Tuesday, January 23, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाज भूषण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 23 :- जिल्हयातील अस्पृश्यता निर्मुलनार्थ दलित व इतर समाजातील समाज सेवक आणि स्वयंसेवी संस्था यांना सन 2018-19 या वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयातील कलावंत, प्रतिष्ठीत नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांचेकडून प्रस्ताव शुक्रवार 9 फेब्रुवारी 2018 पर्यंत मागविण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ता यांनी दलित समाज आदी सामाजिक, दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत. पुरस्कारासाठी जात, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. सामाजिक क्षेत्रात किमान 15 वर्ष कार्य असावे. वय पुरुष कार्यकर्त्याचे किमान 50 वर्ष आणि महिलासाठी  40 वर्षापेक्षा कमी नसावे. एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजल्या जाणार नाहीत. पुरस्कारासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणताही पदाधिकारी पात्र असणार नाहीत. सक्षम अधिकारी , पोलीस अधीक्षक नांदेड यांचेकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. समाज कार्य बाबतचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र  जोडण्यात यावा.
स्वयंसेवी संस्थेसाठी समाज कल्याण क्षेत्रात दलित समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय अत्याचार व अस्पृश्यता निर्मुलन, अंधश्रद्धा रूढी निर्मुलन जनजागरण इत्यादी कार्य करणा-या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल. तसेच सामाजिक कार्याचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र जोडावा. संस्था पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 सोसायटी रजिस्ट्रेशन नुसार पंजीबद्ध असावी. समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य 10 वर्षापेक्षा अधिक असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल. संस्थेचे कार्य राजकारण व पक्षापासून अलिप्त व स्वतंत्र असावे. पाच वर्षाचा अहवाल जोडणे आवश्यक आहे.संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्याबाबतचे सक्षम अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
इच्छूक सामाजिक कार्यकर्ता व संचालक स्वयंसेवी संस्था यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक रोड, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड यांचे कार्यालयात विहित नमुना व आवश्यक माहिती प्राप्त करून घेवून आपला प्रस्ताव 9 फेब्रुवारी  पर्यंत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे. 

