Friday, May 5, 2017

जिल्‍हयात वंचित समुहातील नागरिकांची
मतदार यादीत नोंदणीची मोहीम
            नांदेड दि. 5 :- भारत निवडणूक आयोगाने प्रत्‍येक पात्र व्‍यक्‍तीची मतदार यादीत नोंदणी व्‍हावी यादृष्‍टीने मोहीम राबविण्‍यासाठी सूचना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार जिल्‍हयात प्रत्‍येक पात्र व्‍यक्‍तीची मतदार यादीत नाव नोंदणविण्‍यासाठीची मोहीम सुरु करण्‍यात आलेली आहे. या मो‍हिमेत विशेषत कामगार, हमाल, कचरा वेचणारे, दिव्‍यांग व्‍यक्‍ती आदींची यादीत नावे नोंदविण्यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
            या मोहिमेअंतर्गत नांदेड तहसिल व सेवाभावी संस्‍था यांच्‍या मदतीने शहरात कचरा वेचणारे यांची नावे मतदार यादीत नोंदविण्‍यासाठी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. यास अत्‍यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्‍ये जवळपास 102 पात्र व्‍यक्‍तीचे मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठी अर्ज भरुन घेण्‍यात आले तसेच विविध क्षेत्रात काम करणारे कामगार यांचीही कामगार दिनाच्‍या निमीत्‍ताने नोंदणी करण्‍यात आली आहे. जवळपास 211 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. वरील प्रमाणे नोंदणीनंतर सर्व पात्र अर्जदाराना लवकरच मतदान ओळखपत्राचे वाटप करण्‍यात येणार आहे.
            याशिवाय सर्वच तालुक्‍यांमध्‍ये वंचीत व्‍यक्‍तीची नावे मतदार यादीत नोंदविण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. यामध्‍ये बीएलओ हे झोपडपटृी, तात्‍पुरत्‍या निवा-यात राहणा-या व्‍यक्‍तींना भेट देवून त्‍यांची नावे यादीत नसल्‍यास त्‍यांचेकडून अर्ज भरुन घेण्यात येत आहेत, अशी माहितीही उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नांदेड यांनी दिली आहे.

000000
"नीट" परीक्षा सीबीएसईच्या नियमावलीनुसार
काटेकोरपणे सुरळीत पार पाडावी - जिल्हाधिकारी डोंगरे





नांदेड दि. 5 :- "नीट" ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारी ही एक महत्वपूर्ण परीक्षा आहे. त्यामुळे सीबीएसईच्या नियमावलीनुसार कोटेकोर नियोजन करुन परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परिक्षा "नीट"  देशभरात रविवार 7 मे 2017 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने होरायझन डिस्कव्हरी अकॅडमी येथे आयोजित "नीट" परीक्षा पर्यवेक्षक कार्यशाळेत जिल्हाधिकारी डोंगरे बोलत होते. 
नांदेड येथे यावर्षी पहिल्यांदाच केंद्र मंजूर झाल्यानंतर "नीट" परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी 13 हजार 700 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 35 केंद्रांवर परीक्षा होणार आहे.  ही परीक्षा व्यवस्थीत पार पाडण्याची जबाबदारी पर्यवेक्षकांनी समर्थपणे पेलावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केले.  
            याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्ताबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक विश्वेश्वर नांदेडकर यांनी दिली. होराझनचे प्राचार्य तथा नीट परीक्षा शहर समन्वयक प्राचार्य फनिद्र बोरा यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून पर्यवेक्षकांना सविस्तर मार्गदर्शन करुन शंकेचे निरसन केले.
आर.सी.एम.टी. ग्रुपचे सचिव ॲड संजय रुईकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. चारी, तंत्रनिकेतनचे प्राचार्य अशोक कामठाणे,  मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष शिरसाट तसेच होरायझनचे उपप्राचार्य प्रवीणकुमार उपस्थित होते. मुरलीधर हंबर्डे यांनी सुत्रसंचालन केले.

