Thursday, May 17, 2018


माजी सैनिकांच्या पाल्यांची  
पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी निवड
नांदेड, दि. 17 :- माजी सैनिकांच्या पाल्यांना लागू असलेली पंतप्रधान शिष्यवृत्तीची घोषणा झाली असून जिल्ह्यातील सात माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
निवड झालेले माजी सैनिकांचे पाल्य कु. कविता रामदास कदम, किनवट. कु. यशोदा गोविंदराव शेवाळकर नांदेड.  कु. वैशाली धोंडीबा कोळेकर, मुखेड.  कु. धनश्री राजेश्वर जोशी, लोहा. कु. ज्योती दिलीप व्यास, नांदेड. कु. सोनी प्रभाकर डाके नांदेड. व कु. प्रतिक्षा हनुमंतराव शिवनकर लोहा यांची नावे आहेत. यांना प्रत्येकी 27 हजार रुपये प्रतिवर्षे अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यत शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. मा. पंतप्रधान यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदनाचे प्रमाणपत्र माजी सैनिकांच्या पाल्यांना मिळणार आहे.  केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा माजी सैनिकांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे मार्गदर्शनासाठी यावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
000000


पीक कर्जमाफीचे अर्ज करण्यास 20 मे मुदत
वंचित शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 17 :-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा रविवार 20 मे 2018 पर्यंत  “आपले सरकार” या सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
काही शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करु न शकल्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. त्यानुसार 20 मे 2018  पर्यंत  “ आपले सरकार ”  पोर्टलवर किंवा शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ओटीपीद्वारा केल्यानंतरच संबंधित अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत. आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे दि. 9 मे,2018 रोजी शासन निर्णयाद्वारे या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. दि.1 एप्रिल 2001 ते 31 मार्च, 2009 पर्यत उचल केलेल्या पीक / मध्यम मुदत कर्जाची दि. 30 जून, 2016 रोजी थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 1 एप्रिल,2001 ते 31 मार्च,2016 पर्यंत इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व दि.30 जून, 2016 रोजी थकीत असलेल्या थकबाकीदार शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णय दि.9 मे,2018 च्याप्रमाणे योजनेच्या व्याप्तीत वाढ केल्यामुळे संबंधित शेतक-यांनी 20 मे, 2018 पर्यंत “आपले सरकार” सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांनी https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज भरुन  योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
000000


मान्‍सून पूर्वतयारी आढावा बैठकीचे
बचत भवन येथे आयोजन
      नांदेड, दि. 17 :- पावसाळी नैसर्गिक आपत्‍तीच्‍या संदर्भात करावयाच्‍या कार्यवाहीबाबत जिल्‍हा व तालुकास्‍तरीय खाते प्रमुखांची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शनिवार 19 मे 2018 रोजी सकाळी 11.30 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्‍यात आली आहे.
     पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्‍तींना तोंड देण्‍यासाठी आणि सावधगिरीच्‍या उपाययोजनांची पुर्वतयारी करण्‍यासाठी या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेच्यावतीने कळविले आहे.
00000


अनाथ प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 17 :- बालगृहातून बाहेर पडलेल्या ज्या अनाथ मुलांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नाहीत, अशा मुलांनी त्यांच्या शेवटच्या वास्तव्यास असलेल्या संस्थेशी संपर्क साधून ते अनाथ असल्याबाबतचा प्रस्ताव संबंधीत संस्थेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नांदेड यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
बालन्याय ( मुलांची काळजी व  संरक्षण ) अधिनियमांतर्गत राज्यात कार्यरत शासकीय, स्वयंसेवी बालगृहांमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि विशेष लाभ मिळत नसल्यामुळे अशा लाभार्थ्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र महिला व बाल विकास आयुक्तालय स्तरावरुन निर्गमीत करण्यात येणार आहे. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.    
000000




महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा
        नांदेड, दि. 17 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 18 मे 2018 रोजी औरंगाबाद येथून मोटारीने सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने मातोश्री मंगल कार्यालय सिडको रोड कौठा नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. आगमन व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. गणपतराव राऊत यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- मातोश्री मंगल कार्यालय सिडको रोड कौठा नांदेड. त्यानंतर सोईनुसार मोटारीने मातोश्री मंगल कार्यालय सिडको रोड कौठा नांदेड येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.
00000

Wednesday, May 16, 2018


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 16 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 21 मे 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. त्यानुसार सोमवार 21 मे रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

Monday, May 14, 2018


सामान्य व्यक्तींच्या समस्या जाणून
बँकेशी संबंधीत कामे पूर्ण करावीत  
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
       
नांदेड दि. 14 :- शेतकरी व सामान्य व्यक्तींच्या समस्या जाणून त्यांची बँकेशी संबंधीत कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. जिल्हास्तरीय बँक समितीची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी आ. वसंत चव्हाण, आ. सुभाष साबणे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, शेतकरी व गरीब व्यक्ती सावकाराकडे जाणार नाही यासाठी त्यांची कर्ज प्रकरणे निकाली काढावीत. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून मिळणारी रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये. बँकेकडे जी गावे दत्तक नाहीत ती गावे बँकांना दत्तक देण्यात यावीत. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकांनी सकारात्मक राहून पुढे यावे. बँकांनी पिक कर्ज वाटप त्वरीत करुन कर्ज वितरणाचे उद्दीष्ट पुर्ण करावीत, अशी सुचना त्यांनी केली.  
           
यावेळी जिल्ह्यातील सन 2017-18  पिक कर्ज व इतर कर्ज व शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेण्यात आला. सन 2018-19 मधील पिक कर्ज वितरणाची कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान नाबार्डद्वारा नांदेड जिल्ह्यासाठी प्रकाशीत डेअरी व शेळीपाल यावर क्षेत्रीय विकास योजना पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीस बँकेचे व संबंधीत कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. शेवटी वित्तीय साक्षरात समन्वयक श्री घेवारे यांनी आभार मानले.
000000



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...