000000
वित्त आणि नियोजन, वने मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
 नांदेड दि. 23 :- राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 व 28 जानेवारी 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 27 जानेवारी 2018 रोजी नागपूर येथुन शासकीय विमानाने सकाळी 9.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. लोकतंत्र सेनानी संघ-मेळाव्यास उपस्थिती स्थळ- वासवी माता परमेश्वरी भवन, कॅन्सर हॉस्पीटल जवळ सिडको रोड नांदेड. दुपारी 12 वा. श्री नगरेश्वर वैश्य मंदिर आयोजित आर्य-वैश्य समाज उपवर-वधू परिचय मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनॉल रोड, नांदेड. सायं. 6 वा. भाजपा व्यापारी आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- गुरुकृपा मार्केट महावीर चौक नांदेड. रात्री नांदेड शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
रविवार 28 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वा. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनास उपस्थिती स्थळ- श्री हनुमान मंदिर विजयनगर प्रांगण नांदेड. दुपारी 12 वा. श्री नगरेश्वर वैश्य मंदिर आयोजित आर्य-वैश्य समाज उपवर-वधू परिचय मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- चांदोजी पावडे मंगल कार्यालय कॅनॉल रोड नांदेड. सायं. 7 वा. नांदेडहून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करतांना
वैयक्तीक माहिती गोपनीय ठेवावी
माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 23 :- नागरिकांनी ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन शॉपींग आणि सोशल मिडियाचा वापर करतांना आपल्या खात्यासंबंधी वैयक्तीक माहिती गोपनीय ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. "महाराष्ट्र सायबर" ट्रान्सफॉर्मिग अंतर्गत माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर सुरक्षेविषयक प्रशिक्षणाचे आयोजन सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांनी सायबर गुन्ह्याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.  
यावेळी पोलीस निरीक्षक श्री शहाणे म्हणाले, नागरिकांनी मोबाईलवर येणाऱ्या फसव्या फोन कॉल्स पासून सावध रहावे, बक्षीस किंवा लॉटरी संदेशाकडे दुर्लक्ष करावे, एटीएमकार्ड व पासवर्ड काळजीपूर्वक वापरावे. वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी, मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित https आणि पॅडलॉक असलेल्या संकेतस्थळाचाच वापर करावा. ऑनलाईन शॉपींग करताना सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा. एटीएम मशीनमध्ये कार्ड वापरताना त्याठिकाणी यंत्र चिटकवले आहे काय ? याची खात्री करुन एटीएम कार्ड वापरावे. एटीएम मशीनच्या ठिकाणी किबोर्डच्या दिशेने सुक्ष्म कॅमेरा बसविण्यात आलेला नाही याची खात्री करावी. पीनकोड अनओळखी व्यक्तीला दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. बॅक खात्यासंबंधी माहितीची पावती कचऱ्यात न टाकता वापर झाल्यानंतर पावती नष्ट करावी किंवा अनोळखी व्यक्तीच्या हाती पडणार नाही याची दक्षता घ्यावी. मौल्यवान वस्तु एटीएम सेंटरमध्ये विसरुन जाऊ नये. बँक खातेधारकांना कधीही एटीएम संबंधी माहिती फोनवर विचारल्या जात नाही. अशावेळी फोनवर एटीएम संबंधी विचारणा करणाऱ्या व्यक्तीला माहिती न देता नजीकच्या बँक शाखेत संपर्क करावा. सोशल मिडिया वापरताना धार्मिक, जातीय, राजकीय, सामाजिक भावना दुखावतील असे मजकूर, छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप्स तयार करुन पोस्ट करणे, लाईक, शेअर, कमेंट, फॉरवर्ड, प्रसारित करणे हा दंडनिय व दखलपात्र गुन्हा आहे. सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास तात्काळ डिलीट करावी, असे सांगितले.
या संबंधीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत जवळच्या बॅक शाखेशी किंवा पोलीस स्टेशनशी त्वरीत संपर्क साधुन तक्रारी करावी.  सायबर गुन्ह्याचे प्रकार फिशींग, हॅकींग, पोर्नोग्राफी, सोशल मिडिया वापर, एटीएम फ्रॉड आदी विषयी माहिती देऊन नागरिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर क्राईम पासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्री शहाणे यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने फसवणूक झालेल्या नागरिकांच्या चुकांबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सिरसेवाड, श्री राठोड, जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, काशिनाथ आरेवार यांनी केले. यावेळी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.   
00000


Monday, January 22, 2018

लघु उद्योग घटकांना
जिल्हा पुरस्काराचे वितरण
 नांदेड दि. 22 :- लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते  सोमवार 29 जानेवारी 2018 रोजी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन नांदेड येथे सायं. 5 वा. होणार आहे. यावेळी अधिक्षकीय उद्योग अधिकारी उदय पुरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
उद्योग संचालनालयाच्या जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत सन 2017 च्या जिल्हा पुरस्कारासाठी निवड झालेल्या नांदेड जिल्ह्यातील लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यात प्रथम पुरस्कार देगलूर तालुक्यातील खानापुर येथील श्रीकांत मेडीवार यांचे मे. श्री साई ॲग्रो इंडस्ट्रीज, तर द्वितीय पुरस्कारात नांदेड येथील दुर्गाचारी चेनाजोलू यांचे ओम नृसिंह ट्रॅक्टर ट्रॉली ॲड ॲग्रीकल्चर इक्वीपमेंट मॅन्युफॅक्चर नांदेड यांना वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी संबंधीत नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गौतम लाडे यांनी केले आहे.

