Wednesday, March 8, 2017

  मृदपरीक्षक ( मिनीलॅब ) पुरवठा योजनेसाठी
प्रस्ताव मागविले; 14 मार्च मुदत
नांदेड, दि. 8 :- राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य व्यवस्थापन योजना 2016-17  अंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), कृषि चिकित्सालय, अशासकीय संस्था (NGO), शेतकरीगट यांना मृदपरिक्षक (मिनीलॅब) चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी मंगळवार 14 मार्च 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी खासगी संस्था, लाभधारक यांना 16 तालुक्यासाठी 62 मृद परिक्षक (मिनीलॅब) चालविण्यासाठीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यासाठी मृदपरिक्षक (मिनीलॅब) च्या एकुण किंमतीच्या 60 टक्के किंवा जास्तीतजास्त 45 हजार रुपये प्रतिनग याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य व्यवस्थापन योजना 2016-17  अंतर्गत खताच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना मिळण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीची मृद आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. यासाठी सन 2016-17 मध्ये मृदपरिक्षक (मिनीलॅब) च्या माध्यमातुन गावातच शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका उपलब्ध होण्यासाठी इच्छूक संस्था, लाभधारक यांना मृद परिक्षकाचा (मिनीलॅब) अनुदानावर पुरवठा शासन करणार आहे. मिनीलॅबमार्फत एकुण 12 घटकांचे परिक्षण करता येते. मिनीलॅबचे  सर्व  साहित्य एका लहान पेटीमध्ये बसवलेले असते. ही मिनीलॅब भारतीय कृषि अनुसंधान परीषदेने संशोधीत केलेली आहे. अत्यंत उपयोगी अशी ही मिनीलॅब आहे.
जमीन आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत मृद परिक्षक (मिनीलॅब) चालविण्यासाठी जिल्ह्यातील संस्थेची निवड जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येईल. सर्वसाधारणपणे संस्थेने कृषिक्षेत्राशी निगडीत केलेले काम, संस्थेकडे तज्ज्ञ मनुष्यबळ, जागेची उपलब्धता, आर्थिक स्थिती, लेखा परिक्षण अहवाल आदी बाबीचा निवड करताना विचार करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या संस्थेवर संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचे तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण राहील. संस्थेसोबत पुढील पाच वर्ष मृद परिक्षक चालविण्याचा सामंजस्य करारनामा संबंधीत संस्था व जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्यात करण्यात येईल.
संस्थेची निवड करताना नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), कृषि चिकित्सालय, अशासकीय संस्था (NGO), शेतकरीगट असा प्राधान्यक्रम राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक संस्थांनी मंगळवार 14 मार्च 2017 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयास संबंधितांनी अर्ज सादर करावेत. अधिक माहिती व तपशीलासाठी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000000
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा
महिला मतदार अभियानांतर्गत ओळखपत्रांचेही वितरण
नांदेड, दि. 8 :-  जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, आरोग्य शिबीर, विविध स्पर्धा तसेच महिला मतदार जागृती अभियानात नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.


कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार किरण अंबेकर, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, सहायक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांच्यासह जिल्हा महसूल प्रशासनातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना प्र. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, महिला या सबलाच आहेत. त्यांच्याकडे परिस्थितीवर मात करण्यासाठीची मोठी इच्छा शक्ती असते. त्यामुळेच त्या दैनंदिन जीवनात अनेक भुमिका बजावूनही त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात. महिलांच्या या शक्तीचे समाज सदृढ आणि राष्ट्राच्या विकासात नक्कीच मोठे योगदान आहे. याप्रसंगी श्री. पाटील यांनी महिला मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत , अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सुरवातीला मीना सोलापुरे यांनी शक्तीगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती ढालकरी यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांचे समयोचित भाषण झाले. महिला मतदार जागृती अभियानांतर्गत नांदेड तहसील कार्यालयाकडून नोंदविण्यात आलेल्या नवमतदारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी ॲड. छाया कुलकर्णी यांचे महिलाचे अधिकार व समस्यांबाबत व्याख्यानही झाले. कार्यक्रमात श्रीमती ढालकरी, तहसीलदार संतोषी देवकुळे, ज्योती पवार, नायब तहसीलदार उषा इजपवार, उर्मीला कुलकर्णी, यांच्यासह चंदक्रला यमलवाड, सोलापुरे, वंदना गवळी, अनुपमा मुधोळकर, अनुराधा सुरेवाड, रेणुका पांडे, स्वाती पेदेवाड, अनिता काळे, उषा कदम, वंदना यमलवाड यांचाही सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेचे पारितोषिक वितरणही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांच्या हस्ते झाले.
तत्पुर्वी प्र.जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त ध्वजारोहणही करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कक्ष व अधिकारिणी कक्ष यांचेही उद्घाटन करण्यात आले. डॅा. ललिता सूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले.

