Thursday, November 10, 2016

कौटुंबिक न्यायालयात विशेष शिबीर संपन्न
नांदेड , दि. 10 :- कौटुंबिक न्यायालय नांदेड व अभिवक्ता संघ कौटुंबिक न्यायालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश गोविंद वायाळ यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ श्रीमती डॉ. तेजल दोशी व समाजसेविका श्रीमती मथू सुरेश सावंत यांनी दांम्पत्यांना मार्गदर्शन केले व कौटुंबिक खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी प्रोत्साहित केले. नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष मिलिंद एकताटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपिठावर अभिवक्ता संघ कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्ष शिवाजी वडजे यांचीही उपस्थिती होती.
सुरवातीला प्रमुख न्यायाधीश गोविंद जी. वायाळ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाची भुमिका व अपेक्षा व्यक्त केली. समुपदेशक श्रीमती प्रतिभा काचेवार, श्रीमती राधा गावारे, श्रीमती शितल उदगीरकर यांनी समुपदेशन केले. कार्यक्रमास पक्षकार, विधिज्ञ आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित पक्षकारांपैकी जास्तीत जास्त पक्षकारांनी शनिवार 12 नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय महालोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली काढली जातील असा आशावाद व्यक्त केला.
 ॲड ऋषीकेश संतान, ॲड. शफीक खान, ॲड वर्धमान सोनटक्के, ॲड विक्रम राजे शिंदे, ॲड पल्लवी औरादकर, ॲड अंबादास बडगे, ॲड जयेश पाटील, ॲड चंद्रशेखर राजेवार, ॲड आरेफा अली आणि कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ॲड. मुजाहिद सय्यद यांनी सुत्रसंचालन केले. ॲड. अस्मिता वाघमारे यांनी  आभार मानले.

00000000
सहकार सप्ताहानिमित्त सोमवारपासून
जिल्ह्यात कार्यशाळा व विविध कार्यक्रम
नांदेड , दि. 10 :- सहकार विभागाच्यावतीने 14 ते 20 नोंव्हेंबर 2016 या कालावधीत 63 वा सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यंदा “शाश्वत विकासात सहकाराचे योगदान” या संकल्पनेवर सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यशाळा व संस्थांच्या यशोकथांचे सादरीकरण होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कळविली आहे.
सहकार सप्ताहामध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेत त्या-त्या क्षेत्रातील दोन यशस्वी सहकारी संस्थांच्या यशोगाथेचे सादरीकरण, तज्ज्ञाचे मार्गदर्शन, सहकारी संस्थांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना, भविष्याचे नियोजन याबाबत तज्ज्ञांचे व्याख्याने व परिसंवाद होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, सभासदांनी व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांनी केले आहे.
सहकार सप्ताहातील कार्यशाळेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.  सोमवार 14 नोव्हेंबर रोजी उद्घाटन नागरी सहकारी बॅका – ठिकाण मर्चट को-ऑप बॅक लि. नांदेड. मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी- नागरी , ग्रामीण बिगरशेती पतसंस्था- ठिकाण भुविकास बॅक लि. नांदेड. बुधवार 16 नोव्हेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था- ठिकाण नांदेड जिल्हा मध्य. बॅक लि. गुरुवार 17 नोव्हेंबर रोजी सहकारी गृहनिर्माण संस्था व पणन सह संस्था- ठिकाण अशोकनगर गृहनिर्माण सह संस्था नांदेड. शनिवार 19 नोव्हेंबर रोजी सुतगिरण्या, हातमाग व यंत्रमाग संस्था- ठिकाण भुविकास बॅक लि. नांदेड.

