Thursday, June 14, 2018


आत्महत्या टाळण्यासाठी जागरुकता आवश्यक
-डॉ. नीलम मुळे : मुलाखतकार - देवेंद्र भुजबळ.
            समाजात दिवसेंदिवस आत्महत्यांचे, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनुवंशिकता आणि परिस्थितीजन्य विविध कारणांमुळे हे घडत आहे. राज्य सरकारने या बाबीचे गांभिर्य ओळखून 24 फेब्रुवारी, 2015 पासून ''104'' या क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे.  मानसिक आजार झालेल्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींनी, कार्यालयातील सहकाऱ्यांनी, मित्रांनी संबंधित रुग्णांची लक्षणे ओळखून तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास या आत्महत्या टळू शकतील, असे मानसरोग तज्ज्ञ डॉ. नीलम मुळे यांनी नेटभेटमध्ये सांगितले.
डॉ. नीलम मुळे  मानसरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी मानसशास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. शिवाय निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यातील 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. आज समाजातील वाढत्या मानसिक समस्या आणि त्यावर उपाय याबाबत त्या सतत जनजागृती करीत आहेत.
मानसिक आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या आधीच्या आई/वडिलांपैकी सहा पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार असेल तर शक्यता खूप असते. दुसरे कारण म्हणजे परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळेही मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशयी प्रवृतीच्या होतात. त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कटकारस्थाने रचतात असे वाटत रहाते. परत कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीची सतत भिती वाटत राहते. त्या एकच गोष्ट सतत करीत राहतात. या आजारांची नावे म्हणजे डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया (त्यात परत पॅरानॉईया एक प्रकार), कॅटॉटॉनिक, एंक्सायटी डिसऑर्डर, (दुचिंता) बायपोलर डिसऑर्डर अशी आहेत. या आजारांच्या लक्षणावरुन ती ओळखता येतात.
स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबंद्ध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो. हा रुग्ण लगेच ओळखता येतो. कॅटॉटॉनिकमध्ये रुग्ण एकाच स्थितीत दिवसेंदिवस त्याच स्थितीत राहू शकतो. एका पायावर उभे राहिले तर तसेच, एक टक पहात राहिले तर तसेच राहतील. अशा रुग्णांना शॉक ट्रिटमेंट द्यावी लागते. पण अशा रुग्णांचे प्रमाण कमी असते.
पॅरानॉईयामध्ये रुग्ण संशयखोर असतात. ते सतत संशय घेत असतात. बायको असेल तर नवऱ्याचा, नवरा असेल तर बायकोचा. त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये सतत भांडणे होतात. वैवाहिक जीवन कष्टप्रद होते. बऱ्याचदा अशा विवाहांची परिणती शेवटी घटस्फोटात होते. प्रसंगी काही रुग्ण जोडीदाराची हत्या पण करतात. त्यांच्या डोक्यात ते सतत कटकारस्थाने रचत असतात. कधीतरी शेवटी त्यांच्या हातून कृती घडते.
डिप्रेशन हे अनुवांशिकतेमुळे होऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही होऊ शकते. घरातील वातावरणही कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाही, ती एकलकोंडील बनते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये लवकरच जाते. काहीवेळा अशा व्यक्तींच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की, ते बोलत नाहीत आणि एकलकोंडेपणा वाढत जातो. फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भिती वाटत राहते. ही भिती उंचीची, पाण्याची, गर्दीची, सभेत बोलण्याची असते. एका मर्यादेपलिकडे भिती गेली की, त्याला फोबिया म्हणतात. रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी यांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी रुग्णाची लक्षणे ओळखून त्याला तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे. या रुग्णांचे उपचार म्हणजे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाने लिहून दिलेली औषधे नियमितपणे घेणे, गरजेनुसार विद्युत लहरींचा वापर करणे ही होत. उपचारांचा कालावधी रुग्णाच्या आजाराच्या प्रमाणावर अवलंबून असते. स्किझोफ्रेनियामध्ये मात्र आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. पॅरानॉईयाच्या रुग्णास डिप्रेशनमध्ये गोळ्यांच्या प्रमाणापेक्षा समुपदेशन जास्त महत्वाचे असते. डिप्रेशन काही काळापुरते असू शकते. वेळेवर व योग्य उपचाराने ते कायमचे बरे होऊ शकते. पण वेळीच उपचार न घेतल्यास असे रुग्ण आत्महत्येस प्रवृत्त होतात किंवा अन्य व्यक्तीची हत्याही करु शकतात. भावनिक, संवेदनशील व्यक्तींना डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते.
समाजात आज जीवघेणी स्पर्धा, तुलना यामुळे डिप्रेशनचे प्रमाण वाढताना दिसते. यास एकल कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी घरातील आजी, आजोबा, काका, काकू, इतर भावंडे असतात. त्यामुळे संयुक्त कुटुंबात डिप्रेशनचे प्रमाण अत्यल्प असते. आईवडिल दोघेही नोकरीला असणाऱ्या कुटुंबातील मुलांमध्येही डिप्रेशनचे प्रमाण अधिक असते. परंतु दोघांनाही नोकरी/व्यवसाय करणे आवश्यकच असेल तर त्यांनी मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. लहान मुले आपल्याला वेळोवेळी समजून घेत असतात, त्यामुळे त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र घेणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्वाच्या ठरतात.
समाजात याविषयी जागृती होण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिणे, महिला मंडळे, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये पालकसभा, कंपन्यामध्येही प्रशिक्षण घेणे असे उपक्रम डॉ. मुळे सतत करीत असतात. व्यक्तीने कार्यालयात कामाला व्यक्तीगत पातळीवर घेऊ नये तर ते सामुहिक जबाबदारी म्हणून पार पाडले पाहिजे. एकमेकांविषयी द्वेष, मत्सर असता कामा नये. एकमेकांशी सतत संवाद साधला पाहिजे. कार्यालयात निरोगी आणि पोषक वातावरण राहिले पाहिजे.
आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योगा आणि ध्यानधारणेचा फार उपयोग होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी. त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे. स्वत: डॉ. मुळेही नियमित योगासने, ध्यानधारणा करीत असतात. आपले मन हे रिकाम्या भांड्यासारखे असते. त्यात चांगले विचार टाकले तर चांगली कृती होते. नकारात्मक विचार टाकले तर व्यक्ती कृतीशून्य होते किंवा नकारात्मक बाबी करण्यास प्रवृत्त होते.
आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे आहे. आपण नशिबाला, देवाला दोष देतो. पण संकटाला संधी समजलो तर आपण ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून व्यक्तीने भविष्याचा अतिविचार न करता, वर्तमानकाळ कसा चांगला होईल हे पाहिले पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले पाहिजे.
आजकाल आईवडिल दिवसभर बाहेर राहतात. पूर्वी मुले फक्त टीव्ही पाहू शकायची पण आता इंटरनेटमुळे चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही मुलामुलींपर्यंत तत्काळ पोहोचतात. त्यामुळे पालकांनी मुलामुलींना योग्य वेळीच सर्व गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. संपूर्ण आयुष्य ही एक परीक्षा असते, हे आपण समजून घेतले पाहिजे. ताणतणावांना दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला काही ना काही छंद असला पाहिजे. आपली आवड काय आहे ? हे त्या व्यक्तीने ओळखले पाहिजे. वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे, सायकल चालविणे, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, असे काही छंद जोपासले पाहिजेत.
-देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)