00000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 22 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्यानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्याच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आला आहे. त्यांनी असे खराब झालेले , माती लागलेले जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

000000

Sunday, January 21, 2018

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
यांच्याकडून योगेशच्या कुटूंबियांचे सांत्वन
नांदेड दि. 21 :- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भिमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या योगेश जाधव या तरुणाच्या हदगाव तालुक्यातील आष्टी येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी राज्यमंत्री श्री आठवले यांनी योगेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली यावेळी वडील श्री प्रल्हाद, आई सौ. संगिता, भाऊ विशाल यांची उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा केल्याचे सांगून राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून जाधव कुटुंबियाना शेतजमीन, घरकुल, लहान भावास नौकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून योगेशच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु असून शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहे, अशा भावना राज्यमंत्री श्री आठवले यांनी यावेळी व्यक्त केल्या.     
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने एकुण 5 लाखाची मदत जाहीर करुन त्यापैकी योगेशच्या कुटुंबियांना यावेळी 2 लाख रुपये रोख दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संदिप कुलकर्णी, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, रिपब्लिकन पक्षाचे गौतम भालेराव, वसंत मुळे, बाबुराव कदम, विजय सोनवणे, गौतम काळे, शरद सोनवणे, मिलींद शिराढोणकर यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते.

0000

Saturday, January 20, 2018

टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्ये भाग घेण्याची संधी ;  
खेळाडुंसाठी गेल इंडियन स्पिड स्टार चाचणीचे आयोजन    
नांदेड दि. 20 :- सन 2020 टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्यें भाग घेण्याकरीता खेळाडुंसाठी गेल इंडियन स्पिड स्टार चाचणीचे आयोजन बुधवार 24 जानेवारी 2018 रोजी यशवंत महाविद्यालय मैदान नांदेड येथे सकाळी 7.30 वा. करण्यात आले आहे. या चाचणीत विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंचे राज्यस्तरीय शिबीर व निवड चाचणीसाठी निवड केली जाईल. राज्यस्तर चाचणीत विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी निवड करण्यात येईल. या खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सो. लि. या संस्थेने गेल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीच्या सहकार्याने भारतातील वेगवान धावकांची निवड करुन या धावकांना सन 2020 च्या टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्ये सहभागी होण्याकरीता अद्यावत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.  
निवड चाचणी जिल्हयातील सर्व खेळाडूंची होईल. चाचणीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या (कमीत-कमी 25 मुले- 25 मुली व जास्तीतजास्त कितीही) खेळाडू मुले-मुली यांना क्रीडा शिक्षकासह चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडू मुले-मुली व शिक्षकांना प्रमाणपत्र दिले जाईल. चाचणी  धावणे प्रकार- 100 मी., 200 मी. व 400 मी.धावणे, वयोमर्यादा गट (मुले / मुली) - 11 ते 14 वर्षे- जन्मतारीख 1 जानेवारी 2004 ते 31 डिसेंबर 2006 व 15 ते 17 वर्षे - जन्मतारीख 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2003 अशी राहील. ऑनलाईन नोंदणी  www.nycsindia.com, bhaskrdoibale@gmail.com या ई-मेल आयडीवर नोंदणी करावी.
निवड चाचणीकरीता तांत्रीक प्रमुख प्रलोभ कुलकर्णी- 8625021219 हे राहणार आहेत. यासाठी अधिक माहिती करीता- अनिरुध्द शिरसाठ (जिल्हा समन्वयक, एन.वाय.सी.ए.)- 9764022299, विक्रांत खेडकर-  8379063999, भास्कर भा.डोईबळे- 9975209438 यांचेकडे संपर्क करावा. सबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आपल्यास्तरावरुन मुले-मुली खेळाडूंस उपस्थित ठेवण्याकरीता आदेशीत करावे व शाळा बाह्य मुले-मुली खेळाडूंनी पालकाचे संमतीपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
शारीरिकदृष्टया सक्षम खेळाडू मुले-मुली यांना देखील या चाचणीसाठी पाठवावे. खेळाडू सोबत पाणी बॉटल, जेवणाचा डब्बा, आवश्यक क्रीडा साहित्य असणे आवश्यक आहे.  खेळाडूचे आधार कार्ड, मुख्याध्यापक, पालकाचे संमतीपत्र, शाळेतील सहभागी खेळाडू यादी सोबत आणावीत. प्रवास खर्च स्वत: करावा लागेल.
            निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, मारोती सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण व अनिरुध्द शिरसाठ (जिल्हा समन्वयक, एन.वाय.सी.ए.) हे तांत्रीक समिती सदस्य संयोजन करीत आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...