000000

Thursday, May 4, 2017

"नीट" परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 
नांदेड, दि. 4 :- "नीट" परीक्षा 2017 ही रविवार 7 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधीत नांदेड शहरातील एकूण 35 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 7 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स मशीन आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
कर्मचारी निवड आयोगाच्या मल्टी टास्कींग पदाच्या
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 
नांदेड, दि. 4 :- भारत सरकार कर्मचारी निवड आयोगाची मल्टी टास्कींग परीक्षा-2016 ही रविवार 14 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते 4 यावेळेत नांदेड शहरातील एकूण 11 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात सदरच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स मशीन आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
जिल्हयातील सर्व न्यायालयात
8 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणे मिटविण्याची संधी

नांदेड दि. 4 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तर्फे 8 जुलै, 2017 रोजी जिल्हा न्यायालय, नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी प्रकरणे भूसंपादन प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, मनपा, नपा प्रकरणे, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे, तसेच विविध बॅंकांची, प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मनपा अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बॅंक अधिकारी व संबंधित सर्व पक्षकार यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत आपली जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढून आपला पैसा, वेळ वाचवावा व सदर राष्ट्रीय लोकअदालतीच्या रूपाने चालून आलेल्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
मागील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मिळालेले यश पाहता यावेळी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव न्या. एस.आर.नरवाडे यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात व दाखल पुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड या कार्यालयाकडे फक्त एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलीही फिस आकारण्यात येणार नाही. आपले आपसातील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रुपाने सुवर्ण संधी चालून आली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने केले आहे.

000000
समाज कल्याणच्या निवासी शाळेत प्रवेश सुरु 
            नांदेड दि. 4 :-   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नायगाव खै. येथील अनुसूचित मुलांची शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक सन 2017-18 साठी इयत्ता सहावी ते दहावी मधील सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  
            अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी या शाळेत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज भरुन देण्याची अंतिम तारीख शनिवार 10 जून 2017 आहे. हे प्रवेश शासनाच्या सामाजिक आरक्षणानुसार ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार दिले जाणार आहेत, असे नायगाव खै. येथील अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. चरकेवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

