Monday, August 13, 2018


भूजल नियंत्रणासाठीच्या मसुद्याबाबत
सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन
नांदेड दि. 13 :- महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील प्रयोजने पार पाडण्यासाठी शासनाने दि. 25 जुलै रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र भूजल नियम 2018 चे मसुदा नियम सर्वसामान्य जनतेच्या अभिप्रायांसाठी प्रसिध्द केले आहेत. या मसुदा नियमांबाबत दिनांक 31 ऑगस्ट 2018 पर्यंत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन जनतेला नांदेड भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी केले आहे.
मसुदा व नियमावली जनतेच्या अभिप्रायासाठी प्रसिद्ध केली असून नियमांचा सविस्तर मसुदा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून या विषयी कोणत्याही व्यक्तीस हरकती किंवा सूचना पाठवावयाच्या असतील, तर त्या अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, इमारत संकुल, क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400001 येथे लेखी स्वरुपात तसेच psec.wssd@maharshtra.gov.in या इमेलवर वेळेच्या मुदतीत पाठवाव्यात. या हरकती, सूचना  शासन विचारात घेणार आहे.
000000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
00000

नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण
मोहिम पूर्वतयारीसाठी कार्यशाळा   

गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करावी   
                                                                         --- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 13:- गोवर व रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात नोंव्हेबर महिन्यात राबविण्यात येणार असून ही मोहिम यशस्वीरित्या , सुक्ष्म नियोजन पूर्वक करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिम जिल्हास्तरीय प्रशिक्षण व नियोजन कार्यशाळेचे आयोजन हॉटेल ताज पाटील मध्ये करण्यात आली होती.  
या लसीकरण मोहिम कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही.आर. मेकाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर, श्री. कट्टाणी , जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण  सिंगणे एस. व्ही.,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डी. एस.मठपती, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक देवकरे, एसएमओ डॉ. अमोल गायकवाड, डॉ. विद्या झिने, वैद्यकीय अधीक्षक , तालुका आरोग्य अधिकारी,  वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, नागेश देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यशाळेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. अरुण डोंगरे पुढे म्हणाले की, गोवर-रुबेला लस मोहिमेत 9 महिने ते 15 वर्ष या वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेबाबत प्रत्येक गावात, शाळेच्या विद्यार्थी , शाळाबाह्य बालकांपर्यंत ही लस पोहचविण्याची नियोजनबध्द राबविण्यात येणार आहे. त्याची सुरवात देशातील विविध राज्यात यापूर्वी झाली आहे. यापूर्वी देशातील नऊ कोटींच्यावर बालकांना यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक घटकांनी या कार्यात सहभाग नोंदवून कार्य करावे. तसेच लसीकरणासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटाखालील पात्र लाभार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट झाले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, रुबेला हा एक संक्रामक समान्यत: सौम्य व्हायरल संसर्ग असून तो मुख्यत: मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू किंवा जन्मजात दोष ( जसे की, अंधत्व, बहिरेपणा आणि ह्दय विकृती) होऊ शकतो हे बालक जन्मजात रुबेला सिंड्रोम (सीआरएम) म्हणून ओळखले जाते. गोवर आणि रुबेला या दोन आजारांपासून आपल्या बालकांना सुरक्षित करु शकतो . जरी यापुर्वीदेखील आपण आपल्या बालकास गोवर रुबेलाचे लसीकरण केले असेल तरी मोहिमेमध्ये लसीकरण करणे अनिवार्य आहे, असेही यावळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोक काकडे पुढे म्हणाले की, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नियोजनपूर्वक केले, तर आपण यश प्राप्त करु शकतो. आपली सामाजिक बांधिलकी ठेवून सुक्ष्मनियोजन करुन लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी




 श्री. काकडे यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक म्हणाले की, गोवर-रुबेला या लसीकरणाबाबतची माहिती दिली.
अंगणवाडी, शालेय , शाळाबाह्य व नियमित लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करणे, त्यांची संख्या निश्चित करणे, सुक्ष्म कृतीनियाजन तयार करणे, मोहिमेचे नियोजन, अहवाल पर्यवेक्षण, शितसाखळी व्यवस्थापन , लसीची मागणी, मोहिमेचे पर्यवेक्षण व मुल्यमापन करणे, मोहिमेच्या व्यापक प्रसिध्दीबाबत नियोजन करणे इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच शंभर टक्के बालकांना लसीकरण करण्यास्तव विविध शासकीय, अशासकीय विभागाचा समन्वय, जबाबदाऱ्या व मार्गदर्शन करण्यात आले.
या गोवर-रुबेला लसीकरण मोहिम जिल्हास्तरीय प्रशिक्षण व नियोजन कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ. दुर्गादास रोडे यांनी केले . प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही. आर. मेकाने यांनी केले.
****



स्वातंत्र्य दिनानिमित्त बुधवारी
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 71  व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त बुधवार 15 ऑगस्ट, 2018  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
0000000


पालकमंत्री रामदास कदम यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 13 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 15 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई येथून नंदीग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने नांदेड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 5.20 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 8.45 वा. शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व "15 ऑगस्ट स्वातंत्र्य" दिनानिमित्त झेंडा वंदन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सकाळी 9.30  वा. शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वा. शासकीय वाहनाने मालटेकडी रेल्वे उड्डाण पुलाकडे प्रयाण. दुपारी 4 वा. मालटेकडी रेल्वे उड्डाण पुल लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.15 वा. शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.15 वा. शासकीय वाहनाने नांदेड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

Sunday, August 12, 2018


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 27.38 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात रविवार 12 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 27.38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 438.03 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 466.85 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 49.11 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 12 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 18.88 (516.86), मुदखेड- 30.00 (626.35), अर्धापूर- 26.33 (480.00), भोकर- 33.25 (630.50), उमरी- 21.67 (503.32), कंधार- 16.33 (461.16), लोहा- 15.00 (448.65), किनवट- 41.43 (469.99), माहूर- 32.75 (622.50), हदगाव- 17.29 (582.33), हिमायतनगर- 26.00 (567.34), देगलूर- 11.17 (189.66), बिलोली- 33.60 (327.60), धर्माबाद- 66.33 (387.65), नायगाव- 22.00 (362.00), मुखेड- 26.00 (293.68). आज अखेर पावसाची सरासरी 466.85 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7469.59) मिलीमीटर आहे.  
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...