Wednesday, April 11, 2018


जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी   
अर्ज सादर करण्याचे आवाहन
               नांदेड,दि. 11 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्काराचे प्रस्ताव शुक्रवार 13 ते 20 एप्रिल 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे प्राप्त होतील, असे आावाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
               जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, गुणवंत खेळाडू पुरस्कार-2 (एक महिला व एक पुरुष) यांचे कार्य / योगदानाचे मुल्यमापन करुन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार 2017-18 वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती नांदेड यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
               पुरस्कारासाठी अर्जदाराचे राज्यात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे. संबंधीत जिल्ह्यात क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य असले पाहिजे. क्रीडा संघटक, कार्यकर्त्यांने सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे. वयाची 30 वर्ष पुर्ण असणे आवश्यक असून गुणांकनासाठी जिल्ह्यातील खेळाडुंची कामगिरी ग्राह्य धरली जाईल. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्ण 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. तसेच या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी शालेय व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 1 ऑक्टोंबर 2012 www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

Tuesday, April 10, 2018



पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून  
आरोग्याविषयी ग्रामीण मुलींचे प्रबोधन   
नांदेड , ‍दि. 10 :- अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 8 वी, 9 वी व दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थींना तसेच ग्रामीण महिलांना सॅनेटरी नॅपकीन वापरासंदर्भात व आरोग्य विषयक प्रबोधन करण्यासाठी पॅडमॅन चित्रपटाचे आयोजन नुकतेच जिल्ह्यातील 70 शाळेत करण्यात आले होते. यात जवळपास 8 हजार 562 विद्यार्थींनींनी सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील महिला स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुक होत आहेत, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000


जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेची
प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावीत 
नांदेड , ‍दि. 10 :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील इयत्ता 6 वीची प्रवेश परीक्षा शनिवार 21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्ह्यातील संबंधीत 39 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ज्या सेतू केंद्रातून प्रवेश अर्ज केला तेथून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावीत. ज्यांनी ऑफलाईन प्रवेश अर्ज शाळेमार्फत केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संबंधीत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शाळा मुख्याध्यापकांनी प्राप्त करावीत. प्रवेशपत्र प्राप्त होताच संबंधीत विद्यार्थ्यांना त्वरीत वाटप करावीत. पालक, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.
00000


जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेची
शनिवारी बचत भवन येथे बैठक
नांदेड , ‍दि. 10 :- शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालायाच्या इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षेच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार 13 एप्रिल 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे होणार आहे. बैठकीस जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व परीक्षा केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी यांचेसह संबंधीत विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.  जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा शनिवार 21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वा. नांदेड जिल्ह्यातील 39 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. याबाबत परीक्षा केंद्र, साहित्य वाटप व नियोजनाची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


जलयुक्‍त शिवार अभियानातून
शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान    
                                                - जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे
              
नांदेड,दि. 10 :- जलयुक्त शिवारच्या कामातून पाणी साठ्यात वाढ होत असून शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत विविध कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे संपन्‍न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
               यावेळी सहाय्यक जिल्‍हाधिकारी अजित कुंभार, जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपाली मो‍तीयेळे, डॉ. सचिन खल्‍लाळ, व्‍ही. एल. कोळी, एन. एच.गायकवाड, प्रभोदय मुळे, सर्व तहसीलदार , नायब तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी तसेच जिल्‍हा व तालुका विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
               बैठकीत जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत सन 2017-18 ची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
               जिल्‍ह्यात सन 2016-17 मध्‍ये 226 गावात 8 हजार 552 कामे पूर्ण झाली आहेत. तर सन 2017-18 मध्‍ये 183 गावे प्रस्‍तावित आहेत. 5 हजार 424 कामांपैकी एकूण 2 हजार 708 कामे पूर्ण झाली आहेत. जिल्‍ह्यात 380 कामे प्रगतीपथावर असल्‍याची माहिती यावेळी दिली.  
00000

Monday, April 9, 2018


केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड , ‍दि. 9 :- केळीच्या पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असले तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. पानाचा प्राद्रुर्भावग्रस्त भाग काढून टाकावा. झाडावर प्रोपीकोनेझॉल 0.05 टक्के ( 0.5 मिली ) + मिनरल ऑईल 1 टक्के (10 मिली ) प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. जर केळीच्या अपरिपक्कव केळावर छोटे लालसर ठिपके खालील भागावर आढळून येत असल्यास 10-15 फुलकिडी / झाड आहेत, असे समजून व्हर्टीसोलियम लेकॉनी ( 2 बाय 108 सीएफयु / जी ) 3 ग्रॅम / लिटर + स्टीकर 1  मिली / लि. किंवा निमार्क 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
0000000


बीएड प्रवेशासाठी
सीईटी परीक्षेचे अर्ज भरणे सुरु
नांदेड , ‍दि. 9 :-  शैक्षणिक वर्षे 2018-19 मध्ये दोन वर्षीय बीएड कोर्ससाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सीईटी परीक्षा 9 व 10 जून 2018 रोजी होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 9 मे 2018 अंतिम मुदत आहे.
यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये परीक्षा शुल्क आहे. पदीव प्राप्त किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावीत. अधिक माहितीसाठी शासकीय अध्यापक महाविद्यालय स्वातंत्र्य सैनिक कॉलनी शोभानगरजवळ नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी केले आहे.
0000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...