लेख -

  वीज अंगावर पडू नये, यासाठी बचावाच्या उपाययोजना
दरवर्षी जगात विजा पडून होणाऱ्या मृत्‍युंचे प्रमाण खपूच जास्‍त आहे. नांदेड जिल्‍हयात वारंवार विजा पडून मोठया प्रमाणावर वित्‍त आणि जीवीतहानी झालेली आहे. ही बाब चिंतेचे कारण बनलेली आहे. याबाबत सखोल संशोधन करण्‍यासाठी भारतीय उष्‍णदेशीय मौसम विज्ञान संस्‍थान, पृथ्‍वी विज्ञान विभाग भारत सरकार, पुणे येथील दोन वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञांनी नांदेड जिल्हयातील वीज प्रवण गावांना भेटी दिल्‍या होत्‍या. त्‍यांचा संशोधनाचा अहवाल जिल्‍हा प्रशासनास पाठविलेला होता. त्‍यांच्‍याद्वारे स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या विजपात पूर्वसूचना  Lightning Information & Predicition System (LIPS) देणारी यंत्रणा व त्‍याचे सेंसर स्‍थापित करण्‍यात आले आहेत. एखादया ठिकाणी विजांचा कडकडाट होत असेल तर ही प्रक्रिया आजुबाजुला पसरते आणि ही यंत्रणा 200 कि.मी. परिक्षेत्रात याची पूर्व सूचना देते. त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून तेथील यंत्रणेला दूरध्‍वनी, मोबाईल आणि व्‍हॉटस्अप प्रणालीवर संदेश प्रसारीत करुन जास्‍तीत जास्‍त एक ते दीड तास आधी याची पूर्वसूचना देवून संभावीत धोका आणि होणारी वित्‍त व जीवीतहानी टाळता येणे शक्‍य होते. हे संदेश आपल्‍याव्‍दारे सुद्धा पुढे प्रसारीत होणे आवश्‍यक आहे.
मान्‍सून सक्रिय होण्‍याच्‍या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्‍या काळात विजा कोसळण्‍याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्‍याच्‍या आधी साधारणत: दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेच्‍या सुमारास आकाशात अचानक ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्‍यामुळे शेतात काम करीत असलेल्‍या शेतक-यांचा, मजुरांचा आणि जनावरांच्या अंगावर विजा पडून मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना नियमितपणे घडतात. उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्‍यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्‍याही परिस्थितीत घेवू नये.  याबाबत तहसीलस्‍तरावर वेळोवेळी घेण्‍यात येणा-या तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, सरपंच, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षण, वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदींना विजेबाबत माहिती दिल्यास व सूचना फलकावरही माहिती डकविल्‍यास मोठया प्रमाणावर जनजागृती होते.
विजापासून सुरक्षित राहण्‍यासाठी सूचविण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत.      कोसळणारी वीज ही उंच वस्‍तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्‍या वस्‍तूवर जास्‍त आकर्षित होते.
 हे टाळा :- एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्‍त धोका झाडाखाली थांबल्‍यामुळे उद्भवतो ज्‍यांच्‍या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्‍या असतात.  निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.  झाडाच्‍या जवळ किंवा खाली उभे राहिल्‍यामुळे मनुष्‍याला अशा प्रकारे ईजा होण्‍याची, दगावण्‍याची शक्‍यता असते. धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकु, गोल्‍फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्‍या वरच्‍या बाजुला  असल्‍यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्‍यात.
अचानक होणा-या वीज वादळापासून स्‍वत:चा बचाव करण्‍यासाठी पुढील सूचना पाळाव्‍यात. तात्‍काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेउन त्‍यांना दोन्‍ही हातानी आवळुण ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्‍यांवर टेकवावी.
विजा चमकत असताना किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाल्‍यास काय करावे व   काय करु नये - विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन दूर राहावे. यात आगीचे स्थान, वाहनाचे रेडीएटर्स, स्‍टोव्‍ह, धातुचे पाइप, धातुचे वाँश बेसीन, मोबाइल फोन इत्‍यादी. विजा चमकत असताना विद्युत प्‍लगमध्‍ये कोणत्‍याही ईलेक्ट्रॉनिक वस्‍तूची जोडणी देण्‍यात येवू नये. जसे हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर. जर वीज आपल्‍या घरावर कोसळली तर त्‍यातील प्रभार प्‍लगच्‍या माध्‍यमातून विद्युत प्‍लगमध्‍ये येवू शकते. विजा चमकत असताना मोबाईल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्‍ही, दुरध्‍वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे आकर्षित होवू शकते. चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत असताना त्‍यातुन बाहेर येवू नये.
धातुंच्‍या वस्‍तू विजा चमकत असताना त्‍या घेवून बाहेर जावू नये. जसे छत्री, धातुंची भांडी इत्‍यादी. पाण्‍यात असल्‍यास त्‍वरीत बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्‍यास त्‍यातून लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्‍वरीत सुरक्षित आसरा घ्‍यावा. इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्‍ध नसल्‍यास गुफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्‍ध झालेच नाही तर उंचीच्‍या वस्‍तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनिला टेकून बसा. उंचझाड वीजपाताला आकर्षित करतात. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्‍यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्‍वचेला मुंग्‍या, झिणझिण्‍या आल्‍यासारखे वाटते. तेंव्‍हा समजून घ्‍यावे की, वीज आपल्‍यावर पडणार आहे यावेळी त्‍वरीत आपल्‍याला जमिनीवर बसलेल्‍या मुद्रेत जावे. या विविध उपाययोजनांमुळे वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्‍युंचे प्रमाण कमी करण्‍यासाठी मदत होईल व वादळी विजांपासून आपला जीव वाचू शकेल.
- संकलन काशिनाथ र. आरेवार
 जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

                                                            000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...