00000000

Tuesday, March 7, 2017

ग्राहक मार्गदर्शन शिबिरात
ग्राहकोपयोगी विषयांवर मार्गदर्शन
     नांदेड दि. 7 :-  जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने ग्राहक संरक्षण उपक्रमांतर्गत भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राहकांसाठीच्या मार्गदर्शन शिबिरात  ग्राहकांना दुध, अन्नपदार्थ यामध्ये असलेली भेसळ, वजनमापातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणुकदार कसे बनावे, दुरसंचार सेवा, बांधकाम, व्यावसायिकांविरुद्धच्या तक्रारी याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. तहलिसदार कार्यालय नांदेड येथे बहुउद्देशीय सभागृहात शिबीर संपन्न झाले.
याप्रसंगी ग्राहक संरक्षण मंचाचे अध्‍यक्ष श्री. बिडवई, तहसिलदार किरण अंबेकर, सहायक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, श्री. कमटलवार, उद्योजक हर्षद शहा, श्री. पाळेकर, श्री. पांचाळ, श्री .येसगे, श्रीमती वाखरडकर, श्रीमती माढेकर आदींची उपस्थिती होती.
शिबिरात ग्राहकांना दुध, अन्‍नपदार्थ यामध्‍ये असलेली भेसळ कशी ओळखावी, वजनमापातील फरक, ग्राहकांची फसवणुक झाल्‍यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणुकदार कसे बनावे, दुरसंचार सेवा, बांधकाम, व्‍यावसायिकाविरुध्‍दच्‍या तक्रारींच्या कार्यवाही बाबत मार्गर्शन करण्यात आले. भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्‍था मुंबई या संस्‍थेचे सहसचिव दिनेश भंडारे व त्‍यांचे सहकारी श्रीमती आनंदिता कौर, श्री. दिक्षीत, प्राची मयेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्राहकोपयोगी गोष्‍टींवर उपस्थिताचे शंका समाधान केले. तक्रारींचे योग्‍य प्रकारे निराकरण करणे, त्‍याचप्रमाणे लहान बचत सुरु करुन पुढे हुशार गुंतवणुकदार कसे बनावे याचेही मार्गदर्शन करण्‍यात आले.
फसवणूक झाल्‍यास तक्रार कुठे व कशी करावी, ग्राहक न्‍यायालय, माहितीचा अधिकार, शैक्षणिक व आर्थीक नियोजन, विमा, बँक, प्रवासाची साधने, मालमत्‍ता, दुरसंचार सेवा, विद्युत उपकरणे इत्‍यादी ठिकाणी होणाऱ्या फसवणुकीमध्‍ये दाद कुठे व कशी मागावी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. सुरवातील तहसिलदार श्री. अंबेकर यांनी प्रास्ताविक केले. शिबिरास ग्राहक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000
स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी बौध्दिक,
मानिसकदृष्टया सक्षम राहणे आवश्यक - कारभारी
नांदेड दि. 7 :- सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बौध्दिकदृष्टया सक्षम होण्यासोबतच मानिसक दृष्टया सक्षम असणे काळाची गरज आहे. कारण स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी केवळ बौध्दिक परिपूर्णताच असल्याचे चालणार नसून संघर्षाची परिस्थिती, परीक्षेचा निकाल, आर्थिक व सामाजिक परिस्थिती या सर्व बांबीना सक्षमपणे तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्टयासुध्दा कणखर राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले ते जिल्हाधिकारी कार्यालय,सेतू समिती,नांदेड वाघाळा शहर मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे उद् घाटक  म्हणून बोलत होते.
            डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये व्याख्याते म्हणून अकलूज येथील बँक अधिकारी रुपेश जैन यांचे C-SAT व वर्तमानपत्रातील बातम्यांचे विश्लेषण या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रंसगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बालाजी चंदेल,शैलेश झरकर, मनपाचे ओंकार स्वामी यांची उपस्थिती होती. 
            व्याख्यात्याचे ग्रामगीता देऊन जयराज कारभारी यांनी स्वागत केल्यानंतर इतनी शक्ती हमे देना दाता या प्रेरणा गीताने शिबिरास सुरुवात करण्यात आली.
            आपल्या व्याख्यानातून रुपेश जैन यांनी महाराष्ट्र  सेवा आयोगाव्दारा विद्यार्थ्यांची अभियोग्यता (कल) चाचणी तपासण्यासाठी तो विद्यार्थी वेगवेगळया परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो आणि अशा स्थितीत त्याला दिलेली जबाबदारी कशी पार पाडतो याची विश्लेषण करण्याची प्रक्रिया श्री जैन यांनी विद्यार्थ्यासमोर विभिन्न वैशिष्टयासह मांडली. C-SAT हा पेपर व्यक्तीच्या स्वभावाचे विविध पैलू अभ्यासणारा पेपर असून व्यक्तीच्या ठायी आवश्यक सर्व क्षमतांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आयोग करीत असतो. श्री जैन यांनी याप्रसंगी स्पर्धा परीक्षेसाठी वर्तमानपत्रातील कोणत्या बातम्या वाचाव्या,कोणत्या सोडून दयाव्यात हे सोदाहरण विद्यार्थ्यांना सांगितले. सरतेशेवटी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्याख्यात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी तर सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अजय वटटमवार,कोंडिबा गाडेवाड, बाळू पावडे, रघु श्रीरामवार, सोपान यनगुलवाड, लक्ष्मण शेनेवाड, विठ्ठल यनगुलवाड, अभिजित पवार यांनी सहकार्य केले.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...