणार नाहीत तसेच 51 मतदान केंद्रावर मतदान असुन ज्या शाळेत मतदान केंद्र असेल त्या शाळेत मतदानाचे दिवशी सुट्टी राहणार आहे. विज खंडीत होणार नाही याबाबत विज वितरण कंपणीचे अधिकारी यांना सुचनाही देण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसर व मतमोजणी परिसर येथे फौजदारी प्रक्रीया कलम 144 लागू करण्यात आली आहे. मतदानच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी जनतेने शांतता पाळावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी (कृउबास) तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्लाळ व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी (कृउबास) तथा तहसिलदार ज्योती चौहान यांनी केले आहे.
00000


वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरण करुन घ्यावे - राऊत  
नांदेड दि. 1 :- योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण न केलेल्या वाहनधारकानी तात्काळ वाहनातील सर्व त्रुटी दुरुस्तीचे कामकाज करुन प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
प्रधान सचिव परिवहन व बंदरे मुंबई यांच्या निर्देशानुसार योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम नुकतीच राबविण्यात आली होती. या मोहिमेत दोन वायुवेग पथक व एक महसूल सुरक्षापथकामार्फत योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेली वाहने पोलीस स्टेशन, एसटी विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच आवश्यकतेनुसार गॅरेजमध्ये अटकविण्यात आली आहेत. यात 614 वाहने तपासणी केली असून त्यापैकी 157 दोषी वाहनावर करवाई करण्यात आली आहे. तर 131 वाहनधारकाने दंड व कर 9 लाख 91 हजार 900 रुपये भरणा केला आहे. या वाहनधारकाना तात्काळ योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000



खाजगी बसने अधिक तिकिटदर
आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- हंगामाच्या काळात खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर आकारल्यास प्रवाशांनी परिवहन कार्यालयास तक्रार नोंदवावी, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
राज्य शासनाने 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयान्वये कंत्राटी वाहनांचे (खाजगी बस, ट्रॅव्हल्स आदी) महत्तम भाडेदर निश्चित केले आहे. सोबत नमुना जोडला असून शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अंमलात आला आहे. कंत्राटी बस परवानाधारकांकडून विहित दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असले तर त्याविषयी मोटार वाहन विभागाच्या 022-62426666 या नि:शुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर तक्रार नोंदवावी. मुंबईसाठी 1800220110 या नि:शुल्क क्रमांकावरही तक्रार नोंदविता येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.  
अशी तक्रार विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर देखील नोंदविता येऊ शकेल. तक्रारी संदर्भात उचित चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवानाधारकांच्या परवान्यावर निलंबनाची / रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. या शासन निर्णयाद्वारे खाजगी कंत्राटी वाहनांना गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी बसच्या तुलनेत जास्तीतजास्त दीडपट भाडे आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000000

Wednesday, October 31, 2018


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौडमध्ये विविध घटकांचा सहभाग ;
सरदार पटेल यांना अभिवादन
नांदेड दि. 31 :- विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.   
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये महापौर श्रीमतीर शिलाताई भवरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर,  प्रवीस साले, दिलीप ठाकूर, प्रा. नंदू कुलकर्णी, छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते.
तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते वजिराबाद मार्केट रस्ता, महावीर चौक, जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...