Wednesday, June 13, 2018


मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत
19 ते 22 जून कालावधीत
लसीकरण मोहीम यशस्वी करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
           
नांदेड, दि. 13 :- मिशन इंद्रधनुष्य योजनेंतंर्गत लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. लसीकरणाने गरोदर माता व बालकांचे आजार टाळण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.  
            यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झीने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, मिशन इंद्रधनुष्य मोहिम कार्यक्रमात जिल्ह्यातील निवडलेल्या गावातील माता-बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत यासाठी आरोग्य विभागासह संबंधीत विभागाने प्रयत्न करावेत. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत या मोहिमेची तिसरी फेरी 19, 20 व 22 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही मोहिम नांदेड, उमरी, बिलोली, धर्माबाद, देगलूर, मुखेड, कंधार, हदगाव, किनवट व अर्धापूर या दहा तालुक्यातील 20 गावात 24 लसीकरण सत्रासाठी निवड करण्यात आलेली आहे. शुन्य ते दोन वयोगटातील बालक तसेच गर्भवती महिलांना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. डोंगरे यांनी केले. 
यापुर्वी प्रथम फेरीत 23, 24 व 26 एप्रिल या कालावधीत 259 वंचित बालकांपैकी 242 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर वंचित  61 गरोदर मातांपैकी 58 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. दुसरी फेरी 21, 22 व 24 मे 2018 या कालावधीत 166 वंचित बालकांपैकी 165 बालकांचे लसीकरण करण्यात आले तर 33 वंचित गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हास्तरावर या मोहिमेच्या अनुषंगाने आवश्यक असलेली औषधी, साधनसामुग्री, मनुष्यबळ आदीचे नियोजन केले आहे. जिल्हा व तालुकास्तर अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षकामार्फत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे संनियंत्रण करण्यात येऊन वंचित बालक व गरोदर मातांचे संपुर्ण लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
00000



राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत
विविध घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड, दि. 13 :- राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कांदाचाळ, शेडनेट, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, ट्रॅक्टर, प्लास्टिक मल्चींग, फुलपिके, मसाला पिके, हळद रोपवाटिका, आळींबी उत्पादन प्रकल्प, संरक्षित शेती (हरितगृह), हरीतगृहातील उच्च प्रतीची भाजीपाला लागवड, फुलपिके लागवड आदी घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर 20 जून 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावीत, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.
अर्ज करण्यासाठी सातबारा, होल्डींग, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बॅकेच्या पासबुकाची झेरॉक्स, विहित नमुन्यातील हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी) आदी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील लाभार्थ्यांनी सामुहिक शेततळे मंजुर करताना त्यांच्याकडे फलोत्पादन पिके असण्याबाबतची अट शिथील करण्यात येत आहे. तथापी शेतकऱ्यास पूर्वसंमती देताना संबंधीत लाभार्थ्यांने भविष्यात फलोत्पादन पिके लागवड करण्यात येणार असल्याबाबत हमीपत्र देणे बंधनकारक राहील. सन 2018-19 पासून 24 बाय 24 बाय 4 मीटर व 34 बाय 34 बाय 4.70 मीटर आकाराचे शेततळे मंजूर करण्यात येणार आहेत. या घटकांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन केले आहे.
00000000


जवाहर नवोदय विद्यालयात
अकरावीसाठी प्रवेश सुरु
            नांदेड, दि. 13 :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर ता. बिलोली येथे 11 वी विज्ञान शाखेतील रिक्त जागेसाठी ऑनलाईन अर्ज 5 जुलै 2018 पर्यंत करावीत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.    
सन 2017-18 मध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी www.nvshq.org या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. संकेतस्थळावर सविस्तर प्रवेश प्रक्रियेची पात्रता व संपुर्ण माहिती उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करावीत, असेही आवाहन केले आहे.
000000

Tuesday, June 12, 2018


बालकामगार विरोधी दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
नांदेड, दि. 12 :- जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. रॅलीस उपजिल्हाधिकारी तथा बालकामगार प्रकल्पाचे सचिव सुनिल महेंद्रकर यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.  
जागतिक बालकामगार विरोधी दिन 12 जून रोजी पाळला जातो. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत जिल्हयात 9 विशेष प्रशिक्षण केंद्र चालविले जातात. त्यामध्ये 442 बालकामगारांना शिक्षण दिले जाते. नांदेड शहरात 6 विशेष प्रशिक्षण केंद्र असून तीनशे बालकामगारांना शिक्षण दिले जाते. रॅलीत विद्यार्थी, संस्थेचे संस्थापक प्रमुख, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच नायब तहसिलदार तथा प्रभारी प्रकल्प संचालक डी. एन. पोटे, सहाय्यक कामगार कार्यालयातील कामगार अधिकारी अविनाश देशमुख व त्यांचे कर्मचारी, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती पवळे रुक्मीणी यांचाही सहभाग होता. रॅलीचा समारोप अल्पबचत भवन येथे करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पालकांनी कामाला पाठवू नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अर्धापूर, मुदखेड, भोकर याठिकाणी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला.
0000


शासकीय तंत्र प्रशाला केंद्रात
व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु
नांदेड, दि. 12 :- शासकीय तंत्र प्रशाला केंद्रातील विविध व्यवसाय अभ्यासक्रम सन 2018-19 साठी प्रवेश सुरु झाली आहेत. इलेक्ट्रीकल, ॲटोमोबॉईल व कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपनीत नौकरीची संधी प्राप्त होते. या व्यवसायाच्या मर्यादीत जागा असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, भारत गॅस एजन्सी समोर बाबानगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्र प्रशाला केंद्राचे मुख्याध्यापक यांनी केले आहे. 
00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...