0000000
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी
अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड , दि. 10 :-  मागेल त्याला शेततळे योजना नांदेड जिल्हयात सन 2015-16 पासून सुरु आहे. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची मूदत 13 मेपर्यंतच होती. पण या योजनेस आता शासनाने मुदतवाढ दिल्याने आँनलाईन अर्ज भरण्याची ही प्रणाली 10 आँक्टोंबरपासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने दिली आहे.
            इच्छुक लाभार्थ्यानी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज www.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना (प्रपत्र-2) डाऊनलोड करुन घ्यावेत व ऑनलाईन अर्जाची पोच पावती डाऊनलोड करुन स्वत:कडे ठेवावी.
   यामध्ये जास्तीतजास्त 30x30x3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15x15x3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. तसेच इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारमध्ये किमान 20x15x3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.आकारमानानुसार कमाल रक्कम 50 हजार रुपये इतकी राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतक-यांनी  मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
वैज्ञानिक संशोधनासाठीचे हवाई फुगे आढळल्यास
तात्काळ पोलीस, टपाल किंवा प्रशासनाशी संपर्क साधा
नांदेड, दि. 10 :- टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) हैद्राबाद यांच्यावतीने संशोधनासाठी हवाई फुगे प्रक्षेपित केले जाणार असून. असे हवाई-फुगे आढळल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी जवळचे पोलीस स्थानक, टपाल कार्यालय किंवा प्रशासनाशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. फुगे किंवा त्याच्याशी संलग्न उपकरणे हाताळू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. याबाबत त्यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासन, पोलीस विविध घटकांनीही सतर्क रहावे असेही संबंधीत यंत्रणांना निर्देशित केले आहे.
टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) यांच्यामार्फत 15 नोव्हेंबर 2016 ते 30 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये अंदाजे 10 हवाई-फुगे प्रक्षेपित केले जाणार आहेत. हे प्रक्षेपण रात्री 8 ते सकाळी 6.30 यावेळेत केले जाणार आहे. अशा हवाई-फुग्यांसोबत पाठविण्यात आलेली संशोधनासाठीची शासकीय उपकरणे पॅराशुटच्या साह्याने जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हे पॅराशुट व उपकरणे आढळल्यास आल्यास ते आहे त्याच स्थितीत ठेवण्यात यावीत. ही उपकरणे लाकडी तसेच धातुच्या चौकटीत बंदीस्त करण्यात आली आहेत. ही उपकरणे आहे त्याच स्थितीत राहू द्यावीत. व त्याबाबत टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) हैद्राबाद, दुरध्वनी क्रमांक (040) 27123978, 27122505 किंवा 27130019 किंवा फॅक्स – (040) 27123327 या क्रमांकाशी किंवा जवळचे पोलीस स्थानक, टपाल कार्यालय, जिल्हा प्रशासनाशी संबंधित तलाठी, तहसील किंवा सक्षम अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या फुग्यांशी संलग्न उपकरणांना हात लावू नये. यासंदर्भात माहिती देणाऱ्यास संबंधित संस्थेकडून माहिती देण्याचा खर्च व योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. या उपकरणावरही संपर्कासाठी पत्ता, दुरध्वनी क्रमांक, तार आदी माहिती देण्यात आली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत उपकरणास हाताळले जाऊ नये. ते जोखमीचेही ठरू शकते. त्यामुळे वेळीच माहिती देणाऱ्यास, खर्चापोटीची रक्कम दिली जाईल. पण उपकरण उघडले असल्यास, किंवा हाताळले असल्यास मात्र खर्च-बक्षिस दिले जाणार नाही.
नोव्हेंबर महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यापासून या प्रयोगात या फुग्यांचे प्रक्षेपण करणे सुरु होईल. हा एक वैज्ञानिक प्रयोग आहे. त्याबाबत विविध घटकांनी दखल घेऊन, ग्रामीण व सर्वदूर दुर्गम अशा परिसरातील नागरिकांनाही माहिती द्यावी, त्यांना असे फुगे व सोबत उपकरणे आढळल्यास नजीकच्या सक्षम शासकीय यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000
मराठी साहित्य सृष्टीच्या समृद्धतेत
दिवाळी अंकामुळे भरच - गवळी
जिल्हा ग्रंथालयात प्रदर्शनाचे उद्घाटन
नांदेड , दि. 10 :- दिवाळी अंकांनी मराठी साहित्य सृष्टीला समृद्ध केले. दिवाळी अंकातूच अनेक नवोदितांना साहित्यिक क्षेत्रात ओळख मिळाली, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गवळी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कथा-कथनकार दिगंबरराव कदम होते. जिल्हा ग्रंथालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमास कवी महेश मोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती.
            उद्घाटनपर भाषणात श्री. गवळी म्हणाले की , माहिती तंत्रज्ज्ञान युगाचा स्पर्श होण्याआधी, ग्रंथ आणि त्यातही दिवाळी अंक हेच साहित्यीक मेजवानीचे साधन होते. विशेषतः मराठीत दिवाळी अंकाची परंपरा मोठी आहे. दिवाळी अंक ही मराठी साहित्यीक विश्र्वाचे वैशिष्ट्य आहे. पुर्वी दिवाळी अंक विविध साहित्य प्रकारांनी नटलेले असत. आता मात्र विविध विषयांना वाहिलेली दिवाळी अंक उपलब्ध होऊ लागले आहेत. वाचन प्रेमींसाठी दिवाळी अंक आजही मेजवानी ठरतात. दिवाळी अंकातून लिहीत्या झालेल्या नवोदितांना साहित्य विश्र्वातही प्रवेश मिळतो, ओळख मिळते, असा अनुभव आहे. त्याअर्थाने दिवाळी अंकांचे मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोठे योगदान आहे, असेच मानावे लागेल.
यावेळी कवी श्री. महेश मोरे यांनी कविता सादर करून वाचनप्रेम, दिवाळी अंक यावर मार्मिक सादरीकरण केले. कथा-कथनकार श्री. कदम यांनी विनोदीबाज असलेली ग्रामीण कथा सादर करून, उपस्थितांना खळखळून हसविले.
सुरवातीला ग्रंथालयशास्त्राचे जनक रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शन आयोजनाबाबतची भुमिका विशद केली. प्र. के. सुर्यवंशी यांनी सुत्रसंचालन केले. अजय वट्टमवार यांनी आभार मानले. तत्पुर्वी जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहातील दिवाळी अंक प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी दोनशेहून अधीक दिवाळी अंकाची वैशिष्ट्यपुर्ण मांडणी करण्यात आली आहे.

00000

Wednesday, November 9, 2016

नोटांच्या बदलाबाबत नागरिकांनी घाबरून
जाऊ नये , बँकांनी-यंत्रणांनी सेवा देण्यासाठी दक्ष रहावे
जिल्हाधिकारी काकाणी यांचे आवाहन , विविध यंत्रणांची बैठक
नांदेड , दि. 9 :- भारत सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केलेल्या आहेत. पण या नोटा अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी शुक्रवार 11 नोव्हेंबर 2016 च्या रात्री बारा वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानुसार त्या स्विकारण्यात याव्यात व बँकांद्वारे या नोटा विहीत पद्धतीने बदलून देण्याची आणि रक्कम काढण्याबाबतही निर्देशित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सामान्य नागरिकांची अडवणूक होऊ नये यासाठी या यंत्रणांनी काळजी घ्यावी. तर नागरिकांनीही घाबरून न जाता व कोणत्याही आमिष, अफवांना बळी न पडता व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या निर्देशानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध यंत्रणा, बँकांचे अधिकारी-प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. गुंटूरकर,  रेल्वे, राज्य परिवहन महामंडळ तसेच पेट्रोप पंप चालक संघटनेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 
बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या सर्व यंत्रणांना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्ष रहावे असे निर्देशित केले. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये. अनावश्यकरित्या बँकामध्ये व्यवहारांसाठी गर्दी करू नये. रुग्णालये, औषध दुकाने, पेट्रोल-डिझेल आणि गॅस पंप, घरगुती गॅस, सरकारी बस सेवा, रेल्वे तिकीट, विमान तिकीट अशा विहीत केलेल्या विविध ठिकाणी शुक्रवार 11 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. त्याठिकाणी इंधन व औषध खरेदी करताना, पाचशे व हजाराच्या पटीत करणे सोईस्कर ठरेल. इंधन व औषधांसाठी समन्वयाने सुट्ट्यांपैश्यांच्या उपलब्धतेबाबत मार्ग काढण्यात यावा. शुक्रवार 11 नोव्हेंबर नंतर मात्र या जीवनावश्यक सेवांच्या ठिकाणीही जुन्या नोटांचा वापर करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले.
बैठकीत बँक तसेच उपस्थित विविध यंत्रणांना जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी येत्या दोन दिवसात काटेकोर काळजी घेण्यात यावी. पुरेसे कर्मचारी सेवा देतील व येणाऱ्या सामान्य नागरिकांचे पुर्ण समाधान होईल, अशी माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अशाही सुचना करण्यात आल्या. जुन्या नोटा बँकांमधून बदलून देण्यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे.तसेच व्यवहारांचा लेखा-जोखा असेल, तर अशा जुन्या नोटांच्या स्वरुपातील रक्कमा पुढे 30 डिसेंबर 2016 पर्यंत संबंधितांना खात्यात जमा करता येणार आहेत.
बँकामधून टप्प्या-टप्प्याने ग्राहक, खातेदारांना एटीएम व थेट बँकेतून रक्कमा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठीही भारतीय रिझर्व बँकेने पद्धत विहीत करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या गरजेपुरत्या रक्कम उपलब्ध होणार आहेत. पण अनावश्यकरित्या बँकेतून रक्कमा काढून घेण्यासाठी गर्दी करू नये. बँकांनी याबाबत ग्राहकांना-खातेदारांना माहिती द्यावी. मागणीनुसार चलन पुरवठ्यासाठी वेळीच कार्यवाही करावी, वरीष्ठ बँकांकडे सतत-संपर्क ठेवावा, असेही निर्देशित केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनीही ‘जिल्ह्यातील नागरिकांनी येत्या दोन दिवसात बँकीग व्यवहाराबाबत दक्ष रहावे. कोणत्याही आमिषाला व अफवांना बळी न पडता व्यवहार करावेत. घाई-गर्दी न करता व्यवहार करावेत. यामुळे चलन पुरवठ्याची परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी मदत होईल. जनतेने बँक यंत्रणा, प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून काळा पैसा आणि चलन व्यवहारातील गैरप्रकार निपटून काढून, राष्ट्र उभारणीत हातभार लागेल,’ असेही आवाहन केले आहे.

00000

Tuesday, November 8, 2016

दहावीच्या मार्च 2017 परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर
नांदेड, दि. 8  :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या मार्च 2017 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत.
परीक्षेस नियमित प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावेत.
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत नियमित शुल्कासह शुक्रवार 4 नोव्हेंबर ते सोमवार 21 नोव्हेंबर 2016  पर्यंत, शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत मंगळवार 22 ते सोमवार 28 नोव्हेंबर 2016 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची मुदत बुधवार 7 डिसेंबर 2016 आहे.  तर विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत मंगळवार 22 ते सोमवार 28 नोव्हेंबर 2016 पर्यंत, शाळांनी बँकेत चलन सादर करावयाची मुदत मंगळवार 29 नोव्हेंबर ते शनिवार 3 डिसेंबर 2016 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या तारीख बुधवार 7 डिसेंबर 2016 आहे.
मंगळवार 29 नोव्हेंबर ते बुधवार 7 डिसेंबर 2016 या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सलमध्ये मुद्रीत कराव्यात. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापक यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.  ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी. प्रचलित शुल्क बॅक ऑफ इंडियात जमा करुन बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत, विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करण्यात याव्यात. अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखादा विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल. आधार नोंदणी केली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरले नाही असे होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

0000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...